

ग्लोकल मॉल-नासुप्रमीधल करारानुसार ३७७ झाडेही प्रकल्पातून गायब:बिल्डर म्हणतो कुंडीत लावतो ते ही अर्धेच!नासुप्रने केले मान्य!
फडणवीसांच्या कार्यालयाचे पत्र…
नागपूर,ता.११ मार्च २०२४ : अमेरिकेच्या न्यूयार्क शहरात वर्ल्ड ट्रेड सेंटर (ट्वीन टॉवर्स) ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवादी हल्ल्यात भुईसपाट झाले,या घटनेने जग हादरुन गेलं होतं,अमेरिकेसारख्या विकसित देशाला त्याच ठिकाणी पुन्हा अश्या व्यवसायिक संकुलाची निर्मिती सहज शक्य असताना त्यांनी एवढी मोठी जागा त्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारक उभारुन तशीच ठेवली.दर वर्षी जगभरातून मृत पावलेल्यांचे आप्तजन त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करीत असतात.या स्मारकाची आठवण काढण्याचे कारण नागपूरातील सीताबर्डी या ठिकाणी पुणे-मुंबई येथील सुप्रसिद्ध बिल्डर खंडेलवाल यांच्यातर्फे‘वर्ल्ड ट्रेंड सेंटर ‘नावानेच भव्य असे ग्लाेकल स्केवर मॉल २०१२ पासून उभारले जात आहे.हा प्रकल्प उभारला जात असताना बुटी बंधू यांच्या या आठ एकर जागेवर नागपूर शहरातील ऐतिहासिक वैभव असणारे तीन हेरिटेज श्रेणीत मोडणारे दरवाजे,बाहूली विहीर तसेच दोनशे वर्षांपेक्षा अधिक वर्षांची अनेक झाडे या परिसरात होती.मात्र,काल केंद्रिय मंत्री नितीन गडकरी तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी यांच्या हस्ते रिगल टॉकीज समोरील एकमेव हेरिटेज उरलेल्या ऐतिहासिक दरवाज्याचे उद् घाटन पार पडले,यावरुन शहरातील अनेक इतिहासतज्ज्ञ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ही जागा बुटी बंधू यांची होती.ती त्यांनी विकसित करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासला हस्तांतरित केली होती.नासुप्रने पुण्यातील खंडेलवाल या बिल्डरला अनेक नियम,अटी व शर्थीसह ही जागा व्यवसायिक संकुल बांधण्यासाठी दिली मात्र,खंडेलवाल यांचा गोयल गंगा विकसित करीत असलेला ग्लोकल मॉल प्रकल्प हा सुरवातीपासूनच नियमबाह्यरित्या अनेक प्रशासकीय परवानग्यांच्या संदर्भात अनेक वादामध्ये अडकला.‘सत्ताधीश’ने या पूर्वी पुराव्यांसह यावर श्रृंखलाच प्रसिद्ध केली आहे.आता मात्र,हेरिटेज दरवाजाच्या उद् घाटनाचे श्रेय घेण्यासाठी नेते व प्रशासकीय अधिकारी यांची लगबग बघता,अनेक इतिहासतज्ज्ञांनी यावर तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे.
याच परिसरात ऐतिहासिक अशी बाहूली विहीर होती.अनेक दशके नागपूरकर ही विहीर बघण्यासाठी आपल्या पाल्यांना घेऊन येत असत.६० फूट खोल असणा-या या विहीरीत आत जाण्यासाठी पाय-या होत्या.याशिवाय भुयारी मार्ग होता.या विहीरीला तीन दरवाजे होते.आत मध्ये एक चौकोनी दरवाजा होता.१९९४ साली ही विहीर खोदत असताना सहा मजुरांना तांब्याचा पाईप गवसला.मध्यरात्री त्या मजुरांनी तो पाईप चपकून लंपास केला व नंतर विकून टाकला.हे सहाही मजूर यानंतर मृत्यू पावले,अशी आख्याकिका येथील भाडेकरु यांच्यात चर्चिली गेली होती.

