Advertisements

‘झुंड’चित्रपटातील होतकरु पात्र बाबु छेत्रीची निर्घुण हत्या
सुप्रसिद्ध फुटबॉलपटू प्रा.विजय बारसे यांची खंत
नागपूर,ता. ८ ऑक्टोबर २०२५: एखाद्याची एक्झीट ही मनाला चटका लाऊन जाणारी असते,त्यात ही तो ’नाही बा’च्या श्रेणीतील असेल तर ही खंत थोडी आणखी खोलवरची असते.गाजलेल्या ‘झुंड‘चित्रपटातील एक होतकरु पात्र असलेल्या बाबु छेत्रीची(वय वर्ष २१) काल मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास आपापसातील वादातून निर्घुण हत्या झाली,हे वृत्त कळल्यानंतर ज्यांच्या जीवनावर हा चित्रपट साकारण्यात आला हाेता,ते सुप्रसिद्ध फुटबॉलपटू प्रा.विजय बारसे यांनी छेत्री पुन्हा त्याच गुन्हेगारीच्या वळणावर लागल्याने त्याचा हाच शेवट होणार होता…अशी खंत खास ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केली.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रा.बारसे यांच्या जिवनातून प्रेरित होऊन ‘झुंड‘चित्रपटाची निर्मिती केली होती.या चित्रपटात शतकाचा महानायक अमिताभ बच्चन यांनी फूटबॉल प्रशिक्षकांची मुख्य भूमिका साकारली. नागपूरातील गिट्टी खदान वस्तीतील गुन्हेगार प्रवृत्तीच्या तरुणांना खेळाकडे वळवण्याचा व सभ्य समाजाचा एक भाग होण्याचा संघर्ष यात साकारण्यात आला होेता.या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या अंकुश गेडाम या तरुणासोबत सतत त्याच्या पाठीशी राहणा-या मित्राची भूमिका प्रियांश क्षत्रिय उर्फ बाबू छेत्री याने साकारली होती.संपूर्ण चित्रपटात त्याचा ही अभिनय हा अगदी सहज व तितकाच लक्षवेधी ठरला होता.
बाबु हा पोलिस रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार होता.त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद होती.मंगळवारी रात्री मद्य प्राशन करुन तो घरात झोपला असताना त्याचा मित्र ध्रुप साहूने (वय वर्ष २१)त्याला जबरदस्ती घरातून उठवून नेले.दोघेही रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास प्लॉट क्र.४४,आेमसाई नगर २, येथील एका निर्माणाधीन इमारतीत गेले.या ठिकाणी त्यांनी दारु,गांजा व व्हाईटनरची नशा केली.नशेतच दोघांमध्ये भांडण झाले.भांडणात बाबूने चाकू काढला व साहूवर वार केला.साहूने तो वार चुकवला व चाकु हिसकावून छत्रीवर वार केले.त्याने जिवाच्या भितीने छत्री याचा गळाच चिरला.यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत दगडाने देखील त्याचावर वार केला.तो उठून मारायला येऊ नये यासाठी बाबुला साहूने वायरने बांधून ठेवले व पसार झाला.
अवघ्या सहा तासात पोलिसांनी खब-याच्या माध्यमातून संशयित आरोपीला अटक केली.आरोपीवर भा.न्या.संहितेच्या कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.प्रियांशु उर्फ बाबु हा अट्टल गुन्हेगार असून कोळसाचोर म्हणून देखील त्याच्यावर गुन्हे दाखल होते.रेल्वेच्या वॅगनमधून कोळसा चोरी व मोबाईल चोरीसाठी अनेकदा त्याला अटक झाली आहे.महत्वाचे म्हणजे ‘झुंड‘चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अंकुश गेडाम याच्यासारखेच प्रियांशुला देखील चांगलीच प्रसिद्धी मिळाली मात्र,त्याने परत गुन्हेगारीचाच मार्ग पत्करला.
‘झुंड‘चित्रपटाचे चित्रिकरण संपल्यानंतर चित्रपट प्रदर्शित होण्या पूर्वीच मानकापुरातील पाच लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात त्याला अटक झाली होती.त्याचे वडील हातमजूर असून त्याला तीन मोठ्या बहीणी आहेत.बाबुच्या बहीणीच्या तक्रारीनंतर जरीपटका पोलिसांनी आरोपी शाहूच्या मुसक्या आवळल्या.
झोपडपट्ट्यांमधील तरुणाईला सभ्य समाजामध्ये आणून त्यांचे जीवनमान सुधारणे व त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मी आयुष्यभर झटलो मात्र,माझी पंचवीस वर्षांची साधना प्रियांशुसारख्या प्रवृत्तीने भंग केल्याची खंत विजय बारसे व्यक्त करतात.दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीच इतर सर्व कलाकारांसारखेच प्रियांशुची निवड चित्रपटासाठी केली होती.प्रियांशु हा चांगला फूटबॉल खेळत असे.प्रियांशु सोडला तर या चित्रपटातील इतर कलाकारांनी मागील जिवनात पुन्हा वळण्याचे धाडस केले नाही.मात्र,प्रियांशु हा पुन्हा मागच्याच वळणावर गेला,ज्याचा शेवट हाच होणार होता,मला अतीव दु:ख झाले असल्याचे विजय बारसे म्हणाले.
पुढील तपास जरीपटका पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण क्ष्रीरसागर करीत आहेत.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
…………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
