

सुनील केदारांचा भाजपवर घणाघात
रश्मी बर्वे यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल
नागपूर,ता.२७ मार्च २०२४ : मागील साढे चार वर्षांपासून रश्मी बर्वे या जिल्हा परिषद सदस्य व गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या मात्र,इतकी वर्ष त्यांना बर्वे यांची जात आठवली नाही,आता रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर होताच, त्यांना जात प्रमाणपत्रावरुन नोटीसा पाठविल्या जात आहे,सत्तेची आग इतकी आहे तर या ना पुढे,कशाला वृत्तपत्रांचा आधार घेऊन लढता,असे खुले आव्हान काँग्रेसचे माजी मंत्री व सावनेरचे आमदार सुनील केदार यांनी केले.आज रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांना सादर केला.यानंतर महाविकासआघाडीची सभा सेंट उर्सूला शाळेसमोर भरली,त्या सभेत केदार यांनी वरील आव्हान केले.
बर्वे यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नोटीस बजावली आहे.यावरुन केदार यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.अनेक विषय आहे बोलण्यासारखे मात्र २७ तारेखनंतर म्हणजे आजपासून गावोगावी,गल्लोगल्ली एकच चर्चा होणार ती म्हणजे रामटेक लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार यांच्या विजयासाठीची.ही विचारधारेची लढाई असून,लोकशाही जिवंत ठेवायची की नाही,संविधानाचे रक्षण होणार की नाही,रामटेकचे मतदार आपले कर्तव्य पार पाडणार आहेत की नाही,यावरच ही चर्चा राहणार असल्याचे केदार यांनी सांगितले.
सत्ताधारी सत्तेचा अमरपट्टा घेऊन नाही आले.ब्रिटीशांच्या तोफा व बंदूकींनाही सामान्य भारतीय माणूस हा घाबरला नाही,ब्रिटीशांनाच देश सोडून जावे लागले.त्यामुळेच रामटेक जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने देशात पुन्हा गुलामी पाहिजे की स्वातंत्र्याचे वारे,याचा प्रचार करावा,असे आवाहान त्यांनी केले.
मी नेहमीच शासकीय अधिका-यांना सांगतो,गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडा.आज पत्रकार ही मनात असलं तरी सत्य लिहू शकत नाही,ज्या मायबापाने उपाशी राहून पुस्तके पुरवून अधिकारी बनवले त्याची जाणीव न ठेवता अधिकारी वर्ग हा अक्षरश: गुलाम झाला असल्याची टिका केदार यांनी केली.माझ्यावर आघात केला,वेळ प्रसंगी अजूनही आघात करतील पण,मी शेतक-यांच्या कुटूंबातील असून काेणालाही घाबरत नसल्याचा दम केदारांनी दिला.
ज्वारी पेरली तर गहूं उगवत नसतात.‘जिस दिन मेरी चक्की चलेगी ना उस दिन सब पिस जायेंगे‘असा सूचक इशारा त्यांनी दिला.मी अडीच वर्ष मंत्री होतो मात्र सत्तेचा माज दाखवला नाही. लोकशाहीत सत्ता ऐश्वर्य भोगण्यासाठी नाही,लोकांच्या कल्याणासाठी वापरायची असते.सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो.माझा स्वभाव सर्वांना माहिती आहे.‘मी तिखट जरुर आहे पण बेईमान नाही’असे सांगत बर्वे यांना उमेदवारी दिल्यानंतर रोज वृत्तपत्रात बातम्या येऊ लागल्या.सत्तेची आग इतकी की माध्यमांची आड घेतली जाते.अडीच वर्ष बर्वे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या त्यावेळी जात पडताळणी समितीने नोटीस का नाही पाठवली?
हिंदू धर्मात तर महिलांचा आदर राखला जातो.जननी समोर नतमस्तक झाले पाहिजे,ही हिंदू धर्माची शिकवण असताना तिच्यावर आघात करता?अधिकारी,कर्मचारी आणि पत्रकारांनी याचा विचार करावा,असे आवाहन करत,रश्मी बर्वे या जेव्हा अवघ्या नऊ वर्षांच्या होत्या त्या वेळी त्यांचे पितृछत्र हरवलं,त्या शेतमजुराची मुलगी असून अत्यंत गरीब घरातील होत्या.वडील नसेल्या मुलीने आपले जीवन कसे व्यतीत केले असेल?जीवन कसं काढलं असेल?त्यांच्या घरावरील कवलारु देखील फूटलेले होते.सणासुदीला कधी नवीन कपडे मिळाले नाही,सणासुदीला गोडधोड कधी त्यांच्या घरी शिजत नसे मात्र,कर्तृत्वाने मोठे असणा-यांची वाट कोणीही अडवू शकत नाही.दम है तो सामने आके लढो,मर्द म्हणता ना स्वत:ला मग दोन-दोन हात आमोरा सामोरे करा,असे आव्हान सुनील केदार यांनी केले.
रामटेक मधून ‘भगोडा‘उमेदवार उभा केला,ते ही स्वत:च्या पक्षाचे चिन्ह न ठेवता.अश्या उमेदवाराविरुद्ध गरीबीत जिवन जगलेल्या पण कर्तृत्वाने मोठे असणा-या मातृशक्तीला साथ देणार की नाही?असा सवाल करुन समर्थकांचे समर्थन मागितले.
