

मालवीय नगर येथे ३१ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान भव्य आयोजन
२९ मार्च २०२२: अनंत कोटी ब्रह्मांड नायक दत्त अवधूत आणि असंख्य भक्तांचे आराध्य दैवत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा कृपा प्रसाद म्हणजेच मालवीय नगर, नागपूर येथील श्री स्वामी मठ होय.
महाराजांच्या कृपेने आणि अनेक भक्तांच्या सहकार्याने २१ मार्च २००७ रोजी मठाची स्थापना आणि प्राण प्रतिष्ठा श्री स्वामी महाराजांच्या प्रकट दिनी करण्यात आली.
गर्भ गृहात श्री क्षेत्र अक्कलकोट धर्तीवर आत्म लिंग वर श्री स्वामी समर्थांचा मुखवटा स्थापन करण्यात आला, ध्यान गृहात श्री स्वामींची पहुडलेली मूर्ती आहे आणि २ गुरुपौर्णिमा चे दिवशी श्री स्वामींच्या देवी रूपाची स्थापना मठात झाली. अतिशय मनोहर. चैतन्यदायी आणि भरजरी वस्त्र अलंकारांनी सुशोभित असलेले हे श्री स्वामीचे आईरूप आपल्याला जगण्याचे वेगळेच बळ देऊन जाते.अनेक सुप्रसिद्ध कलाकार कायमच येथे आपली सेवा श्री स्वामी चरणी रुजू करतात तर अनेक मान्यवरांनी आणि सिद्धांनी मठाला भेट देऊन श्री स्वामी दर्शनाचा लाभ घेतला आहे.
श्री स्वामीना रोज सकाळी रुद्र अभिषेक केला जातो त्यानंतर दुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती व नैवेद्य होतो आणि रात्रीची आरती ८.३० वाजता असा नित्यक्रम असतो. तसेच दर गुरुवारी संध्याकाळी ७.०० वाजता उपासना आणि प्रसाद वितरण चा कार्यक्रम असतो.
मठा मध्ये श्री स्वामी प्रकट दिन निजानंदमग्नदिन, गुरुपौर्णिमा, श्रावण मास नित्य लघुरुद्र, नामजप यज्ञ हे उत्सव नियमित पणे साजरे होतात.श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन उत्सव व श्री स्वामी मठाचा वर्धापन दिन मालवीय नगर येथे ३१ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्रींचा नामजप संकल्प सोहळा देखील होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाला गुरुवार, ३१ मार्च रोजी सकाळी ७ वाजता मंगलकलश स्थापना, श्री स्वामींना रुद्राभिषेक, आरतीने प्रारंभ होणार आहे. शुक्रवार, १ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत नामजप केला जाईल. सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध संतुर वादक वाल्मिक धांडे यांचे संतुर वादन होणार असून त्यांना तबल्यावर राम खडसे संगत करतील.
गुढीपाडव्याला शनिवार, २ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्रीस्वामी मठाच्या सेवेकरी महिलांचे भजन होणार आहे तर रविवार, ३ एप्रिल रोजी प्रकट दिन व नामजप संकल्प सोहळा होईल. यात यजमान निलेश व प्रेरणा महाजन यांच्या हस्ते महापूजा केली जाणार आहे.
त्यानंतर विवेक अलोणी, वैष्णवी जोशी, श्रीकांत पिसे, श्याम देशपांडे, आशीष घाटे, श्रीकांत खोलकुटे, अतुल देशपांडे, राजू केळापुरे आपली कलासेवा स्वामीचरणी अर्पण करतील. दुपारी १२ वाजता श्री दत्तमाला मंत्र, अष्टोत्तरशत नामावली व श्रीस्वामींचे नामसंकीर्तन झाल्यानंतर आरती व महाप्रसादा ने उत्सवाची सांगता होणार आहे. सर्व स्वामी भक्तांनी सहकुटुंब सहपरीवार उपस्थित राहून सर्वतोपरी योगदान द्यावे व श्रीं च्या सेवेचा लाभ घ्यावा. ज्यांना नामजपात सहभागी व्हायचे आहे त्यांनी ३१ मार्चपर्यंत नावे नोंदवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
