फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeblogसब घोडे बारा टक्के....

सब घोडे बारा टक्के….

Advertisements

नागपूर,ता.१३ जानेवरी २०२६: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवि विंदा करंदीकर यांची एक सुप्रसिद्ध कविता आहे,‘सब घोडे बारा टक्के’ही  कविता १९५२ च्या पहिल्या भारतीय निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर करंदीकर यांनी लिहली होती.आजही ती राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर तेवढीच चपखल बसते.ही कविता आजच्या राजकारण व समाजकारणावरही मार्मिक भाष्य करते .विंदा म्हणतात ‘सब घोडे बारा टक्के,जितकी डोकी तितकी मते,जितकी शिते तितकी भूते,कोणी मवाळ कोणी जहाल,कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ,कोणी ढिले कोणी घट्ट,कोणी कच्चे कोणी पक्के,सब घोडे बारा टक्के….!महाराष्ट्रात इतक्या दशकात इतक्या पक्षांची इतकी सरकारे आली,गेली मात्र,विंदाच्या शब्दात सांगायचे झाल्यास त्यांची ही कविता काही केल्या ‘ मरत’ नाही…याचा अर्थ या कवितेचा संदर्भ कालबार्ह्य होत नाही.
येत्या १५ जानेवरी रोजी महाराष्ट्राची जनता पुन्हा एकदा एका नव्या निवडणूकीला, महानगरपालिकांच्या निवडणूकीला सामोरे जात आहे.महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरात देखील या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचार तोफा आज सायंकाळी थंडावल्या.नागपूर महानगरपालिकेच्या १५१ जागांसाठी आता मतदारांकडून मतांचा ‘जोगवा’’उघडपणे’मागून झाला आहे.अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आज मध्य नागपूरातील गल्ल्यांमध्ये ‘फटफटीवर’बसून मतांच्या जोगव्यासाठी रोड शो करावा लागला.भारत माता चौक,तीन नल चौक,शहीद चौक,टांगा स्टँड चौक,गांधी पुतळा,पंडित बच्छराज व्यास चौक,महाल चौक,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक,गांधी गेट व महाल येथे मुख्यमंत्र्यांच्या फटफटीरुपी टांगा हा चांगलाच धावला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरातील प्रत्येकाला सर्वोत्तम नागरी सुविधा मिळाव्यात,नागपूरचा सुखांक वाढावा असा ध्यास घेतल्याचे सध्या महाराष्ट्राच्या सर्वाधिक ’पंसदीच्या’ठरलेल्या अभिनेत्री गिरीजा ओक यांनी घेतलेल्या जाहीर मुलाखतीत सांगितले.(काही विघ्नसंतोषी नागपूरकरांच्या,नागपूरात वलय असलेले मुलाखतकार नव्हते का?म्हणून पोटात शूल उठला तर ’घर की मूर्गी दाल बराबर’म्हणून काहींनी स्वत:ची समजूत घालून घेतली) गडकरींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी बैठका व सभांचा धडाकाच लावला मात्र,त्यांचा जीव प्रभाग क्र.१८ मधील एका उमेदवारामध्ये विशेषत्वाने अडकला असल्याचे भाजपचे कार्यकर्ते खासगीत चर्चा करताना आढळतात.हे उमेदवार गडकरींच्या इतक्या पसंदीचे आहेत की तेच भावी महापौर असल्याचा दावा केला जात आहे.आता पर्यंत मनपात एक माजी महापौर व भाजप आमदार यांचाच शब्द ‘प्रामाण्य’मानला जातो,गडकरींचे हे पसंदीचे उमेदवार महापौर झाल्यास,त्या आमदाराच्या मनपावरील ’वर्चस्ववादाला’जबर धक्का बसेल,असा कयास आहे,परिणामी प्रभाग क्र.१८ मध्येच जणू मनपाची खरी निवडणूक रंगत, रंगली असल्याची चर्चा आहे.
‘निष्ठावान महापौर’याचाच दूसर अर्थ ’डोळे झाकून स्वाक्षरी’असा होतो.नागपूरात अजून अनेक ‘ड्रीम प्रोजेक्ट’होऊ घातले आहेत.या प्रकल्पांमध्ये कोणतीही अडवणूक नको यासाठी खरी तळमळ असल्याचा खोचक टोला ही विरोधक हाणताना दिसून पडतात.
