
बिल काढले साढे पाच लाख:२५ दिवस ठेवले डांबून
२५ ऑगस्ट २०२० ची घटना
डॉ.बाळंखे यांनी पत्नीला ठरवले ‘बेअक्कल’ चेक नको नकदी भरा म्हणून ठणकावले
खेळ मांडला…..
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २० मे: करोना या विषाणूच्या संसर्गाने गेल्या वर्षीपासून जगात,भारतात व महाराष्ट्राच्या उपराजधानीत जो उच्छाद मांडला आणि संसर्गितांचे प्राण ज्या पांढ-या कोटमधील तथाकथित‘देवदूतांच्या‘म्हणजे डॉक्टर्स मंडळीच्या हातात सोपवला त्या देवदूतांपेक्ष्ा करोना विषाणू हा जास्त प्रामाणिक असल्याचे अनेक घटनांवरुन सिद्ध झाले आहे.करोना विषाणू हा प्राण घेण्यासाठी येतो हे सर्वांनाच माहिती आहे,मात्र प्राण वाचवणारे पांढरे कोटमधले देवदूत गेल्या वर्षीपासूनच रुग्णांची कशी आथिक लृटच करीत आहेत, त्यांच्या भीतीचा आणि अगतिकतेचा फायदा उचलून कशी भावनिक व मानसिक पिळवणूक करीत आहेत हे अनेक घटनांवरुन सिद्ध ही झाले आहे.
गेल्या वर्षी नरेश तिवारी हे ४७ वर्षीय गृहस्थ खामला येथील विवेका रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेत. २५ ऑग्सट २०२० रोजी भरती झाले त्यांना १८ सप्टेंबर २०२० रोजी सुटी मिळू शकली! त्यांना २० हजार रुपये डिपॉझिट भरण्यास सांगण्यात आले.दुस-या दिवशी त्यांच्या पत्नीला ते करोना पॉझिटीव्ह असल्याचे सांगून एक लाख रुपये भरण्याची सूचना करण्यात आली.

पत्नी या देखील करोना पॉझिटीव्ह असल्याने व फार जास्त धावपळ करण्याच्या स्थितीत नसतानाही त्या रुग्णालयात पोहोचल्या व एक लाखाचा धनादेश कॅश काऊंटरवरील सचिन नावाच्या कर्मचा-याला सुपुर्द केला.यावर सचिन याने या रुग्णालयाचे संचालक व नागपूर शहरातील सुप्रसिद्ध मेडीसिनतज्ज्ञ डॉ.बाळंखे यांना याबाबत कळवले.डॉ.बाळंखे हे स्वत: फोनवर साै.तिवारी यांच्याशी बालले ‘आपको अक्कल नही है क्या?हाॅस्पीटल्स मे चेक नही चलते सिर्फ कॅश चलता है,आपको कॅश ही जमा करनी पडेगी,तभी ट्रीटमेंट शुरु होगा!’
पत्नी यांनी त्या ही अवस्थेत आपल्या यजमानासाठी धावपळ करुन नातेवाईकांकडून कॅश आणून काऊंटरवर जमा केली.यानंतर अगदी दररोज त्यांना एक लाख रुपयांची मागणी येऊ लागली!
हद्द तर तेव्हा झाली २९ ऑगस्ट रोजी त्यांच्या यजमानांना एकाच दिवशी ८ रेमडिसिव्हिरचे इंजेक्शन लावण्यात आल्याचे सांगण्यात आले एवढंच नव्हे ४५ हजार रुपयांचे ‘तोशील’हे इंजेक्शन देखील त्याच दिवशी यजमानांना लावण्यात आल्याचे सांगितले!म्हणजे एकाच दिवशी विवेका रुग्णालयात नरेश तिवारी या रुग्णाला एकूण ९ इंजेक्शन लावण्यात आल्यायचे बिलमध्ये नमूद करण्यात आले!

