फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजहनुमानगल्लीत अतिक्रमणाने घेतला तरुणाचा जीव

हनुमानगल्लीत अतिक्रमणाने घेतला तरुणाचा जीव

Advertisements

सीताबर्डी पोलिसांनाही करावा लागला संतापाचा सामना

अतिक्रमण: धंतोली झोन अधिकारी,पदाधिका-यांची ‘चंदी’

नागपूर,ता. १५ मार्च २०२२ : महाराष्ट्राच्या उपराजधानीत आज एक अत्यंत संतापजनक घटना ऐन वर्दळीच्या ठिकाणी घडली,एका तरुणाला रात्री ८ वाजता दरम्यान अचानक ह्दयघात झाल्याने त्याचा माेठा भाऊ,लहान भाऊ,बहीण व नातेवाईक त्याला कारमधून तातडीने धंतोली येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना हनुमान गल्लीतील सायकल दूकानांच्या अतिक्रमणामुळे रुग्ण असणारी कार तब्बल १५ मिनिटे त्या अतिक्रमणात फसली परिणामी ह्दयघाताच्या रुग्णाला जीवनदान मिळू शकणारा ‘गोल्डन अवर’निघून गेला,रुग्णालयात पोहाेचल्यावर डॉक्टरांनी रुग्णाला तपासून मृत घोषित केले,पंधरा मिनिटं आधी आणले असते तर कदाचित रुग्णाचा जीव वाचला असता,असे डॉक्टरांचे म्हणने असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले.

कार्तिक मुदलियार असे मृत व्यक्तीचे नाव असून तो अमर होजियारी कोष्टीपूरा येथील रहीवासी आहे.रात्री आठ वाजता दरम्यान अचानक त्यांना ह्दयघात झाला.कुटुंबियांनी तातडीने त्यांना कारमध्ये टाकले व धंतोली येथील रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी हनुमान गल्लीत कार टाकली मात्र या ठिकाणी अगदी रस्त्याच्या मधोमध अतिक्रमण करुन बसलेली ६ सायकलची दूकाने आहेत,एकसाथ अतिक्रमित करुन बसणारा रस्ता मोकळा करण्यासाठी वेळ लागला,एखादी कार देखील या रस्त्याने निघू शकत नाही याचा अर्थ या सहाही सायकल दूकानांच्या जबर झालेल्या मालकांनी महानगरपालिकेच्या रस्त्यांवर किती चौ.मी.पर्यंत बेखौफपणे अतिक्रमण केले आहे यावरुन हे सिद्ध होतं.

हे अतिक्रमण आज एक ३५ वर्षीय तरुणाच्या जीवावर उठले.कारला सुद्धा जायला जागा या सायकल दूकानांच्या मालकांनी नेहमीप्रमाणेच शिल्लक ठेवली नव्हती.यावरुन रुग्णाच्या कुटूंबियांनी चांगलाच आक्रोश केला.अगदी दूकाने पेटवण्यापर्यंतचा तेथील नागरिकांचा संताप अनावर झाला.सीताबर्डी पोलिसांनी मध्यस्थी केली.याबाबत गुन्हा दाखल झाला आहे की नाही,याबाबत माहिती मिळू शकली नाही मात्र मोदी नं एक,दोन,तीन व हनुमान गल्लीतील दूकानदारांना नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातून ज्याप्रकारे ‘अभय‘मिळाले आहे व आजची घटना बघता यात धंतोली झोनचे अधिकारी व पदाधिकारी हे बरोबरीचे दोषी असल्याचे आढळतात.

हनुमान गल्लीतील हॉटेल व्यवसायिक देखील या सायकल दूकानांच्या मालकांच्या अतिक्रमणामुळे त्रस्त आहेत.अनेक वेळा तक्रारी करुन देखील या सायकल दूकान मालकांचा ‘बाल भी बांका’मनपाचा अतिक्रमण विभाग करु शकला नाही ना धंतोली झोनचा सभापती किवा सहायक आयुक्त करतात.ऐरवी तेरवी शहरातील दिव्यांगाचे स्टॉल्स तोडून सामान फेकण्याचा बहादूरपणा दाखवणारा हा विभाग व मनपा प्रशासकीय अधिकारी बर्डीवरील कपड्यांच्या व सायकल दूकानवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत मात्र मूग गिळून बसलेले दिसतात.या गल्ल्यांमधील हॉटेल व्यवसायिक हे मनपाला सर्व प्रकारचा कर भरतात मात्र आपल्या करदात्यांच्याच योग्य तक्रारीविषयी मनपाचा अतिक्रमण विभाग व झोनचे अधिकारी,सभापती ‘अर्थपूर्णरित्या’निष्क्रिय असतात.या दूकानदारांच्या अतिक्रमणामुळे त्यांचा व्यवसाय चालत नाही,अतिक्रमणामुळे त्यांच्या हॉटेलमध्ये ग्राहक येण्यास तयार नसतो,अशी येथील हॉटेल मालकांची तक्रार आहे.