गडकरी यांनी पश्‍चिम,उत्तर नागपूरमधील मतदारांशी देखील संवाद साधला व गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा(पुन्हा एकदा) संकल्प जाहीर केला.गिट्टीखदान,हजारी पहाड,म्हाडा कॉलनी चौक येथे प्रचार सभेत तर आमच्या ‘धुरंधर’उमेदवारांनाच निवडून द्या,असे आवाहन करीत, आम्ही भारतातील सुंदर आणि स्वच्छ शहर म्हणून नागपूर विकसित करु,असे आश्‍वासन(पुन्हा एकदा)मतदारांना दिले.‘धुरंधर’मधील रहमान डकैतांचा उल्लेख मात्र त्यांनी टाळला….!
गडकरींच्या बरोबरीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रचार सभांचा धडाका लावत प्रत्येक क्षेत्रात नागपूरला ‘नंबर वन’ करणार असल्याचा शंखनाद पश्‍चिम नागपूरातील रामनगर मैदानातील सभेत केला.तिरंगा चौकातील सभेत तर त्यांनी ‘माझे नगरसेवक,माझी गॅरंटी’असल्याचे ठणकावले.संत्रानगरीतील प्रत्येक परिवर्तन भाजपच्याच काळात झाले,आता राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले.पुढील पाच वर्षात नागपूर आणखी ‘विकसित’करण्याची हमी मतदारांना दिली.’तर्री पोहे विथ देवाभाऊ’’शो’मध्ये तर त्यांनी भाजपच्याच काळात नागपूरला आधुनिकतेचा साज चढला असल्याचा दावा केला.स्वागत लॉनमध्ये तर्री पोह्यांचा आस्वाद घेताना मुलाखतकार सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी व अभिनेते भारत गणेशपुरे यांना, नागपूरने देशाला व महाराष्ट्राला विकासाचे (अशाश्‍वत)मॉडेल दिले असल्याचा ‘शोध’लावला!
सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्या पूर्वी चक्क नागपूरकर नागरिकांच्या सूचना मागवल्या.११ जानेवरी रोजी जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात शहरात विदेशी दूतावास,मेट्रोचा पुढील टप्पा,२४ बाय ७ पाणी पुरवठा,सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया,भांडेवाडीतील कच-यावर शास्त्रोक्त पद्धीने प्रक्रिया,बायोमायनिंगद्वारे डंपिंग यार्डमधील कच-यांचे डोंगर कमी करणे,शहरातील रस्ते मोकाट श्‍वान व पशुमुक्त करणे,शहरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात हॉकर्स झोनची निर्मिती,हरितीकरण मोहिमेअंतर्गत दरवर्षाला २५ हजार नवीन झाडांचे रोपण,शहरात नवीन उद्यानांची निर्मिती,सहाही विधानसभा क्षेत्रांत सहा वैज्ञानिकांच्या नावाने ई-ग्रंथालयांची निर्मिती,रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्यासाठी सहाही विधानसभा मतदारसंघात कौशल्यविकास केंद्रांची निर्मिती,स्मार्ट मोबिलिटीअंतर्गत सीसीटीव्ही कॅमरे,फूटपाथ अतिक्रमण मुक्त करणे,स्काय वॉकची निर्मिती,झापेडपट्टीवासियांना पट्टे वाटप,तलावांचे सौंदर्यीकरण व संवर्धन,मैदानांचा विकास,सिमेंट रस्त्यांची निर्मिती इत्यादी…इत्यादी….अशी(पुन्हा एकदा)वचने दिलीत.२०२६ च्या निवडणूकीसाठी असलेला भाजपचा हा जाहीरनामा २००४ च्या  मनपा निवडणूकीतील जाहीरनामाच असल्याची टिका विरोधकांनी केली.
