फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसांस चले ना चले राष्ट्र चलना चाहिये....

सांस चले ना चले राष्ट्र चलना चाहिये….

Advertisements

परमवीर चक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी जागवले कारगिलचे शौर्य

वंदे मातरम् उद्यानाचा भूमिपूजन सोहळा

चंद्रकांत पाटील यांचे आघाडी सरकारला शाब्दिक टोले

‘जिंकू आणि जगू‘हीच प्रेरणा:गडकरी

नागपूर,ता.४ फेब्रुवारी २०२२: माझ्यासाठी हे उद्यान नाही तर पावन भूमि आहे,ज्या वीर सैनिकांना सर्वोच्च अश्‍या वीरतेचा परमवीर चक्र पुरस्कार प्राप्त झाला त्यांंच्या स्मरणार्थ नागपूरात हे ‘वंदे मातरम् ’उद्यान साकार होत आहे,त्या वीर जवानांच्या बलिदानाच्या शौर्याचे या उद्यानामुळे नागरिकांना स्मरण होईल,ज्यांनी देशाच्या सीमांना सुरक्ष्त ठेवण्याची महत्तम कामगिरी केली त्यांची नावे त्यांचे म्यूरल्स नागपूरकर तरुण,ज्येष्ठ व नागरिक जेव्हा बघतिल तेव्हा त्यांच्या मनात देखील देशाप्रति सकारात्मक भाव निर्माण होईल,या देशातील तरुण ही देशाची ताकद आहे,राष्ट्र निर्माण मध्ये योगदान देण्यासाठी त्यांच्या मनात प्रेरणा निर्माण होईल,ही धरणी वीर व वीरांगणांची धरणी आहे,मला भारतमातेच्या धरणीवर जन्म घेण्याचा अभिमान आहे ‘हमारा लहू का हर कतरा हिंदूस्थान गायेगा..सांस चले ना चले मेरा राष्ट्र चलना,बढना चाहिये’असे जाज्वल्य भाव परमवीर चक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी जागवले.

ते भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने मध्य नागपुरातील प्रभाग क्र.१९ बजेरिया या परिसरातील एम्प्रेस मॉल समोर महाराष्ट्र टेक्सटाईल्स कार्पोरेशनद्वारे महानगरपालिकेला प्रदत्त भुमीवर १.२० लाख वर्ग. फुट जागेत एम्प्रेस मॉलसमोर भारतीय सेनेमध्ये ज्या सैन्यांना परमवीर चक्र या पदाने सन्मानीत करण्यात आले त्या सर्वांच्या स्मृतीत “वंदे मातरम” उद्यान निर्माण करण्यात येत आहे. या उद्यानाच्या भूमि पूजनप्रसंगी बोलत होते.याप्रसंगी मंचावर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावणकुळे,महापौर दयाशंकर तिवारी,उपमहापौर मनीषा धावडे,भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके,स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर,सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे व भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी कारगिरल युद्धाच्या शौर्याला जागवणारे प्रसंग कथन केले.ते ऐकून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.अनेक प्रसंगी त्यांच्या कथनादरम्यान उस्फूर्तपणे उपस्थित तरुणाई व नागरिक ‘भारत माता की जय’चे नारे लावत होते.विशेष म्हणजे कारगिल युद्धाच्या प्रसंगी कॅप्टन योगेंद्र यादव हे अवघे १९ वर्षांचे होते.वय जरी लहान होते तरी अंगी बळावलेले साहस दूर्दम्य होते.वयाच्या १९ साव्या वर्षीच प्रत्यक्ष युद्ध भूमीवर ते ही कारगिलसारख्या ठिकाणी परंपरागत शत्रूच्या विरोधात लढण्याची संधी मिळाली,यासारखे सौभाग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.२२ वर्षांपूर्वी दूर्दम्य क्षेत्र,उणे वीस ते तीस डिग्री तापमान,शत्रू वरच्या टेकड्यांवर मजबुतीने कब्जा करुन बसलेला,भारतीय सैन्याला खालून युद्ध लढायचे असताना शत्रू हे विसरला ही हिंदूस्थानाची भूमी आहे,वीर आणि वारांगणांची भूमि आहे,कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी शत्रूंच्या बंकरला ‘कब्रस्थान’ बनवण्याचे सामर्थ्य या देशाच्या मातीत आहे,भारतीय सैन्याच्या दूर्दम्य शौर्याला जगात कोणीही शरण आणू शकत नाही.आम्हाला शत्रूला नेस्तनाबूत करता येतं,असे ते म्हणाले.

