(वेलेेंटाईन डे स्पेशन(भाग-६)
नागपूर,ता.१२ फेब्रुवरी २०२६: सत्तरच्या दशकातली ती अतिशय सुंदर,देखणी अभिनेत्री.जिच्या गालावरच्या खळीमध्ये आणि बोलक्या डोळ्याच्या गहराईमध्ये माहिती नाही किती तरुणांनी आपल्या मनाच्या भावना गोंजारल्या,समजावल्या.तिची उंची,देहयष्टी,कपाळ,सुंदर केस,तिचं हास्य सगळं काही जीवघेणंच होतं.पण…नियतीने तिच्या मनातला सुखाचा कोपरा मात्र ‘कोरडा’ ठेवला होता.प्रेमाचा ओलावा आणि सुखाची तृप्ती कधी तिथपर्यंत पोहोचलीच नाही,पोहोचला तो धोका,विश्वासघात आणि समुद्रा एवढे अश्रू.सत्तरच्या दशकातल्या या शोकांतिकेचे नाव आहे ‘रिना रॉय’.
रिनाची कहानीच संपूर्ण काटेरी वाटेची आहे.७० आणि ८० चा काळ हा बॉलिवडूचा आणि सिंगल थियेटरचा सुवर्णकाळ होता.या काळात अनेक नवीन चेहरे आणि प्रतिभावंत स्टार्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती.७० एम.एम.चा तो पडदा त्यांच्या दिलखेचक अभिनयाने व्यापला होता.या स्टार्स पैकी काहीजण अजूनही बॉलिवूडच्या दूनियेत आपली जागा टिकवून आहेत तर,तर काही स्टार्स अचानकपणे अज्ञातवासात निघून गेले.यामध्ये अभिनेत्री रिना रॉय हिचा ही समावेश आहे.
आपल्या चढत्या काळात नाव,यश,प्रसिद्धी आणि पैसा कमविणारी ही अभिनेत्री प्रेमात मिळालेल्या धोक्या समोर मात्र हरली.आपल्या अभिनय आणि सौंदर्याने संपूर्ण सिनेजगताला वेड लावणा-या रिना रॉयने सत्तर आणि ऐंशीचे दशक गाजवले होते.महत्वाचे म्हणजे पुरुष चाहत्यांसाखाच महिला वर्ग ही तिच्यावर जीवापाड प्रेम करीत होता.दोन दशकांच्या सिनेप्रवासानंतर अचानक ही अभिनेत्री मुंबईच्या सिनेजगतातूनच नव्हे तर भारत देशातूनच फार… दूर निघून गेली.
रिना रॉयचे खरे नाव रुपा होते.तिचे कुटूंब मुळचे चेन्नईचे.ती तिच्या आई-वडीलांची तिसरी मुलगी होती.७ जानेवरी १९५७ ला मुंबईत रिनाचा जन्म झाला.रिनाचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती.तिच्या वडीलांचे नाव सादिक अली आणि आईचे नाव शारदा राय होते.रिना रायचे जन्मानंतरचे नाव सायरा सादिक अली होते.सादिक अली हे चित्रपटांमध्ये अगदी छोट्या भूमिका करीत होते जसे की ‘बावरे नैन‘मध्ये ते दिसले.लहानपणीच आई-वडीलांचा घटस्फोट झाल्यानंतर तिच्या आईने आपल्या चारही मुलांची मुस्लिम नावे बदलून हिंदू नाव ठेवले आणि रिनाचे नाव रुपा राय झाले.पुढे ‘जरुरत‘चित्रपटात तिचे नाव रिना होते.हेच नाव पुढे तिने कायम ठेवले आणि सिनेजगतासाठी ती ‘रिना राय’झाली.रिनाच्या जन्मानंतर आई-वडीलांचे लग्न टिकले नाही व चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांच्यात घटस्फोट झाला.ते रिनासह कुटूंबाला मुंबईत सोडून चेन्नईला निघून गेले.कुटूंब चालविण्याची जबाबदारी देखण्या रिनाच्या खांद्यावर येऊन पडली.तिने स्टूडियोचे उंबरठे झिझवून स्क्रीन टेस्ट देण्याचा सपाटा लावला आणि तिचे टीन एजमधले उफाळणारे मादक सौंदर्य निर्माता बी.आर.इशारांनी बरोबर हेरले.
कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी रिना क्लबमध्ये नृत्य करीत असल्याचा देखील दाखला दिला जातो.याच क्लबमध्ये निर्मात्याची नजर तिच्यावर पडली असे सांगितले जाते.रिनाच्या करिअरची सुरवात फार वाईट झाली.बी.आर.इशारांनी तिला एकदम दोन चित्रपटांसाठी साईन केले होते.त्यांचा ‘नई दूनिया नए लोग’(१९७१)हा सिनेमा आधी फ्लोअरवर गेला.त्यात रिनाचा नायक होता डेनी डेन्झोप्पा! या सिनेमाची आठवण अशीही आहे की यात रेल्वेचा एक सीन होता,सारे युनिट बंगलोरजवळील जंगलात होते आणि हा सीन महत्वाचा होता.रेल्वे दिवसातून फक्त एकदाच तिथून जायची.त्यामुळे सीन चुकला तर रिटेकसाठी दूसरा दिवस उजडायचा.दोन दिवस रिटेकमध्ये गेले होते.तिस-या दिवशी बी.आर.इशारा वैतागले.ते म्हणाले ‘आता माझे पैसे संपलेत आणि एका शॉटसाठी सगळे युनिट जंगलात आणायचे मला परवडत नाही तेव्हा आता चूक न करता तू शॉट दिला तर माझ्यावर उपकार होतील.‘रिनाचे वय तेव्हा फक्त १४ वर्षांचे होते.मात्र,ती पुन्हा संवाद विसरली आणि रेल्वे निघून गेली.सीन तसाच राहून गेला आणि पुढे जाऊन हा चित्रपटही डब्ब्यात गेला.
