फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणसामाजिक न्याय मंत्री अन् कौटूंबिक हिंसाचार!

सामाजिक न्याय मंत्री अन् कौटूंबिक हिंसाचार!

Advertisements
कुठे नेऊन ठेवला आहे फडणवीसांच्या मंत्र्याने सुसंस्कृत महाराष्ट्र!

नागपूर,ता.६ फेब्रुवरी २०२५: गेल्या काही महिन्यांपासून करुणा मुंडे यांचे अनेक मुलाखती विविध यूटयूब चॅनल्सवर झळकले.त्या कोण आहेत,कोणाच्या पत्नी आहे,त्यांचा संघर्ष काय आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे.आज दिवसभर संपूर्ण वृत्त वाहिन्यांचा विषय देखील त्याच ठरल्या कारण वांद्रे सत्र न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा मुंडेवर प्रकरण शेवटच्या निकालापर्यंत येईपर्यंत कौटूंबिक हिंसाचर करु नये असे ‘आंशिक’आदेश दिले आणि हाच सुसंस्कृत महाराष्ट्राच्या प्रतिमेला जबर धक्का पोहोचवणारा भाग ठरला.विशेष म्हणजे शिंदे सरकारमध्ये हेच धनंजय मुंडे हे ‘सामाजिक न्याय व कल्याण मंत्री ’होते,जो स्वत: एका महिलेच्या विरोधात कौटूंबिक हिंसाचाराचा आरोपी आहे त्या मंत्र्याकडे हे मंत्रालय असणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची क्रूर थट्टाच ठरते.
९ जानेवरी १९९८ रोजी करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत विधिवत विवाह केला.याचे पुरावे देखील त्यांनी न्यायालयात सादर केले आहे.यानंतर हे जोडपे आधी इंदूर व नंतर मुंबईत वास्तव्यास हाेते.यांना दोन अपत्ये असून २१ वर्षाचा मुलगा व १९ वर्षाची एक मुलगी आहे.२०१८ पासून राजकारणाची पायरी भराभर चढत असताना धनंजय मुंडे यांच्या वागण्यात बदल झाला असल्याचे करुणा सांगतात.कुटूंब व समाजाच्या दबावा पुढे त्यांनी त्यांच्या जातीच्या मुलीशी, राजश्री यांच्यासोबत दुसरा विवाह केला.खरं तर सामाजिक जिवनात वावरणा-या एखाद्या राजकारणी व्यक्तीकडून समाजा पुढे हा नैतिक दृष्टया गुन्हा ठरणारीच कृती होती मात्र,यावर कोणीही आक्षेप घेतला नाही.

पुढे कहर तर तेव्हा झाला जेव्हा या सामाजिक न्याय व कल्याण मंत्र्यांनी करुणा यांच्या बहीणीवर देखील लैंगिक अत्याचार करणारी बाब पुढे आली आणि धनंजय मुंडे हे अक्षरश:कामदेवतेला ही लाजवतील असा अवतार ठरले!अर्थात आपल्याच बहीणीचा विश्‍वासघात करणा-या धनंजय यांच्या या तिस-या लफडीचे, त्यामुळेच कोणाला काहीच वाटले नाही किवा धनंजय मुंडे यांच्या जिवनात आलेल्या या तिस-या स्त्रीवर झालेल्या अन्याय-अत्याचाराविषयी संवेदनशीलता देखील वाटली नाही.महाराष्ट्राची सुसंस्कृत व संवेदनशील मनाची जनता उभी झाली ती करुणा धनंजय मुंडे यांच्या बाजूने.

त्यांचा लढा हा एका क्रूर व स्वार्थी मानसिकतेच्या मंत्र्याविरुद्ध होता व तितकाच चिवट आणि जोखिमेने भरलेला होता.करुणा मुंडे सांगतात त्याप्रमाणे आपल्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी त्यांना ४५ दिवस मुंबईच्या तर १६ दिवस बीडच्या तुरुंगात राहावे लागले!याशिवाय मुंबईत त्यांच्या घरी कधी पण ‘स्कॉटलँडच्या’ पोलिसांशी तुलना होणारी मुंबई पोलिस धडकायची व त्यांना पोलिस ठाण्यात १६-१६ तास कोणत्याही कारणांशिवाय बसवून ठेवायची.उद्देश्‍य एकच,मंत्री धनंजय मुंडे यांच्या पिच्छा त्यांनी सोडावा!

