नागपूर,ता.५ ऑक्टोबर २०२४: समृद्धी महामार्गावर गेल्या वर्षी १ जुलैला झालेल्या भीषण खासगी बस अपघातात २५ प्रवाश्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता,त्या वेळी घटनास्थळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली व मृतकांच्या कुटूंबियांना २५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली.मात्र,घटनेला पंधरा महिन्यांचा कालावधी लोटला तरी मृतकांच्या कुटूंबियांना ही मदत देण्यात आली नाही,त्यामुळे मदतीची दानत नाही,असे आता सरकारने जाहीर करावे अशी नाराजी आज प्रेस क्लब येथे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
या प्रसंगी बोलताना ते म्हणाले,की या घटनेबाबत एसआयटी स्थापन करुन ट्रॅव्हल्सच्या मालकासह सर्व संबधितांवर कारवाईचे आश्वासन देखील सरकारने दिले होते,त्या अाश्वासनाचाही विसर सरकारला पडला.दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी याप्रसंगी अनिल देशमुख यांनी केली.याप्रसंगी मृत परिवाराचे कुटूंबिय देखील उपस्थित होते.न्याय मिळावा,यासाठी कुटूंबातील सदस्यांनी तब्बल १०४ दिवस वर्धा येथे साखळी उपोषण केले.राज्यकर्त्यांनी त्यांची देखील दखल घेतली नाही,अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
भीषण अपघातामुळे मृतकांची ओळख देखील पटू शकली नाही.या स्थितीत डीएनए चाचणी करण्याची ग्वाही मंत्री गिरीश महाजन व आमदार श्वेता महाले यांनी दिली होती.यानंतर महाजन यांनी अश्या चाचणीला बराच वेळ लागणार असल्याचे सांगितल्याने, सर्व मृतकांचे सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.एकीकडे अंत्यसंस्कार होत असताना दूसरीकडे अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदी,सरकारी ताजपोशी होत होती.राज्यसरकारने ५ लाख तसेच केंद्र सरकारने २ लाख रुपये देऊन हात झटकले.
याबाबत कुटूंबियांच्या सदस्यांनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १०४ दिवस उपोषण केले.‘शर्म करो आंदोलन’,मूक मोर्चा’ काढण्यात आला.जानेवरीत नागपूरात ‘राम जप’आंदोलन करण्यात आले,अशी माहिती आंदोलनाचे संयोजक चंद्रशेखर मडावी यांनी दिली.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला.देशमुख यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, सरकारने आश्वासन दिले असल्यास त्याचे पालन करण्याची ग्वाही दिली.पण,अद्याप काहीच केले नाही.विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी सरकारने ठोस निर्णय घ्यावा,अशी मागणी त्यांनी केली.
या अपघाताला जबाबदार असणा-यांवर कठोर कारवाई होणे हाच खरा न्याय असेल,अशी भावना मृतकांच्या कुटूंबियांनी व्यक्त केली.माझ्या कुटूंबातील तर सर्वच सदस्य गेले आहेत,अनेकांच्या कुटूंबातील तरुण मुले,कर्ते या अपघातात गेले, त्यांच्यावर फार मोठे संकट ओढवले आहे.सरकारने किमान,त्यांना तरी मदत करावी,असे अतुल वनकर म्हणाले.
याप्रसंगी अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रातील कायदा,सुव्यवस्था यावर देखील कठोर टिका केली.बदलापूराची घटना झाली.शेवटी शाळेचे संचालक व सचिव आपटे व कोतवाल यांना अटक करण्यात आली.महाराष्ट्राची जनता विचारते आहे की एवढ्या गंभीर व संवेदनशील घटनेतील आरोपींना अटक करण्यासाठी सरकारला इतके दिवस का लागले?आपटे हा भाजपच पदाधिकारी असल्याने सरकारने त्याला फरार केलं होतं का?असा प्रश्न जनतेला पडला आहे.चंद्रपूर आणि पुण्यात देखील महिलांविरोधात असेच गुन्हे घडले.पुण्यात तर बदलापूरसारखीच लहान-लहान चिमुकलींसोबत शाळेच्या व्हॅनमध्ये घृणित घटना घडली,या विकृत नराधमांना कायद्याची काही भीती महाराष्ट्रात राहीली आहे की नाही?असा सवाल ूमाजी गृहमंत्री म्हणून त्यांनी विद्यमान गृहमंत्री फडणवीसांना केला.सरकारचं लक्ष कायदा-सुव्यवस्थे ऐवजी फोडाफोडीच्या राजकारणात असल्याचा आरोप त्यांनी केला.कायद्याची,पोलिसांची भीती राहीली नाही,पोलिसांवर कोणाचाही वचक नाही त्यामुळेच महाराष्ट्रात विकृत नराधम,लहान-लहान चिमुकलींवर बलात्कार करण्याची हिंमत करतात,असा आरोप त्यांनी केला.