माझ्या बटालियनला हा आदेश होता की श्रीनगर लेहला लागून असलेल्या डोंगरावर कब्जा करुन बसलेली टेकडी सोडवून घेणे.शत्रूंनी त्या टेकडीवर कब्जा करुन राष्ट्रीय महामार्गच अवरुद्ध करुन ठेवला होता.कोणतीही रसद पोहोचू शकत नव्हती,ती टेकडी शत्रूकडून परत घेणे अत्यंत गरजेचे होते.आमचे कमांडर खुशाल सिंह ठाकूर यांनीच या युद्धाची संपूर्ण रणनीती आखली होती.२२ दिवसांच्या या युद्धात आपले दोन सैन्य अधिकारी,दोन कनिष्ठ अधिकारी व २१ जवानांना वीरमरण प्राप्त झाले होते.

वरीष्ठांच्या आदेशाप्रमाणे द्रास या सर्वात वरच्या टेकडीवर कब्जा मिळवण्याची रणनीती तयार झाली होती.२ जुलैला आम्ही त्या टेकडीवर चढण्यास सुरवात केली.दिवसभर मोठमोठ्या दगडांमागे लपून बसायचो रात्री चढायला प्रारंभ करायचो कारण ‘आम्हाला मरणासाठी नाही मारण्यासाठी जिवंत राहायचे होते’.२ रात्र आम्ही तो प्रवास केला आणि त्या टेकडीवर पोहोचलो.जे दृष्य बघितले,अनुभवले ते आता शब्दात ही सांगता येणार नाही.रस्सीच्या मदतीने एकदुस-याचा हात धरुन आम्ही सात जण त्या टेकडीवर पोहोचलो.टायगर हिल या टेकडीपासून आणखी ५० ते ६० किमी वर होती.त्यावर देखील शत्रू बसला होता.एक पाऊल मागे किवा एक पाऊल पुढे ही केला असता तरी मरण हे निश्‍चित होते.मात्र आम्हाला असे मरण हवे होते जे जग कधीही विसरणार नाही.सैनिकांचा विचारच एवढा कणखर असतो की रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि शेवटचा श्‍वास देहात असेपर्यंत लढायचेच आहे.कोणत्याही परिस्थितीत सैनिक हा पुढेच जात असतो,मागे हटत नाही.एक क्षण असा ही आला की आमच्या बटालियनचे नेतृत्व करणारे हवालदार मदन हे देखील वीर गतीला प्राप्त झाले.त्यामुळे आम्ही नेतृत्वविहीन झालो.आमच्यावर चारही बाजूने शत्रू गोळीबार करीत होता.आम्ही २० मिनिटे आपली फायरिंग बंद केली.परिणामी एका मोठ्या दगडाच्या आड लपलेले २० पाकिस्तानी सैनिक हे समोर आले आणि आम्ही एकसाथ आपली फायरिंग उघडली.त्यांना यमसदनी पाठवल्यानंतर त्यांचे शस्त्र आम्हाला उपयोगी पडले.

