फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजहाय कोर्टाच्या स्थगितीमुळे रश्‍मी बर्वे पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात!

हाय कोर्टाच्या स्थगितीमुळे रश्‍मी बर्वे पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात!

Advertisements


रश्‍मी बर्वे व वकील नारनवरेंचा दावा:स्थगितीमुळे सर्वच शासकीय यंत्रणांचे निर्णय ठरणार अवैध!
आता चेंडू सर्वोच्च न्यायालयात

विरोधकांच्या दबंगशाहीला न्यायालयाची चपराक: रश्‍मी बर्वे यांची टिका

नवनीत राणा भाजपच्या वॉशिंग मशीनमधून धूवून निघताच जात प्रमाणपत्राबाबत दिलासा:रश्‍मी बर्वे यांचा उद्वेग

बर्वे यांचा आरोप असणारा धृतराष्ट्र कोण?

नागपूर,ता.४ एप्रिल २०२४ :अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र व लोकसभा निवडणूकीचा उमेदवारी अर्ज रद्द झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या रामटेक लाकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्‍मी बर्वे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून आज दिलासा मिळाला असून, जात पडताळणी समितीद्वारे त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आलेल्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे.यानंतर तातडीने रश्‍मी बर्वे तसेच त्यांचे वकील नारनवरे यांनी आज दुपारी साढे तीन वाजता प्रेस क्लब येथे पत्र परिषद घेऊन हायकोर्टाच्या या निर्णयामुळे रश्‍मी बर्वे या पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात येणार असल्याचा दावा केला.

नारनवरे यांनी याप्रसंगी सांगितले की,आजचा उच्च न्यायलयाचा निर्णय म्हणजे रश्‍मी बर्वे यांना फार मोठा दिलासा आहे.जात प्रमाणपत्राला घेऊन गेल्या दोन महिन्यांपासून बर्वे यांच्या प्रतिष्ठेवर डाग लावण्याचे कटकारस्थान सातत्याने सुरु आहे.विविध प्रकारची संकटे त्यांच्यावर ओढवण्यात आली.त्यांच्या उज्जवल राजकीय भविष्यावर हेतुपुरस्सर आक्रमण करण्यात आले.ते आक्रमण आज निरस्त झाले असल्याचे नारनवरे यांनी सांगितले.काल सोमवारी उच्च न्यायालयात या प्रकरणाला घेऊन बळदंड लोकांनी ’ड्रामा’केला असल्याची टिका करीत,त्या जोरावर न्यायालयावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र,न्याय देवते पुढे ते अयशस्वी झाले,असे नारनवरे यांनी सांगितले.

घटनेच्या कलम २२६ अन्वये कोर्टाला अधिकार असून यात असत्य काहीच नव्हते, त्यामुळे आम्ही आमचे मुद्दे ठामपणे कोर्टासमोर मांडले.सर्वात पहीला आक्षेप तर आम्ही हाच घेतला की याचिकाकर्ता सुनील साळेव तसेच वैशाली देवडीया या प्रकरणात कोणत्याही प्रकारे बाधित झाले नाहीत किवा त्यांच्या मौलिक अधिकारांना बाधा पोहोचली नाही,तरी देखील त्यांनी रश्‍मी बर्वे यांचे दोन महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसतर्फे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेचा मुद्दा उकरुन काढला.कायद्याप्रमाणे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ज्यांच्या मौलिक अधिकारांवर अश्‍या प्रकरणात सरळ बाधा पोहोचत आहे तेच,याचिका दाखल करु शकतात.२०२० पासून रश्‍मी बर्वे या जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या तसेच अडीच वर्ष जि.प.अध्यक्षा पदावर होत्या त्या काळात कोणीही त्यांच्या जात वैद्यता प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला नाही.

दूसरा आक्षेप आम्ही हा नोंदवला,की २८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी होणार होती.त्यामुळे विरोधकांचा हा हेतूच होता की दूपारी ३ वाजेच्या आत रश्‍मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज हा जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवून स्पर्धेतून बाद करण्यात यावा आणि तेच घडले.शासकीय यंत्रणांचा गैरवापर करुन,प्रशासनाला हाताशी धरुन अवघ्या काही तासात दक्षता पथकातर्फे नोटीस पाठविण्यात आली,रात्री बेरात्रीपर्यंत बर्वे यांच्या नातेवाईकांकडे जाती संबंधीची चौकशी करण्यात आली,२० मार्च रोजी देवडीया यांनी जात वैधता समितीकडे तक्रार दाखल केली,२८ मार्च रोजी या समितीने बर्वे यांचे जात प्रमाण अवैध असल्याचा निर्णय देखील सकाळी दहा वाजता घोषित केला.असं आजपर्यंत समितीच्या इतिहासात कधीही घडले नाही.इतकी पराकोटीची तत्परता समितीने कोणत्याही प्रकरणात दाखवली नाही.घटनेच्या कलम ७ अन्वये उच्च न्यायालयाला अधिकार आहेत न्यायालय समितीला ही केस रि-ओपन करण्याचे आदेश देऊ शकते.मात्र,समितीने तातडीने रश्‍मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्रच रद्द केले.