मी गृहमंत्री यांचा राजीनामा मागणार नाही कारण,मला माहिती आहे मी कितीही राजीनामे मागितले तरी खूर्चीला असे चिपकून आहेत, की ते राजीनामा देणारच नाही,त्यामुळे त्यांचा राजीनाम मागण्यापेक्षा गृहमंत्र्यांने महाराष्ट्रातील कायदा,सुव्यवस्था कशी सुधरेल याकडे लक्ष देण्याचे आवाहन अनिल देशमुख यांनी केले.
बदलापूरच्या घटनेत लोकांचा उद्रेग झाला तो अारोपी काँग्रेस किवा भाजपचा पदाधिकारी होता म्हणून नव्हे, तर इतक्या संवेदनशील घटनेतही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी ज्या पद्धतीने पोलिसांकडून उशिर झाला,त्यामुळे जनक्षोभ उसळला.आरोपी कोणत्याही राजकीय पक्षाचा असो,पोलिसांनी आपले काम चोखपणे करायला हवे होते.पण,असे घडले नाही आणि आरोपी असणारा शाळा संचालक हा भाजपचा होता त्यामुळे त्याला फरार करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यातील महायुतीबाबत प्रश्न विचारला असता,ज्या पद्धतीने महायुतीत अजित पवारांविषयी बोलले जात आहे,ते बघता अजित पवारांना लवकरच सांगण्यात येऊ शकतं की त्यांनी युतीतून बाहेर पडून एकट्याने निवडणूक लढवावी,निवडणूकीनंतर पुन्हा युतीत घेऊ मात्र,तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढा,असे अजित पवारांना सांगण्याची शक्यता असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.
अजित पवारांच्या पक्षातील एक ते नऊ पर्यंत जे सध्या मंत्री आहेत त्यांना कोणालाही शरद पवार गटात परत घ्यायचं नाही,असं शरद पवारांनी ठरवलं असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात अनिल देशमुख यांनी सांगितले.
महाविकासआघाडीत खूप चांगल्या पद्धतीने जागावाटपाची चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.कोणत्या पक्षाला कुठली जागा,असा फॉर्मूला नसून जागा जिंकण्याची शक्यता असणाच्या निकषावर‘ऑन मेरिट’चर्चा सुरु आहे. बहूतेक जागांबाबत निर्णय झालेला आहे.शेवटची बैठक ७,८,९ ऑक्टोबर रोजी मुंबईला होणार आहे,तीन दिवसात प्रलंबित जागांवर चर्चा होणार आहे,विदर्भातील जागेबाबत देखील चर्चा होईल.समन्वयाने,एकोप्याने आम्ही निर्णय घेऊ.काही जागांची अदलाबदल देखील होऊ शकते,असे ते म्हणाले.
निवडणूक पार पडल्यानंतर शरद पवार यांनी देखील सांगितले आहे की सरकार महाविकास आघाडीचंच महाराष्ट्रात येणार आहे.आघाडीच्या जवळपास १७०-१८० जागा येणार आहेत.निवडणूकीनंतर शरद पवार,राहूल गांधी व उद्धव ठाकरे एकत्रित बसतील व मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील.आमच्या आघाडीमध्ये कुठल्याही गोष्टीसाठी वाद नाही.काही नेत्यांना, कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री आपलाच,म्हणून सांगावं लागतं मात्र,निवडणूकीनंतर मुख्यमंत्री पदा बाबात तिन्ही पक्षाचे तिन्ही नेतेच हा निर्णय घेतील,असे अनिल देशमुख यांनी सांगितले.