

नागपूर,ता.२ एप्रिल २०२४: योगायोग असा की काल सोमवारी १ एप्रिलचा दिवस होता.हा दिवस जगाला मूर्ख बनविण्याचा असतो.याच दिवशी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे धाकटे चिरंजीव सारंग गडकरी हे मुस्लिम बहूल भागात गडकरींसाठी मुस्लिम बांधवांची मते मागण्यासाठी गेले होते.यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि नितीन गडकरी हे सर्वस्वी वेगवेगळे असून ,भाजपला नव्हे तर गडकरींना मत देण्यासाठी आव्हान केले.हा व्हिडीयो संपूर्ण मुस्लिम बहूल भागात चांगलाच व्हायरल देखील झाला किंबहूना करण्यात आला.आपल्या भाषणात सारंग यांनी मुस्लिमांना आव्हान करताना अनेक अश्या गोष्टींचा उहापाेह केला जे किमान भाजपच्या तत्वात मुळीच बसणारे नव्हते,तरी देखील ज्या धाडसाने सारंग यांनी अनेक मोबाईलचे कॅमरे ऑन असताना जे भाषण केले त्या भाषणाचे आता अनेक अन्वार्थ काढले जात आहे.
योगायोग असा की कालच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार नागपूरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी होते.वर्धा येथील सभेनंतर त्यांनी आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद देखील घेतली.या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे देतानाच,या ही निवडणूकीत भाजपची सत्ता आल्यास गडकरी पंतप्रधान होतील का?असा प्रश्न केला असता,‘ते इंडिया आघाडीतून पंतप्रधान होतील‘असे मिश्किल उत्तर देऊन ते जागेवरुन उठले.
एकीकडे गडकरी यांचे पूत्र लोकसभेच्या निवडणूकीत जवळपास चार लाख मते असणा-या मुस्लिम मतदारांना संबोधित करताना,मुस्लिम मतदार भाजपला कधीही मत देत नाही मात्र,गडकरी हे खूप चांगले माणूस असून माणूसकीच्या नात्याने मुस्लिमांनी भाजप या राजकीय पक्षापलीकडे जाऊन, गडकरींना मत देण्याचे केलेले आव्हान आणि शरद पवार यांचे नागपूरातच केलेले ’गडकरी हे इंडिया आघाडीतून पंतप्रधान होतील’हे विधान यांचा काय मेळ आहे?यावर आता चांगलीच चर्चा झडत आहे.
२०१४ मध्ये जेव्हा गडकरी हे नागपूरातून पहील्यांदा लोकसभेत निवडून गेले त्यावेळी, ही मुळीच भाजपची सीट नव्हती असे सारंग हे मुस्लिम बांधवांना सांगताना व्हिडीयोमध्ये दिसून पडतात आहेत.याचा अर्थ नागपूकरांनी भाजपला नव्हे तर गडकरी यांना मतदान केले होते,त्यामुळेच गडकरी व भाजप हे वेगवेगळे आहेत हे मुस्लिमांनी समजून घ्यावे,असे सारंग यांचे म्हणने होते.अर्थात २०१९ मध्ये दुस-यांदा गडकरी हे लोकसभेवर गेले त्यावेळी त्यांना मोदींच्या लाटेने तारले की स्व कर्तृत्वाच्या करिष्म्याने,हा खुलासा सारंग गडकरी यांनी आपल्या भाषणात केला नाही.
मूळात सारंग गडकरींनी मुस्लिम मतांची बेगमी करताना भाजप व गडकरी यांच्या दरम्यान स्पष्टपणे जी रेघ ओढली,त्याच्या मागे काय गूढ दडले आहे,याचा मागोवा आता विविध समाज माध्यमांवर घेतला जात आहे.दिल्लीश्वरांची गेल्या काही काळापासून गडकरी यांच्यावर प्रचंड खप्पामर्जी झाली असल्याची चर्चा खासगीत झडत असते मात्र,उघडपणे फक्त निवडणूक जिंकण्यासाठी चक्क पक्षाच्या विरोधात जाऊन मत मागण्या मागील राजकारण, हे काल पहिल्यांदा जगासमोर आले किंबहूना आणल्या गेले.११ डिसेंबर २०२२ रोजी मेट्रोच्या दूस-या फेजचे उद् घाटन तसेच वंदे भारतचे लोकापर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे नागपूरात आले असता,गडकरी यांच्याप्रति त्यांची देहबोली व भाषणातील बेदखलपणा चाणाक्ष नागपूरकरांच्या नजरेतूनही सूटला नव्हता.