आम्ही अजून सावरलो ही नव्हतो तेवढ्यात आणखी ३५ ते ४० शत्रू सैनिकांनी आमच्यावर गोळीबार केला.ते ‘अल्लाह ओ अकबर’चे नारे देत होते.ते जवळ येताच माझ्याकडील लाईट मशीनगन मधून आरपीजी राऊंड मी डागले.माझ्या प्लेटून हवालदाराने मला सूचना केली ‘योगेंद्र या शस्त्राला त्यांच्याकडे फेक’त्याच दरम्यान माझ्यासोबतच्या एका सैनिकाच्या हातात ग्रेनेड फाटला,त्याचे बोट कटून दूरवर फेकल्या गेले.
त्याला वाटलं त्याचा हात कटला.आजवर सैनिकांचे शौर्य फक्त पाठ्य पुस्तकात वाचले होते,त्यावेळी प्रत्यक्षात सैनिकांचे शौर्य अनुभवत होतो.सैनिक आपल्या मातृभूमीसाठी किती जांबाज असतो याचे दर्शनच घडले.आम्हा सात ही सैनिकांवर तीन बाजूने फायरिंग होत होती.ग्रेनेडचा एक तुकडा माझ्या घुडक्यावर फाटला.मला वाटलं माझा पाय कटला.मला स्वत:ला फर्स्टॲड करणे गरजेचे होते.माझा सहकारी सैनिक मला फर्स्टॲडसाठी मदत करीत असताना तो हूतात्मा झाला.माझ्याही डोळ्यांना जबर जखम झाली.नाकातून रक्त वाहू लागले.माझ्या डोळ्याजवळचे मांस लटकू लागले होते.त्या टेकडीला पाठ टेकून बसूल राहीलो.माझ्यासोबतचे सगळे सैनिक वीर मरणाला प्राप्त झाले होते.अनंतराम यांनी मला फायरचे आदेश दिले होते.त्यांना ही गोळी लागली होती.माझ्या हात गोळीबारामुळे उखडून खाली लटकत होता.माझ्या हाताची हाडे बाहेर लटकत होती,मी हाताला तोडून फेकू ही शकलो नाही.मी हाताला माझ्या पाठीवरील बॅगेच्या हँडलमध्ये लटकवले.

पाकिस्तानी सैनिक हे आमच्या जवळ आले होते.आमच्यापैकी कोणी जिवंत तर नाही,हे बघताना त्यांनी पुन्हा आमच्यावर गोळ्या झाडल्या.त्यांनी वीर जवानांच्या छातीत व डोक्यात गोळ्या झाडल्या.माझ्या देखील हातावर व पायावर फायरिंग केली.मात्र माझ्या मनात हा ठाम विश्‍वास होता मला जिवंत ही राहायचे आहे आणि गोळीबारातून होणा-या रक्तामांसाची वेदना ही सहन करायची आहे.त्याच विश्‍वासाने मला तारले आणि मी आज जिवंत तुमच्यासमोर तो अनुभव सांगण्यासाठी उभा आहे.मी मनातल्या मनात परमेश्‍वराचा आठव करीत होतो,पाकिस्तानी सैनिकांनी आम्हा सर्वांना बुटांनी ठोकरले.आपण आपल्या देशाला ‘भारत मां’संबोधतो,ती भारत मां आपल्या वीर पुत्रांच्या शौर्य,पराक्रम आणि वीरतेला कधीच विस्मरणात जाऊ देत नाही.पाकिस्तानी सैनिकांनी माझ्या छातीत गोळी घातली.माझ्या खिशातील पर्समध्ये पाच रुपयांचे शिक्के होते,गोळी त्या शिक्क्यांमध्ये रुतून बसली. पण त्या क्षणी मला वाटलं मी देखील वीरगतीला प्राप्त झालो आहे…..!