दररोजची पैशांची मागणी,साढे आठ वर्षीय एकूलत्या एक मुलीला मोठय्ा जावेकडे सोडून दिल्याचा भावनिक उद्रेग,स्वत:पॉझिटीव्ह असल्याने धावपळ करण्यास असलेली असमर्थता या सर्व कारणांमुळे पत्नीने यजमानांना सुटी देण्यात यावी म्हणून घोषा लावला मात्र दररोज वेगवेगळी कारणे सांगून तब्बल २५ दिवस नरेश तिवारी यांना विवेका रुग्णालयाने एक प्रकारे उपचाराच्या नावाखाली ‘डांबूनच’ठेवले.
२५ दिवसांचे ५ लाख ३० हजार रुपयांचे बिल सौ.तिवारी यांच्याकडून विवेका रुग्णालयाने वसूल केले.मात्र जेव्हा बिल तपासले तेव्हा नरेश यांना या रुग्णालयात तब्बल ८-१० नव्हे तर चक्क १८ रेमडिसिव्हिर देण्यात आल्याचे नमूद होते!व त्याचे ५ हजार ४०० रुपयांच्या हिशेबाने ९५ हजार रुपयांचे बिल काढण्यात आले!
महत्वाचे म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या ऑडिटर्स यांनी देखील रुग्णालयाचे हे बिल‘ योग्य ’असल्याचा अहवाल दिला!बिलामध्ये ८ हजार रुपये सिटीस्कॅनचे लावले!सर्वात तापदायक बाब म्हणजे नरेश तिवारी यांना भरती करताना स्वत: डॉ.बाळंखे यांनी दर दिवसाचा बेडचा खर्च ७ हजार १५० रुपये सांगितले असताना बिलामध्ये दर दिवसाचा खर्च २० हजार रुपये लावण्यात आले होते.
याविरोधात महानगरपालिकेत कोणतीही दाद न मिळाल्याने सौ.तिवारी यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.तेथील डीसीपी यांनी रुग्णालयाला उत्तर देण्यास सांगितले,यामुळे विवेका रुग्णालयाने बिलामधील १ लाख ७ हजार रुपये कमी केलेत!याच रुग्णालय सोबतच न्यूरॉनसंबंधित देखील खटला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरु असल्याने विवेका रुग्णालयाने न्यायालयाच्या निर्णयानंतरच तिवारी यांच्या बिलाबाबत विचार केला जाईल,असे उत्तर सौ.तिवारी यांना कळवले.

मात्र सौ.तिवारी यांचा एकच प्रश्न विवेका रुग्णालयाला आहे,एकाच दिवसात ८ रेमडिसिव्हिर व एक ४५ हजार रुपयांचं ’तोशील’इंजेक्शन माझ्या नव-याला दिलेच कसे?२५ दिवसांत १८ रेमडिसिव्हिर इंजेक्शन्स नरेश तिवारी यांना दिला असल्याचा दावा कश्यावरुन खरा आहे?या इंजेेक्शन्सच्या दुष्परिणामांना जवाबदार कोण असणार?खरंच इंजेक्शन्स देण्यात आलेत का?पुरावा काय?कि फक्त बिलामध्ये नमूद केले इंजेक्शन्स दिले म्हणून?
या रुग्णालयाची एक शहनाज मॅडम सांगतात ‘गेल्या वर्षी रेमडिसिव्हिरबाबत शासनाचा कोणताही रुल नव्हता!त्यामुळे कितीही इंजेक्शन्स रुग्णाला देता येऊ शकत होते!’
महानगरपालिकेचे अति.आयुक्त जलज शर्मा यांनी देखील रुग्णालयाचे बिल हे मनपाचे ऑडीटर्स डॉ.शाझिया व डॉ.मेश्राम यांनी तपासल्याप्रमाणे योग्य असल्याचा निर्वाळा दिला!
याचा अर्थ खासगी रुग्णालये व मनपाचे ‘सेट’झालेले ऑडीटर्स,खासगी रुग्णालयांकडून मनपाच्या काही सत्ताधारी नेत्यांना दररोज मिळणारी ’एक लाख रुपयांची टक्केवारी’हे वारंवार होणारे आरोप खरे आहेत का?असे आता बोलले जात आहे.