यानंतर मोदींचे अनेक दौरे नागपूर तसेच नागपूरमार्गे झाले मात्र,गडकरींप्रति त्यांचा दूर्लक्षीतपणा हा पराकोटीचा खटकणारा होता.यावेळी तर लोकसभेसाठीच्या पहील्या यादीत एकूण १९३ उमेदवारांची यादी भाजपतर्फे घोषित झाली, त्या पहील्या यादीत गडकरी यांचे नावच नव्हते.महाराष्ट्र व बिहारमध्ये युतीची सरकार असल्याने या राज्यांचा क्रम नंतर लावण्यात येईल,अशी मखलाशी भाजपच्या मोठ्या नेत्यांनी जरी केली असली, तरी नागपूर व गडकरी हे नाव अगदी पहील्याच यादीत येणे अपरिहार्ह्य होते ते नाही घडले.दूस-या यादीत जरी नाव आले तरी प्रतिष्ठा आणि मानमर्यादेची ती रया पार निघून गेली होती.
गडकरी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रचाराचा जो धडाका लावला आहे तो बघता,या वेळी मी प्रचार करणार नाही,रॅली काढणार नाही,दारोदारी मत मागणार नाही,ज्यांना द्यायचे आहे त्यांनी मत द्या,नाही द्यायचे त्यांनी नका देऊ,हा त्यांचा व्हिडीयोच घरोघरी जास्त पोहोचला आहे.यावेळी तर फक्त गडकरीच नव्हे तर त्यांची मुले,सुना,कुटूंबियच भाजपचे झेंडे हातात घेऊन प्रचारात जुंपली असल्याचे दृष्य दिसून पडतंय!मार्चचा शेवटचा आठवडा व भाजून काढणारा एप्रिल महीन्यात गडकरी यांना मधुमेह,उच्च रक्तदाब असतानाही सकाळी आणि दूपारी ४ पासून रॅलीत फिरुन मत मागावी लागत आहे.
२०१९ मध्ये गडकरी यांच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा स्वत:रणरणत्या मे महिन्यात लकडगंज येथे आले होते.कळकळीने त्यांनी नागपूरातून गडकरी यांना विजयी करुन दिल्लीत पाठविण्याचे आवाहन नागपूरकरांना केले होते.यावेळी गडकरी व त्यांचे कुटूंबिय हातात बॅनर घेऊन प्रचार करताना दिसून पडत आहेत,हे चित्र एवढं का बदललं? २०१९ मध्यचे गडकरी हे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार होते,यात शंका नाही.त्यांच्या स्वभावामुळे विरोधी राजकीय पक्षामध्ये त्यांचा कोणीही शत्रू नाही.स्वत:सोनिया गांधी यांनीही संसदेत त्यांच्या कामाचे मुक्त कंठाने गुणगान केले होते.त्यामुळेच सारंग गडकरींनी मुस्लिम बहूल भागात गडकरींकडे बघून मत द्या,त्यांना विजयी करा,भाजपकडे बघून नाही,असे केलेले आव्हान हे येत्या काळातील राजकारणाची दिशा स्पष्ट करतात.
गेल्या पाच वर्षात गडकरी यांचे दिल्लीत हेतूपुरस्सर करण्यात आलेले खच्चीकरण हे सर्वविदीत आहे.गडकरी यांचा स्वभाव पाहता फार काळ ते हे सहन करणार नाही,हे देखील तेवढेच खरे.विहीरीत जीव देईल पण दुस-या पक्षात जाणार नाही,हे देखील गडकरी यांचेच शब्द आहेत त्यामुळे भाजपाच्या तिकीटावर जिंकूनच ,गरज पडली तर ते पुढे इंडिया आघाडीच्या पाठींब्यावर देशाचे पंतप्रधान होतील का?यावर आता चांगलेच चर्वितचर्वण होत आहे.
सारंग गडकरी यांनी फक्त नागपूरातील मुस्लिम बहूल भागात भाजप या राजकीय पक्षा पलीकडे गडकरींना मत देण्याचे आव्हान केले नाही तर,देशातील संपूर्ण मुस्लिमांनाच हे आव्हान रितसर पोहोचले आहे.गडकरी हे असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या मुलाच्या या भाषणानंतर हैदराबादेतील एमआयएम किवा तमिळनाडूतील द्रमुक पक्ष त्यांना इंडिया आघाडीतर्फे पंतप्रधान होण्यासाठी विरोध करणार नाही.गडकरी हे हिंदूत्वावादी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असले तरी, ते वेगळे आहेत,हे मुस्लिम तसेच ईसाई धर्मिय मतदारांच्या मनात ठसविण्यात सारंग गडकरी यशस्वी झाले आहेत,असा कयासही आता लावला जात आहे.
