फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजहवाईन गिटार से सूर हरवले.....

हवाईन गिटार से सूर हरवले…..

Advertisements

 

‘द मॅन विथ सिगिंग गिटार ’योगेश ठाकर काळाच्या पडद्याआड

डाॅ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१३ फेब्रुवारी २०२२: शो च्या ठिकाणी ज्या-ज्या मैदानात योगेश ठाकर ऑकेस्ट्राची बस थांबायची तर रसिक श्रोते गर्दी करुन बघत असत बस मधून कोण-कोण उतरत आहेत?आपले आवडते गायक,वादक,निवेदक,नृत्यांगणा यांना बघताच श्रोत्यांचा जल्लोष त्या ठिकाणी टाळ्यांनी आणि शिट्यांनी व्यक्त होत होता.कलाकारांचे ऑटोग्राफ घेण्यासाठी श्रोत्यांची झुंबड उडत असे.हा काळ होता सत्तरीच्या दशकातला.त्या काळी ऑकेस्ट्रा कलावंतांना सेलिब्रिटीसारखा मान मिळत असे.टेलिविजन त्या काळी अस्तिवातच नव्हता त्यामुळे निखळ मनोरंजनाचे साधन म्हणून चित्रपट आणि ऑकेस्ट्रा ग्रूप्स हेच प्रसिद्धीच्या शिखरावर होते किंबहूना त्या वेळी रसिक श्रोत्यांच्या मनावर आपले अधिराज्य गाजवत होते.त्या वेळी नागपूर शहरात फक्त तीनच आॅकेस्ट्रा प्रसिद्ध होते कादर,योगेश ठाकर व मेलोडी मेकर्स.तिघांचीही सादरीकरणाची पद्धत फार वेगळी होती.यातही कादर व योगेश ठाकर हे स्वत:कलावंत असल्यामुळे संगीताची त्यांना खोलवर जाणीव होती.योगेश ठाकर हे स्वत:हवाईन गिटारचे ‘बादशाह’होते.प्रसिद्ध गुजराती उद्योगपतींचे सुपुत्र असणारे योगेश भाई यांनी मात्र मनापासून संगीतावर प्रेम केलं.त्यांचं हवाईन गिटार हे अतिशय बोलकं होतं,त्यांच्या बोटांचा स्पर्श होताच ते फक्त एक इंस्ट्रमेन्ट न राहता बोलायला लागत होतं.त्या झंकारातून मग ‘जागो मोहन प्यारे‘,‘मै तुलसी तेरे आंगन की’‘आजा आजा मै हूं प्यार तेरा’,‘मेरा नाम चिन चिन चूं’ आणि त्या-त्या काळी गाजलेल्या गीतांची धून लीलया निघत असे आणि श्रोते स्तब्ध होऊन,मंत्रमुग्ध होऊन तो स्वर्गीय अनुभव कानातच नव्हे तर मनात साठवून तृप्त होत असे.असा हा महान कलाकार,महान ऑकेस्ट्रा संचालक आणि तितकाच महान माणूस आज आपल्यामधूनन देहरुपाने निघून गेला आणि संपूर्ण नागपूरचं कलाजगत मनापासून हळहळलं.

योगेश ठाकर ऑकेस्ट्रा म्हणजे नागपूरकरांसाठीच नव्हे तर अनेक कलावंतांसाठी व मध्य भारतीयांसाठी एक ‘आख्याकिका’ होती.७० च्या दशकापासून तर २१ साव्या शतकातील संपूर्ण एक दशक अश्‍या ४० वर्षांचे सूरमयी योगदान या महान संयोजकाने नागपूरकरांसाठी दिले आहे.सर्वात ‘पॉश आणि लबालब माणूस’अशी त्यांची ख्याती होती.घरी पैश्‍यांची कमतरता नव्हती तरी देखील आपले संगीतप्रेम शेवटपर्यंत जपले.कुटुंबियांना त्यांचे ,उद्योगधंदे सोडून ऑकेस्ट्रामध्ये रमणे आवडत नसे,आपल्या संगीतावरील प्रेमासाठी त्यांनी वडीलांच्या घरी शिव्या देखील खालल्या मात्र रामनगर येथील ‘कला कूंज’या वास्तूत त्यांनी आपली संगीताची साधना आणि आवड सातत्याने जपली.अनेक नवखे कलावंत त्यांच्या कला-कूंजच्या उंब-याला ‘स्पर्श’ तरी व्हावा यासाठी तरसत होते.अनेक कलावंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले.‘ज्वेल थीफ’चे गाणे ‘होठो पे ऐसी बात मैं दबा के चली आई‘या गाण्याचा सराव सर्व वादकांसोबत व गायकांसोबत रात्री ९ वाजता एकदा सुरु झाला की पहाटेचे ४ कधी वाजायचे हे त्या काळातील अवलियांना कळायचे देखील नाही.

