फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमसूरज तातोडे यांची बावणकुळेंविरुद्ध लेखी तक्रार

सूरज तातोडे यांची बावणकुळेंविरुद्ध लेखी तक्रार

Advertisements

मुख्यमंत्री,पोलिस महासंचालक,नागपूरच्या पोलिस आयुक्तांकडे केली तक्रार

नापगूर,ता. ३ फेब्रुवारी २०२२: नुकतेच ॲड.सतीश उके यांनी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या पत्नीचे सख्खे मावस भाऊ सूरज तातोडे यांना प्रेस क्लब येथे माध्यमांसमोर आणून एकच खळबळ उडवून दिली होती.या पत्र परिषदेत तातोडे यांनी बावणकुळे यांनी ५ हजार कोटींची अवैध मालमत्ता जमवली असल्याचा खळबळजनक आरोप ही केला होता.गेल्या १८ वर्षांपासून बावणकुळे यांच्या अवैध मालमत्ता गोळा करण्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे तातोडे यांनी सांगितले होते.ही पत्र परिषद संपताच ॲड.उके यांना त्यांच्या भावासह गुन्हे अन्वेषन शाखेच्या पोलिस अधिका-यांनी तातडीने ताब्यात घेऊन त्यांना १४ वर्ष जुन्या एका विनयभंगाच्या प्रकरणात अटक देखील केली होती. बावणकुळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सूरज तातोडे याला ब्रेन हॅमरेज झाला असल्याने तो काहीही बोलतो असा खुलासा केला होता.मात्र आज सूरज तातोडे यांनी बावणकुळे यांच्या विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राज्याचे पोलिस महासंचालक, गृहमंत्री ,
पोलीस आयुक्त नागपूर, पोलीस उपायुक्त परी. क्र. २ नागपूर, पोलीस निरीक्षक , पोलीस स्टेशन बजाजनगर, नागपुर यांच्याकडे रितसर तक्रार नोंदवली.

वरील पत्त्यावर माझी पत्नी व माझ्या दोन अपत्यांसह राहत असल्याचे त्यांनी सांागितले. मी गेल्या तीनवर्षांपासून अर्धांगवायूमुळे जवळपास अपंगत्वामुळे त्रासलो आहे. हा अर्धांगवायूचा झटका मला माझा रक्तदाब अनियंत्रित झाल्यामुळे झाला आहे. हा अनियंत्रित रक्तदाब चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र शासनाचे मंत्री असताना झाला असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला. मी त्यांचे सर्व प्रकारचे काम करीत असे याशिवाय माझा स्वतःचा सुद्धा ट्रांसपोर्टेशनचा व्यवसाय होता तसेच बांधकाम व्यवसाय सुद्धा होता तसेच मी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सुद्धा होतो आणि मी जखापुर जगदंबा कंन्स्ट्रक्शन कंपनी पत्ता Flat No. १०१ , प्लॉट नं. ११३,११४ Casa Pride Apartment , Near Kachipura Garden , Kachipura , New Ramdaspeth ,Nagpur – ४४००१० चा संचालक होतो आणि आहे, माझे या कंपनीत ५१ टक्के शेअर होते आणि आहेत. माझे सी. ए. पवन खाबिया आहे व होते आणि ते चंद्रशेखर बावनकुळे यांचेपण सबंधित आहेत त्यामुळे ते दबावात खरी माहिती लपवू शकतात. मी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेल्या सन २००७ पासून २०१८ पर्यंत त्यांच्या संपत्तीची देखरेख , नगदी कोट्यावधी रुपयांचा सांभाळ , सोने खरेदी , पैशांची देखरेख, घर सजावटी- बांधकाम सामान आणि चायना देशात जावून अंतर्गत सजावट सामग्री याची खरेदी व त्याचे सुपरविजन , बांधकाम, पैशाचा हिशोब तसेच त्यांचे दागदागिने व सर्व प्रकारचे घेवाण देवाणची कामे सुद्धा करीत असे. बावनकुळे यांच्या निर्देशाप्रमाणे ते महाराष्ट्र सरकार मध्ये वीज , महसूल , उत्पादन शुल्क या विभागाचे मंत्री म्हणून काम सांभाळत असतांना सर्व प्रकारचे घर, बेहिशेबी पैशाचे हिशोब ठेवणे , दुसऱ्या ठिकाणी ही बेहिशेबी रक्कम दुसऱ्यांच्या नावाने गुंतविणे, मुंबईची नगद रक्कम नागपूरला घेवून येणे , सोने खरेदी करणे, नोटबंदीच्या कार्यकाळात नगदी जवळपास ५० कोटीची रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन देणे, हे सर्व काम बावनकुळे यांच्या सांगण्याप्रमाणे करीत असे. बावनकुळे यांचे या सर्व कामात माझे व्यक्तिगत घेणे – देणे काहीही नव्हते. त्यांच्या घरच्या सर्व कामात सामानाची खरेदी देश विदेशात जाऊन करणे त्यांचा हिशोब कागदोपत्री वीस टक्क्यापेक्षा कमी दाखविणे याकरीता त्यांचे सी. ए. कडे जावून बावनकुळे यांच्या सांगण्याप्रमाणे ती कामे करीत होतो . बावनकुळे मंत्री असतांना त्यांच्याकडे येणारे महाराष्ट्रातील विविध सरकारी आणि शासकीय कंपन्यांचे ठेकेदार , बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर, टेंडर घेणारे कंपनीचे लोक यांच्याकडून मिळणाऱ्या टक्केवारीची रक्कम बावनकुळे यांच्या निर्देशाने स्वीकारणे व त्याचा हिशोब ठेवणे ही सर्व कामे करित होतो . हे सर्व मी कोणतेही काम आपल्या मर्जीने किंवा स्वतः योजना आखून किंवा डोके लावून आपण होऊन केलेली नाहीत व त्यात माझे व्यक्तिगत कोणतेही पैसे गुंतविले नाहीत किंवा त्यातून कोणताही फायदा घेतला नाही ही सर्व कामे मी त्यांचा बिनपगारी नोकर व घरकाम्या म्हणून काम केले आहे.