भाजपसारखा हरामखोर पक्ष कधीही शेतक-यांची दैना जाणून घेत नाही,असा आरोप करीत,शेतक-यांचा कापूस काळवंडला,वीजेच्या दराने कंबरडे मोडले,त्यांचेच सरपंच पिण्याच्या पाण्याची बिले तरी भरु शकतात का?औषधासारख्या गरजेच्या वस्तूवर जीएसटी लावला.राज्यात दोन वर्षांपासून सरकार चालवत आहेत नागपूर जिल्ह्याचा एक तरी प्रश्न त्यांनी सोडवला का?नागपूर जिल्ह्यात किती कारखाने आलेत?शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या का?नुकतीच एक तांदळाच्या व्यापा-याने देखील आत्महत्या केली.
सुरेश भट सभागृहात गरीब,कष्टकरी,कामगार महिलांना मोफत किट वाटपाचे आमिष देऊन गोळा केले,चेंगराचेंगरीत एका महिलेचा दूर्देवी मृत्यू झाला तर ५० च्या वर महिला या जखमी झाल्या.किती मोठमोठी फलके सभागृहास्थळी भाजपची लागली होती,या घटनेनंतर तातडीने जाहीरातबाजीचे सगळे फलक काढले,वरुन हा कार्यक्रम आमचा नसून कामगार कल्याण विभागाची योजना होती,अशी मखलाशी केली.सत्तेचा माज इतका की त्या महिलेचे शवविच्छेदन अहवाल हा हार्टअटैकने मृत्यू झाला,असा आला!ज्याने शवविच्छेदन केले त्याला रात्रीच्या रात्री बडतर्फ केले,वृत्तपत्रे हे सत्य छापत नाही कारण त्यांना कोट्यावधींच्या जाहीराती मिळतात,लक्षात ठेवा ऋतू बदलतो तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही,असा गर्भित इशारा याप्रसंगी सुनील केदार यांनी दिला.
ईव्हीएमची चिंता करु नका,सावनेर जिल्हा हा केदार यांचा आहे हे विसरु नका.पूर्ण भारतात हा संदेश गेला पाहिजे रामटेकमधून काँग्रेसच्या उमेदवार सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाला आहे,याचा निर्धार करा.मी कुणाला घाबरत नाही,तुम्ही पण कोणालाही घाबरु नका.पुढच्या वेळी सुनील केदारांवर वार कराल तर सरळ फाशी द्या कारण तुरुंगातून बाहेर आलो तर सोडणार नाही,असा इशारा केदार यांनी दिला.
मी सामान्य माणसाची लढाई लढणार,अन्याय विरोधात लढणार आहे.ब्रिटीशांच्या गोळीची चिंता आपण कधी केली नाही,तुम्ही त्या शूरवीरांचीच लेकरे आहात.त्यामुळेच आजपासून निर्धार करतोय ‘ना खूद सोऊंगा ना सोने दूंगा’आपल्याला या लढतीसाठी रात्र जागायची आहे.वचन द्या माणुसकी सोडून वागणार नाही,बेईमानी करणार नाही,कोणी केली तर सोडणार नाही,असे अभिवचन केदार यांनी यावेळी समर्थकांकडून घेतले.
यावेळी रश्मी बर्वे यांनी ही निवडणूक ग्रामिण भागातील गरीबांसाठी लढत असल्याचे सांगितले.ही उमेदवारी रश्मी बर्वे हिची नसून सामान्य माणसांची आहे,महिला-भगिनींची आहे,अन्यायाने गांजलेल्या शेतक-यांची आहे,सुशिक्षीत असूनही बेरोजगारीमध्ये आयुष्य कंठत असणा-या बेरोजगारांची ही उमेदवारी असल्याचे त्यांनी सांगितले.माझी ताकत तुमचा हात आहे असे सांगून,तुमच्या विश्वासाचा हात माझ्या डोक्यावर असू द्या,असे आवाहन त्यांनी केले.
मी २०२० मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढले,जि.प.ची सदस्य झाले.केदारांनी मला अध्यक्ष करुन धूरा सोपवली.माझ्यासारख्या महिलेला माझा अधिकार कळला,स्वातंत्र्य समजले.आज आघाडीच्या सर्व नेत्यांनी देखील माझ्या डोक्यावर आर्शिवादाचे छत्र धरले आहे.दूनियाची कोणतीही ताकत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करु शकत नाही.सूर्य जसा तापतो त्याची आग आजूबाजूच्यांमध्येही धग उत्पन्न करते.आपल्या कार्यकर्त्यांमध्येही अशीच धग पेटलेली आहे.उन्हाचे चटके अनुभवा तेव्हाच सावलीचा आनंदही लृटता येईल.आज माझ्या महिला भगिनी एवढ्या उन्हात माझ्यासाठी इथे आल्या.सकाळपासून उन्हातान्हात उपाशी,तहानलेल्या आहेत.गाड्या किती लागल्या,पैसे कोण देणार याचा विचार ही न करता स्वत:च्या हिंमतीवर इथे आल्या.माझ्यासाठी हा क्षण कधीही न विसरणारा आहे.
माझ्यावर कितीही आरोप करा,आम्ही ज्या नेत्याच्या तालमीत तयार झालो ते महत्वाचे आहे.केदारांना फार त्रास दिला जात आहे मात्र,आम्ही त्यांना शब्द दिला आम्ही वादग्रस्त विधान करणार नाही मात्र,ज्यांची मानसिक प्रतारणा विरोधक वारंवार करीत आहेत त्यांचे हात मजबुत करण्यासाठी आर्शिवाद द्या,अशी साद त्यांनी घातली.
याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व मा.आ.राजेंद्र मुळक,सुरेश भोयर,नाना गावंडे,प्रकाश जाधव आदी यांची देखील भाषणे झाली.
……………………………………..




आमचे चॅनल subscribe करा
