रमण विज्ञान केंद्रातील व्हिंटेज कार प्रदर्शनाला नागपूरकरांचा भरघोस प्रतिसाद
नागपूर,ता.२२ फेब्रुवरी २०२६: ‘चक्के पे चक्का,चक्के पे गाडी’,१९६८ साली ‘ब्रम्हचारी’चित्रपटातील हे मस्तीखाेर,उत्साहाने भारलेलं गाणं त्या काळी संपूर्ण भारतीय सिनेरसिकांना वेड लावून गेलं होतं,या गाण्यात नायक शम्मी कपूर यांच्या दिलखेचक अदांजापेक्षाही सिनेरसिकांना आवडली ती त्यांची चारचाकी क्लासिक गाडी. रसिकांना तीच किंबहूना त्याच मॉडलची गाडी आजही बघायला मिळाली तर!काेणाला नाही आवडणार?ज्येष्ठांना पुन्हा एकदा स्वत:च्या तारुण्यातील आठवणींमध्ये रमायला ,तर आजच्या तरुण पिढीला त्या काळातील देखण्या वाहनांना इतक्या जवळून बघण्याची उत्सुक्ता साधण्याला नक्कीच आवडेल.हीच दूर्लभ संधी शहरातील रमण विज्ञान केंद्र आणि तारामंडळ तसेच सेंट इंड विंटेज ऑटोमोटिव्ह असोसिएशनच्या सहकार्याने सलग तिस-या वर्षी देखील नागपूरकरांना आज रविवारी पुन्हा एकदा मिळाली.या प्रदर्शनातील काही वाहने तर शंभर ते सव्वाशे वर्ष जुनी आहेत.
सुभाष रोडवरील रामण विज्ञान केंद्राच्या भव्य परिसरात आज साठच्या दशकापासून तर विविध काळातील विंटेज कार व दूचाकींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनात त्या दशकांमधील आकर्षक व दूर्मिळ क्लासिक कार तसेच गतकाळातील पिढींमध्ये पराकोटीचे क्रेझ असणा-या विविध मोटारसायकल नागपूरकरांना पाहायला मिळाल्या.जुन्या काळातील तंत्रज्ञान,वाहनांची रचना हे सगळं नव्याने अनुभवण्याची संधी या प्रदर्शनातून नागपूरकरांना मिळाली.
हे प्रदर्शन तीन वर्षांपासून वाहनप्रेमी,विद्यार्थीगण तसेच कुटूंबियांसाठी एक आगळी-वेगळी पर्वणी ठरते.या निमित्ताने अनेक दशकांपासूनच्या देखण्या वाहनांना जवळून पाहण्याची आणि वाहनांच्या इतिहासातील अनुभव घेण्याची संधी नागपूरकरांना मिळत असते.परिणामी,यंदा ही सकाळपासूनच वाहनप्रेमींनी प्रदर्शनस्थळी अलोट गर्दी केली.
विविध रंगांची,विविध आकारांची ,विविध नावांच्या आकर्षक व्हिंटेज कार,बस,जीप आणि बाईक्स बघून ना ज्येष्ठांचा ना तरुणांचा पाय त्यांच्या समोरुन पुढे निघत होता.
लाल रंगाची आकर्षक मर्सिडीज बघून अनेकांना राजेश खन्ना आठवून गेला.तर जीप बघून ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू’हे गाणं आठवून गेलं.व्हिंटेज बाईक बघून ’जिंदगी एक सफर है सुहाना’हे त्या सुपरस्टारचं गाणं आठवलं नसतं तर नवलच.यानंतरचा सुपरस्टार सदीचा महानायक याचे ‘मुकद्दर का सिंकदर ’मधले गाणे ही ’रोते हूये आते है सब’ नकळत ओठांवर तरळले.‘जखमी’चित्रपटात सुनील दत्त आणि आशा पारेखवर ज्या कारमध्ये बसून अख्खे गीत ’आओ तुम्हे चांद पे ले जाये’चित्रित झालं,त्या कारचा ही शाेध घेत ज्येष्ठ वाहनप्रेमी जणू चंद्र गवसल्याचा आनंदात दिसून पडले.
तरुणांसाठी तर ही एक खूप आकर्षक पर्वणीच होती.प्रदर्शनातील प्रत्येकच बाईक समोर त्यांना सेल्फी घ्यायचा होता,इतक्या आकर्षक बाईक्स प्रदर्शनात होत्या.लहान मुलांना तसं ही गाड्यांचं खूप आकर्षण असतं.त्यामुळे त्यांना उघड्या जीप्स,बाईक्सवर बसायचं होतं,पण परवानगी नव्हती.तरी देखील जमेल तसं ते वाहनांना हात लावून आनंद घेताना दिसून पडत होते.प्रत्येक वाहनांसमोर त्या वाहनाची माहीती दिली असल्याने,ती माहिती वाचण्यासाठीही वाहनप्रेमी वाहनांसमोर किती तरी वेळ थांबत होते.
या उपक्रमाविषयी रमण विज्ञान केंद्राचे शैक्षणिक अधिकारी चारुदत्त पुल्लीवार यांनी या व्हिंटेज कार एक्झीबिशनचं वर्णन ‘हेरिटेज ऑन व्हिल्स’असं केलं.या प्रदर्शनात १९०० पासून तर १९९० पर्यंतच्या ४० कार आणि ४० बाईक्स असल्याचे त्यांनी खास ‘सत्ताधीश‘सोबत बाेलताना सांगितले.या प्रदर्शनाला यंदा देखील नागपूरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला असलयाचे त्यांनी सांगितले.हे या प्रदर्शनाचं तिसरं वर्ष असलं तर दर वर्षी येणा-या वाहनप्रेमींची संख्या ही वाढत असल्याचे ते म्हणाले.सायंकाळी ५.३० पर्यंतच प्रदर्शनीची वेळ असतानाही अखेरच्या वेळेपर्यंतही प्रदर्शनीला भेट देणा-यांची संख्या ही लक्षणीय असल्याचे त्यांनी सांगितले.याचा अर्थ ही शंभर वर्ष जुनी व ऐतिहासिक वाहने बघून नागपूरकरांचं मन भरत नाही जर अधिकाधिक त्यांचे औत्सुक्य वाढत जात आहे हे लक्षात येतं.हा उपक्रम रमण विज्ञान केंद्र व सेंट इंड विंटेज ऑटोमोटिव्ह असोसिएशनच्या सहकार्याने होत असून,पुढील वर्षी देखील या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाला नागपूरकरांनी असाच भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
……………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