शुटींगच्या त्या दिवशी मात्र रिना हमसून हमसून रडली.आता पुन्हा चुकायचं नाही हा निश्चय तिने मनात केला अन् तो थेट पुढे काही काळानंतर आलेल्या ‘आशा’चित्रपटातल्या एका सीनपर्यंत पाळला.
बी.आर.इशारा यांच्या १९७३ मध्ये आलेल्या ‘जरुरत’या सिनेमात देखील असेच दृष्य होते.ज्यात अस्ताला जाणा-या सूर्याचे दृष्य सीनच्या पार्श्वभूमीला होते.या सिनेमाचा नायक होता देखणा पण मख्ख चेह-याचा विजय अरोरा.इथे रिनाने एकाच शॉटमध्ये सूर्यास्त नेमका पकडला आणि तिची अभिनयाची गाडी रुळावर आली.‘जरुरत’हा रिनाचा पडद्यावर आलेला पहिला चित्रपट होता.पहील्याच दृष्यात दिग्दर्शक तिला सांगतो,’तुम्हारा बाप मर गया है और तुम्हे रोना है’वयाच्या १४ व्या वर्षी ‘मरण’याचा अर्थ काय असतं हे देखील मला माहिती नव्हतं आणि दिग्दर्शक मला त्या विषयी सांगतोय,असं हसत एका मुलाखतीत रिना हिने सांगितले.
या सिनेमातील बोल्ड दृष्यांमुळे रिना या नंतर ‘जरुरत गर्ल’म्हणून कुप्रसिद्ध झाली.अनेक दृष्यात तिला विवस्त्र होताना बघून सिने प्रेक्षकही थक्क झाले होते.आई,बहीणी व कौटूंबिक जबाबदा-यांमुळे वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रिनाने चेह-यावर मेकअपची पुटे चढवली आणि देहाचे प्रदर्शन करण्यासही बाध्य झाली!मात्र,यासाठी तिने कधीही आपल्या कुटूंबाला दोषी ठरवले नाही,हा तिच्या मनाचा खूप मोठेपणा होता.ती एक प्रेमळ बहीण होती,जबाबदार मुलगी होती पण सिनेजगतात राहूनही ती व्यवहारिक कधीच झाली नाही.
रिनाच्या सुरवातीच्या काळात सिने समीक्षक तिची तुलना आशा पारेखशी करायचे जे रिनाला पटत नव्हते.आशा पारेख व माला सिन्हा कधीही नंबर रेसमध्ये वर जाऊ शकल्या नाहीत मात्र,त्यांची शिडी वापरुन अनेक मख्ख अभिनेते आपला सिनेमा हिट करण्यास यशस्वी झालेत.त्यामुळेच रिनाला या अभिनेंत्रींशी स्वत:ची तुलना होने पटत नव्हते.
रिनाला सिनेजगतात ‘लूक’आणि ‘गेटअप’ची जाण अभिनेत्री रेखाने करुन दिली.तिचा कपाळावरचा महिरप आणि धनुष्याकृती मासोळी डोळे याचा योग्य वापर करण्यास रिनाला रेखाने शिकवले.मात्र,सुरवातीच्या काळात रिनाला स्वत:ची प्रतिमा आणि करिअरचे गांर्भीयच नव्हते.केवळ अर्थाजणासाठी रिनाने अनेक ‘बी‘ आणि ‘सी-ग्रेडचे’ सिनेमे स्वीकारले.या काळात ओ.पी.रल्हनसारखा जाणता निर्माता तिच्या सौंदर्यावर भाळला होता व तिच्यासोबत नात्यात येण्यास आतूर झाला होता.तेव्हा त्यांचा राजेंद्रकुमारसोबतचा ‘तलाश’तिकिट खिडकीवर सुपरहिट झाला होता.पण,रिनाला अश्या नात्यात काहीही रस नव्हता,ख-या प्रेमासाठी ती आसुसलेली होती.
रिनाला सुरवातीच्या काळात अपयशाला सामोरे जावे लागले होते.तिचा ‘मिलाप’,‘जंगल मे मंगल’ आणि ‘उम्रकैद’हे चित्रपट ओळीने फ्लॉप झाले होते.मात्र,१९७६ मध्ये रिलिज झालेल्या राजकुमार कोहलीच्या ‘नागिन’या सुपरहिट यशाने तिला रातोरात ‘ए’ग्रेडची हिरोईन बनवली व यशाच्या शिखरावर नेऊन बसवले.‘नागिन‘साठी रिनाला फिल्मफेअरच्या र्स्वोकृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले.
‘नागिन’या चित्रपटात रीना रॉय आणि जितेंद्र मुख्य भूमिकेत होते.हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता,ज्यामध्ये सुनील दत्त,फिराेज खान,संजय खान,विनोद मेहरा,कबीर बेदी,रेखा,मुमताज यासारखे फार मोठे कलाकार होते.या चित्रपटात रिनाने इच्छाधारी नागिनची भूमिका वठवली जी तिच्या नाग जोडीदाराची(जितेंद्रची)हत्या करतात अश्या शिकारींचा सूड घेते.लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी या चित्रपटाचे संगीत दिले आहे जे खूप गाजले.‘तेरे संग प्यार मैं नही तोडना’संपूर्ण चित्रपटात वारंवार वाजणा-या या गीताने रसिकांना अक्षरश: वेड लावले होते.
