फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशहेरिटेज ‘मोरबी‘ हेरिटेज ‘फूटाळा’:प्रकल्प कि निवडणूक फंडे!

हेरिटेज ‘मोरबी‘ हेरिटेज ‘फूटाळा’:प्रकल्प कि निवडणूक फंडे!

Advertisements

समाज माध्यमांवर संतापाचा महापूर

नागपूर,ता.३१ ऑक्टोबर २०२२:गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर बांधलेला झुलता पूल रविवारी संध्याकाळी तुटल्याने, पुलावर असणा-या जवळपास १३७ पर्यटकांचा नदीत पडून मृत्यू झाल्याची अतिशय दूर्देवी घटना घडली व समस्त देश हळहळून उठला,मूळात एखाद्या खासगी एजंसीला असे प्रकल्प चालविण्यासाठी देणे, ते ही शहरातील ग्रेड वन सारख्या ऐतिहासिक व हॅरिटेज नैसर्गिंक संसाधनाचा सत्यानाश करुन,यावर आज चांगलेच तोंडसुख नेटीझन्सनी घेतले.मोरबीसारखी दुर्घटना नागपूरात फूटाळावरही होऊ शकते,अशी भीती व्यक्त करीत या ही ठिकाणी एका खासगी एजंसीलाच काम देण्यात आले असल्याची चर्चा देखील या निमित्ताने उमटली.

ज्या हेरिटेज वास्तू व संसाधनांना कायद्यानुसार धक्का ही लाऊ शकत नाही तरी देखील काही राजकीय ‘वजनदार’नेते हे आपला प्रभाव वापरुन सगळे कायदे कानून,नियम धाब्यावर बसवून ‘नेटाने’हेरिटेजचा सत्यानाश करुन प्रकल्प राबवतात,अशात कोणतीही दूर्घटना घडली तर त्यात मारला जातो तो मात्र सामान्य माणूसच,यावर देखील समाज माध्यमात आज चांगलाच संताप व्यक्त झाला.

मोरबीचा पूल हा देखील हॅरिटेज श्रेणीत मोडत होता.पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू असणारा हा पूल तब्बल १४० वर्ष जुना होता.त्याची लांबी ७६५ फूट होती.हा पूल ब्रिटीश काळात बांधला गेला असून त्यावेळी साढे तीन लाख रुपयांचा खर्च आला होता.हा पूल याच वर्षी सहा महिने बंद ठेवण्यात आला व त्याची डागडूजी करुन चारच दिवसांपूर्वी पर्यटकांसाठी तो पुन्हा खुला करण्यात आला.या डागडूजीसाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले.पुलाच्या देखभालीची जबाबदारी ‘ओरेवा’ग्रुपकडे देण्यात आली असून या कंपनीने तेथील महानगरपालिकेशी २०३७ पर्यंतचा करार केला होता,हे विशेष.

तारांच्या सहाय्याने उभारलेल्या आणि केवळ पादचा-यांसाठीच असलेल्या या पुलावर दुर्घटनेच्या वेळी पाचशेच्या जवळपास पर्यटक होते.महत्वाचे म्हणजे एका वेळी फक्त शंभर लोकांचीच क्षमता असणा-या परंतु ५०० पर्यटकांना एकाच वेळी ओरेवा कंपनीच्या तिकीट विक्री अधिका-यांनी व कर्मचा-यांनी १२ व १७ रुपयांची तिकीटे विकली होती.या झुलत्या पुलावर क्षमतेच्या बाहेर वजन झाल्याने व पर्यटकांचा भार न पेलविल्यामुळेच पूल तुटला तर पुलावरील काही तरुण या पुलाला जोरजोरात हलवित होती, असे आता आरोप प्रत्यारोप होत आहे.

या दुर्घटनेसाठी फक्त कंपनीच्या अधिकारी,सरकार,ठेकेदारांना दोषी धरायचे की वीजेचे बल्ब,भिंतीवरील घड्याळी व मच्छर मारण्याचे रॅकेट बनविणा-या परंतू या बाबतीतील एका अनुभव शुन्य कंपनीला एवढी मोठी जबाबदारी सोपविण्याचा घाट घालणा-या व मधली ‘टक्केवारी’खाणा-या राजकीय नेत्यालाही दोष द्यायचा,यावर आता समाज माध्यमात टिकेची झोड उठली आहे.

र्निदोष नागरिकांच्या जीवावर उठू शकणा-या एवढ्या मोठ्या व महत्वाच्या प्रकल्पांच्या जबाबदा-या राजकीय हस्तक्षेपातून व अर्थकारण साधण्यातून खासगी कंपन्यांना कश्‍या काय दिल्या जाऊ शकतात,यावर आता चांगलाच रोष व्यक्त होत आहे.

मोरबीच्या दूर्घटनेत हकनाक बळी केलेले अनेक तरुण हे १८,१९ वर्षांचे आहेत,ते देशाचे भविष्य होते,अनेक महिला व बालकांचा यात जीव केला.तेथील रुग्णालयात प्रेतांचा खच बघता अवघा देश स्तब्ध झाला आहे.दिवाळी,त्यात उर्स,त्यात रविवार त्यात गर्दीसाठी कोणतेही नियोजन नसणे,हे सगळे योगायोग जुळून आलेत.खासगी कंपनीने फक्त नफा कमविण्यासाठी क्षमतेबाहेर तिकीटे वितरीत केली.

