

रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये केला बाद
पत्रकार परिषदेत विरोधकांना दिला इशारा
१ एप्रिल रोजी उच्च न्यायालयात या प्रकरणावर होणार सुनावणी
नागपूर,ता.२८ मार्च २०२४: रामटेक लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी आज नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार व रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद करण्यात आला.काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्यासाठी रामटेकसाठी तिकीट खेचून आणली होती.काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बर्वे यांनी केदार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र,जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नोटीसनंतर तसेच न्यायालयाने यात तातडीने हस्तक्षेप न केल्याने अखेर त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना पेव फूटले.उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिंदे गटात प्रवेश करुन रामटेकमधून उमेदवारी अज भरला आहे.रश्मी बर्वे या पारवे यांना तगडी लढत देतील असा कयास लावला जात असताना बर्वे यांची उमेदवारीच रद्द होणे यामागे सत्ताधा-यांवर कटकारस्थानाचा आरोप लावल्या जात आहे.
स्वत:रश्मी बर्वे यांनी त्यांच्या वकीलासह पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी हे एका गरीब शेतकरी कुटूंबातील अनुसूचित जमातीतील महिलेला घाबरले व कटकारस्थातून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला असा आरोप करीत, हा फक्त माझा नव्हे तर संपूर्ण महिला वर्गाचा घोर अपमान असल्याची टिका त्यांनी केली.मी अबला नसून सबला आहे असे सांगत दूर्गेचा अवतार घेऊन राजकारणातील महिषासूर राक्षसांचा नाश करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
या सत्तेत हूकमशाहीची राजवट सुरु असून सत्ताधा-यांनी माज आणला असल्याची टिका त्यांनी केली.मी माझ्या वकीलाशी सल्ला मसलत करण्याची संधी न देता सकाळी ११ वाजता माझ्या हातात पत्र येते की माझे जात प्रमाणपत्र हे अवैध असल्याने माझा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे असे मला कळविण्यात येते.एकीकडे ते ’बेटी बआचो बेटी पढाओ’चा नारा देतात दूसरीकडे एका गरीब शेतकरी कुटूंबातील महिलेची लोकसभेत जाण्याची वाट कटकारस्थान करुन अडवतात.पण मी घाबरणारी नाही कारण जनतेचा विश्वास माझ्यावर आहे आणि या जनतेच्या विश्वासासाठी रश्मी बर्वे खंबीरपणे उभी आहे,असे त्यांनी ठणकावले.
या सरकारचे दिवस भरत आले आहे.आज त्यांना विरोधक संपवायचे आहे.जो जो त्यांच्या विरोधात उभा राहतो त्यांना ते असेच कटकारस्थातून संपवतात,असा आरोप त्यांनी केला.पण मी घाबरणारी नाही,ते जितकं मला अडवतील तितकं मी ताकदीने उभी राहील.माझ्या मागे माजी मंत्री सुनील केदार,मा.आ.राजेंद्र मुळक यांच्यासह संपूर्ण काँग्रेसचे नेते,जिल्हा परिषदेतील सदस्य व पदाधिकारी तसेच ग्रामीण भागातील समर्थक ताकदीने उभे असल्याचे त्या म्हणाल्या.
सकाळी ११ वा.अवघ्या एका तासात मला माझी कोणतीही बाजू न मांडता पत्र दिल्या जातं,या अन्यायाविरोधात आम्ही उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात दाद मागू,तिथे तर दाद मिळाली नाही तर हा फक्त गरीब शेतकरी कुटूंबातील महिलेचा अपमान होणार नाही तर संपूर्ण गोर गरीब जनतेचा विश्वास न्यायदानाच्या प्रणालीवरील उडून जाईल.
माझ्या उमेदवारी अर्जावर तर विरोधकांनी आक्षेप घेतला पण माझ्या पतीच्या श्यामकुमार बर्वे यांच्या ही उमेदवारी अर्जावर देखील त्यांनी आक्षेप घेतला,याचा अर्थ ते ‘पंजा’चिन्हाला किती घाबरतात अाहे हे लक्षात येतं.