एका १९ वर्षीय सैनिकाच्या मनात एकच पागलपण सवार होते,‘पोस्ट को बचाना है’.कमी वय,युद्धाचा अनुभव पण नाही,काहीच समजत नव्हते आता पुढे काय करावे?एक नाला तिथे दिसला,तो कोणत्या बाजूने वाहतोय,माहिती ही नव्हतं.भारत कि पाकिस्तान कुठे पोहोचवेल माहिती नव्हतं.त्या उडी घेतली.वाहत गेलो.माझे नशीब बलवत्तर होते मला भारताच्या दिशेने वाहून नेले.तिथे भारताचे सैनिक होते,
त्यांनी मला नाल्यातील एका खड्डयातून बाहेर काढले.त्यांना एवढेच सांगू शकलो ‘पोस्ट को बचा लो’.कर्नल खुशाल सिंह ठाकूर यांच्याकडे वार्ता पोहोचली,त्यांनी आहे त्या स्थितीत जवानाला खाली आणण्याचे आदेश दिले.कारगिरच्या त्या डोंगरांवर वर चढणे एक वेळ सोपे आहे मात्र खाली उतरणे अतिशय अवघड आहे.मला खालच्या कॅम्पमध्ये पोहचोवण्यास सैनिकांना रात्र झाली होती.मला ओळखले का?असा सवाल कर्नल खुशाल सिंह यांनी केला.माझ्या डोळ्यांना दुखापत झाली होती,जबर मार बसला होता,रक्तस्त्राव अद्यापही थांबला नव्हता,मी डोळे देखील उघडू शकत नव्हतो,त्यांनीच ते कर्नल असल्याचे सांगितले.मी फक्त आवाज ऐकू शकत होतो.मी त्यांना वरील टेकड्यांची भौगोलिक व पाकिस्तानी सैनिकांची रणनीतीची परिस्थिती बयाण केली,त्यांनी जवानाची रिक्वायरमेंट काय आहे?असे विचारले.पार्लेजीचं अर्धे बिस्कूट खालल्यानंतर मी बेशुद्ध झालो.तीन दिवसांनी मला शुद्ध आली.मला कळले त्याच रात्री पुन्हा रणनीती आखून कारगिलवर चढाई करण्यात आली,यावेळी एक ही जवान शहीद न होता,२६ जुलै रोजी कारगिलवर भारत देशाचा तिरंगा लहरला.कारगिरलवर चढाई करताच युद्ध समाप्त झाले होते.तो दिवस आता आपण विजय दिवस म्हणून साजरा करतो.‘सांसो के तराने हिंद के गान गायेंगे,हमारा हर लहू हर कतरा हिंदूस्थान गायेगा‘असे सांगत ‘सांस चले ना चले मेरा राष्ट्र चलना चाहिये,बढना चाहिये’असा जाज्वल्य देशाभिमान याप्रसंगी कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी कथन केला.

चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला टोला-
याप्रसंगी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वंदे मातरम् उद्यानाच्या संकल्पनेचे व महापौर दयाशंकर तिवारी यांनी घेतलेल्या पुढकाराचे विशेष कौतुक करीत ते नेहमीच अनोख्या व नव्या संकल्पना पुढे आणत असल्याचे सांगितले.दूसरीकडे पैसे देऊन एमएलसी,एमएलए झालेल्या लोकांकडून काय अपेक्षा असणार?असा सवाल त्यांनी केला.नाही तर देशाच्या सीमांच्या चिंता करणारे बघा?असा टोमणा त्यांनी राहूल गांधी यांचे नाव न घेता हाणला.देशाच्या मातीप्रति योग्य दृष्टिकोणाचा काही लोकांमध्ये वानवा जाणवतो.आज कारगिल युद्धात ज्यांनी पराक्रम आणि शौर्य गाजवला ते स्वत: या उद् घाटन समारंभाला उपस्थित आहेत ही फार मोठी उपलब्धी आहे.कॅप्टन योगेंद्र यादव यांच्या घरीच सैन्याचा वारसा आहे.त्यांच्या वडीलांनी १९६२ च्या युद्धात सहभाग घेतला.भाऊ देखील सैन्यात होते.वयाच्या १९ सा व्या वर्षी त्यांना स्वत:ला देशाच्या रक्षणाची संधी मिळाली.द्रास आणि टायगर हिल पुन्हा प्राप्त करण्याची संधी मिळाली.मृत्यू आला तरी विजय मिळवणारच हे ध्येय त्यांनी बाळगले.१९ वर्षाच्या त्या वयात हा कोणता जज्बा होता?नाही तर देशाच्या तरुणाईला बर्बाद करण्याचे धोरण राबविले जाते.धान्य दूकानांमध्ये आता दारु विकल्या जाणार आहे.सकाळी धान्य आणायला गेलेला माणूस रात्रीच घरी परत येईल,असा टोमणा त्यांनी आघाडी सरकारला हाणला.तरुणाईसमोर राष्ट्रभक्तीचा आदर्श साकारणारे महापौर यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

