

शेतकरी आक्रोश आंदोलनातुन सलील देशमुख यांचा सरकारला सवाल
नागपूर,२० ऑगस्ट २०२४: सध्या नागपूर जिल्हात सततच्या पावसामुळे मोठया प्रमाणात संत्रा व मोसंबीची गळ होत आहे. शेतकऱ्यांनी मदत देण्याची मागणी करुन सुध्दा राज्य सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले नाही. सध्या राज्यात निवडणुका डोळयासमोर ठेवून लाडक्या खुर्चीसाठी अनेक योजना राबवीत आहे. परंतु या भाजपा सरकारसाठी शेतकरी कधी लाडका होणार? असा सवाल राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी उपस्थीत केला.ते संविधान चौकात आयोजीत शेतकरी आक्रोश आंदोलनात बोलत होते.
सलील देशमुख यांच्या नेतृत्वात मोठया प्रमाणात होत असलेल्या संत्रा व मोसंबी गळतीच्या नुकसानीचे पंचनामे करुन ५० हजार रुपये प्रती हेक्टर मदत देण्यासाठी हे शेतकरी आक्रोश आंदोलन मंगळवारी करण्यात आले. यावेळी नागपूर जिल्हातील संत्रा व मोसंबी उत्पादक मोठया प्रमाणात उपस्थीत होते. नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल, कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील ३५ हजार हेक्टरवर संत्रा आणि १२ हजार हेक्टरवर मोसंबीच्या उत्पादनक्षम बागा आहेत. सर्वाधिक बागा नरखेड आणि काटोल तालुक्यात आहेत. सध्या या बागांमध्ये ८० टक्के अंबिया बहाराची संत्री आणि मोसंबी आहे. यावर्षी संत्रा उत्पादक भागात सरासरीपेक्षा २५ टक्के अधिक पाऊस झाला असून, आता सुध्दा सतत पाऊस सुरु आहे. फळगळीमुळे नागपूर जिल्ह्यातील अंबिया बहाराच्या संत्रा आणि मोसंबीचे सध्या ५६ ते ५८ टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास फळगळ आणि नुकसानीची तीव्रता आणखी वाढणार आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या संत्रा व मोसंबी उत्पादकांना आर्थिक मदतीद्वारे दिलासा देणे आवश्यक असल्याचे सुध्दा सलील देशमुख म्हणाले.
जिल्हाधीकारी नागपूर यांच्या मार्फेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देवून नुकसानग्रस्त बागांचे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत देण्याची मागणी त्यांनी केली. शिवाय पिक विमाच्या माध्यमातुन उत्पादकांना मदत देण्यासाठी मागणी करीत कोणत्या कारणामुळे ही फळगळ होत आहे याचे कारण शोधण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या तसेच सेंट्रल सिट्रस रिसर्च इंन्सिस्टीट्युट, नागपूर च्या तज्ञांची तातडीने टिम तयार करुन कोणत्या बुर्शीमुळे ही फळगळ होत आहे याचे संशोधन करावे आणि यावर शेतकऱ्यांनी काय उपयोजना कराव्या याची माहिती त्यांना देण्यात यावी अशी मागणी सलील देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
…………………………..




आमचे चॅनल subscribe करा