विरोधकांना एवढाच माझ्यावर आक्षेप होता तर २०२० मध्ये मी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देऊनच जिल्हा परिषदेची निवडणूक लढले त्याच वेळी त्यांनी का आक्षेप घेतला नाही?अडीच वर्ष मी जि.प.अध्यक्ष हाेते त्यावेळी देखील माझ्या जातीच्या प्रमाणपत्राविषयी कोणालाही चौकशी करावीशी वाटली नाही मात्र,रामटेक मधून लोकसभेच्या निवडणूकीसाठी माझी उमेदवारी घोषित होताच जात प्रमाणपत्र वैधता समितीला हाताशी धरुन माझे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु झाला.मी चांभार समाजाची असून आज आमच्या समाजालाच मिटवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत असल्याचा आरोप याप्रसंगी रश्मी बर्वे यांनी केला.
जी रश्मी बर्वे विरोधकांना रणांगणात नको हवी होती,तीच रश्मी बर्वेच त्यांना रणांगणात दिसेल असा इशारा त्यांनी दिला.
याप्रसंगी बोलताना बर्वे यांचे वकील नारनवरे यांनीसांगितले की निवडणूक अधिका-यांनी फक्त एक तांत्रिक बाजू धरुन उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला.यावर आम्ही देखील आक्षेप नोंदवला.निवडणूक अधिकारी असणारे अपर जिल्हाधिकारी यांनी आमचे आक्षेप नोंदवून घेतले व आमचा निवडणूक अर्ज बाद केला,असे ॲड.नारनवरे यांनी सांगितले.
निवडणूक अधिकारी यांनी माझे पती श्यामकुमार बर्वे यांना काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले असल्याची माहिती यावेळी बर्वे यांनी दिली.विरोधक हे बर्वे यांची नेमकी जात कोणती सांगत आहेत?असा प्रश्न केला असता,हे विरोधकांनीच सांगावे मी कोणत्या जातीत जन्म घेतला आहे,मी कोणत्या समाजात लहानाची मोठी झाले,माझा समाज कुठला,असा प्रतिप्रश्न बर्वे यांनी केला.
ज्या जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांना चांभार अनुसूचित जाती,असे जात वैधता पत्र २०२० मध्ये प्रदान केले मात्र,साळवे नावाच्या व्यक्तीने त्यांची उमेदवारी लोकसभेसाठी जाहीर होताच समितीकडे तक्रार केली व बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राची पुर्नतपासणी करा.साळवे यांचा अर्ज समितीने फेटाळून लावला व जात प्रमाणपत्राची पुर्नतपासणी करण्याचा अधिकार समितीला नसल्याचे कारण सांगितले.बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रारदाराला काही आक्षेप असल्यास त्यांनी न्यायालयात दाद मागावी.मात्र,दूस-या तक्रारदाराने देखील याच समितीकडे पुन्हा तक्रार अर्ज केला तेव्हा या समितीने बर्वे यांना नोटीस जारी केली.मूळात एक वेळा जातीचे वैद्यता प्रमाणपत्र दिल्यानंतर समितीला नोटीस देखील देण्याचा अधिकार नियमानुसार नाही,असे ॲड.शैलेश नारनवरे यांनी सांगितले.
दूस-या तक्रारदाराचाही अर्ज समितीने फेटाळून लावायला हवा होता मात्र,त्यांच्यावर प्रचंड राजकीय दवाब असल्याने या दबावातून त्यांनी रश्मी बर्वे यांना नोटीस पाठवली.महत्वाचे म्हणजे राज्य माहिती आयोगाचे आयुक्तांनी या संदर्भातील संपूर्ण माहिती घेतली व एस.पी.ला निर्देश दिले की त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी.एस.पी.नागपूरने चौकशी करुन अहवाल राज्य माहिती आयुक्तांना सादर केला.आम्ही कलम १८ अन्वये राज्य माहिती आयुक्तांना अशी माहिती घेण्याचे कोणतेही अधिकार नाहीत,याला आम्ही न्यायालयात आव्हान केले आहे.याची दखल घेत न्यायालयाने आदेश दिले आहे, की या सर्वांचे आदेश हे चुकीचे असून यावर स्थगिती देण्यात येत आहे.