भाजपने जे शिवसेना तसेच राष्ट्रवादीसोबत केले तेच गडकरी हे भाजपसोबतही करु शकतात,असे देखील आता बोलले जात आहे.ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायलयाने शिवसेनेच्या फूटीनंतर पक्ष शिंदेंच्या ताब्यात दिला त्याचप्रमाणे, गडकरी यांचाच स्वीकार भाजपातील अनेक नेते करु शकतात.त्यामुळे ‘पक्ष माझाच’ असे सांगून मोदींना बाहरेचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.राजकारणात काहीही अशक्य नाही,हे महाराष्ट्राच्या राजकारणाने २०१९ नंतर देशाला दाखवून दिलं आहे.गडकरी यांचे राहूल गांधी यांच्यासोबत देखील चांगले संबंध आहेत.वेळ पडली तर राहूल गांधी हे गडकरींना पाठींबाच देतील.
गडकरी पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार होते आणि आहेत,हे काहीही झाले तरी नाकारता येत नाही.त्यामुळेच गेल्या दोन टर्ममध्ये त्यांचे पंख छाटण्यात आले,यावेळी तर तिकीटाचे देखील वांदे झाले होते.गडकरींना तिकिट दिले तरी घरी बसवायचं,पुढे राज्यसभेत पाठवायची तयारी होती,असे देखील आता बोलले जात आहे.
नागपूरात ‘एक म्यान मे दो तलवार नही रह सकती’या उक्तीप्रमाणे दोन सत्ताकेंद्रे निर्माण झाली आहेत,हे सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ दिसून पडतंय.भाजपच्या संसदीय समितीमधून गडकरी यांची गच्छंती करुन फडणवीस यांची वर्णी लागणे,हे एकच उदाहरण पुरेसे आहे.२०१९ मध्ये काँग्रेसच्या नाना पटोलेंना फक्त वीस दिवस प्रचार करुन साढे चार लाखांच्या वर मते मिळाली होती,त्यावेळी देखील गुजरात मधील एक लॉबी गडकरींना पराभूत करण्यासाठी सक्रिय होती,अशी चर्चा होती,यावेळी देखील त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नााही.
गडकरी यांच्या विराेधात निवडणूकच लढविण्याची ईच्छा नसणारे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे हे अचानक फॉर्ममध्ये आलेले दिसून पडतात.त्यांची देहबोली बदलली.आत्मविश्वासाने दररोजचा प्रचार त्यांचा सुरु आहे.नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे,हे नाकारता येणार नाही.‘पंजा’च्या मागे मुस्लिम मते भक्कमपणे उभी रहातात,हा नागपूरचा राजकीय इतिहास आहे.त्यामुळेच या ही निवडणूकीत विकास ठाकरे यांच्या बाजूने चार लाख पैकी दोन लाख जरी मुस्लिमांची मते पडली तरी निकाल पलटू शकतो,याची जाणीव गडकरींनाही आहे.देशभरात ईव्हीएम विरोधात कितीही ओरड सुरु असली तरी त्याचा फायदा किमान नागपूरात भाजपला होणार नाहीहे देखील गडकरींचे काही शुभचिंतक खासगीत सांगाताना दिसतात.
त्यामुळेच गडकरींना त्यांच्या दहा वर्षांचा कामाचा हिशेब नागपूरकर जनतेला देणे भाग आहे.एक लाख कोटींची विकासकामे नागपूरात केली,हा त्यांचा दावा नागपूरकर जनतेला तरी पचनी पडलेला नाही,हे वास्तव आहे.शेवटी एक लाख कोटी हा जनतेचाच पैसा होता,त्याचा उपयोग जनतेला न होता मोजक्या कंपन्या आणि कंत्राटदारांना कसा झाला,याचेच व्हिडीयो अलीकडे सर्वाधिक प्रमाणात व्हायरल होत आहे आणि महत्वाचे म्हणजे ते लाखोच्या संख्येने बघितले जात आहे.त्यामुळेच गडकरींच्या नागपूर शहराचा’विकास’केल्याचा दावा जनतेच्या पचनी पडत नसल्याचे चित्र उमटले आहे.