(छायाचित्र : स्वार्थ आणि सत्तालोलूपतेची बळी पडलेली हीच ती हेरिटेज बाहूली विहीर! )
गोयल गंगाने हा प्रकल्प विकसित करताना या ठिकाणचे ऐतिहासिक वैभव सर्वात आधी धुळीला मिळवले.या विहीरीवर मलिक डेकोर नामक दूकानाचे बांधकाम करताना विहीरीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग व्यापला गेला.मात्र,शहरातील इतिहासतज्ज्ञांनी कठोर टिका करताच ही विहीर जशी त्या तशी न बांधता फक्त वरवर‘रिपेअरिंग’ करुन दिली!नागपूरकरांच्या पर्यटनासाठी असणारे एक ऐतिहासिक वैभव एक हेरिटेज वास्तू ही व्यवसायिक संकूलात दफन झाली.
या विहीरीच्या भवती बिल्डरने भवताल चौकट बांधून ठेवली असून एका ऐतिहासिक विहीराला साधी विहीर करुन ठेवली!गडकरी यांच्या हस्ते नागपूरकरांचे वैभव असणा-या ऐतिहासिक विहीरीचे उद् घाटन झाले असते तर नागपूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला असता मात्र,असे घडले नाही.ही विहीर बघण्यास फार लांबून लाेक येत असे,असे अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात.या विहीरीचे बांधकाम सर्वसामान्यांना चकीत करणारे होते.या विहीरीत आत जाण्यासाठी दोन मार्ग होते.एक पायदळ तर दूसरा भुयारी मार्ग होता.

(छायाचित्र : गोयल गंगाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेले पत्र.याच पत्रावर योग्य ती कारवाई करण्याचे पत्र उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून नासुप्रला देण्यात आले)
याशिवाय ज्या रिगल टॉकिज समोरील ऐतिहासिक दरवाज्याचे उद् घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले तसे आणखी दोन दरवाजे त्या परिसरात होती.एक दरवाजा दारव्हेकरांच्या दूकानासमोर तर दूसरा दरवाजा भावनगरीजवळ होता.रिगल टॉकिज समोर तिसरा दरवाजा होता.या दरवाज्यांमध्ये पूर्णत: पुरातन काळातील दगडांचा वापर केला गेला होता.याच दगडांनी या भागातील संपूर्ण घरेच वसलेली होती.या दरवाज्याचे लोखंडी गेट,पायवा हे अतिशय पुरातन अश्या झाडांनी निर्मित होते.दहा माणसे देखील उचलू शकत नव्हते एवढे त्या ऐतिहासिक दरवाज्याचे वजन होते.
याच ऐतिहासिक दरवाज्यातून शेगावीचे संतश्रेष्ठ गजानन महाराज बुटींच्या वाड्यात राहावयास आले होते.बुटींच्या जामदारांकडे असणा-या तहखान्यात १० ते १५ फूट खाली तलवारी,भाले इत्यादी शस्त्रास्त्रे लपून ठेवण्यात आली होती.हे सगळं वैभव कुठे गडप झालं?असा प्रश्न इतिहासतज्ज्ञ करीत आहे.
याशिवाय हा संपूर्ण परिसर दोनशे वर्षांपेक्षाही अधिक अश्या पुरातन झाडांनी वेढले गेले होते.नागपूर शहरातील एक फार मोठा हरित पट्टा या ठिकाणी होता,हे गुगल मॅपमध्ये स्पष्टपणे दिसून पडतो.मात्र,गाेगल गंगाने ग्लोक्ल स्केवअर मॉल विकसित करताना या ठिकाणची संपूर्ण हिरवळ उखडून फेकलेली दिसून पडते.नासुप्रने गोयल गंगाला दिलेल्या परमिट बिल्डिंगमध्ये विकासक या ठिकाणी ३७७ झाडे लावेल असे नमूद केलेले आहे.आता विकासकाने नासुप्रला पत्र दिले की ते ३७७ झाडे लावण्यास असमर्थ आहेत!

