

सुर कोणासाठी? रिकाम्या खूर्च्यांसाठी!
डॉ.ममता खांडेकर
(senior journalist)
नागपूर: लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात काल पुन्हा त्याचा प्रत्यय आला! कशाचा? चौथ्या-पाचव्या गाण्याानंतर श्रोते उठून जाऊ लागलेत आणि निवेदिका केविलवाण्या शब्दात श्रोत्यांना आजर्व करीत होती, या हौशी कलावंतांनी खूप मेहनत केली आहे त्यांच्या गाण्यावर,त्यांना दाद द्या,थांबा, त्यांना ऐकून जा…पण हे शेवटी हे नागपूरकर श्रोते आहेत..या शहरात जिथे जगतविख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनाही एकेकाळी अपमान सहन करावा लागला तेथे हौशी गायकांना ऐकण्यासाठीची सहनशीलता शेवटी श्रोते आणणार तरी कूठून?आणि कूठवर?
दर दोन दिवसांनी सायंटिफिक सभागृहात गाण्यांचा कार्यक्रम असतो. या भागातील दर्दी श्रोते विशेषत: ज्येष्ठ नागरिक विरुंगळा म्हणून का होईना गायकांना ऐकण्यासाठी सभागृहात गर्दी ही करतो मात्र ही गर्दी काही तरी सुरेल ‘ऐकण्यासाठी’ असते ‘झेलण्यासाठी’ नाही. कालच्या कार्यक्रमात तर शहरातील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध डॉक्टर मंडळी होती गाणारी पण..गाण्यांना ना सुर होता ना सादरीकरण. अनेकांचा तर पहरावाही धडाचा नव्हता,घरातील वापरण्याचे कपडे घालूनच ते जणू मंचावर आले होते! असा त्यांचा अवतार होता, चेहऱ्यावर सूतकी भाव आणि गाण्यांची निवड तर त्याहून भयंकर अशीच होती. नागपूरकर श्रोते हे ‘तानसेन’नसले तरी ‘कानसेन’ आहेत, त्यांना चांगलं,सुरेल ऐकवलं तरच ते थांबतात, ऐकतात आणि गायकांना दाद ही देतात. मात्र अलीकडे असे दर्जाहीन कार्यक्रम शहरात वारंवार होऊ लागले आहेत. ‘हौशी‘च्या नावावर अक्ष् रशहा, श्रोत्यांवर लादलेली ही जोरजबरदस्ती कालच्या सांगितीक कार्यक्रमातही अक्ष् रशहा फ्लॉप ठरली आणि चौथ्या गाण्यानंतरच श्रोत्यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. असं का घडावं? सव्वा नऊ वाजता ध्वनिसंयोजकासह सभागृहात फक्त मोजून बारा श्रोते होते ते ही गायकांचे कुटुंबिय. तरीही यादीतील संपूर्ण २६-२७ गाणी सादर करुनच कार्यक्रम संपवण्यात आला! याला कारण काय? तर आम्ही पैसे मोजलेत..अगदी ७-७,१०-१० हजार! प्रत्येकाचे तीन-तीन,चार-चार गाणी तर झालीच पाहिजे. त्यातही दोन डूएट गाणी दाेन सोलो गाणी…पण हे हौशी गायक हे का विसरतात पैशांनी संगीत रक्तात रुजवता येत नाही..श्रोत्यांना ऐकण्यासाठी थांबवता येत नाही मग..वेळ येते ती पैसे देऊनही…रिकाम्या खूर्च्यांना संगीत ऐकवण्याची..!