पश्चिम नागपूरातील एका वस्तीतील परवाची घटना ही प्रातिनिधिक उदाहरण म्हणनू सांगता येईल.भाजपचा तो खास ‘बंगाली‘माणूस परवा कमळचं बटण दाबाल हा प्रचार करण्यासाठी त्या वस्तीत गेला असता अक्षरश: संपूर्ण वस्तीने मिळून त्याला पिटाळून लावले!२३ सप्टेंबर रोजी अंबाझरी ओवरफ्लोमुळे नाग नदीलगतच्या अनेक वस्त्या या पूर्णपणे जलमय झाल्या होत्या.मध्यरात्रीच्या त्या महापूरात या गरीबांचे घर पार धूवून निघाले होते.घरातील अन्नधान्य,सामान,पुस्तके,गाद्या,संपूर्ण साहित्य हे पाण्यात तरंगत होते.आठ तासांनंतर पाणी ओसरले असले तरी त्यांची मुलेबाळे दोन दिवस उपाशी होती,इतरांच्या मदतीवर अवलंबून होती.त्यावेळी भाजपचा हा प्रचारक त्यांची विचारपूस करण्यासाठीही आला नाही,तो रोष या जनतेच्या मनात अजूनही दाटला आहे.
एवढंच नव्हे तर लॉकडाऊनच्या काळात नागूपरातील अनेक वस्त्यांमध्ये फार भयावह स्थिती होती.हाताला काम नाही,घरात खाण्यासाठी अन्नाचा दाणा नाही.गडकरींसह अनेक आमदारांनी ही अन्नछत्र चालवले मात्र,त्याचा फायदा गरीबांना व गरजूंना होण्या ऐवजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी लाटला,असा उघड आरोप केला गेला होता.कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांकडे जेवणाचे डबे भरुन-भरुन जात राहीले,धान्याच्या किट सर्वाधिक नातेवाईकांकडेच पाेहोचल्या,याची चर्चा विरोधी पक्षातील नव्हे तर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये झडल्या,हे विशेष.स्वत:सह आपल्या कुटूंबियांना जगवण्याचा तो तब्बल दोन वर्षांचा जीवघेणा काळ अद्यापही नागपूरातील विविध वस्त्यांमधील गरीब जनतेच्या स्मृतिपटलातून नामशेष झाला नाही,त्याचाही परिणाम यंदा मतदानावर होण्याची शक्यता आहे.
महाल येथील केळीबाग रस्त्यावरील दूकानदारांची नाराजी सोशल मिडीयावरही लपून राहीली नाही.सात पिढ्यांची दूकाने मनपाला हाताशी धरुन उधवस्त करण्यात आली.सचिन वाघाडे या अवघ्या २८ वर्षाच्या तरुणाने त्यांचीच पिडा हाताशी धरुन अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला आहे,हे विशेष.त्याला चिन्ह देखील ‘रोडरोलर’मिळाले आहे.तो भोई समाजाचा असून मागील विधानसभेत तो काँग्रेसच्या बंटी शेळके व विकास कुंभारेंच्या विरोधात मध्य नागपूरातून लढला होता.अपक्ष उमेदवाराला किती मते पडली किवा जमानत जप्त झाली,याला महत्व नसून कोणाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तो उमेदवार उभे राहत आहे,हे म्हत्वाचे असते.व्यापारी वर्ग देखील चांगलाच नाराज असल्याचे दिसून पडतोय.कोणीही न मागितलेल्या शेकडो उड्डाण पूलांमुळे व्यापारी वर्गाचा धंदा बसून गेला आहे.ग्राहक हा वरच्या वर भुर्र निघून जातात.