सर्वोकृष्ट हवाईन गिटारवादक म्हणून तसेच सुप्रसिद्ध अश्‍या ‘योगेश ठाकर ऑकेस्ट्राचे‘ संचालक म्हणून नावलौकिक मिळवणारे योगेश ठाकर यांनी कधीही आपल्या कार्यक्रमाचे फोटो,रेकॉर्ड ठेवण्यामध्ये रुची दाखवली नाही.यशाच्या मापदंडामध्ये आपला कलासक्तीचा शौक बंदिस्त केला नाही.ते ‘बादशाह’मनाचे माणूस होते.योगेश ठाकर यांच्याकडे भांडवलाची कमतरता नव्हती तरी देखील सुरवातीला फक्त ऑकेस्ट्राप्रतिच्या आकषर्णातून सुरु केलेला ग्रूप बघता बघता लवकरच प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचला होता.महाराष्ट्रात गणपतीनिमित्त तसेच मध्य भारतात दूर्गोत्सव निमित्ताने वर्ष-वर्षभर आधीच त्यांचे दहा दिवसांचे कार्यक्रम बूक होत असे.घरुन दोन कार्यक्रम करुन परत येतो असे सांगणारे कलावंत हे महिनो न महिने घरी परतत नसे एवढे शो त्यांना परस्पर एकवेळा दौ-यावर निघाल्यानंतर मिळत असे,करावे लागत असे.मूळ व्यवसायीक असल्याने योगेश ठाकर यांचे नियोजन देखील अतिशय व्यवसायिकपद्धतीचे आणि चोख होते.त्यांच्या वडीलांची ‘नॅशनल कन्सट्रक्शन कंपनी’होती.गांधी नगर येथील एलएडी कॉलेजसमारील रांगेत जिथे आज दास ज्वेलर्सचे दूकानात दिमाखात उभे आहे त्यांचे भव्य असे घर होते.पुढे ते घर विकून ते भरत नगरमध्ये राहण्यास गेले.ऑकेस्ट्रामध्ये गुंतवलेल्या पैश्‍यांची परतफेड लवकरच त्यांना आपल्या रसिकांच्या प्रेमातून मिळाली,एवढी लोकप्रियता योगेश ठाकर ऑकेस्ट्रा ग्रूपने सर्वदूर मिळवली होती.

त्याकाळी अलेक्झांडर,राजा धुराणे,वामनराव,किशन शर्मा,अविनाश भालेराव,राम गाेरे,बाबू वानखेडे,नाना भुसकुटे,इरु मडामे,प्रकाश चव्हाण,रेखा सक्सेना,भूपेंद्र वालिया अशा अनेक गायक-वादक कलावंतांच्या सहयोगातून योगेश ठाकर ग्रूपने यशाची परिसीमा गाठली.नागपूरात अत्याधूनिक स्पेशल लाईट्स आणि रॉलण्ड साऊंड सिस्टिम आणण्याचे श्रेय योगेश ठाकर यांनाच जातं.त्यांचा ‘कट टू कट’पीस वाजविण्याचा अट्टहास झपाटून टाकणाराच होता.त्या काळातील तो रिद् म,मेलोडी,भाव आणि नशा सगळं काही कलावंतांच्या जगण्याचाच एक भाग बनला होता.उत्तर प्रदेश,बिहार,पश्‍चिम बंगाल,मध्य प्रदेश पासून तर अगदी शिमलापर्यंत योगेश ठाकर ऑकेस्ट्रा ग्रूपने लोकप्रियतेचे झेंडे गाडले होते.

