Advertisements

मध्य भारतातील सर्वात मोठ्या ‘गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर’चे भव्य लोकार्पण संपन्न
नागपूर,२२ मार्च २०२६ :: साधनांची कमतरता आणि अनेक अडचणी असतानाही, प्रामाणिकपणा, निस्वार्थ वृत्ती आणि सत्त्वप्रधान राहून स्व. गंगाधरराव यांनी आपल्या कर्तृत्व आणि संघटन कौशल्याच्या जोरावर समाजकार्य केल्याचे गौरवउद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी काढले. कोनशिलेच्या अनावरणाने तसंच स्व. गंगाधरराव फडणवीस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मध्य भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक सेंटर’चे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते आज नागपूरच्या वर्धा रोड वरील पावनभूमी परिसरात संपन्न झाले.
या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरिताताई फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा खासदार मायाताई इवनाते, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभातजी लोढा, राज्यमंत्री श्री. पंकजजी भोयर, आशिषजी जैस्वाल, आ. आशीष देशमुख, नागपूरच्या महापौर नीताताई ठाकरे आणि आ.संदीप जोशी,अध्यक्ष,श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशन या मान्यवरांची उपस्थिती होती.
सेवा हे नराने नारायण होण्यासाठी केलेले कार्य आहे असे लोकसंग्रही कार्यकर्ते असेलेल गंगाधरराव यांच्या नावाने सुरू झालेला उपक्रम अत्यंत औचित्यपूर्ण आहे असे ते म्हणाले. “सेवा हा उपकार नसून कर्तव्य आहे. आपण सेवा करतो तेव्हा आपण स्वतः पवित्र होत असतो. माणसाचे मन स्वाभाविकपणे विविध विचारांनी भरलेले असते, पण सेवेमुळे चित्तशुद्धी होते,” असे विषद करून सेवा भावाने सुरू केलेल्या या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार, उपमहापौर, नगरसेवक आणि आणीबाणीच्या काळातील देशासाठी तुरुंगवास भोगलेले स्व. गंगाधरराव फडणवीस यांचे कार्यकर्तृत्व येणाऱ्या पिढ्यांना कळावे, त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा हे या केंद्राला त्यांचे नाव देण्याचे मुख्य कारण आहे असे सांगत आ. संदीप जोशी यांनी प्रस्ताविकातुन समाजातील तळागाळातील आणि मध्यमवर्गीय रुग्णांनी गरजेच्या वेळी या अद्ययावत आणि माफक दरातील डायग्नोस्टिक सेंटरचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच या कार्यात योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमाची विधिवत सुरवात पारंपरिक दीपप्रज्वलन, भाग्यश्री बारस्कर आणि चमु यांचे प्रार्थना सादरीकरण आणि मान्यवरांच्या स्वागताने झाली तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
वडीलच आपले प्रेरणास्त्रोत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“आपण लहान वयात वडिलांचे जेवढे कार्य पाहिले, त्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडला. त्यातूनच राष्ट्रीय विचार आणि समाजसेवेची भावना आपल्यात रुजली. त्यामुळे वडीलच आपले खरे प्रेरणास्त्रोत आहेत,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.यावेळी त्यांनी आधुनिक आणि अद्ययावत आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेल्या या सेंटर समाधान व्यक्त केले. गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सुमारे सरकारतर्फे २,४०० आजारांवर मोफत उपचार उपलब्ध असून, १२ क्लिष्ट शस्त्रक्रियाही कमी खर्चात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमासाठी सिद्धीविनायक केंद्राचे अध्यक्ष आमदार संदीप जोशी यांचे त्यांनी विशेष आभार मानले आणि अभिनंदन केले. तसेच भविष्यात या सेवांचा आणखी विस्तार कसा करता येईल, यावरही भर दिला.
स्व. गंगाधररावांचे योगदान मोठे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
भारतीय जनता पार्टीच्या वाढ आणि विस्तारामध्ये गंगाधरराव यांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पक्षाचा विस्तार केला,” असे ते म्हणाले. गंगाधरराव यांच्या नावाने सुरू होत असलेला उपक्रम अत्यंत योग्य आणि समाजोपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य सेवांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, शासकीय ठिकाणी निदान सेवा मिळवणे अनेकदा कठीण ठरते, तर खासगी ठिकाणी त्या अत्यंत महाग असतात. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि सुलभ आरोग्य सेवांची गरज आहे. “सेवा ही आयुष्यात सर्वोपरि आहे. ‘डोमेस्टिक हॅपीनेस इंडेक्स’ वाढवण्यासाठीही अशा उपक्रमांवर काम करणे आवश्यक आहे,” असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
यांची होती प्रमुख उपस्थि ती: या कार्यक्रमासाठी पराग सराफ, सचिव,श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशन;श्रीमती वासंतीताई देशंपाडे, संचालिका श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशन;अॅड. अक्षय नाईक, उपाध्यक्ष,श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशन श्री. रितेश गावंडे, सहसचिव श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशन श्रीमती मिनल काळे, संचालिका श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशन; संदीप बारस्कर, संचालक श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशन, अनिरूद्ध भगत, संचालक श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशन, महेन्द्र भुगांवकर, संचालक, श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशन नगरसेवक सुनील दांडेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
…………………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