संपूर्ण शहरच सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांनी बेढब केल्याने दररोज कामासाठी घराबाहेर निघणारा चाकरमानी वर्ग हा देखील शिव्याच हासडताना दिसून पडतो.शहरातील तलावांची दशा,पर्यावरणाचा झालेला पराकोटीचा -हास,नियोजनशून्य विकास,सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळे नागरिकांच्या घरात शिरणारे पाणी,शहरातील शंभर वर्ष जुनी सांडपाण्याची पाईप लाईन बदलण्यासाठी राज्याकडून मिळणारा कोट्यावधींचा निधी,दहा फूट जमीनीखाली असणारी जुनी पाईप लाईन सुधरवण्या ऐवजी कंत्राटदार फक्त दोनच फूट खाेदून त्यात नवीन लहान आकाराचे पाईप घूसवून कामाचे बिल उचलून घेत असल्याचे चिड येणारे दृष्य,२०१९ मध्ये ऐन निवडणूकीच्याच काळात नागपूरकरांना दोन दिवसाआड पाणी मिळण्याची आलेली वेळ,त्यातून गेल्या पाच वर्षात शहरातील खासदार व आमदारांनी कोणातही न घेतलेला बोध,पुन्हा या ही वर्षी एप्रिल मध्येच नागपूरला पाणी पुरवठा करणा-या जलसाठ्यात कमालीची झालेली कमतरता आणि तीव्र पाणी टंचाईला नागपूरकरांना सामोरे जावे लागणार असल्याचे माध्यमातून मिळणारे इशारे,वाढलेले वीजेचे बिल,खाद्य तेलाचे वाढलेले भाव,महांगाई,बेरोजगारी,सामान्यांच्या अवाक्या बाहेर गेलेले शिक्षण,मनपा शाळांची अवकळा,पराकोटीचा भ्रष्टाचार,वर पासून तर खालपर्यंत बोकाळलेली टक्केवारी,या सगळ्या गोष्टी आहे तशाच असताना, एक लाख कोटींच्या विकास कामांचा दावा ,मतदारांवर मतदानाच्या दिवशी किती प्रभाव पाडेल,हे निकालाच्या दिवशी ४ जून रोजीच कळेल.
यावेळी ‘वंचित’ने आपला उमेदवार न देता काँग्रेसला समर्थन दिले आहे.बसपाचे मतदार देखील मागच्या अनुभवातून चांगलेच सावध झाले आहे.मुस्लिम मते काँग्रेसकडे जाऊ नये यासाठी बसपाचे नगरसेवक मोहम्तद जमाल हे गडकरीं यांचेच ‘डमी’ उमेदवार होते,असा आरोप बसपाच्याच पदाधिका-यांनी केला होता.यंदा ती ही आंबेडकरी समाजाची मते काँग्रेसकडेच वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.कधी नव्हे ते काँग्रेसचे संपूर्ण गट -तट ‘’एकदिलाने नागपूरातील ही लढत, लढतात आहेत,असे दृष्य मतदारांसमोर उमटले आहे.कुणबी फॅक्टरसोबत यंदा ओबीसी मतदार देखील काँग्रेसकडे वळणार असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे.
शरद पवारांनी देखील नागपूरातून आपला उमेदवार दिला नसून,काँग्रेसला पाठींबा दिलाआहे.या सर्व परिस्थितीमुळे गडकरी यांची यंदाची वाट अतिशय खडतर झाली आहे यात वाद नाही.पाच लाखांच्या मताधिक्याने गडकरी विजयी होणार असल्याचे कितीही दावे भाजपच्या नेत्यांनी केले असले तरी वास्तव हे फार वेगळे असणार आहे,यात वाद नाही.साठ-सत्तर हजारांचा फरक देखील हार-जीतमध्ये राहू शकतो.
थोडक्यात जे गडकरी हे निवडणूक घोषित होण्या पूर्वी चिंतामुक्त आणि कामात व्यग्र होते ते निवडणूका घोषित झाल्यानंतर पार बदललेले दिसून पडतात.आज तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या प्रचार रॅलीत सहभाग घेतला.हे दृष्य नागपूरकरांना बघण्यासाठी जरी सुखद हाेते तरी ‘वो’बात नही थी,अशी कानाफूसी देखील झाली.२०१९ ची ती रया,वो जज्बात,वो जोश और होश खो देनेवाली वो दिवानगी,यंदा भाजपच्या प्रचारातून सबकुछ ‘नदारद‘ आहे.त्यामुळेच पार बदललेल्या प्रचारात गडकरी यांच्या पुत्राचा व्हायरल झालेला व्हीडीयो,हे हिमनगाचे फक्त एक टोक असल्याची चर्चा देखील शहरातील जाणकारांमध्ये उमटली आहे.मूळ पक्षापासून भरकटणारा हा ‘टायटॅनिक’बुडणार की बुडवणार,याचे उत्तर येणारा काळच देईल.
……………………………..
(संबंधित व्हिडीयो Sattadheesh official you tube वर बघू शकता)




आमचे चॅनल subscribe करा
