फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमसीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन पोलिसाची रेस्टॉरेंट मालकाला मारहाण!

सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन पोलिसाची रेस्टॉरेंट मालकाला मारहाण!

Advertisements


कलम ३५४ झाला थट्टेचा विषय: माझ्याकडे ‘महिला’असल्याच्या पोलिसाच्या धमक्या!

केंद्रिय राज्यमंत्री अनुराग ठाकुर’यांच्या स्वीय सहायकाचा कळमेश्‍वर पोलीस ठाणीयाला फोन!

शिक्षण,व्यापाराचे शहर सोडून पोलिसाच्या भीतीने रेस्टोरेंट मालक परांगदा:छिंडवाड्यात घेतला आश्रय

नागपूर,ता.१३ नोव्हेंबर २०२२: कळमेश्‍वर ठाण्याच्या हद्दीत कर्तव्यावर असणारे एएसआय शिवाजी मुंढे यांनी अमरावती रोड,गौंडखेरी,टी-पॉईंट जवळील ’मूनबग्स’या फॅमिली रेस्टॉरेंटच्या मालकाला तेथील पोलिस ठाण्यात नेऊन लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.ही जागा खुशवंत बजाज नावाच्या एका उद्योजगाने स्वर्गीय सगरादेवी मुख्तियारसिंग डोंगरा यांच्याकडून २०१९ मध्ये कराराप्रमाणे भाडेतत्वावर घेतली होती,उजाड ढाब्यावर ३५ लाख रुपये खर्च करुन त्याचे नुतनीकरण करुन व्यवसायास सुरवात केली मात्र याच दरम्यान सगरादेवी यांचा मृत्यू झाला व त्यांच्या तीन मुली व तिन्ही जावई यांनी इतर एका बिल्डरला ही जागा विकण्याचा घाट घातला व यातूनच बजाज यांच्यावर धक्कादायकरित्या पाेलिसी खाक्याचा ससेमिरा सुरु झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

या मारहाणीविषयी तसेच एएसआय शिवाची मुंढे यांच्या ‘सिंघमगिरी’विरोधात बजाज यांनी कळमेश्‍वर पोलिस ठाण्यात लिखित तक्रार देखील नोंदवली असून अद्याप या तरुण उद्योजगाला पोलिस विभागाकडून कोणताही ‘संवैधानिक’न्याय न मिळाल्यामुळे, त्यांना आपले स्वत:चे हक्काचे शहर जिथे त्यांचे संपूर्ण शिक्षण झाले,व्यवसाय उभारला ते नागपूर शहर सोडून अद्यापही मध्यप्रदेशच्या छिंडवाडा येथे परांगदा होऊन जगत राहण्याची वेळ आली आहे! त्यांच्या माघारी हे रेस्टॉरेंट त्यांचे मॅनेजर सांभाळत असून त्यांना देखील एएसआय शिवाजी मुंढे हे सतत वेळी अवेळी दमदाटी करुन जागा रिकामी करुन देण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव सुरु होण्या पूर्वीच म्हणजे अमरावती रोड वरील सगरादेवी यांच्या मालकीच्या एकूण ९ हजार सक्वेअर फिटची जागा, बजाज यांनी करार पत्र करुन भाड्याने घेतली.विशेष म्हणजे ही जागा भाड्याने देत असताना सगरादेवी यांच्या तिन्ही मुलींनी देखील बजाज यांना ‘सहमती पत्र’ लिहून दिले.वीस हजार मासिक भाडे देण्याचे करार पत्रात नमूद करण्यात आले. बजाज यांनी या ढाब्याचे नुतनीकरण करण्यासाठी सुरवातीला १९ लाख रुपये लावले मात्र करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला आणि लॉकडाऊन लागले.