महत्वाचे म्हणजे या चित्रपटात ‘नागिन’ची भूमिका मुमताज आणि नंतर रेखा यांना ऑफर करण्यात आली होती,पण त्यांनी नाकारल्यामुळे रिना रॉयकडे ही संधी चालून आली.चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर मात्र, या दोन्ही अभिनेत्रींना त्यांनी काय चूक केली,याची चांगलीच उपरती झाली.या चित्रपटात रिना यांना सतत लेंस लावून काम करावे लागत होते,त्या काळी डोळ्यातील लेंसहे थोडे भारी वजनाचे,जाड काचेेचे मिळत होते.चित्रपटाची शुटिंग जंगलात,मैदानात कुठेही होत असल्याने वारंवार धूळ आणि माती डोळ्यात जाऊन, लेंसमुळे तिच्या डोळ्यात जखमा होत होत्या.या सर्व अडचणींवर ‘नागिन’च्या यशाने मात केली व रिना रॉय हिला तिच्या परिश्रमाचे गोड फळ मिळाले.
‘नागीन’नंतर राजकुमार कोहली यांनी रिनाला ‘जानी दुश्मन’,‘मुकाबला’‘बदले की आग’आणि ’राजतिलक’या मल्टीस्टाररकास्ट सिनेमात रिपीट केले.राजकुमार कोहली व रिनाची फिल्मी जोडी हिट ठरली.
त्यानंतर जे.ओमप्रकाशच्या १९७७ मध्ये आलेल्या ‘अपनापन’मध्ये रिनाने एक नकारात्मक रोल केला.या चित्रपटासाठी रिनाला सर्वोकृष्ट सहअभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.जो तिने नाकारला,रिना रॉयच्या मते या चित्रपटात तिची मुख्य भूमिका होती.लग्नानंतर अतिशय श्रीमंतीच्या जगण्याचा हव्यास असलेली रिना,एक मूल झाल्यानंतरही याचसाठी जितेंद्रला म्हणजे आपल्या नव-याला सोडते व अधेड वयाच्या श्रीमंत इफ्तिखारसोबत लग्न करते ज्याला अधीच मोठ-मोठी मुले असतात.या दुस-या लग्नात रिनाला जगातली सगळी सुखे मिळतात,पण लवकरच तिला या ही जगण्याचा तिटकारा वाटू लागतो आणि सगळं काही असून आपल्या जिवनातील ‘एकाकीपणाची ’जाणीव होऊ लागते.जितेंद्र व आपल्या मुलाच्या आयुष्यातून निघून तिने काय गमावले याची उपरती तिला सुलक्षणा पंडितसोबतचा जितेंद्रचा सुखी संसार बघून होते.हा चित्रपट जेव्हा तिला ऑफर झाला तेव्हा तिच्या मोठ्या बहीणीने बरखाने,रिनाची छवि या चित्रपटामुळे नकारात्मक होईल व याचे तिला नुकसान होईल,असा सल्ला दिला होता मात्र,लहानपणापासून आव्हानांची आवड असणा-या रिनाने हा रोल करण्याचे ठरवले व पुढे या ही चित्रपटात तिचा सर्वोकृष्ट अभिनय प्रेक्षकांना खूप भावला.जितेंद्रसोबतचा तिचा संसार,भौतिक सुखांना घेऊन संसारतील भांडणे,सोडचिठ्ठी मागणे,मूल सोडून निघून जाणे,या सगळ्या नकारात्मक छटा असतानाही,अखेरच्या दृष्यांमध्ये स्वत:च्या मूलासाठी तिचं उफाळून आलेलं आईपण,त्याला बघण्यासाठी तिची तळमळ,तगमग,त्याला ह्दयाशी लावण्यासाठी तरसणं आणि अखेर ते तिघेही हिल स्टेशनवरुन निघत असताना,मध्य रस्त्यात त्यांना अडवून आयुष्यात केलेल्या चुकांची कबुली व त्यांना सुखी संसाराच्या दिलेल्या शुभेच्छा,प्रेक्षकांच्या मनात तिला दोषी धरण्या ऐवजी, चित्रपटगृहा बाहेर निघताना तिच्या विषयी कमालीची सहानुभूती निर्माण करुन जातात, ‘अपनापन’ या चित्रपटात रिनाने अभिनयाच्या ज्या दमदार छटा दाखवल्या आहेत,त्यामुळेच तिला सर्वोकृृृृृष्ट सहअभिनेत्री म्हणून फिल्म फेअरचा पुरस्कार देणे हा तिच्यामधील संयत अभिनेत्रीचा अपमानच होता व हा पुरस्कार नाकारुन रिना किती स्वाभिमानी होती हे देखील त्या काळात सिनेरसिकांना कळले.
यानंतर जे.ओमप्रकाश यांनी रिनाला ‘आशा’व ‘अर्पण‘साठी पुन्हा संधी दिली.१९८० मध्ये रिनाला ‘आशा’साठी फिल्मफेअरचे सर्वोकृष्ट मानांकर मिळाले होते.आपल्या करिअरमध्ये रिनाने जवळपास शंभरहून अधिक सिनेमांमध्ये काम केले.नागिन,जानी दुश्मन,प्यासा सावन,अर्पण,आशा,धर्म काटा,सौ दिन सास के,आदमी खिलौना है,हे रिनाचे काही गाजलेले चित्रपट.
