Advertisements

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.९ जुलै २०२४: जिल्हा परिषदेचे सदस्य व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी काल रविभवन येथे नरखेड एमआयडीसी फेज-२ ला हायपावर कमेटीची मिळालेली मान्यता,या संदर्भात पत्रकार परिषद घेतली.ऐन करोना काळातच नव्हे तर वडील अनिल देशमुख १४ महिने ईडीच्या अटकेत असतानासुद्धा या प्रस्तावाचा पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी सांगितले.त्याचवेळी ईडीची धाड,अनेकवेळा घराची झाडाझडती,चौकशीच्या फे-या इत्यादीविषयी बोलतानाच,ईडीच्या एका अधिका-याने माझ्या ६ वर्षाच्या मुलीचा देखील हात धरुन खोलीत ओढले व तिला देखील प्रश्न विचारले,ती अतिशय घाबरुन गेली होती,हा प्रसंग सांगताना सलील देशमुख यांचा एक पिता म्हणून कंठ दाटून आला होता!
इतकंच नव्हे तर सलील देशमुखांनी सांगितले ,आमच्या शिक्षण संस्थेच्या कर्मचा-यांना देखील ईडीच्या अधिका-यांनी चौकशीच्या नावाने हैरान करुन सोडले.शिक्षण संस्थेच्या एका कर्मचा-याच्या कपाळाला बंदूक लाऊन,त्यांना हवे असणारे बयाण घेतले,असे ते म्हणाले.माध्यमांना हवे असेल तर त्या कर्मचा-याला सर्वांसमोर उभे करु शकतो,असा दावा त्यांनी केला.ज्या ईडीच्या अधिका-याने माझ्या लहानशा मुलीची चौकशी केली त्याचे नाव देखील मला माहिती असून, ते नाव मी डोक्यात ठेवले असल्याचे ते म्हणाले.माझी ज्येष्ठतेची वयोमर्यादा गाठलेली आई,बहीण,भावाची पत्नी यांना देखील या चौकश्यांच्या ससेमिराला ब-याच वेळा सामोरे जावे लागले.आमच्या घरी सर्वाधिक मात्रेत कोणती गोष्ट उपलब्ध असेल तर त्या आहेत ईडी,सीबीआय,आयकर विभागाच्या नोटीसा.ईडीला उत्तर देत नाही तर सीबीआय अंगावर आली.इतकंच कमी होतं की काय, आयकर विभाग देखील मागे लागला.या सर्व परिस्थितीला सामोरे जात असतानाही,नरखेड येथील एमआयडीसीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला,असे ते म्हणाले.
मूळात,सलील देशमुख यांचे एक पिता म्हणून कारुण्यरुदन, हे कोणत्याही संवेदनशील माणसाला चीड आणणारे आहे.आजोबांच्या तथाकथित भ्रष्टाचाराची चौकशी करताना सहा वर्षाच्या अजाण नातीला ईडीच्या अधिका-याने धमकावणे,प्रश्न विचारणे,तिला घाबरवणे हे कायद्याच्या चौकटीत बसतं का?हा प्रश्न नकळत छळून गेला.
ईडीच्या याच ‘कार्यक्षमतेवर’ व ‘कार्यपद्धतीवर’ १६ जून २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाला अंकूश लावावा लागला.आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नोंद झालेल्या तक्रारींची दखल विशेष न्यायालयाने घेतली असल्यास ‘ईडी’च्या अधिका-यांना आरोपीला थेट अटक करता येणार नाही,असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.याच बरोबर ईडी अधिका-यांच्या चौकशीच्या कार्यपद्धतीवर देखील आता न्यायालयाने अंकूश लावणे गरजेचे आहे,अशी मागणी पुढे येत आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या(पीएमएलए) अंतर्गत एखाद्या तक्रारींची दखल विशेष न्यायालयाने घेतली असल्यास,या कायद्याच्या कलम १९ मध्ये दिलेल्या अधिकाराचा वापर करुन ‘ईडी’ला कुणालाही अटक करता येणार नाही,यासाठी ईडीला विशेष न्यायालयात अर्ज दाखल करावा लागेल,असे महत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.‘पीएमएलए‘च्या कलम ४५ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असेल तर ‘ईडी‘च्या अधिका-यांना कुणालाही अटक करण्याचा अधिकार नाही,असे न्या.अभय ओक व न्या.उज्वल भुवान यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
हे ईडीच्या अधिका-यांवर साधनसुशितेसाठीचे पहीले पाऊल होते.मात्र,त्या पूर्वी सहा वर्षांच्या चिमुरडीने भोगलेले
’भय’हे न्यायालयांच्या कोणत्या सुनावणीत उमटेल?विरोधी पक्षांवरील दबाव वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून या केंद्रिय तपास यंत्रणांच्या कारवाईकडे जग बघत आहे. गेल्या दहा वर्षात केंद्रिय तपास यंत्रणांच्या कारवाईमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचा अहवाल याच वर्षी एप्रिल महिन्यात प्रसिद्ध झाला आहे.
