मुन्ना यादव प्रकरण: पोलिस स्वत: असुरक्षीत,जनतेची सुरक्षा काय करणार?
नूतन रेवतकर यांचा घणाघाती आरोप
शहरात एमडीच्या राजरोस व्यापाराचा मुन्ना यादवचाच आरोप: हे गृहमंत्र्यांचेच अपयश
गृहमंत्री फडणवीस राजीनामा का देत नाही? रेवतकर यांचा सवाल
नागपूर,ता.१० ऑक्टोबर २०२४: शहरभराच्या पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या मुन्ना यादव याला तडीपार करण्या ऐवजी,भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके हे त्यांच्या पक्षातील गुन्हेगारासाठी वारंवार पोलिस ठाण्यात पोहोचतात व पोलिस अधिका-यांवर रुबाब झाडतात,हे त्यांनी दुस-यांदा केले असून, मागे देखील याच गुंड प्रवृत्तीच्या त्यांच्या ‘खास’कार्यकर्त्यासाठी गणेशपेठ पोलिस ठाण्यात दटके धावून आले होते,आता पुन्हा तीन दिवसांपूर्वी धंतोली पोलिस ठाण्यात दटके यांनी धाव घेतली,अश्या गुन्हेगाराला पोलिसांनी तडीपार करावे व अश्या आमदाराला येत्या निवडणूकीत जनतेने राजकारणातून हद्दपार करावे,अशी मागणी व आव्हान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश सचिव नूतन रेवतकर यांनी आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत केले.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुन्ना यादव हे अतिशय ‘खास’कार्यकर्ता आहेत.दोन दिवसांपूर्वी मुन्ना यादवची दोन्ही मुले करण आणि अर्जून यांनी आपल्या सहका-यांसह त्यांच्या चूलत भावांवर सशस्त्र हल्ला केला.दोन्ही गटात हाणामारी झाली.यानंतर दोन्ही गट धंतोली पोलिस ठाण्यात पोहोचले त्या वेळी मुन्ना यादव याने पोलिस ठाण्यातच डीसीपी स्तराच्या पोलिस अधिका-याची कॉलर धरुन अरेरावी केली.पोलिसांनाच चक्क शिविगाळ करण्याची व दमदाटी करण्याची हिंमत मुन्ना यादवमध्ये येतेच कूठून?असा सवाल रेवतकर यांनी केला.
पोलिस हे कुठल्याही राजकीय पक्षाचे नोकर नसून ते जनतेच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत.परंतू,भाजपचा गुंड मुन्ना यादव व भाजपचा आमदार पोलिसांना आपल्या घरातील नोकर समजून ऐन पोलिस ठाण्यातच त्यांच्याशी अरेरावी करतात,दमदाटी करतात,वर्दीवर असणा-या पोलिस अधिका-याची कॉलर पकडतात.या पूर्वी देखील फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर भाजपच्या पदाधिका-याने पोलीस उपायुक्त यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती मात्र,गृहमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल न करण्याची सूचना देऊन, गुंडप्रवृत्तीच्या पदाधिका-यांना पाठीशी घातले व पोलिसांचे मनोबल खच्ची केले,असा अारोप रेवतकर यांनी या प्रसंगी केला.
मूळात जे पोलिस अधिकारी ऐन पोलिस ठाण्यातच स्वत:ची सुरक्षा भाजपच्या गुंडांपासून करु शकत नाही,ते जनतेची सुरक्षा कशी करणार?असा सवाल त्यांनी केला.नागपूर शहर क्राईम कॅपिटल होण्याचे कारण नागपूरकर जनतेला आता चांगल्याने उमजले आहे.शहरात महिलांविरुद्ध,अत्याचाराच्या,खूनाच्या घटना वाढल्या असून गृहमंत्र्यांचे अतिशय विश्वासू आमदार प्रवीण दटके मात्र, पदाधिकारी मुन्ना यादव आणि त्यांच्या गुंड मुलांना वाचवण्यासाठी धंतोली पोलिस ठाण्यात धाव घेतात,पोलिसांवर दबाव आणतात,त्यांना आमदारकीच्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे रेवतकर म्हणाल्या.