मुंबईतील एका शो मध्ये योगेश ठाकर यांनी ‘सुहानी रात ढल चुकी’ या गाण्यावर हवाईन गिटार वाजवून ‘द लिजेंड’ नौशाद साहेब यांची शाबासकी मिळवली होती.

पद्श्री वसंत देसाई नाईटमध्ये ‘मौसम है आशिकाना’ आणि ‘पन्ना की तमन्ना है की’ या गाण्यांसाठी मन्ना डे,फय्याज आणि पं.गोपीकृष्णन यांनी योगेश ठाकर यांचे कौतूक केले होते.योगेश ठाकर ऑकेस्ट्राची सुरवातच ‘जागो मोहन प्यारे’या सुरेल गीताने होत असे.या गीताचे ऑकेस्ट्रेशन श्रोत्यांना वेडं करुन जात असे.या भारावलेल्या अवस्थेतून मग श्रोते शेवटपर्यंत बाहेर पडत नसत.

नागपूरात पहीली व्हिडीयो बस आणण्याचा मान देखील योगेश ठाकर यांनाच जातो.त्यांच्या योगेश ठाकर ग्रूपमध्ये हेल्पर ते कलावंत सगळे एका कुटुंबासारखेच राहत असे.जॉनी लिव्हर यांना सर्वप्रथम नागपूरात आणण्याची किमया योगेश ठाकर यांनीच साधली होती.त्यानंतर कल्पना अय्यर,जयश्री.टी,ज्यूनिअर मेहमूद,राजेंद्रकुमार आदी शेकडो चित्रपटसृष्टितील कलावंतांनी योगेश ठाकर बॅनरखाली शो केले.

‘बेटा’चित्रपटाच्या रौप्य महोत्सवासाठी नागपूरात आलेल्या अनिल कपूरसोबत देशपांडे हॉलमध्ये योगेश ठाकर ग्रूपनेच सादरीकरण केले होते.

मात्र या यशाचा,लोकप्रियतेचा परचम १९९० साली शेवटी खाली उतरला.नॅशनल कन्सट्रक्शन कपंनीत अति व्यस्ततेमुळे योगेश ठाकर संगीताचा,कार्यक्रमांचा तो दर्जा राखण्यास अपयशी होत होते त्यामुळे त्यांनी संगीत थांबवण्याचा निर्णय घेतला.एका संस्थेच्या वतीने त्यांचा २०१२ साली ‘जीवनगौरव’पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

मात्र नागपूरच्या या महान कलावंताने व शुद्ध ह्दयाच्या माणसाने मुंबईच्या ऑकेस्ट्राला टक्कर देण्याची किमया ७० च्या दशकात गाठली होती हे त्यांचे योगदान नागपूरकर कधीही विसरु शकत नाही.योगेश ठाकर एक ‘हवाईन गिटार वादक’ आणि त्यांच्या मधला ‘दिलदार मनाचा माणूस’ यांना वेगळे करताच येत नाही.त्या तोडीचा हवाईन गिटार वादक,पॅशन असणारा संचालक,व्यवसायाशी प्रामाणिक असणारा माणूस आता पुन्हा नागपूरच्या धरणीत होणे शक्य नाही.

वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांची आज रविवार दि.१३ फेब्रुवारी रोजी प्राणज्योत मालवली.गेल्या दहा दिवसांपासून ते बजाज नगर येथील सिम्स रुग्णालयात फूफ्फूसाच्या आजारावर उपचार घेत होते.त्यांच्या पश्‍ताच तीन विवाहीत मुली
भाऊ आणि भरलापुरला परिवार आहे.उद्या सोमवार दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अंबाझरी घाटावर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येईल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या