महत्वाचे म्हणजे भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ज्या उमेदवारांना रिंगणात उतरवले आहेत त्यातील काहींचा ‘महिमा’हा ‘कालातीत’आहे. महानगरपालिका निवडणूक रिंगणात उतरणा-या उमेदवारांना ‘मी किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांनी महानगरपालिका हद्दीत कोणतेही अनाधिकृत बांधकाम केलेले नाही,मी निवडून आल्यावर कोणतेही शासकीय कंत्राट घेणार नाही’असे शपथपत्रावर लिहून देण्याचे ‘फर्मान’राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२५ मध्ये काढले.शपथपत्र खोटे आढळल्यास,हितसंबंध आढळल्यास नगरसेवक पद रद्द करण्याचे स्पष्ट निर्देशच राज्य निवडणूक आयोगाने दिले.मात्र,आयोगाच्या ‘कल्पक’बुद्धीला शासकीय कंत्राट घेणा-या नगरसेवकाची उमेदवारी मिळणा-या  किंवा त्यांच्या कुटूंबियांसाठी कोणतेही दिशानिर्देश देण्याची ‘गरज’वाटली नाही,यातच आयोगाच्या ’वरील’दिशानिर्देशांमधील ‘फोलपणा’लक्षात येतो.
मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात भारतीय जनता पक्षाने असे अनेक उमेदवार दिले आहेत ज्यांचे कुटुंबियच थेट मनपाच्या शासकीय कंत्राटांचे सर्वात मोठे ‘लाभार्थी’आहेत!यात प्रभाग क्र.३४ मध्ये भाजपचे उमेदवार बाबाराव तायडे यांचा मूलगाच मनपातील सिमेंट-काँक्रिट रस्त्यांचा कंत्राटदार असून,भाजपने कंत्राटदाराच्या वडीलांनाच अनेक निष्ठावंतांना डावलून उमेदवारी देण्याची किमया,लीलया साधली असल्यचा सरळ आरोप विरोधक करतात.
भाजपचे प्रभाग क्र.३७(ड)मधील आणखी एक उमेदवार  व माजी शिक्षण सभापती दिलीप दिवे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी स्वीय सचिव यांचे सुपुत्र असून नगरसेवक म्हणून त्यांच्या मागच्या कारर्कीदीचे ‘मूल्यमापन’ करण्याची पक्षाने तसदीच घेतली नाही व मोठ्या साहेबांच्या आर्शिवादाने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. करोनाच्या काळात दिनदयाल नगर येथील एका लहान मुलाला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला,आपल्या पोटच्या गोळ्याच्या मांडीचे मांस गोळा करण्याची वेळ  कोल्हे आडनावाच्या  जन्मदात्रीवर आले,रुग्णालयात भर्ती केल्यावर त्यांनी त्यांच्या ’हक्काचे’नगरसेवक दिलीप दिवे यांना फोन लावला व प्रभागात भटक्या कुत्र्यांची समस्या मांडली,यावर ’आता मला भटके कुत्रे पकडण्याचेच काम राहीले आहे का?तुम्ही कोणाला फोन लावला आहे माहिती आहे का?’असे सपशेल ‘सत्ताधारी’उत्तर त्या जन्मदात्रीला मिळाले,माध्यमांनी दिवे यांच्या या असंवेदनशीलतेवर चांगलेच ओरखडे ओढले होते.शिक्षण समिती सभापती म्हणून देखील त्यांची कारर्कीर्द ‘देदिप्यमान’राहीली असून अनेक मनपाच्या मराठी व  हिंदी शाळा नागपूरच्या नकाशावरुनच ‘नामशेष’झाल्याची आकडेवारी सांगते!
भाजपचे प्रभाग १(ड)मधील उमेदवार विक्की कुकरेजा हे नामांकित कुकरेजा बिल्डर्सच्या संचालकाचे सख्खे भाऊ असून संपूर्ण नागपूर शहरात अगदी जामठापासून तर सिव्हिल लाईन्सच्या प्रेस क्लब चौकापर्यंत, सर्वदूर ,सर्वाधिक उंच इमारतींचे बांधकाम कुकरेजा बिल्डर्सचे ठलक वैशिष्ठ असून, निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देश,शपथपत्र इत्यादी मधील ‘कंत्रटादार’या संकल्पने पलीकडील कुकरेजा बिल्डर्सची गणना करावी लागेल,तरी देखील विकी कुकरेजा यांना जरीपटका भागातून पुन्हा एकदा भाजपने तिकीट दिले आहे. कुकरेजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय खास’मानले जात असून,त्यांचे मनपा मुख्यालया जवळील कुकरेजा इन्फिनिटी इमारतीत अनेक नियमांचे उल्लंंघन झाले असल्याचा विरोधात सैन्याच्या कामठी रेजिमेंटकडून न्यायालयात दाद मागण्यात आली होती,जी याचिका न्यायालयाने खारिज केली.