गंभीर हल्ला झाला असताना धंतोली पोलिसांनी केवळ कलम ३५३ सारखी किरकोळ कलम लावली.गंभीर घटनेच्या कलमा का लावल्या नाहीत?सर्वसामान्यांसाठी आणि भाजपच्या पदाधिका-यांसाठी कायदा हा वेगवेगळा आहे का? कौटूंबिक बाबतीत तलवारी चालतात का?
असा सवाल त्यांनी केला.आमचा पक्ष कधीतरी गुन्हेगारांच्या मागे गेलेला दिसला का?की पिडीतांच्या मागे दिसतो?असा सवाल त्यांनी केला.
सर्वात महत्वाचे म्हणजे मुन्ना यादव याने काल पत्रकार परिषद घेऊन,पोलिसांवरच आरोप केले की शहरात एमडी,गांजा यांची सर्रास विक्री होत आहे,अमली पदार्थ तस्करांविरुद्ध पोलिस निष्क्रिय राहते.हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच एकप्रकारे घरचा आहेर असून, गृहमंत्र्यांची पोलखोल स्वत: त्यांच्या गुंड पदाधिका-यांनीच केली असल्याचा टाेला रेवतरकर यांनी हाणला.अश्या निष्क्रिय गृहमंत्र्यांनीच पोलिसांची माफी मागून पदावरुन राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
गृहमंत्री फडणवीस यांच्या पक्षाच्या एका फार मोठ्या नेत्याच्या स्वीय सहायक(पी.ए)च्या दबावातून उमरेडचे पीआय अनिल राऊत यांची बदली करण्यात आली असल्याचा खळबळजनक आरोप याप्रसंगी रेवतकर यांनी केला.भाजप नेते तर सोडा त्यांच्या पी.ए.च्या दबावाला देखील नागपूरातील पोलिस प्रशासन बळी पडत असून, पोलिसांना महिन्याकाठी हप्ता वसूलीचे टार्गेट दिले जात असल्याचे व ज्यांनी ते स्वीकारले नाही,त्यांच्या बदल्या केल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप रेवतकर यांनी केला.भाजपच्या या भ्रष्टाचाराला एक पोलिस अधिक्षक देखील कंटाळला असल्याचा दावा त्यांनी केला.
खासदार क्रीडा महोत्सवात मुन्ना यादवच्या मुलाने एका सामन्यात पंचालाच बॅटने मारहाण करण्याची गंभीर घटना घडली होती,त्या घटनेत देखील गुन्हा दाखल झाला नाही,याकडे लक्ष वेधले असता,धंतोलीच्या घटनेत देखील गुन्हा दाखल झाला नसून फक्त ‘दिशाभूल’करतात आहे की गुन्हा दाखल झाला,मी दटकेंविरोधात आंदोलन केल्यामुळे माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ५० लोक पोलिस ठाण्यात दटके यांनी पाठवले होते,पोलिस हे इतके दबावात होते की त्यांनी मला १५ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठवली,मी पण स्वातंत्र्य दिनी संपूर्ण देशाचा कारभार बंद असताना कोर्टात जाऊन झेंडा फडकावेन असा दम पोलिसांना दिल्याने खळबळ माजली होती अशी माहिती यावेळी रेवतकर यांनी दिली.या घटनेवरुन लक्षात येतं की पोलिस हे किती दबावात काम करतात,असे त्या म्हणाल्या.
दटके आता मध्य नागपूरमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे,याकडे लक्ष वेधले असता,मध्यमधून दटके हे निवडून येणार नाही कारण त्यांची अरेरावी,दांभिकपणा याला जनता आणि पोलिसच नव्हे तर त्यांच्याच पक्षातील अनेक कार्यकर्ते कंटाळले असल्याचा दावा रेवतरकर यांनी केला.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दररोज ज्या जाहीराती प्रसिद्ध होत आहेत,त्या भूमिपूजनाच्या जाहीरातींमध्ये ही मुन्ना यादव यांचे छायाचित्र आहे,याकडे लक्ष वेधले असता,ज्या गुन्हेगारावर १४ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे,त्याला तडीपार करण्या ऐवजी गृहमंत्री फडणवीस यांच्या बरोबरीने जाहीरातीत स्थान मिळतंय,यांची ‘मिलीजुली सरकार’ असल्याची टिका त्यांनी केली.