(छायाचित्र:पूर्वीचा ढाबा)

याच दरम्यान सगरादेवी यांचा मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलींनी बजाज यांच्याशी कोणतीही सल्ला मसलत न करता इतर एका मोठ्या बिल्डरला ही जागा विकण्याचा घाट घातला मात्र करोनाची लाट ओसरल्यानंतर बजाज यांनी या जागेवर आणखी पैसा गुंतवून जवळपास ३५ लाखांचा खर्च करुन या ठिकाणी फॅमिली रेस्टॉरेंट बनवले.ही जागा भाडे तत्वावर घेताना संपूर्णत:उजाड स्थितीत होती.या जागेवर सुरक्षा भिंती,मुख्य दरवाजा,खोल्या इत्यादीचे बांधकाम बजाज यांनी स्वखर्चातून केले.

करोनामुळे तब्बल दोन वर्षांचे नुकसान झाल्यानंतर हा संपूर्ण खर्च लवकरच भरुन निघेल असा कयास बजाज यांनी बांधला होता.याच महिन्यात ३० नोव्हेंबर रोजी मृतक सगरादेवी डोंगरा यांच्यासोबतच करार संपणार असल्याने पुढील काही वर्षांसाठी तो पुन्हा वाढविला जाईल,अशी त्यांना आशा होती मात्र, हा करार संपण्या पूर्वीच सगरा देवी यांच्या जावयांनी, इतर एका बिल्डरला ही जागा विकण्याचा डिसेंबर २०२१ मध्ये घाट घातल्याचा आरोप बजाज यांनी आपल्या तक्रारीत केला.

ही जागा विकायची असल्यास ती तुम्ही सांगाल त्या किंमतीत घेतो,अशी विनंती देखील बजाज यांनी सगरादेवी यांच्या मुलींना व जावयांना केली मात्र त्यांनी ती धुडकावून लावली.

सगरादेवींच्या जावयांनी करारनामा संपण्यापूर्वीच रेस्टॉरेंटमध्ये येऊन उद्याच्या उद्या ही जागा खाली करण्याचे ‘तुघलकी फर्मान’बजाज यांना फरमावले.यावर बजाज यांनी करार संपण्यापूर्वी कायदेशीररित्या माझ्याकडून ही जागा खाली करु शकत नसल्याचे जावयांना ऐकवले.विशेष म्हणजे मृतक सगरादेवी यांचे ते जावई असल्याने आपल्या गल्ल्यावरुन बाहेर येत बजाज हे आधी त्यांच्या पाया पडले होते.

या सर्व घडामोडीत अचानक एएसआय शिवाजी मुंढे यांची या प्रकरणात ’एन्ट्री’झाली.रात्रीच्या १ वाजता कळमेश्‍वर पोलिस ठाण्यातून बजाज यांच्या मॅनेजरला फोन आला व बजाज यांना तातडीने पोलिस ठाण्यात पाठविण्यास सांगण्यात आले!बजाज पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर शिवाजी मंुढे यांनी एका को-या कागदावर बजाज यांना स्वाक्षरी करण्याचे फर्मान सोडले!

सगरादेवीची जागा मुकाट्याने रिकामी कर,मला माझ्या भागामध्ये कोणताही लफडा नको,नाही तर मी अशी कलम लावील की तुझा जामीन देखील होणार नाही!अश्‍या असंवैधानिक शब्दात, संवैधानिक पदावरील अधिका-याने एका सामान्य ढाबा चालकाला धमकावले!

परिणामी दुस-या दिवशी बजाज हे वकीलांकडे गेले व वकीलांच्या मार्फत सगरादेवी यांच्या वारसदारांना नोटीस पाठविली.याच रात्री २ वाजता शिवाजी मुंढे हे बजाज यांच्या रेस्टॉरेंटमध्ये पोहोचले व रेस्टॉरेंटच्या कर्मचा-यांनाही धमकी देत,तुम्ही सगळे येथून ताबडतोब निघून जा नाही तर तुमच्यावर देखील ’केस ठोक दूंगा‘अश्‍या शब्दात, संविधानाने कर्तव्याचे पालन करण्यासाठी दिलेल्या खाकी वर्दीचा ‘रुबाब’ मात्र कायदा मोडणा-यां ऐवजी सामान्य कर्मचा-यांवर दाखविला!

