

वि.सा. संघात रंगल्या ‘गप्पा सिनेमावर’
नागपूर, ११ मार्च २०२२: साहित्य, नृत्य, संगीत, नाट्य या सर्व कलामाध्यमांची भाषा वेगवेगळी असते. सिनेमाची भाषा ही जगातील सर्वात तरुण भाषा आहे. सिनेमा प्रत्यक्षाला व्यापक स्वरूप देणारा असून त्याची भाषा ही सर्वसामान्यांची भाषा असते, असे मत प्रसिद्ध सिनेविश्लेषक समर नखाते यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘गप्पा सिनेमावर’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शुक्रवारी विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते डॉ. जब्बार पटेल व सिनेविश्लेषक समर नखाते यांनी सहभाग नोंदवला. सहाव्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे मेडीकल चौकातील व्हीआर सिनेपोलिस चित्रपटगृहात आयोजन करण्यात आले आले असून त्यानिमित्ताने डॉ. पटेल आणि समर नखाते नागपुरात आले आहेत.
समर नखाते यांनी साहित्य, नृत्य, संगीत, नाट्य या सर्वांच्या भाषेवरही विस्तृतपणे भाष्य केले. साहित्यकृती वाचताना प्रत्येकाच्या मनात साहित्यकृती जन्माला येत असते. ती चिन्हातून जन्माला येते. त्यातून शब्द तयार होते. पण शब्दाच्या पलिकडेही भाषा असते ती सिनेमातून आपल्याला दिसते, असे ते म्हणाले.
डॉ. जब्बार पटेल यांनी सिनेमासाठी भाषेचे किती महत्व असते हे सांगितले. त्यांनी सिनेमाचे कथानक किंवा गीत लिहिताना लेखकाने त्याच्या भाषेत ते लिहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी डॉ. जब्बार पटेल व समर नखाते यांच्या कार्याची माहिती दिली.




आमचे चॅनल subscribe करा