कामगार किट एक थट्टाच झाली असून ,धंतोलीत मुन्ना यादव व लखन येरावार या पदाधिका-यांनी संगम चाळीतील घरोघरी घरकाम करुन कष्ट करणा-या अनेक महिलांना ही किट दिली नसून उलट अमर पॅलेस,भाजपच्याच कार्यालयातील एका फ्लॅटमध्ये राहणा-या महिलेला किट दिल्याचे प्रकरण घडले. धंताेलीसारख्या भागात ७० लाखांच्या फ्लॅटमध्ये राहणा-या एका मारवाडी कुटूंबातील महिला ही कष्टकारी कामगारांचा हक्क लाटते,लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते,इतकंच नव्हे तर आणखी एका योजनेसाठी येरावारकडे आपल्या नव-याचाही अर्ज भरुन ठेवते,याकडे कसे बघता?असा प्रश्न केला असता,हा प्रकार गणेशपेठ हद्दीत देखील झाला अाहे.गुजरवाडी झोपडपट्टीतील गरीब,कष्टकरी बायांना ही किट मिळाली नाही तर भाजपच्या पदाधिका-यांनी आपल्याच एका-एका घरात तीन-तीन,चार-चार जणांना पेटी,भांड्यांची किट वाटली,पावती भरलेल्या कष्टकरी महिलांनी जेव्हा त्यांना किट मागितली तर काँग्रेसकडे अर्ज भरला आहे तर तिथेच जा,असे सांगतात.हे त्यांच्या बापाच्या पैशातून देत नसून ही शासनाची योजना आहे,याची देखील चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.
पत्रकार परिषदेत शैलेंद्र तिवारी,अमित श्रीवास्तव,महेेंद्र भांगे ,राजू चव्हाण,संजय आखरे,महेश अंबरवाडे, आदी उपस्थित होते.
अनिल देशमुखांविरुद्ध बोलण्याची लायकी नाही-
याप्रसंगी बोलताना रेवतकर यांनी मुन्ना यादव हे कालच्या पत्रकार परिषदेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध बोलले की,ईडीच्या अटकेत तेरा महिने राहून आलेल्यांनी फडणवीसांवर बोलू नये मात्र,फडणवीस यांच्याच षडयंत्रातून अनिल देशमुख यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्वोच्च न्यायालयालयाला देखील त्यांच्यावरील आरोपात तथ्य आढळले नाही व त्यांना जामीन मिळाला.मुन्ना यादवसारख्या १४ गंभीर गुन्ह्यांची नोंद असणा-या गुंडाची अनिल देशमुख यांच्यावर बोलण्याची लायकी नसल्याचा घणाघात करुन, हिंमत असेल तर निवडणूकी पूर्वी अनिल देशमुखांना निर्दोष ठरवणारा चांदीवाल आयोगाचा दडवून ठेवलेला अहवाल जनतेसमोर
आणावा,असे आव्हान त्यांनी केले.मुन्ना यादव यांनी अंर्तमनात डोकावून बघण्याचे आवाहन अनिल देशमुखांना करण्या ऐवजी स्वत: यावर अंमल करावे,असा टोला त्यांनी हाणला.
……………………………..
तळटीप-
दुनेश्वर पेठेंची दांडी!
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे हे सलील देशमुखांसोबत प्रत्येक पत्रक़र परिषदेत मंचावर दिसतात मात्र,त्यांच्याच नावाने होणा-या आजच्या पत्रकार परिषदेत पेठे यांनी सपशेल दांडी मारली.रेवतकर यांनी अनेकदा फोन करुन देखील त्यांनी ओबीसींचे म्हात्रे नामक पदाधिका-यांसोबत व्यस्त असल्याचे कारण सांगितले.पेठे यांच्या सोयीने दूपारपासूनच एवढ्या गंभीर अाणि संवेदनशील विषयावरील पत्रकार परिषदेची, अनेक वेळा त्यांच्या कडून वेळ बदलण्यात आली होती.अखेर त्यांच्या सूचनेवरुन दूपारी ४ वा.पत्रकार परिषद अायोजित करण्यात आली असताना देखील त्यांची ‘दांडी’अनेकांना कोड्यात टाकणारी होती.अखेर रेवतकर यांनी एकट्यानीच मुन्ना यादव व आ.प्रवीण दटकेंच्या विरुद्ध खिंड लढवली व पेठे ‘अलिप्त’राहीले,यावर पत्रकार परिषदेनंतर चांगलीच चर्चा रंगली.