राज्य माहिती आयुक्तांना कोणतेही संवैधानिक अधिकार नसताना त्यांनी या प्रकरणात समितीला चौकशीचे आदेश दिले.हे आदेश त्यांनी सत्र न्यायालयात सुनावणी सुरु असताना मागे ही घेतले आहेत.
२८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणीच्या दिवशी सकाळी १० वा.दक्षता पथकाचा अहवाल येतो.

आम्ही या प्रकरणासाठी तातडीने सत्र न्यायालया धाव घेतली मात्र,सत्र न्यायालयाने नियमित सुनावणीसाठी सोमवारी ही याचिका घेणार असल्याचे निर्देश पारित केले.२८ मार्च रोजी सकाळी ११ वा.आम्हाला ई-मेलने उमेदवारी अर्ज रद्द केल्याचा रिटर्निंग ऑफिसर उत्तर पाठवतात.निवडणूक अधिका-यांकडे आम्ही धाव घेतली असता दीड तास त्यांनी आमचे म्हणने ऐकून घेतले मात्र निवडणूकीसंबंधी त्यांना भरपूर कामे असल्याने ते वेळ देऊ शकले नाही.मात्र,रश्‍मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज त्यांनी रद्द ठरवला.

यानंतर आम्ही शुक्रवारीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.त्याद्वारे उच्च न्यायालयाला तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली.राज्य सरकारने देखील या प्रकरणात कॅव्हेट दाखल करीत आपली बाजू सुरक्षीत करुन घेतली.सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास तरी नकार दिला असला ,तरी सोमवारी उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी असल्याने त्यानंतर,गरज असल्यास सर्वोच्च न्यायालयात येण्याची मुभा रश्‍मी बर्वे यांना दिली आहे.

त्यामुळेच आम्ही उद्याच सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार असून एकमेव सर्वोच्च न्यायालयालाच अधिकार आहेत जे निवडणूक आयोगाला रश्‍मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे निर्देश देऊ शकतात किंबहूना रश्‍मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज त्यांचे पती व काँग्रेसचे अधिकृत ठरलेले उमेदवार श्‍यामकुमार बर्वे यांच्या उमेदवारी अर्जाची अदलाबदल करण्याची परवानगी देऊ शकतात.कोर्टाने राज्य माहिती आयोगाचे आदेश देखील खारिज केले.त्यामुळे ज्या आदेशांच्या आधारावर रश्‍मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र समितीने रद्द ठरविले तो निर्णय देखील अवैध ठरला असून रश्‍मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र पुन्हा लागू झाले आहे.जात वैद्यता प्रमाणपत्राच्या धनी रश्‍मी बर्वे पुन्हा एकदा झाल्या आहेत.हा आमचा सर्वात मोठा विजय असल्याचे ॲड.नारनवरे यांनी सांगितले.

रश्‍मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रिवाईव होणे हा त्यांचा संवैधानिक अधिकार असल्याचे ॲड.नारनवरे यांनी सांगितले.हायकोर्टाने दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाच्या आधारावर सर्वोच्च न्यायालय रश्‍मी बर्वे यांना फार मोठा दिलासा देऊ शकते.त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाला स्वीकारण्यास बाध्य करु शकते किवा त्यांच्या पतीच्या जागी त्यांचा अर्ज कायम करु शकते.१९ एप्रिल रोजी मतदान आहे त्यामुळे कलम ३२९ अन्वये सर्वोच्च न्यायालय स्वायत्त असणा-या केंद्रिय निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करु शकत नाही मात्र,सर्वोच्च न्यायालयाला जर रश्‍मी बर्वे यांच्या निवडणूक लढण्याच्या संवैधानिक अधिकारावर गदा आणण्यात आली आहे,हे लक्षात आल्यास फार मोठा दिलासा सर्वोच्च न्यायालय देऊ शकते,असे ॲड.नारनवरे म्हणाले.