नागपूरातील फूटाळासारख्या हेरिटेज असणा-या ऐतिहासिक स्थळावर देखील जे नियमबाह्य बांधकाम,प्रेक्षकांची गॅलरी,कमर्शियल कॉम्पेलक्स,दूकाने,स्वच्छतागृहे एका खासगी विकासकामार्फत बांधण्यात आली व लवकरच या देखील ठिकाणी व्यवसायिक दराने फाऊंटेन शो सुरु होणार आहे,यावर देखील आज समाज माध्यमात टिकेचा सूर उमटला.

फूटाळा हा देखील ग्रेड वन हेरिटेजच्या श्रेणीत येत असताना या ठिकाणी कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम तर दूर,डागडूजीसाठी देखील परवाग्या घ्यावा लागत असतात, मात्र राजकीय दबावाखाली सगळे ’नीती-नियम ’आणि ’कायदे कानून’वेशील टांगून, फूटाळ्याचे नैसर्गिक सौंदर्य पूर्णत:संपुष्टात आणण्यात आले एवढंच नव्हे तर आज या ठिकाणी ‘फूकट’फाऊंटन शो दाखविला जात असला तरी लवकरच येथील खासगी विकासक ३०० रुपये प्रति व्यक्ती तिकीट आकारुन नफा कमविणार असल्याने,या ही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक बसवल्याने होणा-या दूर्घटनेसाठी जबाबदार कोण असेल?असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

ज्याप्रकारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबीच्या दूर्घटनेसाठी खेद व्यक्त करीत मृतकांप्रति श्रद्धांजली वाहीली तीच वेळ नागपूरात या अश्‍या प्रकल्पांमुळे येणार नाही,कशावरुन?अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.कारण मोरबीच्या पुलाचे डागडूजीनंतर उद् घाटन पंताप्रधानांच्याच हस्ते चारच दिवसांपूर्वी झाले होते,हे विशेष !गुजरातमध्ये पुढील महीन्यातच विधान सभेच्या निवडणूका आहे व त्याच पार्श्वभूमीवर सगळे नीती नियम धाब्यावर बसवून फक्त लोकप्रियतेसाठी व निवडणूकीत स्वत:च्या पक्षाला फायदा मिळावा यासाठी तब्बल दीडशे कुटुंबांतील कुटुंबियांच्या आयुष्यात कायमचा अंधार पसरविण्यात आल्याची टिका समाज माध्यमात उमटली आहे.

विकासाच्या नावावार पर्यावरणाचा समूळ नाश करणा-या प्रकल्पांचा विरोध करणा-या नागपूरातील पर्यावरण वाद्यांनाच ‘शहरी नक्सली’ तसेच ‘पर्यावरण माफिया’म्हणे पर्यंतची मजल काही राजकीय नेत्यांनी व त्यांच्या चाटूकारांनी गाठली असल्याचे प्रसार प्रचार माध्यमातील बातम्यांच्या स्वरुपात उमटल्याचं दिसून पडतंय.त्यामुळेच मोरबीसारख्या घटना घडतात त्यावेळी फूटाळ्यासारख्या प्रकल्पाबाबत देखील शहरातील काही जागरुक तसेच बुद्धिजीवींचे मन सांशक होतं व समाज माध्यमावरही याचे प्रतिसाद उमटताना दिसतात.

अजनीवनचा प्रकल्प जरी प्रसार प्रचार माध्यमांमध्ये गुंडाळला असल्याचे प्रसिद्ध होत(केल्या जात) असले तरी हाच प्रकल्प आता मागच्या दाराने रेल्वेच्या नावाखाली येत असल्याचीही चर्चाही समाज माध्यमात उमटली आहे.

यासाठीच एका कद्दावर नेत्याने आपली समस्त युक्ती आणि शक्ती वापरुन ‘आपल्या‘माणसाची नियुक्ती रेल्वेच्या ग्राहक निवारण समितीत केली असल्याची कुजबुज व्यक्त केली जात आहे.या माणसाचा शब्द किवा सल्ला टाळणे रेल्वेच्या अधिका-यांच्या बापजाद्यांनाही टाळणे शक्य होणार नाही व अजनीवन हे आता रेल्वेच्या माध्यमातून मागच्या दाराने २०२४ च्या निवडणूकीपूर्वी नागपूरकरांच्या मानगुटीवर ‘येनकेन’ प्रकरणे बसविल्या जाईलच याची ‘खात्रीच‘पर्यावारणवादी समाज माध्यात व्यक्त करताना आढळून येत आहेत.

विशेष म्हणजे शहरातील या अनेकविध ‘विकास ’ नामक प्रकल्पांवर जो कोट्यावधींचा खर्च होत आहे त्याचा भुर्दंड तर तो ‘कर’ रुपात नागपूरकरांवर बसतच आहे याशिवाय अनेक हेरिटेज वास्तूंचा व नैसर्गिक संसाधनांचा बट्याबोळ करुन देखील ‘मोरबी‘सारखीच ‘जिविताची हमी ’ही मिळणार नसल्याचा चांगलाच संताप देखील व्यक्त होत आहे.

त्यामुळेच मोरबीसारख्या घटना या दुर्घटना नसून ‘राजकीय हत्याच‘असल्याचा संताप समाज माध्यमांत व नागपूरच्या अवकाशात उमटलेला दिसून पडतोय.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या