बजाज यांनी वकीलांकडून तयार केलेली नोटीसांची प्रत एसपी आणि एक डीएसपीला दिली.त्यांची तक्रार कळमेश्‍वर पोलिस ठाण्यातील पीआय शेख यांनी स्वीकारली व त्याची रिसिव्ह कॉपी देखील बजाज यांना दिली.वेळी अवेळी रेस्टॉरेंट मध्ये येऊन मालक आणि मॅनेजरला सिंघम स्टाईलनी बोट करुन दमदाटी केली.व मालकाला ‘खडा रह’ म्हणत,व स्वत: आपल्या हाताने खुर्ची ओढत व सिंघम स्टाईलने बसतो तरी देखील मॅनेजर हात बांधून उभा राहतो व काय झाले साहेब?अशी विचारणा करतो.असा व्हीडीयो चांगलाच व्हायरल झाला आहे.

एवढंच नव्हे तर बजाज यांना ७ एप्रिल २०२२ च्या दुपारी ३.३० वाजता कळमेश्‍वर पोलिस ठाण्यात नेऊन अश्‍या खोलीत नेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली ज्या खोलीत सीसीटीव्ही लागलेले नाहीत!(नियमाप्रमाणे पोलिस ठाण्यातील प्रत्येक क्षेत्र हे सीसीटीव्ही फूटजेखाली येणे बंधनकारक आहे)प्रतिकारात बजाज यांनी देखील शिवाजी मुंढे यांना ढकलाढकली केली.बचावासाठी मुंढे यांना मागे ढकलले.यावर मुंढे यांनी पोलिसी बुटांनी त्यांना चांगलेच तुडवले!

(छायाचित्रे:नुतनीकरणानंतरचे रेस्टॉरेंट)

कळमेश्‍वर पोलिस ठाण्यातील पीआय मुंढे यांनी मध्यस्थी करीत शिवाजी मुंढे यांना धरुन ठेवले व बजाज यांना तेथून जाण्यास सांगितले.यावेळी बजाज यांच्यासोबत एक अल्पवयीन नातेवाईक सोबत होता,त्याने या संपूर्ण मारहाणीचा व्हिडीयो रेकॉर्ड केला मात्र शिवाजी मुंढेंनी त्याच्याकडून मोबाईल हिसकला व सायबर सेलच्या तज्ज्ञाकडून फॉरमेटही करुन घेतला.एवढंच नव्हे तर पोलिस ठाण्यातील या बेकायदेशीर घटनेची साक्ष देणारे जे काही थोडे फार सीसीटीव्ही फूटेज होते,ते देखील उडवून देण्यात आले!

या घटेनेनंतर सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान बजाज यांनी मेयो रुग्णालय गाठले.तेथे करण्यात आलेल्या सीटी स्कॅनमध्ये त्यांच्या मानेला व पोटाला गंभीर इजा झाल्याचे निदान झाले.

या सर्व उठाठेवी बजाज यांनी एएसआय शिवाजी मुंढेंच्या विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी करण्यात आल्याचे बजाज यांचे म्हणने आहे.पोलिस विभागातील काही वरिष्ठांनी देखील बजाज यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दवाब आणल्याचा बजाज यांचा आरोप आहे.

यानंतरही बजाज यांनी तक्रार मागे घेण्यासाठी नकार दिल्याने शिवाजी मुंढे यांनी त्यांच्या रेस्टॉरेंटमध्ये येऊन ‘तक्रार मागे घे अन्यथा कलम ३५४ लावून टाकील,माझ्याकडे ‘महिला’तयार आहेत,तुला जामीन देखील मिळू देणार नाही’अशी गंभीर धमकी बजाज यांना दिली.

