

पालकांच्या मनाचे अनेकविध पैलू ‘मन… पालकांचे’ मध्ये उलगडले
नागपूर, १९ जून: मुलांचे मनस्वास्थ्य घडवण्यामध्ये जसे आई-वडीलांचे संस्कार, भूमिका महत्वाची असते तसे समाजमन सुदृढ ठेवण्यासाठी समाजात वावरणारे दाते, मार्गदर्शकाच्या भूमिकेत असलेले सक्षम पालकत्व गरजेचे असते असा सूर तज्ञांनी व्यक्त केला.
ऋतुराज प्रस्तुत ‘मन’ या मालिकेतील बारावे पुष्प सायंटिफीक सभागृहात सादर करण्यात आले. ऋतूराजच्या संचालिका मुग्धा तापस यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘मन… पालकांचे’ हा सांगीतिक चर्चेचा कार्यक्रम ‘जागतिक फादर्स डे’ निमित्ताने रविवारी सादर करण्यात आला.
या कार्यक्रमात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर आणि मानसशास्त्रज्ज्ञ डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी ‘मन… पालकांचे’ विषयावर आपले विचार मांडले. निवेदकाच्या भूमिकेतून किशोर गलांडे यांनी डॉ. पानगावकर व डॉ. धर्माधिकारी यांना बोलते केले.
डॉ. धर्माधिकारी मन म्हणजे काय यावर बोलताना म्हणाल्या, मन ही एक प्रक्रिया असून ती अनुवंशिकता, अनुभव व पालकांच्या संस्कारांनी घडत जाते. डॉ. पानगावकर यांनी पालक म्हणजे केवळ आईवडील नसून समाजाला मार्गदर्शन करणारेही पालक असतात, अशी भूमिका मांडली.
वडिल हे रक्षणकर्ता असतात तर आई ही तारणहार असते. बुद्धी, शरीर, आर्थिक, सामाजिक रक्षण करणारे पालक म्हणजे हे आईवडील असतात. एकल पालकत्वामध्ये आई किंवा वडील या दोन्ही भूमिका निभावतात, असे डॉ. पानगावकर म्हणाले. स्त्री आणि पुरूष यांची जडणघडण वेगळी असल्यामुळे त्यांच्यातील संवेदनशीलतेमध्येही फरक असतो असे सांगताना डॉ. धर्माधिकारी यांनी आई व वडील यांनी समन्वयातून मुलांवर संस्कार करावे, अशी भूमिका मांडली. एकल पालकत्व, दिव्यागांचे पालकत्व, पालकांचे पालकत्व, सामाजिक पालकत्व अशा अनेक विषयावंर तज्ञांनी आपले मत मांडले.
प्रसिद्ध गायक गुणवंत घटवाई, मंजिरी अय्यर व सारंग जोशी या गायकांनी पापा कहते है, आकाशी झेप घे रे पाखरा, है ना बोलो बोलो, देव जरी मज भेटला, पराधीन आहे जगती, वो तो है अलबेला अशी विविध गीते सादर केली. आर्या घटवाई, तनया चाफले, ऋत्वी तापस व आसावरी कायंदे या सहगायिकांचाही यात सहभाग होता. त्यांना गोविंद गडीकर, परिमल जोशी, मोरेश्वर दहासहस्त्र विशाल दहासहस्त्र व मुग्धा तापस यांनी उत्तम वाद्यसंगत केली.
कुंदाताई विजयकर, आदित्य मोटर्सचे अमीन उपलब, सयाजी जाधव यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिहेविअरल सायन्सेसच्या सौजन्याने व विदर्भ गौरव प्रतिष्ठान व तिरुपती अर्बन को. ऑप बँक लिमिटेडच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला.




आमचे चॅनल subscribe करा