विशेष म्हणजे राज्य माहिती आयुक्तांनी आपले सगळे आदेश मागे घेण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने एस.पी.नागपूरचे आदेश देखील मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.असे असताना देखील दक्षता पथकाने रश्मी बर्वे यांना आज सकाळी पावणे दहा वाजता आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले ते ही एस.पी.नागपूरच्या अहवालावर जे न्यायालयाने आधीच रद्द केला आहे,याचा अर्थ दक्षता पथकाने न्यायालयाचा देखील अवमान केला आहे.माझ्या संपूर्ण कारकीर्दीत ही पहीली अशी केस आहे ज्यात मी इतक्या नियमांचे उल्लंघन ते ही सरकारी यंत्रणेकडूनच झालेले बघत आहे,असे आश्चर्य ॲड.नारनवरे यांनी व्यक्त केला.
रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याचा ऑर्डर हा जणू तयारच होता,असा आरोप ॲड.नारनवरे यांनी केला.कोणतीही सुनावणीची संधी नाही,कोणाचंही काही ऐकून घेतलं नाही.मी सकाळीच न्यायालयात जाऊन दाद मागितली की जात वैद्यता पडताळणी समितीला ‘पॉवर ऑफ रिव्यू‘नाही,जी दूसरी तक्रार त्यांनी स्वीकारी ती अवैध होती.यावर न्यायालयाने सोमवारी सुनावणी ठेवली.तेव्हा राजकीय दबावातून बर्वे यांचा उमेदवारी अर्जच बाद करण्यात येण्याची शक्यता मी वर्तवली असता,न्यायालयाने सांगितले,आम्ही याची काळजी घेऊ.
उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्याचे निवडणूक अधिका-याचे पत्र आम्हाला आज दूपारी बावणे बारा वाजता मिळाले आणि मी दीड वाजता पुन्हा न्यायालयाला याविषयी कळवले की,जी भीती सकाळी व्यक्त केली होती ती खरी ठरली,निवडणूक अधिका-यांनी जणू ऑडर तयारच करुन ठेवला होता.यावर न्यायालयाने सोमवारीच १ एप्रिल रोजी सुनावणी घेऊ,असे सांगितले.आम्ही सकाळीच जी भीती न्यायदेवतेसमोर व्यक्त केली होती आणि प्रत्यक्षात ही तेच घडले,सकाळीच कोर्टाने आमच्या याचिकेची सुनावणी घेऊन निवडणूक अधिका-यांना या प्रकरणी कोणातही निर्णय घेण्यास स्थगिती दिली असती तर,रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज आज बाद झाला नसता,असे सांगून आता सोमवारी कोर्ट यावर सुनावणी घेणार आहे व कोर्टानेच शब्द दिला आहे,‘आम्ही याची काळजी घेऊ’त्यामुळे आता आम्हाला कोर्टाकडूनच न्यायाची अपेक्षा आहे,असे ॲड.नारनवरे यांनी सांगितले.
२००० सालीचा जात प्रमाणपत्राचा जो कायदा आहे त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्राला रिव्ह्यू करण्याचा अधिकार समितीला बहाल करण्यात आले नाही,यावर फक्त न्यायालयच हस्तक्षेप करु शकतात.जात वैद्यता प्रमाणपत्र देणा-या अधिका-यांनीच राजकीय दबावातून कायद्याचा दूरुपयोग केला असल्याचा आरोप याप्रसंगी ॲड.नारनवरे यांनी केला.कोणाच्या दबावाखाली,हे मी सांगणार नसल्याचे ते म्हणाले.पुर्नविचाराचे अधिकार नसताना समितीने हे पाऊल उचललेच कसे?असा प्रश्न त्यांनी केला.
याशिवाय ज्या दोन्ही तक्रारकर्त्यांनी जात वैद्यता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली ते दोघेही रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्रामुळे ‘बाधित‘(अफेक्टेड)नाही.एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत जे बाधित नाहीत त्यांना अश्याप्रकारे अपील करता येणार नाही.देशाच्या इतिहासात ही पहीली घटना अशी आहे की फक्त एका दिवसात समितीद्वारे विचारणा झाली आणि दूसरी बाजू ऐकून न घेता निर्णय ही देऊन टाकण्यात आला !यात बर्वे यांच्या मौलिक अधिकाराचे हनन झाले असल्याचे ते म्हणाले.