बजाज हे काही काळ मनसेचे कार्यकर्ते राहीले असल्याने त्यांनी याबाबत मनसेचे नेते महेश जोशी यांच्या कानावर हे प्रकरण टाकले.जोशी यांनी कळमेश्‍वर पोलिस ठाण्यात येऊन पोलिस विभागाच्या अश्‍या कारभाराविषयी खडे बोल सुनावले. याही वेळी कळमेश्‍वर पोलीस ठाण्यात त्यांना तक्रार मागे घेण्यास सांगण्यात आले,यावर काहीही झाले तरी आणि काहीही कारण नसताना एवढी अमानुष मारहाण झाली असता,आर्थिक नुकसान ही सहन करुन,मी तक्रार मागे घेणार नसल्याचे बजाज यांनी सांगितले.कहर तर तेव्हा झाला, बजाज यांना यावेळी तक्रार मागे घेण्यासाठी चक्क ’केंद्रिय राज्यमंत्री अनुराग ठाकुर’ यांचाच संदर्भ देण्यात आला!

सगरादेवी यांच्या मुलींचा संबंध हिमाचल प्रदेशाशी असल्यामुळे अनुराग ठाकूर यांना देखील हे प्रकरण माहिती असल्याने, ठाकुर यांच्या स्वीय सहायकाचा चक्क कळमेश्‍वर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिका-यांना फोन आल्याचे बजाज यांना सांगण्यात आले!

बजाज यांना त्यांच्या या आत्मसन्मानाच्या लढाईत न्याय हवा आहे,‘महिला’तयार आहेत तक्रार करण्यासाठी,या शिवाजी मुंढे यांच्या धमकीची चांगलीच धास्ती बजाज यांनी घेतली असून,या भीतीमुळेच ते आपला व्यवसाय मॅनेजरच्या भरवश्‍यावर सोडून छिंदवाडा येथे आश्रयस्थानी आहेत.कलम ३५४ चे गांर्भीय बजाज यांना माहिती असल्याने ते कोणताही धोका पत्करु इच्छित नाही.एकीकडे ज्या कलमेने महिलांच्या शील व आत्मसन्मानाच्या रक्षणाचे ब्रीद स्वीकारले आहे ,त्याच कलमाचा गैरवापर,ते ही एका संवैधानिक पदावर असलेल्या पोलिस अधिका-याकडूनच करण्यात येत असल्याने,या धमकीला त्यामुळेच वेगळं गांर्भीय प्राप्त झालं आहे.

या कलमाचा दुरुपयोग आपली राजकीय,आर्थिक पोळी शेकण्यासाठी असाच होत राहीला तर कलम ४९८(ब)प्रमाणे एक दिवस देशाचे सर्वोच्च न्यायालय या कलम ३५४ या कलमाच्या दुरुपयोगाच्या अतिरेकाविषयी देखील कठोर ताशेरे ओढवल्याशिवाय राहणार नाही व त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासनातील असेच काही झारीतील शुक्राचार्य असतील,यात दुमत नाही.

अद्याप देखील बजाज यांच्या मॅनेजरला वेगवेगळ्या प्रकारे जागा रिकामी करण्यासाठी धमक्या दिल्या जात आहे.वेळी अवेळी शिवाजी मुंढे हे सिंघम स्टाईलने रेस्टॉरेंटमध्ये पोहोचून ग्राहकांना हुकसावून लावने,कर्मचा-यांना दमदाटी करने,घाणेरडी शिविगाळ करने,रेस्टॉरेंटची लाईट बंद असताना देखील सिंघम स्टाईलने दार ढकलून आत येणे, हा धक्कादायक प्रकार सुरुच असल्याची कैफियत बजाज यांनी खास ’सत्ताधीश’कडे मांडली.

याच हॉटेलच्या विरुद्ध दिशेला असणा-या अनेक हॉटेल्समध्ये अवैधरित्या दारु विक्री होते,हूक्का पार्लर चालतात,इतर गैर धंदे चालतात,रात्रीच्या दोन नंतर ही या परिसरातील अनेक हॉटेल्स नियमांचा भंग करुन सर्रास सुरु असतात,मोठ्या आवाजात डिजे वाजत असतो मात्र, शिवाजी मुंढे यांना ते दिसत नसून,उठसूट ही जागा रिकामी करण्यालाच त्यांनी आपले पोलिसी ‘कर्तव्य’मानले असल्याचा संताप बजाज व्यक्त करतात.