विकासकाने नासुप्रने नमूद केलेल्या ३७७ झाडांपैकी अर्धी झाडे कुंडीत लावली असून ती देखील मागच्या बाजूने कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत.उर्वरित झाडे लावण्यासाठी नासुप्रनेच बिल्डरला जागा ठरवून द्यावी,अशी आता पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे!गोयल गंगाच्या विकासकाने नागपूरातील सीताबर्डी येथे ग्लोकल मॉलच्या उभारणीत फक्त ऐतिहासिक वास्तूंच कायमचे नामशेष केले नाहीत, तर नागपूरच्या पर्यावरणाच्या -हासाला मोलाचा हातभार लावला असल्याचा आरोप पर्यावरणवादी करतात.३७७ झाडे ती देखील सावली देणारी(शेडी ट्री)लावण्याची नासुप्रची अट असताना त्या अटीला एखादा बिल्डर चक्क वाटाण्याच्या अक्षदा लावतो वरुन कुंडीत अर्धीच म्हणजे ११२ रोपटे लावतो,वरुन उर्वरित झाडे लावण्यासाठी नासुप्रलाच जागा मागतो,या मागे शहरातील नेत्यांचा आर्शिवाद व प्रशासकीय अधिका-यांची कृपाच म्हणावी लागेल,असा संताप आता व्यक्त केला जात आहे.हा जनतेच्या पैशांचा दूरुपयोग असल्याचा आरोप केला जात आहे.१९७५ च्या कायद्याचे सर्रास उल्लंघन गोयल गंगाने केलेले दिसून पडतंय.महत्वाचे म्हणजे नासुप्रने बिल्डरला इतर ठिकाणी झाडे लावण्याची देखील परवानगी दिली आहे!प्रकल्पासाठी आधी हेरिटेज झाडांची कत्तल करा,शहरातील मध्य भागातील फूफ्फूसे नष्ट करा,यानंतर त्या ठिकाणी पुन्हा हिरवळ निर्माण न करता दुर…कुठेतरी झाडे लावण्याची परवानगी मिळवा..ती ही लावली नाही तरी ‘राजाश्रयामुळे’ कोणीही,काहीही वाकडं करु शकत नाही,हा उद्दामपणा आणि हा उन्माद शहरासाठी आणि शहरातील जनतेसाठी घातक असल्याची टिका पर्यावरणवादी करतात.

(छायाचित्र : शहराचे नष्ट झालेले हिरवेगार फूफ्फूस!आता प्राणवायू कुंड्यांमधून मिळत असतो…!)
मूळात बुटी बंधूंची ही जागा गोयल गंगाने जास्त दाखवून जास्त एफएसआय मिळवण्याचा प्रयत्न केला.पुढे दूकानदारांना कबूल केलेल्या जागेपेक्षा कमी जागेत दूकाने बांधून देण्यात आली.शहरातील एका हेव्हीवेट नेत्याचा पाठींबा या बिल्डरला असल्यामुळे दूकानदार बिल्डरच्या विरोधात बोलण्याची हिंमत करीत नाही मात्र,दूकानदारांच्या मनात तीव्र संताप असल्याचे आढळून येते.बुटींचे सात भाऊ,आई मिळून ही संपूर्ण १०,२०० चौ.फू.ची जागा आहे मात्र,बिल्डरने ११,२०० चौ.फू.ची मोजणी दाखवली.जमीनीचे वेगवेगळे तुकडे असताना सिंगल प्रापर्टी कार्ड मागण्यात आले.ले आऊट मंजूर नाही,एरिया निश्चित नाही या कारणांमुळे नकाशामध्ये तफावत आढळ्याने बिल्डरने सादर केलेला नकाशा नासुप्रने रद्द केला होता.याशिवाय सिटी सर्व्हेकडून मिळालेली मंजुरी देखील रद्द झाली होती.या प्रकल्पाच्या संदर्भात ज्यांनी इमाने इतबारे काम केले त्या अधिका-यांची नासुप्रमधून उचलबांगडी करण्यात आली.या बिल्डरसाठी सगळं काही नियमात बसवणा-यांची वर्णी लावण्यात आली!