समिती ही नियमाप्रमाणे अहावालासाठी पोलिसांचे सहाय्य घेऊ शकते मात्र ते ही कार्यालयीन वेळेत न घेता,एस.पी.नागपूरचा अहवाल रात्रीच्या दीड-दोन वाजेपर्यंत तयार होत होता,असा आरोप ॲड.नारनवरे यांनी केला.रश्मी बर्वे यांच्या अनेक नातेवाईकांकडे रात्री बेरात्री गेले आणि सकाळी एस.पी.ने आपला अहवाल समितीकडे सोपवला.
ते म्हणतात,यांचे प्रमाणपत्र खोटे आहेत.मात्र,बर्वे यांच्या वडीलांच्या शाळा सोडण्याच्या दाखल्यात जात चांभार,अनुसूचित जाती लिहले आहे.बर्वे यांच्या अनेक नातेवाईकांच्या जात प्रमाणपत्रावर तीच जात लिहली आहे.समितीकडे असा कोणताही पुरावा नाही ज्यात बर्वे यांच्या कागदोपत्री जातीला समिती खोटे ठरवू शकते.रश्मी बर्वे यांचा जन्म जरी पांढूरणामध्ये झाला आहे व जो आता मध्यप्रदेशचा भाग अाहे,तरी देखील पूर्वी नागपूर हा सी.पी.ॲण्ड बेरारची राजधानी होती.सर्वोच्च न्यायालयाने २००४ मधील आपल्या एका निवाड्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे की हा स्थलांतरणाचा प्रश्न नाही तर बायफरफिकेशनचा मुद्दा आहे.अश्या मुद्दांमध्ये महाराष्ट्रातील जात लागू होईल,मध्यप्रदेशमधील नाही.त्यामुळे रश्मी बर्वे या अनुसूचित जातीच्या नसून ओबीसी आहेत,हा मुद्दा समितीचा गैरलागू होतो,असा खुलासा ॲड.नारनवरे यांनी केला.
२०११ साली स्वत:नागपूर उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या संदर्भात अशाच स्वरुपाचा वादावर मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्यांना महाराष्ट्र राज्याचे जाती विषयचे कायदे लागू होतील,असे निर्देश दिले आहे.जरी रश्मी बर्वे यांच्या वडीलांचा जन्म पांढूरर्णा येथे झाला असला तरी रश्मी बर्वे यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे.त्यांना याच राज्यातील जात विषयक कायदे लागू असतील,असे ॲड.नारनवरे यांनी सांगितले.
असे अनेक निर्णय विविध न्यायालयांनी देखील पारित केले आहे.उत्तर प्रदेश आणि बिहारमधून फूटून जे नव्याने राज्य निर्मित झाली त्या राज्यातील नागरिकांना देखील न्यायालयांनी याच धर्तीवर जातीचे प्रमाणपत्र मान्य केले आहेत.रश्मी बर्वे या अनुसूचित जातीच्याच असून त्यांनी कोणत्याही प्रकारे जातीचे खोटे दाखले प्राप्त केले नाहीत.त्यामुळे रामटेक लाेकसभेच्या उमेदवारीच्या बाबतीत त्यांना न्यायालयाकडूनच दिलासा मिळणार आहे,संविधानाच्या कलम ३४१ नुसार त्यांना अनुसूचित जातीसाठी आरक्षीत जागेवरुन निवडणूक लढण्याचा अधिकार आहे.रश्मी बर्वे यांच्या विरोधात संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन झाले आहे,त्यांना राजकीय षडयंत्राचे बळी करण्यात आले आहे,या विरोधात आम्ही उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे,लवकरात लवकर विजय आमचाच होईल,असे आश्वासनही याप्रसंगी ॲड.नारनवरे यांनी दिले.
…………………………………………..




आमचे चॅनल subscribe करा