जिथे सुजाण श्रोते चार गाणी ऐकायला थांबत नाही तिथे ३० गाणी म्हणजे कहरच! त्यातही लांबलचक निवेदन हे असतंच. निवेदकांनाही आपल्यातला ‘संपूर्ण टॅलेंट’ दाखवण्याची हीच ‘संधी’ असते…पुढील कार्यक्रमासाठी त्यांना काहीही शिल्लक ठेवायचंच नसतं. गायकही विसरतात ते प्ले-बॅक सिंगीग करीत नाही..शो लाईव्ह असतो..सुरांसोबतच तुमचे सादरीकरण,उच्चारण, गाण्याची निवड, गाण्यातला भाव, संगीत,वाद्य सगळंच मिळून श्रोत्यांना थांबण्यास भाग पाडायचं असतं. गाण्याचं क्ष्ेत्र नसल्यामुळे हे हौशी गायक गाणीही अशी निवडतात जी मोबाईलवर किंवा दूरचित्रवाणीवर बघायला छान वाटतात मात्र त्यात ‘रिद् म’ नसतो,ठेका नसतो, ऑकेस्ट्रेशन नसतं तरीही..आम्ही पैसे दिलेत ना..मग आम्ही म्हणू तीच गाणी शिकवा…हा अट्टहास सभागृहात मग रिकाम्या खूर्च्यांना गाणी ऐकवायला लावतो. कालच्या कार्यक्रमात ‘बाजीगर ओ बाजीगर’ हे गाणं तर सभागृहात ‘भाजी कर ओ भाजी कर’असे ऐकायला येत होते!कालच्या कार्यक्रमात देखील शहरातील नामवंत वादक कलावंत यांची कीवच आली. २६-२७ गाण्यांवर मेहनत करुनही आणि उत्कृष्ट साथ संगत करुन देखील त्यांच्यावरही रिकाम्या सभागृहासमोर वादन करण्याची वेळ आली. असे नेहमीच घडते..वारंवार घडते..वादकांनाही सवय झाली आहे,अापली बिदागी मिळाली,मानधन मिळालं..संपला विषय! मात्र याला अपवाद देखील असतात. काही कार्यक्रम हे दर्जेदार देखील होतात. श्रोत्यांना फूकट मिळतं ऐकायला म्हूणन श्रोते थांबत नाही..दर्जेदार,सुरेल ऐकायला मिळालं तर श्रोते अगदी रात्री १० पर्यंतही सभागृह रिकामा करीत नाही. शहरातील हौशी गायकांनी यावर नक्कीच विचार करावा. संगीत क्ष्ेत्रात ज्यांनी ३०-३५ वर्षे घालवली ती मंडळी देखील सहसा लाईव्ह कार्यक्रम टाकत नाही कारण प्रश्न पैशांचा असतो…हौशी गायकांना पंचवीस दिवसही संगीत शिकायचं नसतं तरी लाईव्ह शो लगेच टाकायचा असतो.
संगीत हा प्रत्येकाला ‘आत्मिक ‘आनंद देणारा गानप्रकार असतो. त्याचा ‘बाजार’करता येत नाही.. पैसा असला तरी श्रोते विकत घेता येत नाही..त्यामुळे सुर असे लावा की श्रोत्यांनी स्वत:हून दाद दिली पाहिजे. शहरात सुळसुळाट झालेल्या हौशी गायकांना आतातरी कुठे मर्यादा हवी की नको…हे कालच्या शो ने ठलकपणे अधोरेखित केले आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे..!
असाही सत्कार!
काल नागपूर शहरातील असेच एका प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे साहित्यिकांचा सत्कार,पुरस्कार सोहळा व पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. तेथेही डोकावले असता..अहवाल वाचन..प्रस्तावना..मनोगत..मान्यवरांचे भाषण..पुस्तकांवर भरभरुन बोलणारे वक्ते..शेवटी ज्यांचा सत्कार होता त्यांना जागेवरच उभे राहण्यास सांगितले..त्यांचे नाव माईकवर अनाऊंस केले व त्यांनी उपस्थितांना फक्त नमस्कार करुन जागेवर बसण्यास धन्यता मानून घेतली. ना मंचावर आमंत्रण..ना गुलाबाचं फूल..या संस्थेची कीर्ती अनेक साहित्यिकांना माहिती असल्यामुळे ते सत्कारासाठी कार्यक्रमात फिरकलेच नाही. जे नवशिखे होते ते अश्याप्रकारच्या सत्कारामुळे ‘धस्तावलेच!’
प्रत्येक कविकडून १००-१२५ रुपये घेऊन ही संस्था त्यांच्या कवितेचं पुस्तक(क्षमा करा) कवितांची पुस्तके! दरवर्षी(दरवेळी) प्रकाशित करते..संस्था प्रसिद्ध असल्यामुळे वृत्तपत्रातही ठलकपणे त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळते..मात्र प्रत्येक पुस्तकाच्या मागे रुपये सोळा हजार कमाई ही कोणाच्या खिशात जाते…हा संशोधनाचा विषय आहे.




आमचे चॅनल subscribe करा