बावनकुळे यांचा मामा यांच्या पतसंस्थेत सुद्धा मी बेहिशेबी रोख रकमा बावनकुळे यांच्या सांगण्याप्रमाणे नेवून पोहोचविल्या आहेत. नागपूर शहरात बावनकुळे यांचे पैसे घेण्याचे सर्व कामे) माझ्याकडे होती तर मुंबईची मंत्रालयातील पैसे घेण्याचे सर्व काम विजयवर्गी यांची आणि इतरांची होती. मुंबईच्या जेतवन बंगल्यावर मी जेव्हा मुंबईला राहत असे तेव्हा मी बंगल्यावर ठेकेदार व इतर कामाची येणारी रक्कम स्वीकारण्याचे काम सुद्धा केलेले आहे . नागपूर आणि मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे शासकीय विभागाचे ठेके , कंत्राट , नागपूर जिल्ह्यातील सरकारी रस्ते बांधकाम यांची ठेके , कंत्राटदार यांच्याकडून पैसे घेणे हे नेहमीचे काम होते . वीज विभागात सर्व प्रकारच्या प्रत्येक कामात पैसे घेणे त्या ठिकाणांवर नातेवाईकांची भागीदारी ठेवणे हे बावनकुळे यांचे नित्य सवईचे काम होते. बावनकुळे यांच्याकडे येणारे अनेक अधिकारी यांच्याशी त्यांचे अर्थपूर्ण संबंध होते त्यात प्रतापगड मुंबई मंत्रालय मुंबई तसेच येथील संचालक, उप संचालक , मोठे अधिकारी यांचा समावेश होता ,अशाच संबंधातील एका अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी बावनकुळे यांनी त्यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या करीता केली आहे. मला पगार माझे कंपनी जखापूर जगदंबा कंपनीतून मिळत होता त्यात माझे ५१ टक्के शेअर होते व आहेत .

