

सामाजिक न्याय विभागाकडून आर्थिक मदत, कुटुंबियांचे सांत्वन
पालकमंत्र्यांकडून कठोर चौकशीसाठी पाठपुरावा
नागपूर दि. ४ : नागपूर शहरातील २९ जुलै रोजीच्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर पालक मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाला यासंदर्भात कठोर कारवाई व गतीशील चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा व जिल्हाधिकारी विमला आर.यांनी बाल अत्याचार प्रतिबंधक केंद्राला भेट देऊन या दुर्दैवी घटनाक्रमात शासन कुटुंबाच्या पाठिशी असल्याचे सांगितले.
दोन्ही अधिकाऱ्यांनी पीडितेची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी, पीडिता व पीडितेच्या आई-वडिलांसोबत त्यांनी चर्चा केली. या कुटुंबांचे सांत्वन केले असून समाज कल्याण विभागामार्फत आर्थिक मदत जाहीर केली आहे. पीडितेच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्याबाबतही अधिकाऱ्यांनी यावेळी निर्देशित केले.
या प्रकरणात तातडीची चौकशी व पीडितेला तात्काळ न्याय मिळावा या संदर्भातील पालकमंत्र्यांच्या सूचना असल्याचे दोन्ही अधिकाऱ्यांनी कुटुंबाजवळ स्पष्ट केले.संपूर्ण प्रकरण गतिशील पद्धतीने तपासून आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.
राज्य शासन याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनानुसार या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या अध्यक्ष विमला आर. यांनी यासंदर्भातील मंजुरी आदेश दिले आहे. यानुसार केंद्र व राज्य शासन यांच्या मदतीतून पीडितेला आठ लक्ष 25 हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील चार लाख 12 हजार रूपयाची मदत उद्या सामाजिक न्याय विभागाकडून या कुटुंबाला दिली जाणार आहे.
दरम्यान, पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले असून पोलीस तपास प्रगतीपथावर आहे. नागपूर महानगरामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणार नाही यासाठी यंत्रणेने अधिक दक्ष राहण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी केल्या आहेत. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा व जिल्हाधिकारी विमला आर. यांनी यासंदर्भात पोलिस प्रशासन सोबत चर्चा करून दोषींवर कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले आहेत. यावेळी उभय अधिकाऱ्यांसोबत समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख,जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अपर्णा कोल्हे यांची उपस्थिती होती.




आमचे चॅनल subscribe करा