अर्धी लढाई आम्ही जिंकली आहे.हायकोर्टाने आमच्या प्रत्येक आक्षेपाची नोंद घेतली आहे.हायकोर्टाच्या या स्थगिती आदेशामुळे रश्‍मी बर्वे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व देखील बहाल झाले असल्याचे त्यांनी सांगितले.प्रशासनाने ते त्वरित अमलात आणण्याचे आवाहन नारनवरे यांनी केले.

याप्रसंगी बोलताना,आज न्यायालयाने माझ्यासारख्या एका अतिशय सर्वसामान्य महिलेला जो दिलासा दिला आहे,तो न्याय फक्त रश्‍मी बर्वेला नसून न्याय देवतेवर विश्‍वास ठेवणा-यांना दिला असल्याचे रश्‍मी बर्वे म्हणाल्या.विरोधकांनी मी रामटेकमधून निवडणूक लढू नये म्हणून  कितीही कटकारस्थान केले,षडयंत्र रचले तरी विजय सत्याचाच होतो आणि ते आज न्याय देवतेने सिद्ध करुन दाखवलं असल्याचे त्यांनी सांगितले.विरोधकांनी रात्रीच्या रात्री माझे जात वैद्यता प्रमाणपत्र अवैध ठरवले,मला निवडणूकीपासून वंचित केले.कारण त्यांना भीती होती एका अनुसूचित जातीची महिला ही त्यांना चांगलीच टक्कर देईल एवढंच नव्हे, तर विरोधकांचा उमेदवार याच्यावर पराभूत होण्याची वेळ आली असती त्यामुळेच रात्रीच्या रात्री कटकारस्थानातून त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना हाताशी धरुन माझं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरविले.आज न्यायदेवतेने त्यांच्या तोंडावर एक चपराक दिली असल्याची टिका त्यांनी केली.

आपण कितीही बळाचा व सत्तेचा गैरवापर केला तरी ते विरोधकांना नेस्तनाबूत करु शकतो,असा त्यांचा समज आहे.मात्र,आजही भारतात संविधान आणि लोकशाही जिवंत आहे आणि याच संविधानामुळे आज आमच्यासारखे गरीब,सर्वसामान्य लोक न्यायदेवतेवर विश्‍वास ठेऊ शकतो.माझ्या काँग्रेस पक्षाने व माजी मंत्री सुनील केदार यांनी माझ्यावर विश्‍वास ठेऊन माझ्या पतीची उमेदवारी अधिकृत केली यासाठी मी त्या सर्वांचे आभार मानते.मी रामटेक मतदारसंघात अगदी लहानतल्या लहान घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहे.त्या विश्‍वासाचीच आज जीत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.गोरगरीबांचा आर्शिवाद व विश्‍वास हा भूतकाळात देखील माझ्यासोबत होता,आजही आहे व उद्याही राहणार असल्याचे बर्वे यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना रश्‍मी बर्वे यांनी उद्वीग्न होऊन, विरोधकांनी माझी मानसिक प्रताडना केली असल्याचा आरोप केला.महिलांची जेव्हा मानसिक प्रताडना होते तेव्हा तेव्हा या भारतभूमीमध्ये रामायण-महाभारत घडल्याशिवाय राहत नसल्याचे त्या म्हणाल्या.महाभारतामध्ये द्रोपदीचं जेव्हा भर सभेत वस्त्रहरण झाले तेव्हा कौरवांचा सत्यानाश झाला असल्याचे स्मरण त्यांनी करुन दिले.रामायणात देखील जेव्हा सीतेचे हरण झाले व सीतेच्या चारित्र्यावर जेव्हा शितोंडे उडविण्याचा प्रयत्न झाला तेव्हा प्रभू रामाने अहंकारी रावणाचा नाश केला.रावणाची लंकाच पूर्ण राख झाली.

