फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूज‘समृद्धी‘महामार्ग काही अनुत्तरित प्रश्‍न...

‘समृद्धी‘महामार्ग काही अनुत्तरित प्रश्‍न…

Advertisements

समृद्धीवर सोयी सुविधा देणारे २७४  कोटी ४२ लाख ३२ हजारचे कंत्राट
एकाच आठवड्यात का केले रद्द?राजकीय नेते व कार्यकर्त्यांना समृद्ध करण्यासाठी का?
समृद्धी महामार्गावर पहील्या १०० दिवसात ९०० अपघात!३१ जणांचा मृत्यू!
वाहनांच्या अति वेग आणि घासलेल्या टायर्सवर दोषारोपण!
एमएसआरडीसीचे नागपूर-शिर्डी दरम्यान आठ सल्ला केंद्रे हवेत!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.६ जून २०२५: हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर‘समृद्धी’महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला व एकूण ७०१ किलोमीटरचा हा महामार्ग पूर्ण होऊन ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी जवळील आमणे येथे या महामार्गाची सांगता झाली.शिवमडका(नागपूर)ते कोकणठाम(शिर्डी)पर्यंतचा ५२० किलोमीटरचा पहीला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण झाला होता,ज्याचे देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले होते.स्वत: कार चालवत इतका मोठा टप्पा फडणवीस यांनी शिंदे यांच्या सोबतीने पार पाडला होता.तेव्हा या महामार्गाविषयी समस्त महाराष्ट्राच्या जनतेत कमालीचे औतसुक्य निर्माण झाले होते.यानंतर चंदेकासरे(शिर्डी)ते भरवीर खुर्द(सिन्नर)हा ८० किमीचा टप्पा मे २०२३ पासून सुरु झाला.भरवीर खुर्द ते पिंपरी सद्रोद्दिन(इगतपुरी)हा २५ किमीचा टप्पा मार्च २०२४ मध्ये पूर्ण झाला.पिंपरी सद्रोद्दिन ते आमने(भिवंडी)हा ७६ किमीचा टप्पा आज ५ जून २०२५ रोजी लोकार्पित होऊन एकूण ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग आता प्रवाश्‍यांसाठी १२० (पल्लयाड) वेगाने वाहन चालविण्यासाठी व आपले इप्सित गाठण्यासाठी सज्ज झाला आहे मात्र,डिसेंबर २०२२ पासून तर मार्च २०२४ पर्यंत या महामार्गावरुन जाणा-या प्रवाश्‍यांचा अनुभव,शेकडो अपघात,सोयी-सुविधांचा अभाव,अनियंत्रित वेग,मार्ग संमोहन,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा गलथान कारभार,न्यायालयातील याचिका,न्यायालयाचे वारंवार महामंडळाला देण्यात आलेले इशारे व सर्वात महत्वाचे या महामार्गावरील सर्वात महागडा टाेल व प्रवाश्‍यांच्या खिशाला पडणारे भगदाड अश्‍या अनेक प्रश्‍नांची गर्दी समाज माध्यमांत उमटलेली आढळते.
समृद्धी महामार्गाला दर तिस-या दिवशी एक जीव अपघातात जात असल्याचा एक भयक्रांत करणारा असा एक इतिहास आहे.हा मार्ग सुरु झाल्यापासूनच्या ६२८ दिवसात २१६१,अर्थात दररोज सरासरी तीन अपघात या महामार्गावर झाले असून २०२४ पर्यंत २०२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.याचा अर्थ दर तिस-या दिवशी एका जणाने या महामार्गावर आपले प्राण गमावले आहे.
समृद्धी महामार्गावरील सोयीसुविधा व वाहतुकीच्या प्रश्‍नावर सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार(तेच ज्यांनी लाडकी बहीण योजनेविरोधात देखील न्यायालयात याचिका दाखल केली व संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले)जनहित याचिका दाखल केली आहे.२५ सप्टेंबर २०२४ रोजी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्या.अभय ओक यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत आरटीओ,राज्य रस्ते महामंडळ,महामार्ग पोलिस आणि भारत पेट्रोलियम व हिंदूस्तान पेट्रोलियम यांनी सादर केलेेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ११ डिसेंबर २०२२ ते ३० ऑगस्ट २०२४ दरम्यान अवघ्या ९ महिन्यात या महामार्गावर एकूण १,१६६ अपघात झाले.यातील ११५ प्राणांतिक अपघात होते.यात २०२ जणांचा मृत्यू झाला.१८०० हून अधिक जण जखमी झाले.त्यात ६६३ जणांना गंभीर तर १,१३४ जणांना किरकोळ दुखापत झाली.यात सर्वाधिक अपघात हे नागपूर रेंजअंतर्गत झाले!यातील ६६ प्राणांतिक अपघात होते यात १११ जणांचा मृत्यू झाला!