भाजपचे प्रभाग क्र.२१(ड)मधील उमेदवार संजय अवचट हे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचे जवळचे नातेवाईक असून १५ जुलै २०२२ रोजी जमीनीच्या व्यहवारात दिलेला धनादेश न वटल्याचे सिद्ध झाल्याने संजय अवचट यांना सहा महिने कारावास व ४० लाख रुपये दंडाची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली होती.माेहनलाल पटेल असे फिर्यादीचे नाव होते.पूर्व नागपूरात अनेक निष्ठावंताना डावलून अवचट यांच्यासाठी आमदार खोपडे यांनी तिकीट आणल्याचे बोलले जात आहे.महत्वाचे म्हणजे आमदार कृष्णा खोपडे यांच्या सुपुत्राने नगरसेवकाचे तिकीट न मिळाल्याने भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे ‘नाट्य’ही चांगलेच गाजले.
प्रभाग क्र. १४ मधून भाजपने राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातून आलेल्या प्रगती पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.जून २०१६ मध्ये प्रगती पाटील यांच्या विरुद्ध शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण केले असल्याचा आरोप करीत त्यांना अपात्र घोषित करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती.यावर न्यायालयाने मनपा आयुक्तांना नोटीस बजावली.काँग्रेसच्या पराभूत उमेदवार तिलोत्तमा किनखेडे यांनी ही याचिका दाखल केली होती.यावर तत्कालीन न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्या.झेड हक यांच्या खंडपीठाने मनपा आयुक्त व प्रगती पाटील यांना नोटीस बजावली होती.
याचिकाकर्तीनुसार,प्रगती पाटील यांनी तेलंगखेडी गुलमोहर फ्लॅट टिळक नगर येथे घर असल्याचा दावा केला.तेलंखेडी येथे १ हजार २४० चौरस फूटाचे त्यांचे घर आहे तर टिळक नगरात ९२८ चौ.फूटाचा फ्लॅट आहे.याशिवाय टिळक नगरात १ हजार १५ चौ.फूटाचे घर आणि तेलंगखेडी येथे ५५० चौ.फू.फ्लॅट देखील असल्याचे निवडणूक अधिका-यांना सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले.सदर संपत्ती ही प्रगती पाटील व अजय पाटील यांची आहे.मात्र,फॉरेस्ट हाऊसिंग सोसायटीच्या फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला.याशिवाय टिळक नगरातील गुलमोहर फ्लॅटमध्येही अवैध बांधकामाचा आरोप झाला.या संदर्भात मनपाकडून चौकशी करण्यात आली मात्र,प्रगती पाटील या नगरसेविका झाल्याने कारवाई करण्यात आली नाही,असा दावा याचिकेत करण्यात आला.आपल्या निवडणूकी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात विविध खटल्यांतील दोषसिद्धीबाबत माहिती प्रगती पाटील यांनी भरली आहे.ती घरे आम्ही विकून टाकली असून न्यायालयाने ती याचिका खारीज केली असल्याची माहिती अजय पाटील देतात.
’पार्टी विथ डिफरेन्स’ने नागपूरात प्रभाग क्र.१७ मध्ये दिलेल्या महिला उमेदवाराबाबत सर्वाधिक चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे.या प्रभागात तारा मुन्ना यादव यांना उमेदवारी देण्यात आली असून मुन्ना यादव व त्यांची मुले ही गुन्हेगारी पार्श्वभूमीसाठी नागपूरात ‘कुप्रसिद्ध’आहे.राज्य इमारत बांधकाम मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांच्या विरोधात पोलिसांनी ५ एप्रिल २०१८ रोजी दहा गुन्ह्यांची माहिती शपथपत्रावर नागपूर खंडपीठाला दिली होती व त्यांच्या जामीनाला विरोध केला होता!महत्वाचे म्हणजे मुन्ना यादव प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला उत्तर सादर करण्यासाठी न्यायालयाने वारंवार वेळ दिला होता मात्र,सरकारी पक्षातर्फे मुन्ना यादवविरुद्ध खटल्यांसंबंधी फाईल्स तर न्यायालयात पोहोचल्याच नाहीत शिवाय सरकारी वकील देखील उपस्थित नव्हते!यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत कठोर शब्दात फडणवीस सरकारला फटकारले होते.