ईडीच्या कारवायांमध्ये ही वाढ चक्क ८६ पटींनी अधिक आहे!ईडीने १० वर्षांच्या काळात ७५५ आरोपींना अटक केली.एकूण १ लाख २१ हजार ६१८ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली.२००५ मध्ये जेव्हा हा पीएमएलए कायदा भारतात लागू झाला तेव्हा पासून तर २०१४ पर्यंत म्हणजे मोदी यांची सत्ता येण्या पूर्वी २९ आरोपींना अटक करण्यात आली होती.याच कालावधीत ५ हजार ८६ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली होती.१,९७१ मालमत्तांवर तात्पुरत्या स्वरुपात कारवाई करण्यात आली.मागील दशकात हा आकडा ३११ होता.२००५ ते २०१४ या कालावधीत १,७९७ गुन्हे व तक्रारींची नोंद झाली होती.गेल्या दशकभरात मात्र ईडीने ५,१५५ मनी लाँडरिंगचे गुन्हे दाखल केले.ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात १२ पटींने वाढ झाली.मागील दहा वर्षात १,२८१ तक्रारी न्यायालयासमोर दाखल झाल्या तर आधीच्या दशकात हाच आकडा फक्त १०२ होता.इतकी कार्यक्षम ईडी ब्रिटेनमध्ये स्थायिक झालेल्या विजय मलल्या,नीरव मोदी आणि संजय भंडारी या देशाच्या आर्थिक गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणात मात्र,अद्याप यशस्वी झालेली नाही.
पंतप्रधान मोदींच्या कार्यक़ाळात ‘डिरेक्टोरेट ऑफ एन्फोर्समेंट’म्हणजे सक्तवसुली संचालनालय(ईडी)या केंद्रिय अर्थखात्यातील महसूल विभागाच्या यंत्रणेचा दबदबा देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सर्वाधिक परिणाम साधणारा दिसून पडला.ईडीची ही कार्यक्षमता आणि कारवाईचा,सामान्य जनता स्वागत करीत असतानाच भारतीय जनता पक्ष या सत्ताधारी पक्षातील मात्र एकाही खासदार,आमदार तसेच राजकीय नेत्यांवर ईडीची धाड गेल्या १० वर्षात का पडली नाही,याचे कोडे सामान्य जनतेला देखील चांगल्याने उलगडले आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी माध्यमांसमोर दिलेल कबुली,जनतेच्या ईडी व भाजपविषयीच्या धारणेवर शिक्कामोर्तब करणारी ठरली.उद्धव ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांनी ऐन लोकसभा निवडणूकीच्या काळात शिंदे गटात प्रवेश केला.मी दबावामुळे पक्ष बदलला.ईडीने मला चुकीच्या प्रकरणात गाेवले होते.त्यामुळे मला तुरुंगात जाणे किवा पक्ष बदलणे हे पर्याय उरले होते,अशी कबुलीच वायकर यांनी एका मुलाखतीत दिली होती.त्यांच्या या मुलाखतीचे राज्यातील राजकारणात पडसाद उमटू लागताच त्यांनी,माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला!पक्ष बदलण्यासाठी दबाव होताच,पण नियतीने अशी वेळ कोणावर ही आणू नये,असे मुलाखतीत म्हटले होते.अलिबाग येथील कथित बंगले आणि जोगेश्वरी येथील राखीव जागेवर पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाप्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असणारे वायकर यांची ईडी आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु होती.चौकशी दरम्यान त्यांच्यावर पक्ष बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाब होता,असा विरोधकांचा आरोप असून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर या चौकश्यांचे काय झाले?हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे.शिंदे गटाकडून मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अतिशय नाट्यमयरित्या अवघ्या ५६ मतांनी विजयी होऊन मोदींचे हात बळकट करण्यासाठी हे खासदार आता सिद्ध झाले आहे!वायकर यांच्या विरुद्ध उबाठाचे अमोल कीर्तिकर निवडणूक रिंगणात असल्यानेच ईडीची कारवाई झाली असल्याचा आरोप कीर्तिकर यांनी केला.