आज त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष हा रश्‍मी बर्वेचे उत्पीडन करत आहे त्यामुळे भाजपचा देखील विनाश अटल आहे,असा इशारा याप्रसंगी रश्‍मी बर्वे यांनी दिला.हा श्राप एका गरीब महिलेच्या आत्म्याचा श्राप असल्याचे विधान त्यांनी केले.विरोधकांना वाटले की.रश्‍मी बर्वे निवडणूक रिंगणातून बाद झाल्यानंतर शांत बसतील तर त्यांनी लक्षात घ्यावे आम्ही सावित्रीबाई फूलेंचा वारसा असलेल्या लेकी आहोत.त्यांच्याच वारसा घेऊन आज रश्‍मी बर्वे त्याच ताकदीने विरोधकांसमोर उभी आहे.माझं मनोबल खच्चीकरण करण्याचा कितीही प्रयत्न विरोधकांनी केला असला तरी रश्‍मी बर्वे ही खचली नाही कारण,ग्रामीण भागातील माता-भगिनींचा विश्‍वास माझ्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांना माझी नव्हे तर ज्या नेत्याचा आर्शिवाद माझ्या डोक्यावर आहेत ते सुनील केदारांची भीती त्यांना वाटली.केदारांनी जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता घालवून एकहाती काँग्रेसची सत्ता आणण्याची किमया साधून दाखवली.त्यानंतर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला विधान परिषदेत पाठवले.शिक्षक मतदारसंघात देखील केदारांनी हीच किमया साधून भाजपच्या उमेदवाराचा पराभव करुन काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय सूकर केला.जास्तीत जास्त बाजार समित्यांमध्येही केदारांच्या नेतृत्वाचा ठसा उमटला आहे व ते केदारांच्या नेतृत्वात काम करताना दिसून पडतात. रामटेकच्या निवडणूकीत देखील हाच चमत्कार घडणार होता.

दलित महिलेकडून त्यांना हार स्वीकारायची नव्हती म्हणून विरोधक इतके गलिच्छ राजकारण खेळले,असा संताप त्यांनी व्यक्त केला.आज न्याय देवतेकडूनच त्यांच्या षडयंत्राला मात मिळाली असून माझ्या जात वैद्यता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या समितीच्या निर्णयाला कोर्टाने स्थगिती देऊन मला फार मोठा दिलासा दिला असल्याचे त्या म्हणाल्या.

बर्वे यांच्या आरोपातील धृतराष्ट्र कोण?

रश्‍मी बर्वे यांनी भाजपच्या शासनकाळातच मणीपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली,बिल्कीस बानोवर बलात्कार करणा-यांना मोकाट सोडून देण्यात आले,कुश्‍तीपटू महिला खेळाडूंवर अन्याय करणा-याला सर्वोच्च न्यायालयाची चपराक बसेपर्यंत पाठीशी घालण्यात आले त्याच धर्तीवर भाजपने माझा छळ केला आहे,असा आरोप केला.महिला विरोधी भाजप पक्षाचा २०२४ च्या निवडणूकीत नाश झाल्याशिवाय राहणार नसल्याचा दावा त्यांनी केला.माझी उमेदवारी रद्द करण्याकरिता मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच कोराडीचे बाहूबली नेते सतत पोलिस विभागावर दबाव टाकून वाटेल ते निर्णय घेण्यास बाध्य करीत आहेत.माझे पती शामकुमार बर्वे यांच्या विरोधात प्रचाराकरीता चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्हान सारख्या ग्रामीण भागात येत आहेत.येत्या १० एिप्रल रोजी त्यांची सभा तिथे होणार आहे.यातून त्यांची पराभवाची भीती व माझ्या विजयाचा विश्‍वास प्रतित होत असल्याचा टोला त्यांनी हाणला.

संपूर्ण काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी पक्ष(शरद पवार गट)शिवसेना(उद्धव ठाकरे गट) व इंडिया गठबंधन पक्षाच्या सर्व नेत्यांची ताकद व हिंमत माझ्या मागे आहे.सर्वोच्च न्यायालय निश्‍चितच आमची बाजू समजून घेईल,अशी अपेक्षा व्यक्त करीत ,मला एकाच गोष्टीची खंत राहील की,एका मागास वर्गीय स्त्रीची जात काढून ज्या पद्धतीचे राजकारण खेळल्या गेले.माझ्या दिवंगत पित्यावर ओरखडे उमटले,माझ्या पतीवर ,कुटूंबियांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस खात्याला हाताशी धरुन कटकारस्थान रचल्या गेले,कोराडीतील भाजपच्या दंबंग नेत्याने ज्या पद्धतीने दररोज पोलिस अधिका-यांवर दबाव टाकला,अश्‍या परिस्थितील नागपूरातील भाजपचे हेव्हीवेट नेते मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेत वावरले!

माझे नैतिक चरित्र हनन करण्यात आले मात्र, ते धृतराष्ट्रासारखे डोळे मिटून होते.इतिहास त्यांना देखील कधीच माफ करणार नाही,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्राची जनता ही अन्याय सहन करणारी नाही,योग्य वेळी योग्य उत्तर देणारी आहे,याची जाणीव विरोधकांनी ठेवावी,असा इशारा याप्रसंगी त्यांनी दिला.
…………………………..

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या