फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशोध व्हायरल ऑडियोचा!

शोध व्हायरल ऑडियोचा!

Advertisements

मनपाचे अधिकारी येणार गोत्यात:भ्रष्टाचाराचा पुरावा समितीला गवसला

पोलिस आयुक्तांना सुपुर्द:पोलिस आयुक्तांची पुष्टि

बिलांवर स्वाक्षरी करणा-या अति.आयुक्तांवर कोणाची मेहरनजर?

नागपूर,ता. १९ फेब्रुवारी २०२२: मनपाच्या बहूचर्चित स्टेशनरी घोटाळ्यात आणखी एक ‘ट्वीस्ट’ आले असून या घोटाळ्याची चौकशी करणा-या समितीच्या हाती एक ऑडियो क्लिप आली असून ती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सोपवली असल्याची माहिती पुढे आली आहे.स्वत:अमितेश कुमार यांनी अाज पोलिस जिमखाना येथे पार पडलेल्या पत्र परिषदेत अशी ऑडियो क्लिप त्यांच्याकडे आली असल्याचे सांगत त्या कॅफोचे संभाषण असल्याची पुष्टि केली.सुत्राने दिलेल्या माहितीनुसार या ऑडियो क्लिपमध्ये तत्कालीन कॅफो विजय कोल्हे,मनपातील वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय चिलकर व सध्या तुरुंगाची हवा खात असलेले भांडार प्रमुख प्रशांत भातकुलकर यांच्यातील संभाषण त्यात कैद्य झाले असल्याची माहिती असून सध्या या ऑडीयो क्लिपची जोरदार शोध मोहीम मनपात  सुरु असल्याची चर्चा आहे.

मनपातील ६७ लाखांचा स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती हनुमंतांच्या शेपटीप्रमाणे ‘वाढता वाढता वाढे’प्रमाणे ५ कोटींच्या जवळ गेली असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे मात्र हा घोटाळा जवळपास १० ते १२ कोटींच्या घरात असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणने आहे.आरोग्य विभागासह शिक्षण,ग्रंथालय,जन्म मृत्यु विभागात देखील भ्रष्ट कारभाराचे लोण ऐन करोनाच्या काळात पोहोचले होते.एकीकडे नागपूरकर जनता करोनाच्या प्रकोपामुळे तडफडत भर रस्त्यावर प्राण सोडत होती त्याचवेळी जनतेसाठी व जनतेच्या नावावर, कारभार हाकणा-या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनातील काही झारीतल्या शुक्राचार्य असणा-या अधिका-यांनी केंद्र व राज्य सरकारकडून, जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आलेल्या कोट्यावधीच्या रकमेवर डल्ला मारत होती,याचमुळे नागपूरकर जनतेचा महापालिकेवर तीव्र रोष आहे.६७ लाखांची रक्कम कंत्राटदार साकाेरे आणि त्याच्याच मुले व नातेवाईकांच्या नावाने असणा-या विविध फर्मन्सी खोटी बिले सादर करुन लाटली.ही बिले मनपाच्या विविध विभागात स्टेशनरी साहित्या पुरवठाच्या बाबतीत तयार झाली होती मात्र कोणत्याही साहित्याच्या पुरवठा न करताच पाऊण कोटींची बिले परस्पर संमत करुन कंत्राटदार व मनपाच्या काही पदाधिका-यांनी लाटून घेतली होती.

मात्र हे बिंग वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय चिलकर यांच्या तक्रारीनंतर फूटले,‘मी त्या गावचाच नाही’या अभिनिवेशात चिलकर यांनी आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे सदर पोलिस ठाण्यात या घोटाळ्याविषयी तक्रार देखील नोंदवली होती मात्र आज पोलिस आयुक्तांनी केलेल्या खुलासाप्रमाणे तक्रारदातेच आता आरोपी म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे,आर्थिक गुन्हे शाखेची चमू या सर्व प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.मनपा घोटाळ्याचा फियार्दीच आता संशयाच्या भोव-यात अडकले आहेत.

हा घोटाळा उघडकीस येताच आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापित करण्यात आली.येत्या ५ मार्च रोजी मनपाची मुदत संपत असल्याने त्यापूर्वीच या समितीने तातडीने चौकशी पूर्ण करुन आपला प्राथमिक अहवाल महापौरांना साेपवला आहे.या अहवालात मनपातील अनेक अधिका-यांच्या कारभाराबाबत धक्कादायक खुलासे असल्याची चर्चा आहे.विशेष म्हणजे हा घोटाळा उघडकीस आल्यावर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी त्यांच्यास्तरावर अति.आयुक्त दिपककुमार मीणा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती ज्यात ज्यांच्यावर संशयाची सुई वळली होती अश्‍या अति.आयुक्त राम जोशी,वैद्यकीय अधिकारी डॉ.चिलकर,सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त महेश धामेचा आदींचा समावेश करण्यात आला होता.याचा अर्थ ‘चोरांनीच’शोधून काढावे ‘चोर कोण आहेत’असा तो प्रकार होता.

सभागृहाने मात्र आयुक्तांची चौकशी समिती निरस्त करुन सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय चौकशी समिती गठीत केली.या समितीने आपला अहवाल महापौरांना सोपवताच डॉ.चिलकर यांची बदली तडकाफडकी महापालिकेतून आरोग्य उपसंचालक कार्यालयात त्यांच्या मूळ कार्यालयात करण्यात आली हे विशेष!या अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा असून सर्व बिलांवर अति.आयुक्त राम जोशी यांच्याच स्वाक्ष-या आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्याच नाकाखाली राजरोसपणे चालणा-या घोटाळ्याची काहीच माहिती नव्हती,यावर कोणीही विश्‍वास ठेवायला तयार नाही,महत्वाचे म्हणजे कोविडची संभाव्य तिसरी लाट बघता गेल्या अनेक वर्षांनंतर राम जोशी यांची चंद्रपुरात झालेली बदली देखील आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी शासनाकडून रद्द करुन घेतली.कोविडची तिसरी लाट आल्यास राम जोशी यांच्या अनुभवाचा फायदा प्रशासनाला होण्यासाठी त्यांची बदली रद्द करण्यात यावी,अशी सबब पुढे करण्यात आली होती मात्र राम जोशी यांच्या अनुभवाचा नेमका फायदा महापालिकेत नेमक्या कोणत्या बाबीसाठी झाला हे आता लवकरच होणा-या मनपाच्या सर्वसाधारण सभागृहात उघडकीस येणार आहे.

तूर्त डॉ.चिलकर,प्रशांत भातकूलकर व वित्त व लेखा अधिकारी विजय कोल्हे यांच्यातील कोटीच्या कोटी उड्डाणे घेणा-या संभाषणाच्या ऑडियोक्लिपचाच शोध मनपात घेतला जात आहे हे विशेष!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या