रिनाची पडद्यावरची जोडी जितेंद्र, शत्रूघ्न सिन्हा आणि सुनील दत्तसोबत जास्त जमली.मात्र,रिनाने राज बब्बरसारख्या नवख्या अभिनेत्यासोबत देखील तितकंच समरसून काम केलं.चित्रपटात निर्माता कोणत्या अभिनेत्याला घेत आहेत,हा विषय कधीही रिनाचा नव्हताच.ती खूप व्यवसायिक आणि तितकीच निखळ मनाची होती.राजेश खन्ना व अमिताभ सोबत तिचे फार कमी सिनेमे आले त्यामुळे ती नंबर गेममध्ये कायम मागे राहीली.या उलट हेमा मालिनी व रेखाचे राजेश खन्ना व अमिताभसोबतचे चित्रपट सुपरहिट होत होते,तरीही रिना त्यांच्या समोर सिनेजगतात टिकून राहीली ती केवळ तिच्या समर्पित कामामुळे, नृत्य कौशल्य आणि प्रतिभेमुळे!
बॉलिवूडमधील या संपूर्ण संघर्षाच्या काळात,संघर्षाचा चित्रपट रिनाच्या जीवनातला अजून बाकी होता..!बॉलिवूडमध्ये रिनाची यशस्वी घौडदौड सुरु असताना तिचं प्रेम बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हावर जडलं..दिग्दर्शक सुभाष घई यांचा पहिला चित्रपट होता ’कालीचरण’.त्यांनी नवख्या शत्रुघ्नला नायकाचा रोल दिला.तोपर्यंत रिना ही प्रसिद्धीच्या यशोशिखरावर होती.तिचा सुनील दत्तसोबतचा ’जख्मी’हिट झाला होता.सुभाष घईच्या ‘कालीचरण’चित्रपटाकडून कोणीही ही अपेक्षा करीत नव्हते की तो ब्लॉकबस्टर ठरेल.पण,चित्रपटातील एकाहून एक सरस गाणे,चित्रपटाची सशक्त कथा आणि रिना-शत्रू यांचा बेमिसाल अभिनय चमत्कार करुन गेला.’जा रे जा ओ हरजाई‘हे गाणं कॉलेज तरुणींचे काळीज घायाळ करुन गेले.
‘कालीचरण’हिट झाल्यावर सुभाष घईने याच जोडीला घेऊन ‘विश्वात्मा’हा चित्रपट बनवला.तो देखील सुपरहिट झाला.मात्र,यानंतर या जोडीविषयी चर्चेला उधाण आले.याच दरम्यान रिनाचे जितेंद्रसोबतचे ‘प्यासा सावन’,‘बदलते रिश्ते’,हिट झाले.त्यांचा अपनापण,अपर्ण आणि आशा हे देखील सुपरहिट सिनेमे होते मात्र,इतक्या चित्रपटात एकत्रित काम करुनही रिना-जितेंद्रची चर्चा सिनेजगतात झाली नाही मात्र,दोनच चित्रपटात काम करुन रिना-शत्रुघ्नं यांच्यात प्रेम बहरले.

(छायाचित्र : ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं तो शत्रूघ्नं ज्याने पूर्व प्रेयसीसाठी रिनाचा विश्वासघात केला)
बिहारमधील पाटण्यात जन्मलेल्या शत्रूघ्नला राम,लक्ष्मण,भरत अशी तीन मोठी भावंडे होती.वडिलांची इच्छा नसतानाही तो पुण्याला आला होता.फिल्मस ॲण्ड टेलिव्हिजन इन्सिटट्यूटची प्रवेश परिक्षा तो उत्तीर्ण झाला.अंदाजे १९६५ च्या काळात राज कपूर या संस्थेला भेट देण्यासाठी आले होते.भेटीचा कार्यक्रम झाल्यावर परत जाताना त्यांनी शत्रूला त्याच्या मित्रांसह मुंबईला शुटिंग पाहण्यासाठी बोलावले.तो तिथे गेला मात्र,मुंबईतील माणसांच्या कोडगेपणाचा पहीला अनुभव त्याला मिळाला.फजितीने खजिल होऊन परतीसाठी रेल्वे स्थानकावर आला असताना त्याचे लक्ष पुनमकडे गेले.ती ज्या डब्यात बसली त्या डब्यात तो चढला.ती रडत होती.तिची सहानुभूती मिळवण्यासाठी त्याने तिच्या हातात चित्रपटाचे मासिक ठेवले ज्यावर ‘सुंदर मुलींनी रडू नये’असा मेसेज पेनने लिहला,तिने ते मासिक फेकून दिले.शत्रूने तिथून काढता पाय घेण्याआधी तिची संपूर्ण माहिती खूप हूशारीने काढली.नंतरच्या काळात दोघे एकमेकाला भेटत राहीले आणि संपर्कात राहीले.पुढे शत्रू त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईला करिअरसाठी निघून गेला.
