

– भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठतर्फे शिवगान स्पर्धेचे विदर्भभर आयोजन
नागपूर, ९ फेब्रुवारी: राष्ट्रभक्तीचा हुंकार…छत्रपती शिवरायांची आठवण आणि चरित्रगायनाने संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भ आणि नागपूर आज एकाचवेळी दुमदुमले. भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात विदर्भ आणि नागपुरात आयोजित स्पर्धेला नागपूर जिल्ह्यातील कलावंतांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
नागपुरात ही स्पर्धा अमृत भवनम, उत्तर अंबाझरी मार्ग येथील सभागृहात आयोजित करण्यात आली. भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठचे विदर्भ संयोजक कुणाल गडेकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेला नागपूर शहर आणि जिल्ह्यातून १५० पेक्षा जास्त प्रवेशिका आल्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनपा स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके, नगरसेवक सुनिल हिरणवार, शाहिर पहेलवान, कुणाल गडेकर आणि राज्याचे सहसंयोजक संजय भाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
ही स्पर्धा एकल व सांघिक गीत या दोन प्रकारात घेण्यात आली. यावेळी कलावंतांनी कलावंतांनी शिवाजी महाराजांचे चरित्र गायन करताना वीररसाने ओथंबलेला पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तीगीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग आदी प्रकारच्या विविध गीतांचे सादरीकरण केले. जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा, महाराजांविषयीचा अभिमान, जोश आणि सुरेल संगीत यामुळे स्पर्धास्थळी राष्ट्रभक्तीच्या हुंकाराचेच दर्शन घडले. या स्पर्धेला शिवप्रेमी रसिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत कलावंतांना टाळ्यांच्या कडकडाटाने गौरविले. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ गायक पं. मोरेश्वर निस्ताने आणि माधुरी अशीरगडे यांनी केले.
महापौर तिवारी यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देताना नव्या पिढीत राष्ट्रभक्ती रुजावी आणि छत्रपती शिवरायांचे चरित्र त्यांची राष्ट्रनिष्ठा त्यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे सांगितले. या स्पर्धेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून समाधान वाटते, असे ते म्हणाले. विजय झलके म्हणाले, नाट्यशास्त्राचे जनक भरतमुनींच्या जन्मदिवसाच्या दिवशीच या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला आणि शिवजागरने आज नागपूरसह अख्खा महाराष्ट्र दुमदुमला. हे राष्ट्रप्रेमी रसिकांमुळेच शक्य होऊ शकले, असे मत व्यक्त केले. या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वच अतिथींनी कुणाल गडेकर आणि संजय भाकरे यांचे विशेष अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे संचालन मधुरा कोलारकर, प्रास्ताविक संयोजक अभय देशमुख, आभार श्याम निसळ यांनी मानले. उद्घाटनानंतर दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत टाळ्यांच्या कडकडाटात कलावंतांनी शिवजागर केला आणि सारेच वातावरण शिवमय झाले. या आयोजनाला दिवसभरात भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके, आ. मोहन मते, संघटनमंत्री, सुनिल मित्रा, नगरसेविका चेतना टांक आणि भाजपचे पदाधिकारी व आमदारांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्यात.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहसंयोजक संजय भाकरे, विदर्भ संयोजक कुणाल गडेकर यांच्या नेतृत्त्वात अभय देशमुख, मकरंद भालेराव, श्याम निसाळ, दिलिप देवरणकर, किशोर डाऊ, मंजुषा देव, मृणाल यादव, संजीवनी चौधरी, अनुप उंबरकर,रेखा भोंगाडे, संगीता जगताप, अर्चना पांडे, नागेश विध्वंस, ओंकार कापसे, वैभव चौधरी, स्वप्निल बन्सोड, राजेश पाणूरकर आदींनी परिश्रम घेतले. या प्राथमिक स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या कलावंतांना अंतिम स्पर्धेत स्थान देण्यात येणार असून ही स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या मुहुर्तावर अजिंक्यतारा गड, जि. सातारा येथे होणार आहे.




आमचे चॅनल subscribe करा