यावरही समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी न्यायालयाच्या आदेशांनंतर देखील विविध उपाययोजना राबवित असल्याचे प्रतिज्ञापत्र प्रादेशिक परिवहन विभागाने दिले.मात्र,नागपूरपासून निघाल्यावर या महामार्गावरील पहिल्या २५० किलोमीटरवरील ६ टोल प्लाझांपैकी एकाही ठिकाणी एकही आरटीओ अधिकारी आढळून आला नाही,समृद्धी महामार्गाकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून(एमएसआरडीसी)दुर्लक्ष होत असल्याचा दावा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती नितीन सांबरे व न्या.वृषाली जोशी यांच्या खंडपीठा पुढे करण्यात आला.याचिकाकर्ता अनिल वडपल्लीवार यांच्या दाव्यांवर एमएसआडीसी जुनीच माहिती सांगत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले!यावर जुनी माहिती नको,प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.यावेळी महामंडळाचे उपाध्यक्षांना प्रत्यक्ष किंवा व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
१५ नोव्हेंबर रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार याचिकाकर्ताने समृद्धी महामार्गावर ५०० किमीचा दौरा केला व शपथपत्रात माहिती नमूद केली.वाहनांचे अनुपालन,टायर सुरक्षा किंवा वेग नियमन तपासण्यासाठी ६ टाेल नाक्यांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नव्हते.स्वच्छतागृहांची दुरावस्था,दिव्यांगांसाठी प्रवेशयोग्य नसणे,अस्वच्छ व अपुरे हॉटेल्स,प्रथमोचार किट,औषधालये तसेच इतर सुविधांचा अभाव याकडे याचिकाकर्त्याने न्यायालयाचे लक्ष वेधले.
१९ फेब्रुवरी २०२५ रोजी समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपवरील स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य आहे.पेट्रोल पंप संचालक कंपन्या केवळ व्यवसायाचा विचार करतात.त्यांना जनसुविधेबाबत काळजी नाही,अशा शब्दात उच्च न्यायालयाने भारत पेट्रोलियम,इंडियन ऑईल व हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही तेल कंपन्यांना फटकारले.आता सुधारणा केली नाही तर प्रत्येक अधिका-याच्या पगारातून दहा लाख रुपयांचा दंड वसूल करु,अशी तंबी(मौखिक)मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली.समृद्धी महामार्गावर स्वच्छतागृहांसारखी मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने तीव्र नाराजी न्यायालयाने व्यक्त केली,त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस सांगतात तसे हा राज्याच्या ‘समृद्धी‘चा मार्ग जरी असला तरी तो प्रवाश्‍यांसाठी सुरक्षित व सुखकर प्रवासाचा मार्ग कधीही ठरला नाही!

यावर उत्तर देताना महाधिकवक्ता डॉ.विरेंद्र सराफ यांनी पेट्रोल कंपन्यांना एमएसआरडीसीने मेमो दिला असल्याचे नमूद केले.मात्र,केवळ मेमो देणे पुरेसे नाही,स्वच्छता आणि स्वच्छतेच्या मानकांचे पालन होते आहे की नाही,याची अधिका-यांकडून प्रत्यक्ष तपासणी करणे गरजेचे असल्याचे निर्देश देत न्यायालयाने या मेमोवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. महत्वाचे म्हणजे,सुनावणी दरम्यान या महामार्गावरील तेल कंपन्यांनी दिलेली माहिती खोटी असून या कंपन्यांनी पेट्रोल पंपावरी स्वच्छतागृहांची चांगल्या स्थितीतील न्यायालयात सादर केलेली छायाचित्रे देखील खोटी असल्याची बाब याचिकाकर्त्यांचे वकील ॲड.श्रीरंग भांडारकर यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिली.