करोनाकाळात मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई कीर्तिकरांवर केली.कीर्तिकर यांची उबाठाकडून लोकसभेसाठी वायकर विरुद्ध उमेदवारी घोषित होताच ईडीकडून खिचडी घोटाळ्यासंबंधात समन्स बजावण्यात आला!कोरोनाकाळात कामगारांना मोफत जेवण देण्यासाठी मुंबई महापालिकेने खिचडी वाटपाचे कंत्राट दिले.या कंत्राटात घोटाळा झाल्याचे आरोप करत घोटाळ्यातील १.६५ कोटींची रक्कम उमेदवार अमोल कीर्तिकर यांना आणि १ कोटी २० लाखांची रक्कम सूरज चव्हाण यांना मिळाल्याची तक्रार भाजप नेते किरीट सौमेय्या यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये केली होती.मात्र,ईडीला तसेच आर्थिक गुन्हे शाखेला कीर्तिकरांवर कारवाईसाठी एप्रिल २०२४ पर्यंत का थांबावे लागले?याचे ही उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे.
ठाकरे गटाचे दुसरे खासदार अनिल देसाई यांच्या स्वीय सहायकावर देखील ईडीच्या छापेमारीत कोणतीही साधनशुचिता नसल्याचा आरोप विरोधक सातत्याने करीत असतात.चौकश्यांचा ससेमिरा लागला.२ मार्च रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनिल देसाईविरुद्ध शिंदे गटाच्या पदाधिका-यांनी केलेल्या तक्रारीची प्राथमिक चौकशी सुरु केली.शिवसेनेच्या नावे असलेल्या बँक खात्यांचा ठाकरे गटाकडून गैरवापर होत असल्याची मुंबई पोलिसांकडे करण्यात आली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या पुणे आणि बारामती येथील कार्यालयांवर देखील ईडीच्या धाडी याच वर्षी जानेवरी महिन्यात पडल्या.२४ जानेवरी रोजी रोहित पवार यांची ११ तास चौकशी करण्यात आली.ईडीची कारवाई राजकीय सुडापोटी असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
लोकसभा निवडणूक जशी जवळ आली तशी ईडीच्या कारवाईला आणखी वेग आलेला, भारतीयांनी बघितला.जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयने याच वर्षी फेब्रुवरी महिन्यात छापेमारी केली.पुलवामा प्रकरणात मलिक यांनी थेट मोदींवरच गंभीर आरोप करण्याचे धाडस केले होते.पदावर असतानाच मलिक यांनी शेतकरी कायद्यांनाही जाहीर विरोध केला होता.मलिक यांच्यावर काश्मीर मधील प्रस्तावित किरु जलविद्दुत प्रकल्पाशी निगडीत गैरव्यवहारांवरुन छापेमारी झाली होती.महत्वाचे म्हणजे याच प्रकल्पाची फाईल मंजुर करण्यासाठी ३०० कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला असल्याची तक्रार स्वत: मलिक यांनीच केली होती.
मनी लाँडरिंग खटल्यात नुकतेच २८ जून रोेजी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मिळाला व कालच त्यांनी बहूमत सिद्ध करुन पुन्हा आपल्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब केले.मला ईडीने खोट्या पद्धतीने अडकवले असा आरोप त्यांनी केला.माझ्याविरुद्ध षडयंत्र रचण्यात आले.५ महिने मला तुरुंगात काढावे लागले.न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो मात्र,माझा कायदेशीर लढा पुढे ही सुरु राहणार आहे,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.याच वर्षी ३१ जानेवरी रोजी सोरेन यांना चौकशीनंतर ईडीने अटक केली होती.