दूर्देवाने एप्रिल २०२१ मध्ये करोनाच्या दुस-या लाटेत सर्वच वर्गातील करोना बाधित रुग्ण हे गेल्या वर्षीच्या तुलनेत आणखीनच जास्त भरडल्या गेलेत अन्…शहरातील या खासगी रुग्णालयांचा रुग्णांना लृटण्याचा ‘दर’ ५ लाखांवरुन १० ते १५ लाखांपर्यंत पोहोचला!स्वत:विम्स रुग्णालयाचे संचालक डॉ.राजेश सिंघानिया यांची एका रुग्णाचा मुलगा जयेश साखरकर याच्यासोबतच्या संभाषणाच्या व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमध्ये ते चक्क सांगताना आढळतात ‘मी तरी जे रुग्ण वाचू शकतात त्यांनाच भरती करुन बरा करुन देत आहे,माझ्या रुग्णालयाचा दरच पाच लाख आहे,किंग्जवे किवा सेवेन स्टार ही रुग्णालये तर तीन दिवसांनी जे रुग्ण मरणार असतात त्यांना ही ५ लाख रुपये घेऊन भरती करुन घेत आहे,मी तरी किमान असे तर करत नाही आहे…….!’
भारतातील नागरिकांचे हे दूर्देव आहे रेमडिसिव्हिरबाबत केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने गेल्या वर्षभरापासूनच कोणतेही प्रभावी धोरण जाहीरच केले नाहीत,याचा फार मोठा फायदा एप्रिल २०२१ च्या करोनाच्या लाटेत खासगी रुग्णलयांनी लाटला.रुग्णांचे तर हाल झालेच मात्र नातेवाईकांना रात्रभर एकेका रेमडिसिव्हिरसाठी रांगेत उभे राहवे लागल्याचे भीषण दृष्य प्रसार-प्रचार माध्यमात उमटले!आता दिल्लीतील एम्समधील डॉक्टर सांगतात आहेत,रेमडिसिव्हिर ही काही जादूची गोळी नाही,हद्द जर ही झाली आता आयसीएमआर कोरोना रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळल्यानंतर आता रेमडिसिव्हिर औषध देखील काढून टाकण्याच्या विचारात आहे,हे…..दिल्लीतील गंगाराम सर रुग्णालयाचे अध्यक्ष् डॉ.एस.राणा यांनीच सांगितले!
याचा अर्थ आयसीएमआरचे गेल्या वर्षीपासूनच रेमडिसिव्हिरबाबत कोणतेही ध्येय धोरण निश्चित नव्हते,याचा सर्वात जास्त भुर्दंड तब्बल १४ महिने नरेश तिवारी यांच्यासारख्या रुग्णांना बसला.
दिल्ली उच्च न्यायालयाने काल बुधवार दि. १९ मे रोजी करोना काळात कर्तव्य बजावणा-या न्यायालयीन अधिका-यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करताना राजकीय नेते आणि नोकरशहा ही मंडळी त्यांचे अपयश मान्य करणे कठीणच असते,हे त्यांच्या रक्तातच नाही,असे परखड मत नोंदवले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नेमलेल्या समितीपुढे खासगी रुग्णालयांविराेधात एकूण २४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.न्यायालयाची समिती स्थापन होताच महापौर दयाशंकर तिवारी यांना देखील शहरातील काही तज्ज्ञ डॉक्टर्स व नागपूर मनपाचे प्रशासकीय अधिकारी यांची समिती स्थापित करण्याची सद् बुद्धि सूचली त्यांच्या या ‘अचून टायमिंगवर’ देखील समाज माध्यमात बरीच बोचरी टिका उमटली.
खासगी रुग्णालयांद्वारे रुग्णांची होणारी आर्थिक पिळवणूक बघता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुमोटो पद्धतीने एक याचिका दाखल करुन घेतली.सुमारे १० दिवसांपूर्वी माजी न्यायाधीश गिलानी यांच्या अध्यक्ष्तेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली असून शहराचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे या समितीवर सचिव आहेत.रुग्णालयांबाबत कोणालाही तक्रार करायची असल्यास, तक्रारकर्त्याचे नाव,पत्ता,मेल आयडी,मोबाईल क्रमांक,रुग्णाशी असलेले नाते,रुग्णाचे नाव,वय,रुग्णालयाचे नाव,रुग्णालयात भरती झाल्याची व रुग्णालयातून सुटी झाल्याची तारीख या सर्व बाबींचा उल्लेख करणे आवश्यक अाहे.
तक्रारकर्त्यांनी आपली तक्रार collectornagpur2021@gmail.com आणि 8879686222 या व्हाट्स ॲप क्रमांकावर करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
सौ.तिवारी यांना देखील महापौरांनी स्थापन केलेल्या समितीवर विश्वास नसल्याने त्या वरील समितीत आपली तक्रार नोंदवणार असल्याचे खास ‘सत्ताधीश’ला सांगितले.
(रुग्ण श्री नरेश तिवारी व विवेका रुग्णालयाचे जनरल मॅनेजर यांच्याच बिलाला घेऊन झालेले संभाषण)




आमचे चॅनल subscribe करा