काही अवधीनंतर १९६८ मध्य पूनम ‘मिस यंग इंडिया’ म्हणून निवडली गेली.यादरम्यान पूनमची शत्रूशी वाढलेली जवळीक तिच्या आईच्या लक्षात आली.एकदा शत्रू तिच्या घरी गेल्यावर तिच्या वडिलांनी त्याचा खूप अपमान केला.‘माझ्या गो-यापान,देखण्या मुलीसमोर तू शोभून दिसत नाहीस,तिची आणि तुझी जोडी ब्लॅक ॲण्ड व्हाईट टी.व्ही सारखी आहे,तू बिहारी कोळशासारखा आहेस’अशी खरडपट्टीच त्यांनी शत्रूची काढली.मात्र,शत्रूने तरीही हार मानली नाही.त्याने १९७३ साली पूनमला पहीला सिनेमा मिळवून दिला ज्याचे नाव ‘सबक’असे होते.या चित्रपटात तोच तिचा नायक होता.मात्र,हा सिनेमा चालला नाही पण,पूनम आणि शत्रूचे संबंध अधिक दृढ झाले आणि तिच्या पालकांचा रोषही ब-याच अंशी कमी झाला होता.शत्रूच्या फिल्मी पडद्यावरील सुरवात देवआंनदच्या ‘प्रेम पुजारी’ने झाली होती जो १९७० मध्ये रिलिज झाला होता.पण,या रोल आधी पोलिस इन्सपेक्टरची त्याची छोटीशी भूमिका असलेला ’साजन’हा चित्रपट १९६९ साली रिलिज झाला होता.
१९८० हे वर्ष रिनासाठी यश आणि दु:खं हे दोन्ही एकसाथ भाेगण्याचा काळ ठरला.तिचा ‘आशा’सुपरडूपर हिट झाला होता.आशाच्या भव्य यशानंतर ती ‘यारी दुश्मनी’या चित्रपटाच्या शुटिंगसाठी लंदनला गेली होती मात्र,९ जुलै १९८० हा दिवस तिच्या आयुष्यात कायमचे दु:खं घेऊन आला.शत्रुघ्नने याच दिवशी त्याची पहीली प्रेयसी पुनम चंदारमाणीसोबत लग्नगाठ बांधली…!हा विवाह अतिशय घाईघाईत उरकण्यात आला होता.रिना लंदनला असताना शत्रुघ्नने रिनाचा कोणताही विचार न करता स्वत:च्या आयुष्याचा खूप मोठा निर्णय घेऊन मोकळा झाला होता.रिना ही पित्याच्या नात्याकडून मुस्लिम होती किंवा तिच्या कौटूंबिक पार्श्वभूमीतून शत्रुघ्नने हा निर्णय घेतला,असे देखील जाणकार सांगतात.
शत्रूच्या लग्नाची बातमी रिनाला खूप मोठा मानसिक धक्का देणारी होती.ज्याच्यासोबत संसार करण्याचे ती स्वप्न पाहत होती तोच कुण्या पुनमशी लग्न करुन मोकळा झाला होत.रिनाला लंदनमध्ये संपर्क करुन काही पत्रकार यांनीच ही बातमी सांगितली.मुंबईहून पत्रकारांच्या ट्रंककॉलने रिनाला हैराण केले होते,पण तिच्याकडे यावर काहीच उत्तर नव्हते.तिथून आल्यावर मात्र,तिने शेलक्या शब्दात आपला राग,दु:खं व्यक्त केलं.माझ्या गैरहजेरीत शत्रूला लग्न करण्याची काय गरज होती?तो खुल्लमखुल्ला हे करु शकत नव्हता का?असा रोख सवाल तिने केला.यानंतर बरेच वर्ष ती शत्रूवर नाराज होती.
शत्रुघ्ने ‘एनिथिंग बट खामोश:द शत्रुघ्न सिन्हा बायोग्राफी‘या त्याच्या बायोपिक पुस्तकात पुनमसोबत विवाह झाल्यानंतर देखील तो रिनाला भेटत असल्याचे कबूल केले व रिनावरील आपल्या प्रेमाची कबुली दिली मात्र,या नात्याचा असा अंत का झाला?याचे कोणतेही उत्तर त्याच्या पुस्तकात नाही.
शत्रूने आपल्या पुस्तकात लिहले की त्याचे पुनमसोबत १९६८ पासूनच जुने अन खूप प्रगाढ संबंध होते.असे असले तरी शत्रूवरील, रिनासोबत प्रेमाच्या नावाखाली केलेल्या विश्वासघाताचे पातक कमी होत नाही.याचा अर्थ शत्रू एक साथ,एकाच काळात दोन स्त्रियांच्या कोमल भावनांसोबत खेळत होता!या पुस्तकात आपल्या बचावासाठी शत्रू सांगतो की पुण्यात नामांकित केंद्रात अभिनयाचे प्रशिक्षण घेताना या दोघांचीही ओळख झाली होती.ओळखीचं रुपांतर प्रेमात झाले मात्र,पुनमने शत्रूची ओळख वडीलांशी करुन दिली तेव्हा शत्रूच्या काळ्या रंगावरुन तिच्या वडीलांनी शत्रूचा बराच अपमान केला होता.यानंतर पुनमसोबत त्याचं नातं पूर्वीसारखं राहीलं नव्हतं.‘सबक’ सिनेमामुळे पुनमशी जी जवळीक निर्माण झाली ती तात्कालिक राहिली आणि पुनमच्या वडीलांना आपणच पुनमचे कसे तारणहार आहाेत याची जाणीव करुन देता आली.पण यानंतर ते दोघेही कधीही अधिक खोलात जाऊन जवळ आले नाहीत.