दिल्ली सरकारच्या वादग्रस्त मद्य धोरण आणि त्यामध्ये लाच दिल्याच्या आरोपाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक झाली.याच प्रकरणात आम आदमी पक्षाचे १८ जण अटकेत आहेत.९ समन्स पाठवल्यानंतर न्यायालयाच्या दणक्यानंतर ते ईडीच्या चौकशील सामोरे गेले होते.मद्य धोरणातील पैसा केजरीवाल यांनी गोवा विधानसभेच्या निवडणूकीत वापरला असल्याचा आरोप ईडीने न्यायालयात केला आहे.याशिवाय २०१४ ते २०२२ या कालावधीत विदेशातून ७ कोटी ८ लाख रुपयांचा निधी आपला मिळाला असून हा निधी विदेशी देणगी नियामक कायद्याचा(एफसीआरए),लोकप्रतिनिधी कायदा व भारतीय दंड संहितेचा(आयपीसी)भंग असल्याचा दावा ईडीने केला आहे.
लोकसभा निवडणूकीसाठी अल्पकाळासाठी जामीन मिळालेले केजरीवाल यांना पुन्हा तुरुंगात जावे लागले असून पुन्हा जामीनासाठी त्यांची याचिका दाखल आहे.महत्वाचे म्हणजे त्यांना दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला मात्र,ईडीने याचा विरोध केला.यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली.यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा हा आदेश ’असामान्य’असल्याचे ताशेरे ओढले.सर्वसाधारणपणे,स्थगिती अर्जावर आदेश राखून ठेवले जात नाहीत,ते सुनावणीच्या वेळीच दिले जातात,असे खंडपीठाने सुनावले.दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयाने २० जून रोजी केजरीवाल यांचा जामीन मंजूर करुन त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते.तसेच या आदेशाला स्थगिती देण्याची ईडीची विनंतीही विशेष न्यायाधीश न्याय बिंदू यांनी फेटाळली होती.त्यानंतर ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.उच्च न्यायालायने २१ जून रोजी ईडीच्या याचिकेवर सुनावणी घेईपर्यंत जामीन मंजुरीच्या आदेशाला स्थगिती दिली.
न्यायदानाच्या या प्रक्रियेत तिहार कारागृहात असलेले केजरीवाल रक्तातील शर्करेची पातळी वाढल्याने इन्सुलिनची मागणी,एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल,न्यायालयातून ईडीला आदेश या घडामोडी देखील सर्वसामान्य जनतेला अस्वस्थ करणा-या होत्या.
‘कॅश फॉर क्वेरी‘प्रकरणी २३ मार्च २०२४ रोजी सीबीआयच्या पथकाने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महूआ मोईत्रा यांच्या कोलकत्यासह अनेक ठिकाणच्या घरांवर छापे घातले.माईत्रा या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.सीबीआयने मोईत्रा यांच्या कोलकाता येथील निवासस्थान तसेच पश्चिम बंगालमधील नादिया जिल्हातील कृष्णनगर येथील अपार्टमेंटवर छापे घातले.डिसेंबर २०२३ मध्ये मोईत्रा यांची अनैतिक वर्तणुकीमुळे लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती.या छाप्यांचा परिणाम हा झाला मोईत्रा पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून तृणमूलच्या खासदार बनून लोकसभेत पोहोचल्या.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलण्यासाठी मोईत्रा उभ्या होताच,पंतप्रधान मोदी यांनी सभागृहातून प्रस्थान केले!
टू जी गैरव्यवहार प्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए.राजा व इतर जणांना दोषमुक्त करण्याच्या निकालाला, सीबीआयने आता तब्बल ६ वर्षांनी उच्च न्यायालयात मार्च २०२४ मध्ये आव्हान दिले.उत्पादन शुल्काशी निगडीत मनी लाँड्रिग प्रकरणातील आरोपी आणि भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के.कविता अद्यापही ईडीच्या कोठडीत आहेत.१५ मार्च रोजी त्यांना अटक करण्यात आली होती.हरियानात ईडीने राष्ट्रीय लोकदलाचे माजी आमदार दिलबाग सिंह आणि त्यांच्या सहका-यांवर छापा टाकला.हरियाणातील कथित बेकायदा खाणकामांमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने सिंह आणि सोनिपत येथील काँग्रेसचे आमदार सुरेंदर पानवर यांच्या ठिकाणांवर छापे टाकले.उत्तराखंडात काँग्रेस नेते व माजी मंत्री हरकसिंह रावत यांच्यासंबंधित आस्थापनांवर ७ फेब्रुवरी २०२४ रोजी ईडीने छापे टाकले.‘महादेव बेटिंग ॲप’प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सह आणखी काही जणांविरुद्ध आर्थिक गुन्हे विभागाने(ईओडब्ल्यू)ने गुन्हे दाखल केले.ईडीने या प्रकरणात सादर केलेल्या अहवालावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला.कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्यावर प्राप्तिकर विभागाने नोटीस बजावली.केंद्र सरकारला इंडिया आघाडीची भीती वाटत असल्यानेच केंद्रिय तपास संस्थांकडून विरोधकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला.
