

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरें यांचे आज पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,केंद्रिय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनावर दू:ख व्यक्त केलं आहे.बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.आज सोमवार दि. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांचे निधन झाले.ते १०० वर्षांचे होते.बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते.दिवाळीपासूनच ते आजारी असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.२६ ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली.त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती खालावली.त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
शिवचरित्रच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रात घरोघरी पोहोचले.त्यांच्या राजा शिवछत्रपती पुस्तकामुळे देशभरात छत्रपतींच्या चरित्राची पारायणे केल्या गेली.‘जाणता राजा’ या महानाट्याने जगभरात प्रचंड लोकप्रियता प्राप्त केली.वयाच्या शंभरीतही त्यांच्या वाणीतील आणि विचारांतील उत्साह कायम होता.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच राजकीय,सामाजिक,मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी बाबासाहेबांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.मनसेचे राज ठाकरे हे देखील बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्यात पाेहोचले.यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक,खासदार सुप्रिया सुळे,माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह अनेक मान्यवर व शिवप्रेमी यांची उपस्थिती होती.नारायण राणे यांनी ‘ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी’असल्याची भावना व्यक्त केली.
शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे.बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनामुळे इतिहास व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली.त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेल्या राहतील.त्यांनी केलेलं इतर कामही कायमच स्मरणात राहील
-पंतप्रधान नरेंद्र मोदी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य,कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
– शरद पवार
पद्मविभूषण बाबासाहेबांच्या निधनानं एक अध्याय पडद्याआड गेला.ज्येष्ठ साहित्यिक,इतिहास अभ्यासक,पद्मविभूषण बाबासाहेब यांचं निधन ही महाराष्ट्रातील गड-किल्ले,महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व होतं.लेखन,व्याख्यान ‘जाणता राजा’सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला
-उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहोचवण्यासाठी बाबासाहेबांनी अविरत प्रयत्न केले.इतिहास अभ्यासक,चरित्रकार,व्याख्याते,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आत आपल्यात नाहीत याचे दु:ख होत आहेेेेेेेेेेेेेे.आम्ही पुरंदरे कुटूंबियांच्या दु:खात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत
– उदयनराजे भोसले
पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत.तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला.तो ध्यास मनात ठेऊन ध्येय प्राप्तीकरिता तत्व रुप आदर्श पुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालवली. दादरा-नगर हवेलीच्या मुक्तीसंग्रामात सैनिक म्हणून ते ही लढले होते
-सरसंघचालक मोहन भागवत
“असा अलौकिक शिवआराधक होणे नाही..
शिवशाहीर शिव चरणी लीन…!”– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केले आहे. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोकही व्यक्त केला आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेंबाच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे.
त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहचले. त्यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला. घरा-घरात शिवभक्त निर्माण व्हावेत आणि या शिवभक्तांना त्यांच्या आराध्याच्या तेजःपुंज पैलूंचे दर्शन घडवावे, यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानले. दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथेही शिवराय चरणी लीन होतील. शिवमहिमा, शिवरायांच्या दिगंत किर्तीची कवने लिहीण्यात आणि ती तडफदार आवाजात, आवेशात पोहचवण्यासाठी दंग होतील. पुरंदरेवाडा हा अनेकांसाठी अनेक अर्थांनी आधार होता. हा आधारवड त्यांच्या निधनामुळे अंतर्धान पावला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव भासत राहील. शिवचरित्राच्या अखंड पारायणालाच आयुष्य मानणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो अशी जगदंबा चरणी प्रार्थना. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.




आमचे चॅनल subscribe करा