समृद्धी महामार्गाच्या उद् घाटनाच्या १०० दिवसांच्या आत या महामार्गावर ९०० पेक्षा अधिक अपघात झाले.यात ३१ जणांचा हकनाक जीव गेला.ही माहिती महाराष्ट्र सरकारच्या क्षेत्रीय परिवहन कार्यालयाच्या अहवालातून समोर आली.हे आकडे २० मार्च २०२३ पर्यंतचे होते.अपघातांचा हा आकडा बघता समृद्धीच्या सर्व आठ प्रवेशद्वारावर वाहनचालकांसाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.अति वेगावर नियंत्रण व वाहनाच्या चाकांमध्ये हवेचा योग्य दाब यावर सर्व वाहन चालकांसोबत अर्धा ते एका तासांचे समुदपदेशन करण्यात येणार होतं,यावर एक लघूपट देखील त्यांना दाखवल्या जाणार होतं.रस्ता सुरक्षेला घेऊन विविध ठिकाणी माहिती फलक देखील लावले जाणार होते.मात्र,अनेकांचे जीव या महामार्गावर गेले,अनेक ट्रेव्हल्स बसेस देखील या महामार्गावरील मेंदू संमोहनाच्या आहारी जाऊन शेकडो प्रवाश्‍यांना घेऊन अपघातग्रस्त झाल्या,तरी देखील राजकीय व प्रशासकीयस्तरावर नैतिकतेची समृद्धी गेल्या पाच वर्षात या महामार्गावर आढळलीच नाही!
महत्वाचे म्हणजे,साक्षात मृत्यूच्या या महामार्गावर धावत असताना दर अडीच ते तीन तासांनी कुठेही वाहनचालकांसाठी थांबा नाही!जणू वाळवंटात प्रवास करीत असल्याचा भास व तनाव या महामार्गावर प्रवास करताना येतो.जेवण आणि नैसर्गिक गरजां भागविण्यासाठी शेकडो किलोमीटरपर्यंत कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. ६७ हजार कोटींचा हा जलद महामार्ग बांधताना ‘दिवाळखोरीची ही वैचारिक समृद्धी’ आजपर्यंत देशातील कोणत्याही महामार्गाच्या वाट्याला आली नसावी! नागपूर ते औरंगाबाद दरम्यान समृद्धी महामार्गावरुन प्रवास करताना एका न्यायमूर्तींना देखील जे हाल भोगावे लागले त्यावरुन या दिवाळखोरीची आणि या महामार्गातून निव्वळ नफेखोरीची ठलक जाणीव होते.
याचिकाकर्ते अनिल वलपल्लीवार यांच्यातर्फे महामार्गालगतच्या वृक्षारोपणाबाबतही प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.दूसरीकडे या महामार्गाच्या दूतर्फा प्रस्तावित वृक्षरोपणाच्या ५० टक्के वृक्षरोपण झाल्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केलेला दावा तो देखील चुकीचा खोटा असून गेल्या पाच वर्षात समृद्धी महामार्गावर वृक्षारोपणाची प्रगती ही समाधानकारक नसल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला.

समृद्धी महामार्गावर दूतर्फा दोन वर्षात वृक्षारोपण केले जाणार असल्याची ‘वल्गना‘करण्यात आली होती.एका कंत्राटदाराला ३०.१४ किमीमध्ये वृक्षारोपण करण्याचे कंत्राट देण्यात आले होते मात्र,समृद्धी नावाच्या वाळवंटात कुठेही हिरवळ झिरपलीच नाही.खडकी बांधमधून पाणी घेऊन या वृक्षांना पाणी देण्यासाठी ड्रिप इरिगेशनची व्यवस्था करण्यात येणार होती मात्र,ते देखील पाणी झिरपलेच नाही आणि ३० किमीच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला ४३ हजार ९० झाडे तसेच महामार्गाच्या मध्यभागी जे ४२ हजार ६५४ झाडे लावली जाणार होती ती एमएसआरडीसीच्या कोणत्या अभियंताच्या फाईल्समध्येच उगवली याचा शोध साक्षात इंद्र देव देखील घेऊ शकणार नाही!! ३९ कोटींचे वृक्षारोपण ना या महामार्गावरील प्रवाश्‍यांना दिसले ना न्यायमूर्तींना!रणरणत्या उन्हात एखाद्या वाहनचालकाला थोडा वेळ एखाद्या वृक्षाखाली थांबण्याची गरज वाटली तरी या महामार्गावर वाळवंटाच्या सावलीशिवाय प्रवाश्‍यांना काहीही गवसत नाही.नागपूरच्या कोतेवाड्यापासून सेलडोहपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष तर सोडा,साधे रोपटे देखील दिसत नाहीत.महत्वाचे म्हणजे कोतेवाडा ते सेलडोह दरम्यान वृक्षारोपणासाठी ३९ कोटींची तरतूद करण्यात आली होती,उर्वरित ७०१ किलोमीटर मधील कोट्यावधी वृक्षारोपणाचा हिशेब तर साक्षात ब्रम्हदेव जरी या समृद्धी महामार्गावर अवतरले तरी नाही देऊ शकणार!