अनेक अटी-शर्थी व नियमांचा भंग केल्याने मनपाच्या अग्निशमन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र देखील या प्रकल्पाला मिळाले नव्हते.२०१९ पर्यंत १ ते २२ पर्यंतचेच नकाशे मंजूर झाल्याचे माहिती अधिकारात समोर आले.मात्र,सातत्याने नवनवे नकाशे मंजुरीसाठी बिल्डरकडून पाठवले जात आहे.स्टॅम्प ड्यूटीत १६ कोटींचा घोटाळा करण्यात आला.पहील्या माळ्यावर सार्वजनिक वापराची जागा सोडल्याचे मंजूर झालेल्या नकाशामध्ये नमूद असताना अशी कोणतीही जागा या प्रकल्पामध्ये बिल्डरने सोडलेली दिसून पडत नाही!आशिष एन-एक्स या दूकानाने तो संपूर्ण भाग व्यापलेला दिसून पडतोय.राजकीय संरक्षणात अनाधिकृत बांधकाम केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

२२.३५० उंचीचे सहा मजल्यांची परवानगी मिळाली असताना २५.९० एलबी,यूबी जी प्लस ६ साठीचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे त्यात ही साढे तीन मीटरचा फरक एकाही मजल्यात नाही,वारंवार नकाशे बदलणे,१०.६०० एेवजी १६.४०० चौ.फू.एफएसआय मंजूर करुन घेणे,जमीनीचा वापर कमर्शियल वापरासाठी करने,त्यातही सर्वात वरच्या मजल्यावर ‘थिएटर’थाटणे,एवढ्या मोठ्या प्रकल्पाला पाण्याचा पुरवठा कूठून झाला,वैध झाला कि अवैधरित्या झाला,रिगल टॉकीजच्या नावाने मीटर असणा-या पाण्याचा वापर कोणी केला?भारत सरकारच्या कायद्याप्रमाणे विना परवागनी कोणत्याही स्वरुपात भू-जलाचा वापर कोणत्याही प्रकल्पासाठी करता येणार नाही,एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी सर्वात आधी वीज पुरवठ्यासाठी सब-स्टेशन लावण्याची अट असतानाही जुने भाडेकरुच्या वीज मीटरवरुन वीज घेण्यात आली,कायद्याप्रमाणे नाग नदीपासून ९ मीटरची अट असताना गोयल गंगाला नाग नदीपासून ६ मीटर अंतरावर बांधकामाची परवानगी प्रदान करण्यात आली,.हेरिटेज असणा-या दरवाज्याचे नुतनीकरण करण्यात आले,या दरवाज्यापासून देखील अंतर कायद्याप्रमाणे ९ मीटरचे असताना गोयल गंगा प्रकल्पातील दूकाने व या हेरिटेज दरवाज्याचे अंतर फक्त ३ मीटर एवढे आहे!इतकेच नव्हे तर कोणत्याही प्रकल्पाला एक फूटपाथ असतो,जो सार्वजनिक वापरासाठी असतो,गोयल गंगाला हेरिटेज दरवाज्यासमोर फूटपाथ देखील नाही,याचा अर्थ मनपाच्या फूटपाथाची जागा देखील या प्रकल्पासाठी हडपण्यात आली,अभ्यंकर रोडवर सेंटर पॉईंटची जागा १२ ऐवजी ९ मीटर सोडली!
