
संतोष गोमवार यांचा कुजलेला मृतदेह सापडला
नागपूर,ता. १३ मार्च २०२२ : कोल वॉशरीजच्या माध्यमातून महानिर्मितीत कोट्यावधीचा कोळसा घोटाळा सुरु असल्याचे, पुराव्यांसह वारंवार माध्यमांसमोर आणल्यामुळेच सूत्रधार संतोष रामदास गोमवार,वय वर्षे ४७ यांची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते व ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.यवतमात्र जिल्ह्यातील वणी येथे गुप्ता कोल वॉशरीज आहे. तेथे संतोष रामदास गोमवार हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.
८ मार्च रोजी रात्री नेहमीप्रमाणे ते कामावर आले व यानंतर ते बेपत्ता झाले.नेहमीप्रमाणे दुसरा व तिसरा दिवस उलटूनही ते घरी पोहोचले नाही.मोबाईलवरही ते प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्या पत्नीने कोल वॉशरीजचे अधिकारी तसेच पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती मात्र गोमवार यांचा मृतदेह काेराडी थर्मल पॉवर येथे गुप्ता कोल वॉशरीजमधून कोळसा घेऊन येणा-या वॅगनमध्ये आढळला,यानंतर काेराडी पोलिसांनी त्यांच्या पत्नीला शुक्रवारी कोराडी येथे बोलावून घेतले.गोमवार यांचा मृत्यू जीव गुदमरल्याने झाला असल्याचा प्राथमिक अहवाल वैद्यकीय अधिका-यांनी पोलिसांना दिला मात्र ते वॅगनमध्ये कसे पोहोचले,हे स्पष्ट झालेले नाही.कोराडी पोलिसांनी आता हा तपास वणी पोलिसांकडे सोपवला आहे.
कोराडी थर्मल पॉवरमध्ये ठिकठिकाणच्या कोल वॉशरीजमधून रेल्वेने कोळसा येतो.गुरुवारी रात्री अशाच प्रकारची एक वॅगन थर्मल पॉवरमध्ये पोहचली.या ठिकाणी वॅगने क्रेनने उलटी करुन कोळसा खाली केला जात असतानाच व त्यातून मोठा कोळसा,चुरी,दगड वेगळे करीत असताना कामगारांना गोमवार यांचा मृतदेह आढळला.हादरलेल्या कामगारांनी लगेच अधिका-यांना व कोराडी पोलिसांना माहिती दिली.ठाणेदार कृष्णा शिंदे,पोसिल निरीक्षक संतोष खांडेकर यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठले.मृतदेह पुरता कुजला होता.त्यांच्या कपड्यात एक पेटीएमची स्लीप आढळली.त्यानंतर ही वॅगन कुठून आली,त्याबाबत माहिती घेऊन पोलिसांनी चौकशीला सुरवात केली मात्र आमच्या संघटनेने वारंवार कोल वॉशरीजमधील कोट्यावधीचा घोटाळा बाहेर काढल्यानेच गोमवार यांची हत्या झाली असा आरोप पवार यांनी आज रविवार रोजी केला.
वॉशरीजमधील चांगला कोळसा छुप्या मार्गाने खुल्या बाजारात विकून निकृष्ट कोळसा महानिर्मितीत पाठवला जात असल्याचा गौडबंगाल गेल्या ५-७ महिन्यांपासून सुरु आहे.कोल वॉशचा हा कंत्राट तिन्ही कपंनीला पाच वर्षांसाठी दिला असल्याने यात कोट्यावधींचा घोटाळा सुरु अाहे. कोल वॉशरीज कंपनी या घोटाळ्यामुळे अब्जोपती झाले असल्याचा आरोप पवार यांनी केला.वेकोलि,एमईसीएल,एसईसीएल कंपन्यांकडून महानिर्मिती वर्षाला २२० दशलक्ष मेट्रीक टन कोळसा खरेदी करते.कोल वॉशरीजचा हा गोरखधंदा माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या कार्यकाळात सुरु झाला.महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंडारे व माईनिंगचे व्यवस्थापक पुरुषोत्तम जाधव हे कोल वॉशरीज कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी व या भ्रष्टाचारातून स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठी, महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनीला देशोधडीला लावण्याचे काम करीत असल्याचा आरोप पवार यांनी याप्रसंगी केला.
खंडारे व जाधव हे दोन्ही अधिकारी कोल वॉशरीजच्या नावाखाली कोळशाची हेराफेरी करुन चांगला कोळसा कोल वॉशरीजच्या माध्यमातून बाजारात विकण्याचा षंडयंत्रात सहभागी असल्याचा दावा पवार यांनी केला.बावणकुळे यांच्या कार्यकाळात महानिर्मितीच्या अधिका-यांनी संगनमत करुन धुतलेला कोळसा वापरण्याचे धोरण आखले.या पूर्वी कधीही असा धुतलेला कोळसा महानिर्मिती वीज निर्मितीसाठी करत नव्हती मात्र अधिका-यांना भ्रष्ट मार्गाने अब्जाेधीश होण्याचाच मार्ग गवसल्याने, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या कार्यकाळात हा धुतलेला कोळसा वीज निर्मिती प्रकल्पात पोहोचविण्याचा घाट घातला गेला.
महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाच्या माध्यमातून कोल वॉशरीज तयार झाल्या व आता मोठ्या प्रमाणात कोळसा कोल वॉशरीजमध्ये धुण्यासाठी जात आहे.येथूनच तो छुप्या मार्गाने कश्याप्रकारे व कोणत्या भावाने खुल्या बाजारात जातो,याचे वेळोवेळी पत्र परिषदा घेऊन पुराव्यांसह घोटाळे ‘जय जवान जय किसान संघटनेने’समाेर आणले आहेत.एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही तर हा कोळसा या कोल वॉशरीज कंपनींच्या माध्यमातून धुतल्यानंतर देखील वीज निर्मितीवर याचा काडीचा फरक पडत नाही.धुतल्यावरही जीसीव्ही न वाढलेलाच कोळसा महानिर्मितीला पुरवला जात आहे मग कशासाठी कोल वॉशरीजचे हे लाड महाराष्ट्र सरकार पुरवतेय?उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात मागच्याच कार्यकाळात कोल वॉशरीजमधील हा संपूर्ण गौडबंगाल आला होता.त्यांनी लगेच कोल वॉशरीजचा हा गोरखधंदा बंद करुन उत्खननातून प्राप्त होणारा काेळसा न धुता सरळ महानिर्मितीकडे पाठविण्याचे आदेश काढले हाेते. २०१४ मध्ये महाराष्ट्राची सरकार बदलली,बावणकुळे हे उर्जामंत्री झाले,यानंतर पुन्हा वीज निर्मिच्या अधिका-यांना अब्जोधीश होण्याचे ‘वेध’लागले.
गेल्या काही महिन्यातच ४०० व्हेग्नस कोळसाचा दर्जा चांगला नसल्याचे सांगून नाकारला गेला.हाच कोळसा मग महानिर्मितीने अल्प दरात कोल वॉशरीज कंपनींना विकला.प्रत्यक्षात या नाकारलेल्या कोळश्याचीही जीसीव्ही २,५०० हून अधिक असतो.त्याचा खुल्या बाजाराज तीन हजारावर प्रति टन दर असताना तो महानिर्मितीने कोल वॉशरील कंपन्यांना २ टक्केहून कमी दरात विकला. या संपूर्ण काळ्या बाजारातील व्यवहरात वरील दोन्ही अधिकारी आकंठ बुडाले असल्याचा आरोप पवार यांनी केला.
जीएसटीचेही गौडबंगाल,शासनाचे अडीच हजार कोटींचे नुकसान-
महानिर्मितीने योग्य दर्जा नसल्याचे सांगत नाकारलेला कोळसा,कमी दरात वॉशरीजला विकला जातो,परंतु नियमानुसार त्यावरही जीएसटी भरने बंधनकारक आहे.या व्यवहारात जीएसटी भरल्या जात नसल्याने २५८ कोटींचे नुकसान सरकारला झाले असल्याचा दावा पवार यांनी केला.या संपूर्ण गौडबंगालाची कागदपत्रे ‘जय जवान जय किसान’संघटनेला उपलब्ध होत असल्यानेच सूत्रधार गोमवार यांची हत्या झाली असल्याचा खळबळजनक आरोप करीत, वणी पोलिसांनी या हत्येचा लवकरात लवकर तपास करुन हत्येच्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.या संपूर्ण प्रकरणाचे दस्तावेज घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लवकरच भेटणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
थ्योरीच चुकीची-
गोमेवार रिकाम्या वॅगनमध्ये झोपले असावे आणि ते लक्षात न आल्याने त्यांच्यावरच कोळसा भरण्यात आला असावा असा एक तर्क आता मांडला जात आहे मात्र ही थ्योरीज पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे पवार यांनी सांगितले.एखादा व्यवस्थापक असणारा अधिकारी हा स्वत:चे केबिन सोडून रिकाम्या वॅगनमध्ये कशाला झोपणार?त्यात ही कोळसा लोडिंग करताना संपूर्ण बोग्यांची आधी तपासणी केली जात असते.लोडिंग पूर्वी संपूर्ण बोग्यांची तपासणी करण्याचा शासनाच नियमच आहे.५०-६० रेल्वेच्या डब्यांची पूर्ण तपासणी करुन याचा अहवाल रेल्वेला दिला जातो,कोणती बोगी खराब आहे,याचे भूगतान देखील मग बिलामध्ये केले जात नाही,असे असताना गुप्ता कोल वॉशरीजमधून कोळसा लोड होताना बोगींची तपासणीच केली गेली नाही का?असा प्रश्न प्रशांत पवार यांनी उपस्थित केला.




आमचे चॅनल subscribe करा