मी कधीही बावनकुळे यांच्या कोणतेही रकमेतून अफरातफर केली नाही . बावनकुळे मंत्री असतांना सन २०१५ ते २०१८ पर्यंत मी त्यांच्याकडे असतांना, त्यांच्याकडे येणारे ओरिएंटल कन्स्ट्रक्शन कंपनीचे ठेकेदार यांच्याकडून मिळालेले ७.५ कोटी, सरस्वती कंस्ट्रक्शन्सचे सुरगाव ते दहेगाव रोड या कंत्राटात १ कोटी,केसीसी कंन्सट्रक्शन यांचे आटोमोटीव्ह चौक ते कामठी सिमेंट रोड या कंत्राटात ५ कोटी , एचजी इन्फ्रा कंपनी यांचे आऊटर सिमेंट रिंग रोड यांच्या कंत्राटात ५ कोटी असे कमीत कमी १०० कोटी रुपये मी नागपूर आणि मुंबई येथील बंगल्यात बावनकुळे यांच्या सांगण्याप्रमाणे हाताळले. सन २०१८ साली मला झालेला अर्धांगवायू यानंतर तो सर्व हिशोब आणि त्या हिशोबाची डायरी आणि त्यावेळी असलेली नगदी बावनकुळे कुटुंबीय यांनी व त्यांच्या माणसांनी घेतली . सन २०१८ मध्ये महेश झोरे यांच्याकडे बावनकुळे यांच्या संपत्तीच्या पूर्ण कागदपत्रांची बॅग बावनकुळे यांच्या सांगण्याप्रमाणे दिली होती . मी माझ्याकडे कधीही त्यांचे काहीही राखून ठेवले नाही, बाकी ठेवले नाही .

कोराडी येथील नैवेद्यम हॉटेलच्या बाजूचा बावनकुळे कुटुंबीय यांच्या करीता खरेदी केलेला प्लॉट घेण्याच्या व्यवहारात १ कोटी नगदी दिले होते . बावनकुळे कुटुंबीय यांचे नैवेद्यम नार्थस्टार यात ११ ते १२ कोटी बेहीशोबी लावण्यात आले. नैवेद्यम नार्थस्टार मध्ये दिलीप कामदार यांना १ कोटी नगदी रक्कम देण्यात आली. बावनकुळे कुटुंबीय यांचे कोराडी येथील राहत्या घरात रिनोव्हेशन करीता १० ते १५ कोटी बेहिशेबी लावण्यात आले त्याकरीता हे महागडे सामान जे कमी किंमतीत दाखविले ते खरेदी करण्याकरीता मी चायना देशात गेलो होतो, हे चायना येथे खरेदीकरीता पाठविलेले १० ते १५ कोटी रुपये बावनकुळे यांनी कागदोपत्री त्यांच्या तज्ज्ञ लोकांच्या मदतीने कमी दाखविले . बावनकुळे यांच्या करीता सन २०१८ मध्ये बिना पावती नगदी पैश्याने १ किलो सोने रोकडे ज्वेलर्स मधून विकत आणले. यात व इतर कोणत्याही व्यवहारात कोणतीही अफरातफर मी कधीही केली नाही.

बावनकुळे यांची माणसे अजय विजयवर्गी , अजय अग्रवाल , नरेश मोटघरे , महेश झोरे आणि बावनकुळे यांचे मामा आणि इतर नातेवाईक ज्यात मुलीचे सासरचे नातेवाईक यांच्याकडे बावनकुळे यांचे बेहिशेबी कोट्यावधी रुपये व्यवसायात , पतसंस्थेत , गुंतवणुकीत दुसऱ्यांच्या नावे आहेत त्यामुळे त्यातील कधी कोणीही कोणताही हिस्सा , भाग बावनकुळे यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचे नावे बक्षिसपत्र करून परत मिळवीत असतात पण मी कधीही बावनकुळे यांचे पैसे घेले नाहीत किंवा माझ्या व्यवसायात त्यांचे पैसे गुंतवले नाहीत . नागपूर आऊटर रिंग रोड याचे काम एमईपी कंपनीकडून पोट ठेकेदार शिवालिक बिल्टेक प्रा. ली. याचे संदीप भाटीया यांनी घेतले होते यात बावनकुळे यांची बेहिशेबी भागीदारी शिवालिक बिल्टेक प्रा. ली. याचे संदीप भाटीया यांच्यासोबत या कामात होती . यात सुद्धा मी बावनकुळे यांचे पैसे घेतले नाहीत.