–
(छायाचित्र : अतिक्रमणाच्या विळख्यात रिगल टॉकिज समोरील जुने वैभव!आता उरला चकचकीत दरवाजा)
२०१२ पासून सुरवात झालेला प्रकल्प वेळेवर पूर्ण न करता वारंवार मुदत वाढ मागितली.मुदत वाढीचे १६ कोटी रुपये माफ करा यासाठी आता बिल्डरचा लढा सुरु आहे.वारंवार नकाशे बदलण्याने नकाशे रद्द करण्यात आले होते.२०१० मध्ये दोन मजली संकूल व अंडरग्राऊंड दूकाने असा नकाशा देण्यात आला होता जो नियमात बसत नसल्याने रद्द करण्यात आला.पीसीआरमध्ये ९ मीटर जागा सोडायची होती.यानंतर हळूहळू इमारतीची उंची वाढत गेली.दोन मजली नंतर पाच मजल्यांचा नकाशा मंजूरीसाठी पाठवला,आता तो ६ मजली झाला आहे.सर्वात वर थिएटर असणार आहे!जागा नासुप्रची,मालक कोण तर बिल्डर!आता विभागीय अधिका-याकडे या बिल्डरची पैसे भरण्याची अटी व शर्थी विचाराधीन आहे.मूळात विभागीय अधिका-यांना ५० हजार रुपयांपर्यंतच सूट देण्याचा अधिकार असताना ५ कोटींची सूट देण्याचा अधिकार कोणी दिला?विकासकाचा लाभ म्हणजेच जनतेची हानी,एवढं साधं गणित विभागीय स्तराच्या अधिका-यांना कळत नसावे का?इतक्या सा-या अनियमितता असताना ग्लोकल मॉलला भोगवटा प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याची सूचना करणारे पत्र केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी नासुप्रला दिले होते.‘सत्ताधीश’ने ते पत्र आपल्या बातमीत प्रसिद्ध केले होते.
आता तर बिल्डर पूर्वी दोनवेळा भरलेले मुदतवाढीचे पैसेच नासुप्रला परत मागत आहे!वेळेवर जागेचा ताबा नासुप्रने दिला नाही,असा दावा बिल्डरने केला आहे.शासन व प्रशासनाची बिल्डर दिशाभूल करीत असल्याचा आरोप हाेत असून, अशीच दिशाभूल विकासकाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील केली असल्याचे बोलले जात आहे.उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयातून देखील या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे सूचनावजा पत्र नासुप्रला देण्यात आले .२०२३ मध्ये बिल्डर सांगतो की जागेचा ताबा उशिरा देण्यात आला.या पूर्वी मग मुदत वाढीचे पैसे दोन वेळा का भरले?२०१३ व २०१४ मध्ये जे मुदत वाढीचे पैसे बिल्डरने भरले ते देखील आता बिल्डरला परत हवे आहेत.यासाठी चक्क उपमुख्यमंत्री यांचीच दिशाभूल केली जात आहे.खरे तर सर्व नियमांची मोडमोड करणा-या व अटी व शर्थींचे पालन न करणा-या गोयल गंगा या विकासकाकडून जेव्हा त्यांनी पैसे भरले नाही तेव्हा २०१६ मध्येच नासुप्रने जागेचा ताबा परत घ्यायला हवा होता,मात्र असे घडले नाही.शहरात सात-बारा चालत नाही मात्र,बिल्डरने त्या ठिकाणची बुटी शाळा देखील नकशात दाखवली .५८ कोटींची जागा फक्त ५ कोटी ४० लाख रुपयांमध्ये घेतली.बर्डीसारख्या ठिकाणची आठ एकर जागा जिची किंमतच ४५-५० हजार प्रति फूट होती,ती इतक्या स्वस्तात एखाद्या बिल्डरला देण्या मागे काय हेतू होता?२०२१ मध्ये देखील ग्लोकल मॉलचा नकाशा रद्द करण्यात आला,अद्याप या प्रकल्पाची आखिव पत्रिका नाही.