मोदी नं २ मध्ये तर कपड्यांच्या दूकानदारांनी फूटपाथ तर सोडा मनपाचा संपूर्ण रस्ताच कपड्यांच्या पुतळ्यांनी व्यापून टाकला आहे.त्यांचा बस चालला तर ग्राहकांना हवेतून उडत गल्लीत शिरावे लागेल एवढी देखील जागा ते येण्याजाण्यासाठी व दुचाकीवाल्यांसाठी शिल्लक ठेवीत नाही.आता गडकरी यांनी मोदी नं १,२,३ व हनुमान गल्लीत देखील उड्डाण पूल बनवावे असे उपहासाने बोलले जाते.नियमांना ताक वर ठेऊन सर्रास कायद्यांची पायमल्ली करण्याची शिरजोरी नेमकी या दूकानदारांना येते तरी कूठून?या प्रश्‍नाचे उत्तर समस्त नागपूरकरांना माहिती आहे.भाजपचाच एक मोठा नेता व्यपारी संघटनेत मोठ्या पदावर आहे, या भागातील दूकानदार अक्षरश:मुजोर आणि शिरजोर झालेले असल्याचे वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

आज दूर्देवी ठरलेल्या कार्तिक मुदलियार याचे नातेवाईक हॉर्न वाजवत राहीले पण मुजोर सायकल दूकानाच्या मालकांनी अतिक्रमण बाजूला केले नाही.आम्ही मनपाच्या पदाधिकारी व अधिका-यांना महिन्याची ‘चंदी‘देतो यामुळे रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा आमचा संवैधानिक हक्क आहे,या अर्विभावात या दूकान मालकांनी रुग्णाचे नातेवाईक कारचा हॉर्न वाजवत बसले तरी रस्ता मोकळा करण्यासाठी धजावले नाहीत.एका कुटुंबावर अश्‍यारितीने शोककळा कोसळणे ही कोणत्याही संवेदनशील मनाला हेलावून टाकणारी बाब आहे.वंदना भगत या धंतोली झोनच्या सभापती होत्या.आता सत्ताधा-यांची सत्ता संपुष्टात आली आहे.मनपात प्रशासक नियुक्त झाला असून आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्या हातात शहराचा कारभार एकवटला आहे.राधाकृष्णन बी.हे फक्त शासकीय बैठकांना हजेरी लावण्यापूरतीच आपल्या कक्षातून बाहेर पडतात,अशी आख्याकिका प्रसिद्ध आहे.शहरात काय चालले आहे?कोण जगतोय कोण मरतोय?त्यांच्या नाकाखालचे प्रशासन नेमके झोनस्तरावर काय करतात आहे?कोणते शासकीय कर्तव्य पार पाडत आहे?याच्याशी आयुक्तांना काहीच घेणे-देणे नाही,आजच्या घटनेनंतर यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

धंतोलीतील फक्त तीन किलोमीटच्या पसिरात १७० मल्टीप्लेक्स रुग्णालये आहेत.धंतोलीला आता नागपूरातील ‘मेडीकल हब’ देखील म्हटले जाते.या ठिकाणी आता एक देखील नव्या रुग्णालयाला परवानगी देता येणार नाही,असे सर्वोच्च न्यायालयाचेच निर्देश आहेत .धंतोली नागरिक मंडळाने या ठिकाणची भरमसाठ रुग्णालये,प्रदूषण व वाहतूकीच्या समस्येला घेऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला होता.मात्र धंतोली झोनमधील प्रशासकीय नोकरशाही व सत्ताधारी पदाधिकारीच न्यायालयाच्या निर्णयाला कश्‍याप्रकारे सुरंग लाऊन,फक्त सीताबर्डीतील अतिक्रमणातूनच नव्हे तर या ठिकाणच्या रुग्णालयातून देखील कशी ‘चांदी’कमावतात,याची देखील चांगलीच चर्चा झडत असते.

भाजप शहरचे महामंत्री मुकेश मोहन मेहाडीया हे व्यापारी संघटनेत महत्वाच्या पदावर आहेत मात्र व्यापा-यांचे हित जोपासताना या शहरातील नागरिकांना देखील या देशाचा संविधान काही संवैधानिक हक्क प्रदान करतो,याचा त्यांना देखील सोयीस्कर विसर पडत असल्याचे दिसून पडतंय.या शहरातील नागरिकांना फूटपाथवरुन चालण्याचा हक्क,मोदी नं १,२,३ तसेच हनुमान गल्लीतील मोकळ्या रस्त्यावरुन चालण्याचा,दूचाकी तसेच चारचाकी घेऊन जाण्याचा कायदेशरी हक्क आहे,मात्र व्यापारी वर्ग व व्यापारी संघटना हे आपले हित जोपासताना ‘पैश्‍यांच्या बळावर’ काही भ्रष्ट नोकरशाही व काही अतिभ्रष्ठ राजकीय नेते आपल्या खिश्‍यात घालून फिरतात तेव्हा अतिक्रमित रस्त्यावर मरण एका सर्वसामान्य नागरिकाचं होतं,कोणत्याही नेत्याचं किवा व्यापा-याचं नाही,हे पुन्हा आज सिद्ध झालं.आज नागरिकांच्या रोषाला हे सायकल दूकानमालक बळी पडता पडता वाचले आहेत,आता तरी धंतोली झोनच्या अधिका-यांनी या अतिशय दूर्देवी घटनेची तत्परतेने दखल घेऊन या गल्ली बोळ्यातील संपूर्ण अतिक्रमणे काढावीत,या ठिकाणच्या दूकानदारांचा जेवढ्या चौ.फूटच्या जागेवर हक्क आहे तेवढ्याच जागेवर व्यवसाय करण्याची कायदेशीर‘सक्ती’(फायदेशीर नाही) आता तरी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.करणार आहेत का?असा सवाल आता विचारला जात आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या