या वृक्षरोपणात बांबू,क्रीपर आदी वृक्षांची रोपण करण्याचे ठरले होते.तसेच या रोपट्यांच्या देखभालीची जबाबदारी पाच वर्षांसाठी निश्‍चित करण्यात आली होती मात्र,एमअएसआरडीसीच्या नागपूर कार्यालयातील अभियंते,मॅनेजर,सुपरिन्टँडिंग अभियंते आदी कोणावरही जबाबदारी अखेरपर्यंत निश्‍चित झालीच नाही कारण,हे प्रशासकीय अधिकारी हे वृक्षारोपणाच्या बाबतीतही ‘निश्‍चित’होते,की ते कोणालाही उत्तरदायी नाहीत!
मूळात डिसेंबर २०२२ पासून नागपूर ते शिर्डी हा ५०० किमीचा पहिला टप्पा सुरु होताच एमएसआरडीसीने जीएचव्ही शिव ॲण्ड पार्क(जेवी)या कंपनीसोबत २७४ कोटी ४२ लाख ३० हजार रुपयांचा ६० वर्षांच्या लीजवर करार केला होता.या मोबदल्यात ही कंपनी समृद्धी महामार्गावर प्रवाश्‍यांसाठी विविध सोयीसुविधा उभारणार होती. २ मार्च २०२३ मध्ये या कंपनीला एमएसआरडीसीने ऑफर पत्र देखील पाठवले होते.मात्र,माशी कुठे शिंकली हे सर्वांना माहिती असून, ज्या ज्या भागातून सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या व त्यांच्या खास कंत्राटदार कार्यकर्त्यांच्या हद्दीतून हा महामार्ग जात होता त्या ठिकाणी या सोयी सुविधा पुरविण्याचे कंत्राट त्यांनाच मिळायला हवे असा ‘बालहट्ट’धरण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.

१० जुलै २०२३ रोजी एमएसआरडीसी व या कंपनीत करार पत्र तयार झाले मात्र ३० जुलै २०२३ रोजी एमएसआरडीसीने या कंपनलीला ७.१ व्हॉल्यूम १ च्या कलमेबाबत उल्लेख करीत, हा करार रद्द करीत असल्याचे पत्र दिले! तसेच पाच कोटींचे इएफडी देखील परत केले!

याचा परिणाम असा झाला, समृद्धी महामार्गावर गेल्या पाच वर्षांपासून सोयी सुविधा उभारल्या गेल्याच नाही,मेंदू संमोहनातून अनेक भीषण अपघात घडले,महिला प्रवाश्‍यांची स्वच्छता गृहांच्या अभावी कुंचबना झाली,अनेक ज्येष्ठ नागरिक,रुग्णांना हालअपेष्टा सहन करावे लागले,हे सगळं घडलं,टप्प्या टप्प्यात सोयी सुविधा उभारण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी!न्यायालयात आपल्या शपथपत्रात एमएसआरडीसीने देखील हेच नमूद केले आहे,लवकरच प्रत्येक दोनशे किलाेमीटरवर आता प्रवाश्‍यांसाठी सोयी-सुविधांच्या निविदा या मंजूर झाल्या आहेत….!परिणामी,समृद्धी महामार्ग हा सर्वसामान्य प्रवाश्‍यांच्या जीवावर उदार होऊन सत्तापक्षातील नेते,पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग मात्र,निश्‍चितच बनला आहे,असेच म्हणावे लागेल!