या तिघी बहीणींपैकी एकीच्या लग्नात कराराच्या पलीकडे जाऊन एक लाख तीस हजारांची मदत केली.या रेस्टॉरेंटच्या उद् घाटनप्रसंगी जागेच्या मालकीन सगरादेवी,त्यांच्या तीन मुली व तिन्ही जावई व कुटूंबियांसह ज्यांना सन्मान देऊन निमंत्रित केले.त्यांचे जेवणाचे बिलही माफ केले,सगरादेवी यांनी नव्या स्वरुपातील ते रेस्टॉरेंट बघून अतिशय आनंद व्यक्त केला होता व त्यांच्या पतीची ती निशानी एवढ्या सुंदर स्वरुपात परिवर्तित झाल्याचा आनंद व्यक्त करुन,काहीही झाले तरी त्यांच्या दिवंगत पतीची निशानी असणारी ही जागा त्या कोणालाही विकणार नसल्याची भावनाही त्या क्षणी त्यांनी बजाज यांच्याकडे व्यक्त केली होती.त्या मोबदल्यात जे मिळाले ते माणूसकीला धरुन नसल्याची खंत बजाज व्यक्त करतात.

(छायाचित्र:मेयाे रुग्णालयाचा अहवाल)

मूळात सगरादेवी व त्यांच्यातील या करारात एका पोलिस अधिका-याची काय भूमिका आहे?कायदा त्यांना अशी परवानगी देतो का?एकीकडे पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे शहरातील गुन्हेगारांवर वचक प्रस्थापित करण्याची भाषा उच्चारतात,दुसरीकडे त्यांच्याच विभागाली काही पोलीस अधिकारी हे गुन्हेगार तर सोडा,सर्वसामान्य उद्योजकालाच देशाधडीला लावण्याचे कार्य करीत आहे.

(छायाचित्र:बजाज यांनी दाखल केलेली तक्रार)

एकेकाळी त्या तिघी बहीणी यांनी मला रेस्टॉरेंट चालविण्यासाठी समंती पत्र दिले मग कराराची मुदत संपली नसतानाही जागा खाली करवून घेण्यासाठी त्यांनी साम,दाम,दंड,भेदाची जी रणनीती अवलंबली आहे ती माझ्या आत्मसन्मानाला घाव घालणारी असल्यानेच ,कायद्याची आणि न्यायाची ही लढाई मी कोणालाही न घाबरता अखेरपर्यंत लढणार असल्याचा निर्धार बजाज हे व्यक्त करतात.

पोलिसांची बदनामी झाल्यास योग्य कारवाई करणार:शिवाजी मुंढे

ही घटना किवा हा आरोप सहा-सात महिन्यांपूर्वीचा आहे.अश्‍या जर घटना घडल्या असतील तर आता पर्यंत बजाज गप्प का बसले?कलम ३५४ ची धमकी दिली असा त्यांचा आरोप आहे तर त्याच वेळी त्यांनी तक्रार का नाही दाखल केली?मारहाण झाल्याची ते जे सांगत आहेत त्या तारखेला मी तिथे नव्हतोच.पोलिसांची बदनामी झाल्यास याची दखल घेत गुन्हे दाखल करण्यात येईल.ही जागा त्या तिनी बहीणींची असून बजाज हे त्यांची जागा बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत.यामुळेच बजाज हे त्या तीन बहीणींसोबत गुंडागर्दीही करीत आहेत.आम्हाला आमच्या हद्दीत असे वाद नको आहेत.त्या तीन बहीणींनी आमच्याकडे बजाज विरोधात तक्रार दाखल केली होती त्याची दखल पोलिसांकरवी घेण्यात आली,एवढेच.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या