

पदवीधर मतदार संघ निवडणूक
नागपूर, ता.९ नोव्हेंबर: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी आचार संहिता लागू झाली आहे. त्यानुषंगाने सर्व शासकीय कार्यालये व कँप मधील सर्व कार्यालयीन इमारती, शासकीय संपत्तीवरील जाहिराती आणि राजकीय पक्षांचे झेंडे काढून टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज विभाग प्रमुखांना दिले.
शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण रोखणे आणि सार्वजनिक जागेच्या गैरवापरावर बंदी घालण्याची कार्यवाही करावी. या मध्ये रेल्वे स्टेशन, बसस्थानके, विमानतळ, रेल्वे पूल, रस्ते, शासकीय बसेस, टेलिफोन व विजेचे खांब, मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतीवर असणाऱ्या अनधिकृत जाहिराती काढून टाकण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिल्यात.
तसेच खाजगी मालकीच्या सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती काढण्याची कार्यवाही त्वरित करावी. तसेच शासकीय वाहनांचा राजकीय पक्ष, उमेदवारांकडून निवडणुकांच्या प्रचारासाठी किंवा निवडणूक कामकाजासाठी वापर करण्यावर बंदी घालावी. सार्वजनिक निधीच्या खर्चातून करण्यात येण्याऱ्या सर्व प्रकारच्या जाहिराती बंद कराव्यात. शासकीय संकेतस्थळावरील राजकीय कार्यकर्त्यांचे सर्व छायाचित्रे तात्काळ काढून टाकावेत. विकास आणि बांधकाम क्षेत्रातील गतिविधींची तात्काळ यादी मागवून घ्यावी. निवडणूक खर्च देखरेख आणि आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
तक्रार देखरेख यंत्रणा, आयटी ॲप्लीकेशन्स, सोशल मीडियावरुन तात्काळ हटवावेत. मतदार व राजकीय पक्षांच्या जागृतीसाठी माहितीचे प्रसारण करणे, शैक्षणिक व खाजगी संस्थांकडून सक्रिय सहकार्य घ्यावे. माध्यम प्रमाणीकरण व संनियत्रण समिती संपर्क करतील.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमत्तिक रजा-
महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, पूणे व नागपूर पदवीधर आणि अमरावती व पुणे विभाग या शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला असून सदर मतदान १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ५ सायंकाळी वाजेपर्यंत असून मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमत्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमत्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.
***




आमचे चॅनल subscribe करा