२१ ऑक्टोबर २०१७ रोजी मुन्ना यादव यांची मुले करण व अर्जुन फटाके फोडत असताना त्यांना विरोधी गटातील मंजू यादव यांनी हटकले,त्यामुळे मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांनी विरोधी गटातील यादव कुटूंबीयांना धारधार शस्त्रांनी जखमी केले तसेच जबर मारहाण व शिवीगाळ केली.धंतोली पोलिसांनी अवधेश उर्फ पापा नंदलाल यादव यांच्या तक्रारीवरुन मुन्ना यादव,त्यांच्या पत्नी लक्ष्मी यादव,करण यादव,अर्जुन यादव,बाला यादव,जग्गू यादव,सोनू यादव व इतरांविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ यासह विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केला मात्र,दोषारोपपत्रातून नंतर कलम ३०७ हटविण्यात आली!या कलमेचा पुन्हा समावेश दोषारोपपत्रात करण्यात यावा यासाठी फिर्यादींनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली.
तत्पूर्वी सत्र न्यायालयाने देखील मुन्ना यादव व कुटूंबियांना दिलासा नाकाराला होता.मुन्ना यादवतर्फे शहरातील नामांकित वकील सुबोध धर्माधिकारी,ॲड.मोहित खजांची व ॲड.उदय डबले यांनी कामकाज पाहीले होते.सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
प्रभाग क्र.३१ मध्ये तर भाजपच्या एका आमदाराने निष्ठावंताना डावलून हॉटेलची जवळपास तेरा लाख रुपयांची उधारी ज्याची द्यायची आहे त्या हॉटेल व्यवसायिकालाच उमेदवारी मिळवून देण्याची किमया साधली!याचा अर्थ निवडून आल्यानंतर हा व्यवसायिक सामान्य नागपूरकरांच्या खिशातून किती ‘उधारी’ वसूल’करेल?हा प्रश्‍न मतदारांनाही छळून जात नसले तर नवलच…!सुसंस्कारी भाजपच्या या आमदारावर मांसाहारी-शाकाहारी जेवणाचे बिल थकीत असल्याचे रेशिम बागमधील जनता आता काय निर्णय घेते हे १६ जानेवरी रोजी निकालातून स्पष्ट होईल….!
प्रभाग क्र.२३ (ड)मधून भाजपने बाल्या बोरकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.लकडगंज कच्छीवसा मैदानात गणेशविसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करण्याच्या विरोध स्थानिकांनी केला होता.इतक्या मोठ्या प्रभागात हे एकमेव मैदान खेळण्यासाठी येथील लहानग्यांना उपलब्ध आहे.फडणवीस सरकारने नागपूर मनपात कृत्रिम तलावांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी ‘ओतला’.परिणामी,नागरिकांच्या मताला वेशीवर टांगून आपापल्या प्रभागात कृत्रिम तलावाच्या निर्मितीसाठी जणू माजी सत्ताधारी नगरसेवकांमध्ये होड लागली होती त्यात एक बाल्या बोरकर असून त्यांनी या मैदानात अवाढव्य कृत्रिम तलावाची निर्मिती करुनच दम घेतला.यासाठी मैदानातील हिरव्यागार झाडांचा बळी घेण्यात आला.याला शहरातील पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध केला होता,तरी देखील एका बाजूची १६ ते १७ हिरव्यागार झाडांना भुईसपाट करण्यात आले.कृत्रिम तलावासाठी ‘ओरिजनल’निसर्ग ओरबडण्यात आला..दूर्देवाने आपल्या भावासोबत खेळत असताना चेंडू तलावात पडल्याने एक चिमूरडा त्यात उतरला आणि पाण्याचा भक्ष्य ठरला….!त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढताच संपूर्ण परिसरानेच टाहो फोडला.स्थानिक नागरिकांच्या,पर्यावरणवाद्यांच्या विरोधाला न जुमाणना-या बाल्या बोरकर विरोधात स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.नुकतेच नगर परिषद बिडगांव येथील निवडणूकीत बाल्या बोरकर यांनी निवडणूक अधिका-यांना दमदाटी करीत शेकडो दुबार मतदान केल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषद घेऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अवंतिका लेकूरवाळे यांनी देखील केला आहे.
प्रभाग १७ मध्ये देखील भाजपने अश्‍या एका नगरसेवकाला पुन्हा तिकीट दिले ज्याच्यावर पंतग उडवण्यावरुन घरा शेजारील एका महिलेला बेदम मारहाण करण्याचा गुन्हा दाखल झाला होता….!