नागपूर सावनेर रोडचे बांधकामाचे ठेकेदार ओरिएंटल कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्याकडून सन २०१८ मध्ये सोमनाथ शर्मा यांनी बावनकुळे यांच्यासाठी एक कोटी रुपये नगदी माझ्याजवळ दिले , ते आणून देण्याचे त्याचे कमिशन सोमनाथ शर्मा यांना ३० लाख रुपये मी त्याच वेळी बावनकुळे यांच्या निर्देशाने दिले. परंतु ते ३० लाख रुपये देण्याचा हिशोब मी डायरीत लिहायचा विसरलो आणि त्यामुळे अंतिम हिशोबाप्रमाणे रोख तीस लाख रुपये कॅश कमी पडली यात बावनकुळे यांनी त्या कमी पडलेल्या पैश्याचा हिशोब मागितल्याने त्यांच्या भीतीपोटी माझा रक्तदाब वाढला आणि त्यातून मेंदूघात झाला आणि डोक्यात रक्ताची गाठ तयार झाली आणि मला अर्धांगवायू झाला. यामुळे डावे अर्धे शरीर ( डावा हात आणि डावा पाय) प्रभावित झाले आहे. हा प्रकार बावनकुळे यांच्या कोराडी नागपूर येथील घरी झाला. त्यानंतर बावनकुळे कुटुंबीयांनी माझ्यावर विविध प्रकारे आर्थिक अफरातफरीचे आरोप करने सुरू केले आणि माझे जगणे मुश्कील केले. मी त्यांचा नातेवाईक म्हणून त्यांची इमानेइतबारे सेवा केली तरीही त्यांनी मी अर्धांगवायूने ग्रसित असतांना माझी कोणतीही गंभीर काळजी घेतली नाही किंवा मला मुंबईत चांगल्या दवाखान्यात सुद्धा दाखविले नाही. बावनकुळे यांच्या पत्नी म्हणजे माझी सख्खी लहान मावशी , त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा आणि बावनकुळे आणि त्यांचे नातेवाईक मला नाही नाही ते बोलले त्यामुळे माझी तब्येत सुधारण्या ऐवजी खालावत गेली.

बावनकुळे साहेब त्यांच्या घरच्या लोकांनी मला म्हटले की मी माझी चल अचल संपत्ती माझ्या स्वतःच्या कमाईतून विकत न घेता, त्यांच्या पैश्यातून अफरातफर करून जमवली आहे, त्यामुळे ती परत दे. बावनकुळे कुटुंबीयांनी माझ्या दोन कार एक मर्सिडीज ( MH 40 BA 0010 ) आणि दुसरी फोर्ड एंडेवर ( MH 40 BJ 4000 ) या त्यांच्याकडे ठेवून घेतल्या आणि म्हटले की ‘जास्त बोलला तर या गाड्यांचे सामान आणि इंजन पूर्ण खराब करून कोराडी तलावात फेकून देईन’ . माझे जखापुर जगदंबा कंन्स्ट्रक्शन कंपनी पत्ता फ्लॅट क्र १०१ , प्लॉट नं. ११३,११४ Casa Pride Apartment , Near Kachipura Garden , Kachipura , Ramdaspeth , Nagpur – ४४००१० चे ५१ टक्के शेअर माझ्याकडून दबावाने आणि जुलुमाने त्यांची माणसे त्यात नरेश मोटघरे , महेश झोरे यांच्या नावे लिहून घेतले. पैसे दिल्याच्या माझ्या नावाच्या या कंपनीचे अनेक खोट्या पावत्यांवर सह्या घेऊन मला खोटे पद्धतीने पैसे दिल्याचे दाखविले . माझ्या बँक अकाउंट मध्ये आर. टी. जी. एस. याने त्यांनी ट्रांन्सफर केलेले पैसे माझ्याकडून काढून परत घेतले आणि बदल्यात माझ्या संपत्तीतील नागपूर शहरातील रामदासपेठ नागपूर येथील प्लँट (क्र. 201, 301, 401, New Casapride Apartment , New Ramdaspeth ) सुद्धा त्यांनी त्यांचे कुटुंबीय पायल बावनकुळे (आष्टनकर) व अन्य यांचे नावे करून घेतले. माझी मौजा – बाबुलखेडा, तालुका कामठी ( हनुमान मंदिर टेकडीजवळची जमीन ) येथील शेती हि संकेत बावनकुळे यांचे नावावर करून घेतली, नोयडा (उत्तर प्रदेश) येथील फ्लॅट ( In front of Metro Station), मौजा – नांदा ता. कामठी येथील (नवीन नांदा वस्तीला लागून) शेतजमीन, कामठी शहर येथील माझी मालकीची इमारत हे सर्व त्यांच्या नावे कागदोपत्री लिहून घेत त्यातील रजिस्ट्री मध्ये लिहिलेले चेक हे त्यांनी मला कधी दिले नाही ते कागदोपत्री दाखवण्याकरता खोटे पद्धतीने मला दिले असे त्या विक्रीतील व विक्रीपत्रात दाखविले पण त्याप्रमाने कोणतीही रक्कम मला मिळाली नाही व मी मागितली पण नाही कारण ते काहीही मी त्यांना स्वखुशीने दिले नाही ते त्यांनी माझ्यावर दबाव टाकून घेतले आहे , याप्रमाणे अनेक प्रकारे माझी फसवणूक करून आणि जुलमाने हे अशी अनेक कृत्ये त्यांनी केलीत .