हैवानाला लाजवेल असा वाल्मीक कराड याने बीडच्या जिल्हाधिका-यांच्या कक्षात पती धनंजय मुंडेंसमोर करुणा यांना मारहाण केल्याची घटना ही तर ‘पुरुष’ म्हणून धनंजय मुंडे यांच्याविषयी तीव्र संताप निर्माण करणारी आहे.करुणा यांनी सांगितल्याप्रमाणे वाल्मीकने त्यांच्या गालावर व नको तिथे स्पर्श करुन मारहाण केली!
कराड यानेच करुणा यांच्या कारमध्ये रिव्हॉलवर ठेवली व पोलिसांनी,स्कॉटलॅण्ड पोलिसांसारखी तत्परता दाखवून करुणा यांना अटक केली,तुरुंगात डांबले.४५ दिवस त्या जामिनाशिवाय तुरुंगात होत्या.हे कथानक बिहार राज्याचे नसून सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याचे आहे,हे विशेष!हा सर्व प्रकार करुणा यांची हिंमत तोडण्यासाठी पुरेसा होता मात्र,धनंजय मुंडे यांच्या कृकृत्याने आधीच त्यांच्या जन्मदात्रीचा जीव घेतला होता,त्यांच्या आईने आत्महत्या केली,आईशिवाय जिवनातील संघर्षाला करुणा या ज्याप्रकारे सामो-या  गेल्या,तोच संघर्ष आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी करुणा यांनी आत्महत्या केली नाही.वयाच्या १६ व्या वर्षापासून ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले तो खरे तर करुणा यांच्या घृणेच्याही पात्रतेचा नव्हता!
२०१९ पासून धनंजय मुंडे यांचा बीड जिल्ह्यात जसजसे वर्चस्व वाढत गेले तसतसे त्यांच्या समर्थकांचे गैरकृत्य आणि हिंसक कारवायांना ‘परवान चढत गेला’.हा ही इतिहास मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येनंतर सुसंस्कृत महाराष्ट्राच्या पुढे आलाच आहे.२०२१ पासून करुणा यांनी न्यायालयीन लढा सुरु केला.आजच्या निकालामुळे त्यांना ‘अंशत’ न्याय मिळाला,असेच म्हणावे लागेल.त्यांना एक लाख २५ हजार पोटगी तर मुलीच्या खर्चासाठी ७५ हजार रुपये असे दोन लाख रुपये पोटगीचे तसेच खटल्याचा खर्च म्हणून २५ हजार रुपये अतिरिक्त देण्याचे आदेश वांद्रेच्या सत्र न्यायालयाने दिले.करुणा यांची मागणी ही १५ लाख रुपये मासिक मिळावा ही असून, धनंजय मुंडे यांचा नोकर असणारा वाल्मीक कराड याच्याकडे चार हजार कोटींची संपत्ती आहे मग मंत्री असणारे धनंजय मुंडे यांच्याकडे किती हजार कोटींची संपत्ती असेल याचा अंदाज येतो त्यामुळे करुणा यांची १५ लाख रुपये पोटगीची मागणी गैर ठरत नाही.

धनंजय मुंडेला वाटलं मंत्री पदासमोर करुणा झुकेल मात्र,ती एक चवताळलेली वाघिण होती.आज धनंजय मुंडेच्या वकीलांनी ॲड.शार्दूल सिंग यांनी करुणा यांना पत्नी नव्हे तर ‘लिव्ह इन’ मध्ये राहणारी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.अशा मानसिकतेच्या वकीलाची सनद रद्द करावी व बार असोशिएनने योग्य कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.सदैव गुण उधळणारे ॲड.सदावर्ते गुणरत्ने यांनी तर न्यायालयाच्या निकालात कुठेही नवरा-बायको असे नमूद केले नसल्याचे गुण उधळले!यावर वकील हा न्यायाधीश नसतो,मी माझ्या लग्नाचे सगळे पुरावे न्यायालयात सादर केले असून येत्या २० तारखेला पुढील सुनावणीत सत्य समोर येईल,असा विश्‍वास करुणा व्यक्त करतात.
मूळात स्वत: धनंजय मुंडे यांनी २००३ पासून करुणा यांच्यासोबतचे आपले संबंध नाकारले नसून त्यांना दोन अपत्य असल्याचे फेसबूकवर मान्य केले आहे.तरीही एखाद्या स्त्रीवर आपल्या हिंसक व गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नोकराकडून इतका पराकोटीचा अत्याचार करणा-या धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रसारख्या पुरोगामी व सुसंस्कृत राज्याचा मंत्री म्हणून राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही,यात शंका नाही.या माजी सामाजिक न्याय व कल्याण मंत्र्यांची संपूर्ण बाजूने कोंडी झाल्यावर कृषि मंत्री पदावरील अडीचशे कोटींच्या वर भ्रष्ट कारभाराचे देखील चांगलेच वाभाडे निघालेले संपूर्ण जनतेने बघितले.मुंडे यांच्या कृषि मंत्री पदाच्या काळात नॅनो युरिया,नॅनो डीएपी,बॅट्री स्पेअर,मेटाल्डे हाईट आणि कापूस बॅगांच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप झाला.