समृद्धी महामार्गावरील सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत कंत्राट प्रक्रिया सुरु असल्याची माहिती एमएसआरडीसीने न्यायालयात दिली परंतु,सोयीसुविधांच्या कंत्राटासाठी पाच वर्षांचा कालावधी का लागला?असा लाख मोलाचा प्रश्‍न उच्च न्यायालयाने उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली .एमएसआरडीसीच्या शपथपत्रानुसार समृद्धी महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधांसाठी १६ ठिकाणांसाठी १९ निविदाधारकांना अंतिम स्वरुप देण्यात आले असल्याचे सांगून सर्व तेल कपंन्यांना शौचालये स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी वारंवार सूचना आणि नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले.१३ जानेवरी २०२५ रोजी पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आल्याचे एमएसआरडीसीने आपल्या शपथपत्रात नमूद केले मात्र,२०२२ पासून सुरु झालेला समृद्धी महामार्गावर जानेवरी २०२५ पर्यंत देखील स्वच्छ शौचालयासारखी मूलभूत सुविधा प्रवाश्‍यांसाठी विशेषत:महिलांसाठी उपलब्ध नव्हती!त्यामुळेच फडणवीस यांच्या दाव्यानुसार समृद्धी हा वास्तवमध्ये समृद्धीचा ‘आर्थिक’महामार्गच ठरतो.न्यायालयाने एमएसआरडीसीच्या शपथपत्रावर असमाधान व्यक्त करीत योग्य उत्तर न दिल्यास प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास संकोच करणार नाही,अशी तंबी दिली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार तेल कंपन्यांना तात्पुरते स्वरुपात पेट्रोलपंप उभारण्यास परवानगी मिळाली आहे,परिणामी तीस किवा पन्नास वर्षांच्या लीजवर एमएसआरडीसीसोबत या तेलकंपन्यांचा करार झाला असता तर कायमस्वरुपी स्वच्छतागृहे तसे इतर सुविधा या तेलकंपन्यांनी समृद्धी महामार्गावर उभारल्या असत्या.मात्र, तात्पुरते स्वरुपात पेट्रोल पंप उभारण्याची परवागनी मिळाल्याने जगातील कोणतीही कंपनी कायमस्वरुपी सोयीसुविधांवर अमाप पैसा खर्च करणार नाही,हे वास्वत आहे.याच कारणामुळे या महामार्गावर रिलायंसने हॉटेलसाखी सुविधा उभारली होती मात्र,लवकरच त्यांनी देखील या महामार्गावरुन आपला गाशा गुंडाळला.
वास्तवतेत एमएसआरडीसीसारखे अतिशय महत्वाचे महामंडळ एखाद्या महानगरपालिकेसारखी कार्यरत आहे,अशी जहाल टिका आता केली जात आहे.नागपूरवरुन मुंबईसाठी निघणा-या प्रवाश्‍यांना निदान ७०१ किलोमीटरच्या प्रवासात निदान दोन ठिकाणी तरी थांबवण्याची सुविधा उपलब्ध व्हायला हवी होती मात्र,याची काेणतीही तसदी या महामंडळाच्या अधिका-यांना किंवा सरकारला घ्यावीशी वाटली नाही कारण, या कारणांमधून किंवा वृक्ष लागवडीतून पैसा जनरेट होत नाही त्यामुळेच ६७ हजार कोटींचा समृद्धी महामार्ग हा निव्वळ आर्थिक विकासाचा महामार्ग ठरला असल्याची टिका होत आहे.
सह्याद्रीसारखा नैसर्गिक डोंगर पोखरुन आठ किलोमीटरचा कृत्रिम भुयारी मार्ग बनवला असल्याची वल्गना करण्याऐवजी व आपली पाठ थोपटून घेण्याऐवजी, हा महामार्ग पूर्ण होईपर्यंत या महामार्गावर हकनाक गेलेले जीव,सर्वसामान्य प्रवाश्‍यांना भाेगावा लागत असलेला त्रास याविषयी देखील दिलगिरीचे दोन शब्द अपेक्षीत होते.आता दहा कोटी वृक्षारोपण करण्याच्या आश्‍वासनाची पूर्तता डिसेंबर २०२२ पासूनच करण्यात आली असती तर पाच वर्षात विकासाचा हा आर्थिक महामार्ग निदान काही तर हिरवळीने नटलेला दिसला असता!