महापौर प्रखर राष्ट्रवादी कार्यकर्ता:गडकरी यांची स्तुतीसुमने
भारत देश तुमच्यासारख्या वीर जवानांच्या दुर्दम्य अश्‍या शौर्यामुळेच सुरक्ष्त आहे.तुमचा अभिमान वाटतो.हा देश तुमचा त्याग आणि देशसेवेच्या वृत्तीला विसरु शकत नाही.वंदे मातरम् उद्यानात तुमच्यासारख्या वीर सैनिकांच्या शौर्यगाथांचा प्रतिमा साकारल्या जाणार आहेत.आज कर्नल ज्या टेकड्यांचा उल्लेख आपल्या गाथेत करीत होते त्या ठिकाणी मला देखील प्रत्यक्ष जाण्याचा योग आला आहे.खरोखरच उणे डिग्री तापमानात मी कर्नल वी.के.सिंग व पत्नी कांचन गडकरी यांच्यासोबत टनेलच्या कामासंबधी गेलो होतो.आशियातील सर्वात मोठी टनेल त्या ठिकाणी निर्मित होत असून राष्ट्रीय महामार्गावरील लद्दाख-लेहला श्रीनगरशी जोडणारी ती टनेल आहे.त्या ठिकाणाहून भगवान अमरनाथांचे मंदिर देखील दृष्टिक्षेपात पडतं.फार कठीण आहे त्या ठिकाणी वावरणं,काम करणं.दीड हजार कामगार टनेल निर्मितीच्या या कामात गुंतले असून दीड महिन्यापासून ते आपलं अन्न धान्य घेऊनच आतमध्ये काम करीत आहे.ज्या ठिकाणी आम्हाला दोन तास थांबणे अशक्य झाले होते अश्‍या उणे तापमानात कामगार तिथे काम करीत आहेत.तुम्ही तर टायगर हिल्सपर्यंत गेलात जिथे आणखी उणे तापमान आहे,याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.या देशाचा इतिहासच वीर सैनिक व शहीदांचा आहे.

महापौर हे स्वत:प्रखर राष्ट्रवादी कार्यकर्ता व प्रतिमेचे धनी आहेत.देशाचा इतिहास व संस्कृतीवर त्यांचे नितांत प्रेम आहे.हिंदी साहित्यिक व वकृत्वाचे धनी आहेत.त्यांच्या संकल्पनेतून सुंदर उद्यानाची निर्मिती होत आहे.मी सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे यांना येताना हेच सांगत होतो जोपर्यंत कामात ऑनरशिप दाखवल्या जात नाही तोपर्यंत काम पूर्ण होऊ शकत नाही.

मी झाडे बघतो तर थांबून बघतो कोणत्या झाडांना पाणी दिले कोणती झाडे वाळली आहेत.मला म्हणतात काय तुम्ही एक-एक झाड बघता आहात,मी सांगतो हे माझ्या नागपूर शहराचे झाड आहेत,प्रत्येक झाड जिवंत राहायला हवे.नही रहेगा तो ‘ठोक दूंगा’.

मला अपेक्ष्त असणारी ऑनरशिप महापौरांमध्ये आहे.त्यांच्याच पुढाकाराने या ठिकाणी सिमेंट रस्ता देखील बनला आहे.उद्यान ही साकारले जात आहे.मी वर्षानुवर्ष बजेरियांच्या नागरिकांना मोकळा श्‍वास घेताना बघितले नाही.एकमेकांच्या छातीवर चढून जगत नाहीत हीच मोठी बाब आहे,एवढी दाटीवाटीची घरे या ठिकाणी आहे,अशी उपरोधिक टिका देखील गडकरी यांनी याप्रसंगी केली.आता हा एकप्रकारे श्‍वास घ्यायला ऑक्सीजन पार्कच बजेरियावासियांसाठी साकारला जात आहे,असे ते म्हणाले.