माहितीच्या अधिकरात या प्रकल्पाबाबतचे अनेक गौडबंगाल उजेडात आले असून, राज्य माहिती आयोगाकडे गेल्या दीड वर्षांपासून या प्रकल्पासंबधीची अपील पडून असल्याचे सूत्र सांगतात.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देखील या प्रकरणाची तक्रार पडून आहे,काहीच हालचाल नाही. परिणामी,आता या प्रकल्पासंबधी उपमुख्यमंत्र्यांकडून ‘योग्य ती कारवाई’ची सूचना असणारे पत्र तसेच गडकरी व नासुप्र सभापतींकडून एकमेव नुतनीकरण झालेल्या हेरिटेज दरवाज्याचे उद् घाटन यामुळे जनता,इतिहासतज्ज्ञ तसेच पर्यावरणवाद्यांमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे.यात आणखी एक गौडबंगाल म्हणजे शहरातील ज्या हेरिटेज वास्तूंचं जतन व संरक्षण करण्याची जवाबदारी हेरिटेज समितीकडे असते त्या हेरिटेज समितीचे अध्यक्षच गोयल गंगाचे वास्तूविशारद(आर्किटेक्ट)आहेत……!
इतक्या नावजलेल्या बिल्डरसोबत लढण्याची ताकद नसलेले बुटींचे भाडेकरु व दूकानदारांना २०१० पासून ज्याप्रमाणे जागा रिकामी करण्यासाठी हतकंडे वापरण्यात आले,त्यावरही ‘सत्ताधीश‘ने विस्तृत बातमी प्रसिद्ध केली होती.सर्वात आधी तर मनपाच्या झोन अधिका-यांना हाताशी धरुन त्यांचे नळ कापण्यात आले,ड्रेनेज लाईन बुजवण्यात आली.वीज कापण्यात आली.बिल्डरच्या गुंडांकरवी दमदाटी करण्यात आली.गुंडांनी तिथेच मुक्काम ठोकला होता.बुलडोजरचा पंजा मारुन जागा सोडून न जाणा-या भाडेकरुंच्या जुन्या घरांवरील कवेलू पाडण्यात आले.हाकेच्या अंतरावर असेलेले सीताबर्डी पोलीस ठाण्याचा आतपर्यंत,भ्रष्ट व्यवस्थेशी लढू न शकणा-या सर्वसामान्य भाडेकरुंचा आवाज पोहोचलाच नाही,पोलिस ठाण्याच्या आतही जाण्यास त्यांना त्याकाळी पोलिसांनी मज्जाव केला होता!जीवाच्या भीतीने अनेकांनी कोणताही मोबदला न मिळवता जागेचा ताबा सोडला.२०१२ साली झाडून पुसून नागपूर शहरातील सर्वच वृत्तपत्रात ‘गाेयल गंगा‘प्रकल्पाच्या जाहीरातींनी पानेच्या पाने व्यापली होती,परिणामी त्या भाडेकरुंचे ’आर्त रुदन’ सर्वसामान्य वाचकांपर्यंत देखील पोहोचू शकले नाही….!त्या काळी डिजिटल मिडीया असता तर कदाचित चार पिढ्यांचे वास्तव्य असणा-या पावणे दोनशे भाडेकरुंना गोयल गंगा नावाचा विकासक हा इतक्या सहजतेने देशाेधडीला लाऊ शकला नसता,भाडेकरुंची फसवणूक,दूकानदारांची फसवणूक,नासुप्र अधिका-यांवर मुदत वाढीचे पैसे परत करण्याची शिरजोरी,२०२३ पासून १६ कोटींचा भरणा करण्यास अरेरावी,उपमुख्यमंत्री फडणवीस यांची दिशाभूल,गडकरींच्या हस्ते ऐतिहासिक,हेरिटेज दरवाज्याचे उद् घाटन यावर खरमरीत टिका इत्यादी या सर्व बाबीं समाज माध्यमांवर पुन्हा एकदा उमटल्या असल्याचे दिसून पडतंय.
………………………………………………..
…………………………………………………….




आमचे चॅनल subscribe करा