इफको कंपनीच्या नॅनो युरियाची ५०० मिलीलीटरची बाटली ९२ रुपयांना मिळते,पणे मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली तीच बाटली २२० रुपयांना खरेदी करण्याची निविदा मंजुर झाली.कृषी खात्याने १९.६८ लाख बाटल्या खरेदी केल्या.नॅनो डिएपची २६९ रुपयांची बाटली ५९० रुपयांना खरेदी करण्यात आली.बॅटरी स्पेअरचा बाजारभाव दोन हजर ४९६ असताना तीन हजार ४२५ रुपयात खरेदी करण्यात आले.गोगलगायींसाठी वापरण्यात येणारे ८१७ रुपये किलोने मिळणारे औषध एक हजार २७५ रुपयात खरेदी करण्यात आले.महत्वाचे म्हणजे या खरेदीसाठी आधी राज्य सरकारने कंत्राटदारांना पैसे दिले त्यानंतर निविदा काढण्यात आल्या.त्यासाठी मागील तारखेची(बॅकडेटेड)पत्रे देण्यात आली,असा आरोप काल अंजली दमानिया यांनी केला.यावरुन मुंडे यांचा मंत्री पदाचा कारभार स्पष्ट होतो.
यंदा ते फडणवीस सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण असे तिस-यांदा मंत्री बनले आहेत,या मंत्रालयात तरी त्यांचा कारभार पारदर्शी राहील यावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्‍वास नाही.महत्वाचे म्हणजे करुणा मुंडे यांनी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ही गंभीर आरोप करीत,त्यांच्यावरील अन्यायाबाबत अनेकदा फडणवीस व अजित पवार यांना निवेदन देऊन सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई आपल्या लाडक्या मंत्र्यावर केली नाही,असा आज माध्यमांसमोर आरोप केला!एखादी स्त्री व दोन अपत्यांची जन्मदात्री आपल्या आत्मसन्मानाचा लढा देत असताना राज्याचे शीर्षस्थ नेतृत्व कशाप्रकारे त्याची दखल घेतात,हे यातून सिद्ध होतं.धनंजय मुंडे हे सुरवातीपासून फडणवीस व अजित पवार यांचे लाडके राहीले आहेत,असा सरळ आरोप करुणा यांनी केला,यावरुन सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर जेव्हा वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्याकडे संशयाची सुई वळली त्याच वेळी संभाजीराजे यांनी धनंजय मुंडे यांना ते निर्दोष सिद्ध होईपर्यंत मंत्रीमंडळात घेऊ नये असे पत्र फडणवीसांना लिहले होते,त्याकडे व समस्त महाराष्ट्राच्या भावना दुर्लक्षीत करुन ज्या उद्दामपणे धनंजय मुंडे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घालण्यात आली ते बघता सरकार नावाची संपूर्ण डाळच किती काळी आहे,याची प्रचिती महाराष्ट्राच्या जनतेला आली.