दूसरीकडे ’आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर व त्यांचे पती दिपक कोचर यांना सीबीआयने २३ डिसेंबर २०२२ रोजी केलेली अटक म्हणजे कायद्याचा कोणताही विचार न करता केलेली कारवाई व सत्तेचा गैरवापर होता’असे गंभीर निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवले.
या सर्व कारवाया बघता सर्वोच्च न्यायालयाचाआदेश हा विरोधकांना फार मोठा दिलासा ठरला आहे.ईडीचा जन्म बराच आधीचा असला तरी ‘पीएमएलए’कायदा हा तुलनेने नवा आहे.या कायद्याखाली कारवाई चालू असेल तर ईडी संशयितांना सर्रास अटक करते.अशा अटक झालेल्यांना जामीन मिळणे,हे सोपे नव्हते.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार या पुढे ‘पीएमएलए’ या कायद्याखाली एखादे प्रकरण विशेष न्यायालयात गेले असेल तर ईडी ला आरोपींना परस्पर अटक करता येणार नाही.या पुढे तशी मागणी विशेष न्यायलयाला करावी लागेल.समन्स बजावलेल्या आरोपींवर वॉरेंट कधी काढायचे आणि अटक कधी करायची,याचा निर्णय या पुढे विशेष न्यायालय घेईल.‘ईडी‘च्या अधिकारांवर सर्वोच्च न्यायालयाने हे मोठे नियंत्रण आणले आहे.सीबीआय,आर्थिक गुन्हे शाखा,ईडी या सारखी तपास यंत्रणा ही आपल्या कारवाईत अधिकाधिक कडक कलमे लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून पडत आहे.महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारच,या सर्व यंत्रणांना कामाला लावल्याचे समर्थन करताना दिसून पडले.
अशा प्रकरणांमध्ये अडकलेल्या अनेक आरोपींना महिनोनमहिने जामीन मिळालेला नाही त्यामुळेच हे कायदे व ते राबविणा-या यंत्रणा यांची एक प्रकारे दहशत निर्माण झालेली आढळून येते.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे येत्या काळात विशेष न्यायालयांमधील विविध खटल्यांमध्ये जामीन मागणा-या आरोपींच्या संख्येत वाढ झालेली दिसून पडेल.मात्र,ही सुधारणा येण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या इतिहासात राज्याचे गृहमंत्रीच अनिल देशमुख यांना १४ महिने जामीन न मिळता ईडीच्या कोठडीत राहवे लागले.इतकंच नव्हे तर त्यांच्या अवघ्या ६ वर्षांच्या नातीवरही ईडीचे ’भय’दाटून आले आले,याची परतफेड बाप म्हणून सलील देशमुखांच्या डोळ्यात अश्रू तरळले असले तरी लोकसभेच्या निवडणूकीत मोदी सरकारला २४० वर भारतातील मतदारांनी अडकून ठेवले हे विसरता येत नाही.पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच लोकसभेच्या अधिवेशनात येत्या काळात देखील तपास यंत्रणांची कारवाई ही सुरुच राहणार असल्याचा इशारा विरोधकांना संसदेत दिला आहे.
मोदींच्या या विधानाचे व कृतींचे पडसाद, महाराष्ट्रात येत्या विधान सभेत उमटतील ,याची धास्ती इतर कोणी नाही तरी भाजपच्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेली दिसून पडते,कारण ईडीमुळे ’लोकभावना’ही भाजपच्या विरोधात गेली आहे,हे या लोकसभेच्या निकालाने स्पष्ट केले आहे.
……………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