मात्र,सत्य शत्रूच्या पुस्तकातील उता-यापेक्षा फार वेगळंच होतं.शत्रूच्या परिवाराने रिनाच्या पालकत्वावर प्रश्न उपस्थित केले होते.१९७९ मध्ये शत्रूचे वडील भुवनेश्वरी प्रसाद सिन्हा हे गंभीर आजारी पडले आणि अगदी सिनेमात दाखवतात तशी विवाहाची अट त्यांनी शत्रूला घातली.त्यांनी शत्रूकडून रिनाशी लग्न न करता घरच्यांच्या समंतीने लग्न करण्याची अट घातली.यानंतर काही दिवसांनी त्यांचे निधन झाले.याचा प्रचंड दबाव शत्रूवर होता.म्हणून त्याने रिना लंदनला गेल्यानंतर घाईघाईत पुनमसोबत लग्नगाठ बांधली.वडिलांच्या मृत्यूस वर्ष पूर्ण होण्या आधी शत्रू विवाहबंधनात अडकला मात्र,रिनाला तो कधीही या बहाण्यावर विश्वासासाठी मनवू शकला नाही.
शत्रूशी नातं तुटल्यावर रिना आतून खूप एकाकी झाली.तिने स्वत:ला चित्रपटात झोकून दिले.याच काळात वेगळ्या धाटणीचे चित्रपट रिनाचे बघायला मिळतात.‘रॉकी’,‘हथकडी’,‘धरम कांटा’,‘करिष्मा’,‘लेडीज टेलर’,‘बेजुबान’,‘लक्ष्मी’,‘सनम तेरी कसम’असे भिन्न आशयाचे चित्रपट तिने केले.पण यात तिचे मन रमले नाही.त्यात पुनम आई होणार असल्याची वार्ता तिच्या कानावर आदळली.
तिला जोडीदाराची निकड तीव्रतेने भासू लागली व यात तिच्या हातून आयुष्याची खूप मोठी चूक घडली.तिची भावंडे बरखा आणि अंजू,भाऊ राजा हे आता मोठे झाले होते.कुटूंबाची जबाबदारी तिच्यावर नव्हती.अशातच इंग्लंडमध्ये शुटिंग करीत असताना तिची ओळख पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी झाली.अगदी थोड्याशा माहितीवर अन किरकोळ भेटीगाठीनंतर,कोणतीही खातरजमा न करता रिनाने आयुष्याचा खूप मोठा जुगार खेळला.रिनाने मोहसिनसोबत १९८३ साली निकाह केला.या वेळी ती तिच्या करिअरच्या पीकवर होती मात्र,तरी देखील तिने हा निर्णय जणू स्वत:चाच सूड उगवण्यासाठी घेतला!

(छायाचित्र : शत्रूचं दू:ख विसरुन सुखी आयुष्याचं स्वप्नं बघणा-या मोहसिन खानसोबत रिना)
लवकरच तिला तिच्या चुकीची जाणीव झाली पण,तोपर्यंत फार उशिर झाला होता.सिनेनगरीत तिची उपयुक्तता संपली होती.वरुन मोहसिनचे लोढणे तिच्या गळ्यात पडले होते पण तिला पुन्हा रुपेरी पडदा खूणावू लागला होता..त्यामुळे ती मोहसिनलाही मुंबईत घेऊन आली.त्यामुळे मोहसिनला त्याच्या ९ वर्षाच्या क्रिकेट करिअरला अलविदा करावे लागले होते.मुंबईत परतल्यावर पुन्हा जे.ओमप्रकाश यांनीच रिनाला हात दिला आणि त्यांच्या ‘आदमी खिलौना है‘ने तिचे पुनरागमन झाले.हा सिनेमा थोडाफार चालला मात्र,या व्यतिरिक्त तिने केलेले पाच वर्षातील सर्व दहाही सिनेमे दणकून आपटले.१९९२ ते १९९७ या पाच वर्षात मोहसिनलाही तेरा सिनेमे मिळाले मात्र,एकही सिनेमा चालला नाही. शेवटी त्याने रिनासह गाशा गुंडाळला आणि परत पाकिस्तानला गेला.तिथे पुन्हा दोघांचे खटके उडू लागले.अखेर तिने त्याच्याशी तलाक घेतला मात्र,याची खूप मोठी किंमत तिला मोजावी लागली.
त्यांच्या एकूलत्या एक लेकीचा ’जन्नत’चा ताबा देण्यास मोहसिनने नकार दिला.सैरभैर झालेली रिना मुंबईत आईकडे लेकीशिवाय परतली आणि बॉलिवूडमध्ये रिएन्ट्रीसाठी पुन्हा प्रयत्न करु लागली.अजय देवगणच्या ‘गैर‘आणि २००० मध्ये आलेला अभिषेक बच्चनचा ‘रेफ्यूजी’तिच्या आई या किरदारची भरपूर तारिफ झाली. या यशानंतर तिच्या पदरात आणखी चित्रपट पडतील असे वाटत असतानाच तिच्या मधली ‘आई’व्याकूळ होऊन तिने पाकिस्तानला आपल्या मुलीकडे धाव घेतली.