दमानिया यांनी देखील काल पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात २०१४ पासून फडणवीस सरकारच्या काळात मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून ,फडणवीस सरकारमधील एक मंत्री नाही तर संपूर्ण सरकारच भ्रष्ट असल्याचा आरोप केला.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तर बीड जिल्ह्याच्या संपूर्ण भ्रष्ट कारभाराची कुंडलीच पेन ड्राईव्हमध्ये अजित पवार यांच्या हातात ठेवली.अर्थात अर्थमंत्री अजित पवार यांना आपल्या पक्षाचा मंत्री काय करतोय,याची संपूर्ण कल्पना असणारच, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या भ्रष्ट कारभाराला कोणाकोणाचा छूपा आश्रय होता,हे महाराष्ट्राच्या जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही.याच कारभारातून बीडमधून ४ सचिव व २ आयुक्तांच्या बदल्या झाल्या.त्यात अतिशय प्रामाणिक म्हणून चर्चित असणा-या आयएएस महिला अधिकारी व्ही.राधा व रवी गेडाम यांचे नाव घेतले जाते.बदल्यांचा अधिकार मंत्र्याला नसतो तो मुख्यमंत्र्यांना असतो त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या भ्रष्ट कारभारात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आरोपीच्या पिंज-यात येतात.असे असले तरी शिंदे यांनी निदान करुणा यांची भेट घेतल्याचे करुणा सांगतात.फडणवीस व अजित पवार यांच्याकडून करुणा मुंडेला कोणताही न्याय मिळाला नाही.
आता या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे भगवानगडावर गेले,आपले रडगाणे गायले.भगवान गडाचे महंत डॉ.नामदेवशास्त्री यांनी यात उडी घेत ते धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचे विधान केले.यानंतर संतोष देशमुखाच्या कुटूंबियांना मंहत यांची भेट घेऊन वस्तूस्थिती सांगावी लागली.यानंतर भगवानगड हा देशमुख कुटूंबियांच्या पाठीशी असल्याचे विधान महंतांनी केले!मात्र,त्या पूर्वी अख्खा महाराष्ट्र जणू महंतावर सोशल मिडीयावर तुटून पडला होता.महंत हे चांगलेच ट्रोल झाले होते.या वरुन महाराष्ट्राची जनता ही अजून तरी तत्वांच्या बाबतीत सुजाण, संवेदनशील व जिवंत असल्याची प्रचिती आली.
येथे ही धनंजय मुंडे यांची डाळ शिजली नसल्याने त्यांनी काल पत्रकार परिषद घेत,माध्यमांवर खापर फोडले व तब्बल ५१ दिवस माध्यमे त्यांचा ‘मिडीया ट्रायल’घेत असल्याचा आरोप केला!मात्र,वाल्मीक कराड व त्याचे अपराधिक प्रवृत्तीचे बगलबच्चे हे कोणाचे कार्यकर्ते होते?याबाबत ते चकार शब्द ही बोलले नाही.यानंतर एका जातीच्या विरोधात हे कटकारस्थान असल्याची वल्गना धनंजय मुंडे यांनी केली.मात्र,संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी कुण्या एका जातीचा मोर्चा निघाला नाही तर त्यात सर्व जाती,धर्माच्या लोकांनी न्यायासाठी उस्फूर्त सहभाग नोंदवला आहे ते बघता ‘मराठा विरुद्ध ओबीसीचा’ लढा हा होऊ शकत नाही जरी यात छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांच्या बाजूने उडी घेतली असली तरी!
याच धर्तीवर फडणवीस सरकारमधील आणखी एक मंत्री संजय राठोड हे अवघ्या २४ वर्षीय पुजा चव्हाण या तरुणीचा गर्भपात,अपघाती मृत्यू किवा संशयास्पद हत्याप्रकरणातून न्यायालयातून निर्दोष सुटले असले तरी जनतेच्या नजरेत ते आपले निर्दोषत्व सिद्ध करु शकले नाहीत.निदान फडणवीस सरकारमध्ये सत्तेच्या सोपाणावर झुलणा-या एका ही मंत्र्याला तुरुंग दिसणार नाही हे जनतेलाही माहिती आहे मात्र,आज करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे विरुद्ध खटल्यामध्ये,न्यायालयाने ज्या पद्धतीने करुणा मुंडे यांची बाजू उचलून धरली ते बघता एका रणरागिणीने आपल्या आत्मसन्मानाच्या लढाईत पहिला विजय प्राप्त केल्याचे समाधान महाराष्ट्राच्या जनतेला लाभले,यात देखील तिळमात्र शंका नाही.यातूनच महाराष्ट्राचा सामाजिक न्याय व कल्याण मंत्री हा कसा नसावा ,याचा आदर्श धनंजय मुंडे यांनी घालून दिला आहे,असेच आता म्हणावे लागेल.
………………………………..
(तळटीप-
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात राज्य महिला आयोग जिवंत अवस्थेत आहे का?असा प्रश्‍न सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात विचारण्यात आला आहे.धनंजय मुंडे हे अजित पवारचे अतिशय जवळचे व लाडके मंत्री असल्यामुळेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर गप्प आहेत,असा सरळ आरोप समाज माध्यमांवर केला जात आहे!
करुणा मुंडे या रुपाली चाकणकर यांच्याकडे ही गेल्या होत्या मात्र,चाकणकर यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या विरोधात कोणतीही भूमिका घेतलीच नाही त्यामुळेच आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्स वर प्रतिक्रिया देत,अंत्यंत निष्क्रिय तथा निरुपयोगी महिला आयोगाकडून कुठलीही ठोस कृती न झाल्याने निराश झालेल्या करुणा मुंडे यांना अखेर न्यायालयामध्ये न्याय मिळाला,अशी पोस्ट केली.)
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या