औद्योगिक,सामाजिक,आर्थिक विकासाचे महाद्वार असा उल्लेख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणाच्या वेळी केला मात्र, त्याचवेळी ५५ हजार कोटींवरुन ६७ हजार कोटींवर गेलेल्या खर्चावर काँग्रेसने श्‍वेत पत्रिका काढण्याची मागणी केली आहे.५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण होता होता ६७ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे.याबाबतची कबुली स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी आपल्या कालच्या भाषणात दिली.वाढलेली महागाई,इंटरचेंजमधील बदल,पाहेाच मार्गाचे वाढलेले अंतर इत्यादी कारणे आता दिली जात आहे. हा महामार्ग भ्रष्टाचाराचा महामार्ग असल्याची टिका करीत, सरकारमध्ये हिम्मत असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर एक श्‍वेतपत्रिका काढण्याचे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

एकूण ७०१ किमी लांबीचा, सहा मार्गिकांचा, १ हजार ९०३ अभियांत्रिकी संरचना असलेला,वन्यजीवांसाठी ९२ ओव्हरपास,८ अंडरपास,६५ उड्डाणपुले,रेल्वे ओव्हरब्रिज,ओव्हरपास,अंडरपास,पादचा-यांसाठी ब्रीज यांच्यासह २४ इंटरचेंज,६ बोगदे,दहा जिल्ह्यांना थेट तर इतर १४ जिल्हे २६ तालुके अनु ३९२ गावांना जोडणा-या, या महामार्गावरील पथकर वसूल करण्याचे कंत्राट अश्‍मी ग्रुप्सला मिळाले आहे,हे विशेष.राज्याच्या अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान हे अश्‍मी ग्रुप्सचे संचालक आहेत.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत विश्‍वासू व जवळचे असलेले प्यारे खान यांच्या अश्‍मी ग्रुप्सला समृद्धी महामार्गावरील टोलचे कंत्राट मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.या महामार्गावर सुरवातीला ५५ हजार कोटी खर्च होणार होता जो आता ६७ हजार कोटींच्या घरात गेला असल्याने या महामार्गावरील टोल देखील वाढीव स्वरुपात असणार आहे.१ एप्रिल २०२५ पासून या महामार्गावरील पथकरात प्रतिकिमीनुसार दरवाढीचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे.त्यामुळे या महामार्गावरुन प्रवासासाठी आता अतिरिक्त ११७ रुपये तीन वर्षांसाठी दरवाढ करण्यात आली आहे.७६ किमीचा अंतिम टप्पा पूर्ण होण्याआधीच ही दरवाढ घोषित करण्यात आली,हे विशेष!डिसेंबर २०२२ मध्ये सुरु झालेल्या या महामार्गावर चारचाकी वाहनांसाठी १.७८ रुपये प्रति किमी इतका पथकर होता.तो आता १ एप्रिलपासून २.०६ रुपये प्रति किमी झाला आहे.७०१ किमी प्रवासाचा विचार करता सध्याच्या पथकरापेक्षा समृद्धी महामार्गावरील प्रवाश्‍यांना १९७ रुपयांचा पथ कर अधिकचा द्यावा लागत आहे.

समृद्धी महामार्गावरील पथकरनिश्‍चिती वास्तवतेत दर तीन वर्षांनी होणार आहे.हा महामार्ग डिसेंबर २०२२ पासून सुरु झाला.त्यानुसार आताची तीन वर्षांची पथकर निश्‍चिती डिसेंबर २०२५ मध्ये व्हायला हवी होती मात्र,अडीच वर्षातच पथ करवाढ करण्यात आली.
थोडक्यात प्रकल्पावर झालेला खर्च आणि दोनच वर्षात त्यातून मिळालेला महसूल यांचे प्रमाण अतिशय व्यस्त असून,त्या प्रमाणात प्रवाशांना सवार्थाने सुरक्षित प्रवासाची व सोयी सुविधांची हमी मिळाली तरच ख-या अर्थाने समृद्धी महामार्ग हा राजकीय ’वल्गनांचा’महामार्ग न राहता ‘समृद्धीचा’ महामार्ग होईल हे सांगणे न लगे.