(छायाचित्र : लहानपणीची सनम आई रिना व वडील मोहसिनसोबत)
तिने मोहसिनला परत संपर्क केला.त्यानेही तिच्याशी तलाक घेतल्यानंतर निकाह केला नव्हता.रिनाने आपल्या मुलीसाठी पुन्हा मोहसिनसोबत कराची येथे निकाह केला व आपल्या काळजातल्या तुकड्याला पुन्हा काळजाशी लावले.आईच्या ममतेपुढे तिच्यातल्या प्रतिभावंत अभिनेत्रीवर पुन्हा एकदा अन्याय झाला.यानंतर रिना व मोहसिनने आपले संबंध न ताणता एकमेकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.यावेळी मात्र,आपलं नातं न तोडता त्यांनी हा निर्णय घेतला.रिना आपल्या मुलीला घेऊन भारतात आली.
आपल्या टीनएजमध्ये कुटूंबासाठी जगलेली रिना तिच्या तारुण्यात शत्रूघ्नसाठी जगली मात्र,तिच्या वाट्याला आलेला विश्वासघात,लग्नाच्या नात्यातून झालेली फरफट यातून ती पुन्हा कधी सावरल्यासारखी वाटलीच नाही.ती दमदार पुनरागमन करेल असं वाटत असतानाच तिच्यातल्या ‘आई’ने तिच्यातल्या अभिनेत्रीवर मात केली व तिने पाकिस्तानला धाव घेतली.सुखांची हकदार असतानाही असा संघर्ष तिच्या नशीबी आला ज्याने एक स्त्री म्हणून,एक प्रेयसी म्हणून,एक पत्नी म्हणून,एक आई म्हणून अतिशय लहान वयात एक मुलगी म्हणून पदोपदी तिची परिक्षा नशीबाने घेतली….!
शत्रूचा संसार मात्र सुखाचा सुरु होता.राजकारण आणि सिनेमे दोन्हीही त्याच्यासाठी लाभदायक ठरले.त्याला लव,कुश ही जुळी मुले व सोनाक्षी ही मुलगी झाली.सोनाक्षी ही हूबेहूब रिनासारखीच दिसत असल्याने नियतीने शत्रू आण पूनमवर सूड उगवला,असे बोललं जातं.अगदी रिनासारखी दिसणारी सोनाक्षी शत्रू-रिनाच्या एकेकाळच्या प्रगाढ प्रेमाचीच साक्ष मानली जाते.
रिनाने
‘जन्नत’चे नाव बदलून
’सनम रिना रॉय’ठेवले आहे.ती आता बरीच मोठी झाली आहे पण बॉलिवूडपासून दूर आहे.आपल्या आईने बॉलिवूडच्या व्यवहारी आणि विश्वासघातकी क्षेत्रात काय भोगले,कदाचित याची सनमला जाणीव असावी.शेवटी ती सुद्धा एका अशा आईची मुलगी आहे जी एक प्रेमळ आणि जबाबदार मुलगी.एक काळजी घेणारी बहीण,प्रेमात सर्वस्व ओवाळून टाकणारी प्रेयसी,लग्नाच्या नात्यात फरफट सहन करणारी सहनशील पत्नी आणि सर्वात महत्वाचं देश,धर्माच्या सीमा ओलांडून आपल्या पिल्लाकडे धाव घेणारी आई अशी सगळी रुपे असणा-या आईची मुलगी आहे.अशी ही रिना रॉय सर्वांनाच भावते.इतकं भोगूनसुद्धा शत्रू,पुनम किंवा अगदी सोनाक्षीसाठी देखील तिच्या तोंडून कधीही अर्थहीन शेरेबाजी झाली नाही.
रिनाच्या जीवनावर ‘लब तक आते आते हाथो से सागर छूट जाता है,शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है’या गीतातील शब्द अगदी चपखल बसतात.‘काफी बस अरमान नही,कुछ मिलना आसान नही,दूनिया की मजबूरी है,फिर तकदीर जरुरी है’गीतकाराने जणू रिना रॉयच्या आयुष्यावरच शब्दरचना केलेली भासते….!
बैठे थे किनारे पे,मौजो के इशारे पे
हम खेले तूफानो से,इस दिल के अरमानो से
हमको ये मालून न था,कोई साथ नही देता
माजी छोड जाता है,साहील छूट जाता है..शीशा हो या दिल हो आखिर…
दूनिया एक तमाशा है,आशा और निराशा है
थोडे फूल है,काँटे है,जो तकदीर ने बाँटे है
अपना अपना हिस्सा है,अपना अपना किस्सा है
कोई लृट जाता है कोई लूट जात है..शीशा हो या दिल हो आखिर..
रिना जेव्हा पडद्यावर हे गीत साकारताना दिसून पडली तेव्हा रसिक प्रेमींना हे तिच्याच आयुष्याचीच ‘निराशा’वाटली,शत्रूच्या अश्या अचानक तिच्या आयुष्यातून निघून गेल्याने मायबाप रसिक तिच्या एकाकीपणात जणू समरस झाले व त्यांनी ‘आशा’अक्षरश: डोक्यावर घेतला.