या ठिकाणी रस्ता बनल्याने सुविधा देखील झाली मात्र या ठिकाणी पार्किंगची योग्य सुविधा करा अशी सूचना गडकरी यांनी केली.वाहन चालकांना हीच वाट असते कधी रस्ता बनतो आणि कधी मी त्यावर गाड्या पार्क करतो!या रस्त्यावर गाड्या पार्क करण्याची परवानगी देऊ नये.दूकाने देखील थाटू देऊ नका.वाटल्यास पाचशे रुपये देऊन माणसे ठेवा जी कॅम-याने या ठिकाणी दूकाने व पार्किंगचे अतिक्रमण करणा-यांचे छायाचित्रण करेल.नाही तर निवडणूका बघून नेते मंडळी दूकाने अाणि वाहनांच्या पार्किंगला परवानगी देतील,मतदारांना सांगा या ठिकाणी अतिक्रमण होऊ देणार नाही,मते द्यायची असेल तर द्या नाही तर नका देऊ.या उद्यानासाठी सुधाकर देशमुख यांनी २५ लाखांचा निधी,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी महाराष्ट्र सरकारतर्फे जागा दिली. नागपूरच्या इतिहासात हे उद्यान लक्षात राहणार आहे.एक मराठी गीत आपण आतापर्यंत ऐकत आलो आहोत ‘जिंकू किवा मरु’ मात्र आमच्या शिक्षकांनी आम्हाला हेच शिकवले ‘जिंकू आणि जगू’.

आज कर्नल यांनी कारगिलच्या शौर्याचे वर्णन केले ते डोंगर मला देखील बघण्याची संधी मिळाली आहे.त्यांचे शौर्य मला ऐकण्याची संधी मिळाली,आपले जवान किती प्रतिकूल परिस्थितीत काम करतात हे ऐकतो तेव्हा मनात त्यांच्याप्रति अभिमान दाटून येतो.कर्नल योगेंद्र सिंह यादव यांच्या दीर्घायुष्याची कामना करीत एवढंच सांगतो ‘आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत’.

स्वायत्त संस्थेद्वारे निर्मित देशातील एकमेव उद्यान : महापौर दयाशंकर तिवारी
प्रास्ताविकात महापौर दयाशंकर तिवारी यांनी ‘वंदे मातरम्’ उद्यानाची संकल्पना विषद केली. ते म्हणाले, ‘वंदे मातरम्’ उद्यान या परिसरात २१ परमवीर चक्र विजेत्यांची ग्लास फायबरचे म्युरल राहणार आहे. सोबतच प्रत्येकांची जीवनी तेथे लावण्यात येणार आहे. या शिवाय ज्या युध्दामध्ये त्यांनी आपले शौर्य प्रदर्शित केले त्या युध्दभुमीचे चित्रांकन सुध्दा सिरॅमिकचे म्युरल प्रतिमेच्या पार्श्वमध्ये करण्यात येणार आहे. परिसरात युध्दात वापरण्यात आलेले एक टँक, एक मिग विमान, एक तोफ हे सर्व वॉर ट्राफी म्हणून ठेवले जाणार आहे. प्रत्येक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमात हे सर्व हुतात्मे साक्षी रहावेत या उद्देशाने नागपूर शहर आणि जिल्ह्यातील शहिदांचे नाव कोरलेले २५० आसन क्षमतेचे एम्पि थिएटर उभारले जाणार आहे. उद्यानाचे प्रवेशद्वार इंडिआ गेटच्या स्वरूपात साकारले जाईल. संपूर्ण देशभरात भारतीय सेनेला समर्पित दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकरलेल्या वॉर मेमोरियल नंतर भारतीय सेनेला समर्पित स्वायत्त संस्थेद्वारे तयार करण्यात येणारे हे देशातील एकमात्र उद्यान ‘वंदे मातरम्’ उद्यान असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले. आभार नगरसेवक संजय बालपांडे यांनी मानले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या