समृद्धीच्या सुरक्षेलाही छेद-
बुलढाणा जिल्हातून जाणा-या समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी लावलेली पत्रे व जाळ्या तोडून रेतीतस्करांनी १४ अनाधिकृत प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग तयार केलेले आढळून आले!कमी वेळेत रेतीचे टिप्पर पोहोचण्यासाठी हे मार्ग तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली.जीवघेणे अपघात,चोरी,दरोडे यासारख्या घटनांनी आधीच समृद्धी महामार्ग ग्रासला आणि गाजला असताना त्यात रेतीतस्करी याची ही आणखी एक भर पडली.दळववळणाचा हा उत्तम मार्ग रेतीतस्करांसाठी देखील सर्वोत्तम मार्ग ठरला आहे.बुलढाणा जिल्हातून मेहकर,लोणार,देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा असे चार तालुके ओलांडून ८७ किलोमीटरचे क्षेत्र या मार्गाने व्यापले आहे.या जिल्ह्यांसाठी समृद्धी महामार्ग फायदेशीर ठरला असला तरी रेतीतस्कर व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी हा महामार्ग जलद् गतीने तस्करी व गुन्हेगारी करण्यासाठी फायदेशीर ठरत आहे.
त्यासाठी मेहकर शिवारात दोन ठिकाणी,डोणगाव परिसरात दोन ठिकाणी,सुलतानपूर एक,राजेगांव परिसरात दोन आणि रेतीचे केंद्र असलेल्या दुसरबीड जवळ एक,असोला जहागीर,हिवरखेड,तडेगाव,देऊळगाव कोळ या भागात उंच असलेल्या समृद्धी महामार्गावर चढण्यासाठी खुश्‍कोचे मार्ग बनविण्यात आले आहेत.पुढे महामार्गावर चढण्यासाठी अडथळा निर्माण करणारे,सुरक्षा कवच म्हणून लावलेले पत्रे तसेच जाळ्या तोडून सोयीस्कर रस्ते निर्माण करण्यात आले आहेत.

सिंदखेड राजा,देऊळगाव राजा तालुक्यातून खडकपूर्णा नदीपात्रात रेतीचा मोठा साठा आहे.या भागातून आपापल्या सोयीने रेती पोहोचवली जाते.पुढे मेहकरपर्यंत हा क्रम निर्विघ्नपणे सुरु राहतो.११ एप्रिल २०२५ रोजी रात्री मुंबईकडून नागपूरकडे येत असलेल्या सीजी-०७-सीव्ही ९०८६ क्रमांकाच्या ट्रेलरला खालून वर चढणारा रेतीचा टिप्पर धडकला होता!डोणगाव शिवारात नागपूर कॉरिडोर चॅनेल क्रमांक २१८ वर हा अपघात घडला होता.त्यानंतरही रेती वाहतूक करणा-या टिप्परची संख्या कमी झालेली नाही!समृद्धी महामार्गावर विविध ठिकाणांहून खुश्‍कीच्या मार्गावरुन वाहने,जेसीबी आणून मुरुम उत्खनन केले जात आहे.अगदी महामार्गालगतचे गौणखनिज काढून नेले जात आहे.यामुळे महामार्गालगत मोठमाेठे खड्डे निर्माण झाले आहेत.या खड्ड्यात आता पावसाळ्यात पाणी साचणार असल्याने महामार्गालाही धोका निर्माण झाला आहे.महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या अति महत्वाकांक्षी प्रकल्पात आता ‘गॅल‘या कंपनीच्या माध्यमातून गॅस पाईप लाईन टाकण्यात येणार आहे.जिथे १२० प्रति तास वेगाने या महामार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाश्‍यांच्या जिवितेची सुरक्षा धोक्यात आहे तिथे पाईपलाईनद्वारे उपलब्ध होणा-या गॅसच्या सुरक्षेची कोणती गॅरेंटी महायुती सरकार घेऊ शकेल?
