

नागपूर,दि.२५ फेब्रुवारी २०२४: महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेश्यक नेतृत्व असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत विखारी वक्तव्य करून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शेवटी भाषेची संपूर्ण मर्यादा ओलांडली, अशी टिका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा आणि परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राचे राजकारण दूषित करणारे हे वक्तव्य असल्याचे मेश्राम म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेल्या समृद्ध वरसा आज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांची जात काढून धुळीला मिळवली, महाराष्ट्राच्या गौरवास्पद शालीन परंपरेला कलुषित करण्याचे काम आज मनोज जरांगे पाटील यांनी केले असून महाराष्ट्राची सुजाण जनता हे कधीही खपवून घेणार नाही, असा घणाघात ॲड. मेश्राम यांनी केला. कोणी कोणत्या जातीत जन्माला यावे हे कोणाच्याही हातात नसंत तरी देखील फडणवीस यांची जात काढून व त्यांना अशलाघ्य शिवी देऊन स्वत: जरांगे पाटील यांनी तरी स्वत:च्या जातीचे काय चांगले केले?असा प्रश्न ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी उपस्थित केला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची हीच शिकवण आहे ‘जात ही कर्माने सिद्ध हाेत असते जन्माने नाही’जरांगे यांनी ही शिकवण अंगीकारली असती, तर कर्माने स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस यांची जात त्यांनी काढली नसती,असा संताप मेश्राम व्यक्त करतात.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, मराठा समाजाच्या उन्नतीसाठी, सक्षमीकरणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले कार्य एकदा जरांगे पाटलांनी अभ्यासण्याची गरज आहे. जातीचा उल्लेख करून आणि केवळ विखारी वक्तव्य करून प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी जरांगे पाटील यांची धडपड अवघ्या महाराष्ट्राला दिसून येत आहे. संपूर्ण मराठा समाजासह महाराष्ट्राच्या जनतेची देखील दिशाभूल करण्याचे काम मनोज जरांगे करीत आहेत. मात्र, ते हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून करत आहेत हे तपासण्याची वेळ आलेली आहे. मनोज जरांगेंचा बोलावता धनी ज्या दिवशी पुढे येईल त्या दिवशी त्यांचा देखील बुरखा ही महाराष्ट्राची जनता फाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिला.
मनसेचे राज ठाकरे यांनी देखील आपल्या अनेक सभांमध्ये महाराष्ट्रात जाती-पातीचे राजकारण कोणत्या पक्षाची स्थापना झाल्यावर सुरु झाले?हे उघडपणे सांगितले असल्याची आठवण मेश्राम यांनी करुन दिली.
………………………………




आमचे चॅनल subscribe करा