मे १९७९ .फिल्मीस्तान स्टूडियोत जे.ओप्रकाश यांच्या ‘आशा’चे चित्रीकरण चालू होते आणि रिना रॉयच्या ‘शीशा हो या दिल हो…’गाण्यावरचा शॉट सुरु होता.जितेंद्र आणि रामेश्वरी समोर बसलेले आहेत आणि रिना त्यांच्या समोर गाते आहे असा तो सीन होता.‘काफी बस अरमान नही,कुछ मिलना आसां नही’,या ओळीचे चित्रीकरण सुरु होते.कॅमरा ट्रोल करावा लागत होता,भगवान दादा हातामध्ये ॲकॉर्डीयन वाजवतात आणि कॅमरा त्यांच्या उजव्या बाजूने पुढे रिनारॉयच्या डाव्या बाजूने समोर यायचा.तिच्या हातात डफली दिलेली होती,रिनाच्या गौरवर्णीय कांतीवर काळ्याकुट्ट रंगाच्या जॉर्जेटच्या चनिया चोळीवरची सोनेरी नक्षीदार वेलबुट्टी अगदी खूलून दिसत होती.तिच्या विस्तीर्ण कपाळावर खड्याची टिकली शोभून दिसत होती.कानात मोठे गोल खड्यांचे झुमके आणि कपाळावरची केसांची जीवघेणी महिरप अन मागे सैल सोडलेले केस,गळ्यात तशीच काळी ओढणी अशा ‘कयामत’वेशभूषेत ती रेडी पोजिशनमध्ये उभी होती.तिच्या पुढे हार घातलेला माईक होता.या आधी गाण्याचा मुखडा चित्रित झाला होता पण या ओळीवर शुटिंगची गाडी अडली होती… थकलेले भगवान दादा त्या ॲकॉर्डियनच्या वजनाने अजून दमून गेले होते,सगळे युनिट घामाघूम झाले होते पण शॉट ओके होत नव्हता,
‘अ‘या आद्य अक्षरापासून सिनेमाचे नाव ठेवणारे दिग्दर्शक जे.ओमप्रकाश थोडेसे वैतागून गेले होते,ते चिडूनच बोलले,‘अरी तूम तो ऐसे हिचकिचा रही हो जैसे असल जिंदगी मे राेमान्स चल रहा है!‘हे वाक्य ते बोलून तर गेले पण नकळत खरे बोलून गेले होते.जे ओमप्रकाश यांच्या १९७७ मधल्या ‘अपनापन’ने तिला चांगली प्रसिद्धी दिली होती,शिवाय तिचे शत्रू बरोबरचे नाते खुलेआम होते.म्हणून जे.ओमप्रकाश यांची रागात केलेली टिपण्णी रिनाला चांगलीच टोचून गेली अन्..पुढच्याच टेकमध्ये शॉट ओके झाला.
वास्तविकतेत हातातल्या डफलीमुळे ती अनकम्फर्टेबल झाली होती आणि तिचे लक्ष विचलित होऊन शॉट चुकत होता.मात्र,जे.ओ च्या टिपण्णीने लाजून चूर झालेल्या रिनाने अगदी सराईतपणे शॉट पूर्ण केला.काही महिन्यातच चित्रिकरण संपले. ४ मार्च १९८० रोजी ‘आशा’रिलिज झाला आणि रिना तिच्या गालावरील सुंदर खळीसारखी सिने रसिकांच्या काळजात खोल-खोल उतरली. पण हेच ते वर्ष होते जेव्हा शत्रूने ,तिला गाफील ठेवून पुनमसोबत विवाह करुन तिला खूप मोठे दु:खं दिले होते.असे दू:खं ज्यानंतर दु:खांची मालिकाच तिच्या आयुष्यात सुरु राहीली…!
मुंबईत परतल्यावर रिनाने आपली मोठी बहीण बरखा हिच्या दिग्दर्शनातील ‘सनम तेरी कसम’हा चित्रपट १९८२ मध्ये केला.यानंतर बरखाने १९८४ मध्ये ‘करिष्मा’देखील दिग्दर्शित केला होता.‘सनम तेरी कसम’या चित्रपटात कमल हसन व रिनाची जोडी रसिकांच्या पसंतीस उतरली होती.या चित्रपटातील गाणी ही तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली होती.
आपल्या जीवनाचाच चित्रपट झाल्यानंतर या अतिशय सुंदर अभिनेत्रीने १८ वर्षानंतर वयाच्या ६० व्या वर्षी टी.व्ही मालिकांमध्ये कमबॅक केलं.२००० साली ‘रिफ्यूजी’ नंतर ती चित्रपटातून गायब झाली होती.आपल्या मुलीचे संगोपन आणि पालनपोषणासाठी ती लाईमलाईट पासून दूर राहील्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले.

(छायाचित्र: मोठी झालेली सनम आपली आई रिना रॉयसोबत)
जिंदगी इम्तेहान लेती है..रिना रॉय एक अशी अभिनेत्री जिला कोणताही गॉडफादर नसताना आपल्या परिश्रम आणि प्रामाणिकतेतून तिने यश व प्रसिद्धीचे शिखर गाठले.आज ती ६९ वर्षांची आहे.आशाओ के सागर मे…मेरी सांसो को जो महका रही है..जा रे जा ओ हरजाई देखी तेरी दिलदारी..ना जाने कैसे पल में बदल जाते है ये दूनिया के बदलते रिश्ते…ये गोटेदार लहंगा निकलू जब डाल के…अबके सावन मे जी डरे..रिमझिम तन पे पानी गिरे,ऐसी वैसी ना समज सजना,..कितने भी तू कर ले सितम..रिना रॉयची ही गाजलेली गाणी आज देखील सत्तरीच्या काळात जन्माला आलेल्या रसिकांच्या काळाजात तितक्याच तीव्रतेने झंकारतात,या गुणी अभिनेत्रीचे भारतीय सिनेजगतात योगदान कधीही विस्मरणात जाणार नाही ना शॉटगन शत्रूघ्नं सोबतचा तिचा ७ वर्षांचा प्रेमाचा काळ सिने रसिक कधीही विसरु शकतील….!
……………………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