प्रभाग क्र ८ मध्ये भाजपने तीन वेळचे माजी आमदार विकास कंुभारे यांच्या पुत्राला श्रेयस कुंभारे यांना यंदा तिकीट दिले असून, ऐन करोना काळात जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनच्या कळा सोसत होत्या,गरीबांच्या घरात एक वेळेच्या जेवणाची भ्रांत होती त्यावेळी कुंभारे यांचे हे चिरंजीव गोवा येथील एका तारांकित हॉटेलमध्ये टेबलवर चढून बिअरचे फव्वारे उडवित असल्याचा व्हिडीयो चांगलाच चर्चेत आला होता.मुख्यमंत्री म्हणतात तसेच नागपूरला नंबर वनचे शहर बनविण्यासाठी भाजपने अश्‍या काही उमेदवारांना नगरसेवक बनविण्याचा निश्‍चय केला असावा….असा उपहास आता ऐकायला मिळतो.
काँग्रेसने देखील  आपला जाहिरनामा ६ जानेवरी रोजी प्रसिद्ध केला असून २४ बाय ७ पाणीपुरवठा,महिन्याला ३० हजार लिटर पाणी मोफत,५०० चौ.फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी,महिला,विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक,स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिकांसाठी मोफत शहर बससेवांसह अनेक जनहितकारी योजना जाहीर केल्या आहेत.२०१७ च्या निवडणूकीत राष्ट्रीय पक्ष असलेल्या व अनेक दशके मनपात सत्ता असणा-या काँग्रेसचे फक्त २९ नगरसेवक निवडून आले होते.मात्र,प्रभाग क्र.१२ मधील काँग्रेसच्या नगरसेविका दर्शनी धवड यांनी नुकतेच गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतले व भाजपने त्यांना प्रभाग क्र.१२(अ)मधून उमेदवारी देखील दिली.याशिवाय काँग्रेसचे शहराध्यक्ष व पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्या कट्टर समर्थक समजल्या जाणा-या गार्गी चोपडा व मनोज साबळे(प्रभाग क्र.१७(ड) यांनी देखील काँग्रेसला ‘हात‘दाखवित कमळ हाती घेतले आहे.सत्ता आणि निवडणूकीतील विजय दृष्टिपथात आल्याने आता अनेकांने पक्ष शिस्तीचे व ‘विचारधारेचे’ मुखवटे उघडपणे उतरवून, फेकून देत असल्याचे मायबाप जनता उघड्या डोळ्याने बघत आहे.
महत्वाचे म्हणजे प्रभाग क्र.१२ मधून काँग्रेसने भूमाफिया हरिश ग्वालबंशी यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन पक्षाला ’उपकृत’केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.नुकतेच नगर परिषदेच्या निवडणूकीत भाजपचे कार्यकर्ते आरिफ लतीफ शेख(रा.कळमेश्‍वर)यांचे अपहरण करुन त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती.या गुन्ह्यात पोलिस अधीक्षक हर्ष पाेद्दार यांनी भूमाफिया व कुख्यात गुंड हरिश ग्वालबंशी(वय वर्ष ५०,रा.मकरधोकडा)व त्याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत(मकोका)कारवाई केली आहे.ग्वालबंशी व त्याच्या टोळीविरोधात गिट्टीखदान,कळमेश्‍वर,सीताबर्डी व सदर पोलिस ठाण्यात खुनाचे,अपहरण,शस्त्र बाळगण्यासह ११ गुन्हे दाखल आहेत.काँग्रेसने त्याच्या पत्नीला उमेदवारी दिली असून त्या नगरसेविका झाल्यास प्रभागातील प्रश्‍ने सोडविणार असल्याची ग्वाही जणू मतदारांना मिळाली आहे….!
थोडक्यात,लोकशाहीच्या या लज्जाहरणावरच विंदांनी अजरामर अशी ही कविता रचली असावी,याची प्रतिची लाभते,त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द जणू हाच भास आजच्याही मतदारांना करुन देत आहे..पुढील अनेक शतके करुन देत राहील….सब घोडे बारा टक्के….!
सब घोडे बारा टक्के
जितकी डोकी तितकी मते
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट;
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!
गोड गोड जुन्या थापा
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार?
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!
जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!
सब घोडे! चंदी कमी;
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी;
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के;
सब घोडे बारा टक्के!
…………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या