या महामार्गावर ट्रकसह विविध वाहने आराम करण्यासाठी थांबविली असता हीच संधी साधून चाेरटे वाहनांच्या टँकमधून डिझेल काढून घेत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.यातील अनेक वाहनधारक हे परराज्यातील असल्याने पोलिस तक्रार देण्यास धजावत नाहीत.डिझेल चोरीच्या काहीच तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या असून तीन घटनांमध्ये महामार्ग पोलिसांनी डिझेलचाेरांना पकडल्याची नोंद आहे!मागील वर्षी मांडवा-बीबीदरम्यान पोलिसांनी रात्रीच्या सुमारास डिझेल चोरांचा पाठलाग सुरु केला होता.त्यावेळी चोरट्यांची स्कॉर्पिओ वाहन उलटून आग लागली.त्यात तिघांचा जळून कोळसा झाला होता तर नागपूरच्या दिशेने डिझेल चोरांचा पाठलाग करीत असताना महामार्ग पोलिसांच्या धावत्या स्कॉर्पिओवर चोरट्यांनीच कॅनमधील डिझेल फेकले,परिणामी,पेटवून देण्याच्या भीतीने पोलिसांनी त्यांचा पाठलाग थांबवला.दूसरबीडपासून डोणगावपर्यंत पोलिसांनी तब्बल ६० किमी त्या डिझेल चोरट्यांचा पाठलाग केला होता.अशा घटना घडल्यानंतरही चोरांची शिरजोरी कुठेही कमी झालेली नसल्याचे भुक्तभोगी सांगतात.
याशिवाय डोणगाव शिवारामध्ये गुराख्यांनी समृद्धी महामार्गालगतच्या जाळ्या तोडून आपली गुरेढोरे चरायला सोडली असल्याची धक्कादायक बाब या महामार्गावरुन प्रवास करताना प्रवाश्‍यांना आढळली.समृद्धीच्या या महामार्गावरील तोडण्यात आलेल्या जाळ्यांमधून चक्क गुरेढोरे रस्त्यांवर फिरताना आढळता.या जनावरांमुळे देखील भरधाव धावणा-या वाहंनाना धडकून मोठी दुर्घटना होण्याचा धोका निर्माण झाला आहे.दरम्यान,समृद्धी महामार्ग देखभाल अभियंता डी.एस.अंभोरे यांनी डोणगाव शिवारात ठाणेदार अमरनाथ नागरे,पोलिस शिपाई पवन गाभणे यांना सोबत घेऊन पाहणी केली असता चॅनेल क्रमांक २६१,२६३,२७१,२६७ येथील बॅरिअर तुटलेले दिसून आले!

याशिवाय समृद्धीच्या पलीकडे शेतक-यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेले अंडरग्राऊंड केबल देखील चोरीला गेले आहेत!या महामार्गावर दोन दरोड्यांचा घटना देखील घडल्या आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर समृद्धीमुळे आता विदर्भाचा विकास झाला,आता मराठवाड्याचा विकास होणार असल्याचे दावे ‘शक्तीपीठ’ महामार्गाच्या नावाने करणे सुरु झाले आहे.समृद्धीच्या या पाच वर्षांचा अनुभव बघता अंदाजित ८३ हजार ३०० कोटींच्या शक्तीपीठ महामार्गाकडे मायबाप फडणवीस सरकार वाटचाल करीत असताना,’पुढचे पाठ..मागचे सपाट’असा न्याय समृद्धीबाबत होता कामा नये.पेट्रोल पंपावरील अस्वच्छ स्वच्छतागृहे,सोयी सुविधांचा अभाव यांवरील याचिका अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे,येत्या ९ जून नंतर उन्हाळी सुटीनंतर न्यायालये उघडतील तेव्हा पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग बातम्यांमध्ये झळकेलच मात्र,जी बाब सरकारने स्वत:हून प्रशासकीय स्तरावर ’नैतिकतेने ’करण्याची गरज आहे,ती बाब न्यायालयाला अधोरेखित करावी लागत आहे,ही शरमेची बाब आहे.यामुळेच समृद्धी महामार्ग हा ५ जून २०२५ रोजी पूर्ण झाला असला ,तरी आपल्या मागे बरेच अनुत्तरित प्रश्‍न सोडून गेला आहे,ज्याची उत्तरे भविष्यात कधीही मिळणार नाही,ही मनाशी गाठ घालूनच या महामार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाश्‍यांना या महामार्गाचा वापर करावा लागणार आहे,हे विशेष!
(उद्याच्या बातमीत वाचा राज्य सरकारचा शक्तीपीठला ब्रेक,भूसंपादन अधिसूचना रद्द पासून तर ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ पूर्ण करणारच!)
………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या