या सर्व संपत्तीचे मूळ दस्तावेज त्यांनी माझ्याकडून घेवून महेश झोरे यांच्या हवाली केले , माझ्याकडे कोणतीही मुळ कागदपत्रे ठेवली नाहीत. माझे जखापूर जगदंबा कंपनीचे ५१ टक्के शेअर त्यांचा माणूस महेश झोरे आणि नरेश मोटघरे यांच्या नावे लिहून घेवून माझा कंपनीतील पगार बंद करून टाकला. याप्रमाणे मी या फसवणुकीत आणि जुलूमात गेल्या तीन वर्षापासून कसाबसा जगत आहे. जास्त काही बोलले तर विविध प्रकारे अन्याय करण्याच्या आणि कागदोपत्री फसवून देण्याच्या धमक्या त्यांच्याकडून मिळत आहेत.
याप्रमाणे ,चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे तसेच त्यांचे सर्व साथीदार यांनी माझी चल अचल संपत्ती (त्यात जखापुर जगदंबा कंन्स्ट्रक्शन कंपनी पत्ता Flat No. १०१ , प्लॉट नं. ११३,११४ Casa Pride Apartment , Near Kachipura Garden , Kachipura , New Ramdaspeth , Nagpur – ४४००१० चे ५१ टक्के शेअर आणि त्याच इमारतील रामदासपेठ येथील ३ फ्लँट सुद्धा आहेत ) माझ्यावर विविध प्रकारे अन्याय करण्याच्या आणि कागदोपत्री फसवून देण्याच्या धमक्या देवून दबाव टाकून, खोटे बोलून फसवणूक करून आणि जुलूमाने बळकावले आहेत, या बाबत कारवाई होण्यास आणि ती परत मिळवून देण्यास कारवाई होण्यास तक्रार देत आहे असे त्यांनी नमूद केले .

ही तक्रार मी इतर कोणाचे कसलेही कोणतेही प्रलोभन , दबावात किंवा प्रभावात न येता किंवा कोणाकडूनही मानसिकरित्या किंवा कोणत्याही प्रकारे भ्रमित न होता व यात कसलेही खोटे नमूद न करता करीत आहे . मला बावनकुळे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक तसेच त्यांची माणसे यांच्यामुळे मी , माझी पत्नी आणि अपत्ये यांची जीवाची भीती त्यांच्या यापूर्वीच्या धमक्यांचेमुळे निर्माण झाली आहे व ते तसे आमचा जीव घेण्या करीता काहीही करू शकतात. यापूर्वी पोलीस स्टेशन कोराडी येथे अदखलपात्र गुन्हा क्र. ५९६/२०१९ कलम ५०४ , ५०६ भा. द. वी. व अदखलपात्र गुन्हा क्र. ५९६/२०१९ कलम ५०४ , ५०६ भा. द. वी. याप्रमाणे माझा भाऊ धीरज दामोदर तातोडे याने मला दिलेल्या धमक्या बाबत दाखल केली आहे, तोच आता बावनकुळे यांच्या सांगण्याप्रमाणे मला शोधत आहे याची मोबाईल रेकॉर्डिंग माझ्या जवळ आहे आणि तो माझ्या पत्नीच्या मागे मला भेटण्यासाठी बोलत आहे .

माझा भाऊ नीरज दामोदर तातोडे हा महाजेनको मध्ये नोकरीला आहे तो सुद्धा आता बावनकुळे यांच्या सांगण्यावरुन मला मानसिक आजारी म्हणत आहे , मला खोटे ठरविण्या करीता मी मानसिक रोगी आहे, माझी मानसिक परिस्थिती बरोबर नाही असे सुद्धा सांगत माझी बदनामी करीत आहेत. या सर्व प्रकाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी सूरज तातोडे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे .

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या