

१४ तारखेला होणार मुख्याध्यापकांची बैठक
नागपूर, ११ फेब्रुवारी २०२२: नागपूर व परिसरातील जवळपास ४० शाळा व्यवस्थापनांनी दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शाळा इमारती व इतर सुविधा उपलब्ध न करून देण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने उभारलेल्या त्यासंदर्भातील आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. सोमवार, १४ फेब्रुवारी रोजी याच संदर्भात शाळा मुख्याध्यापकांची बैठक होणार असून त्यात आंदोलनात सहभागी होण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद गुडधे पाटील यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी सेवासदन, सीताबर्डी येथे शाळा व्यवस्थापन प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस, सेवासदन संस्थेचे उपाध्यक्ष बापू भागवत, लोकांची शाळाचे ढोक सर इत्यादी मान्यवर बैठकीला उपस्थित होते. शाळांना शासनाकडून मागील अनेक वर्षांपासून वेतनेतर अनुदान मिळत नसून त्यामुळे शाळा अडचणीत आल्या आहेत. या संस्थानी शासनाला अनेकदा निवेदन दिली, आंदोलनेही केली, त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे आंदोलनाचा महामंडळाने आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे रवींद्र फडणवीस यांनी सांगितले.
जोपर्यंत शिक्षण संस्थांना वेतनेत्तर अनुदान मिळत नाही तोपर्यंत दहावी व बारावीच्या शालांत परीक्षांसाठी शाळा इमारती व इतर सुविधा उपलब्ध न देण्यात येणार नाही, असा पवित्रा घेत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना व मुख्याध्यापक संघाने सक्रीय पाठिंबा जाहीर केला आहे.
मंगळवारी नागपूर जिल्हा समन्वयक समितीची बैठक श्रीमती दादीबाई देशमुख हिंदु मुलींची शाळा, महाल येथे घेण्यात आली. शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सभेला महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी संबोधित केले. शाळांची सद्यस्थिती, महामंडळाच्या मागण्या, सरकारकडून चालू असलेली टोलवाटोलवी अशा अनेक मुद्दयांवर प्रकाश टाकला.
या सभेला महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महासंघाचे पुरुषोत्तम पंचभाई, बाळा आगलावे, विजुक्टा नागपूरचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र झाडे, संयुक्त कार्यवाह प्रा. दिलीप तडस, विभागीय कार्यवाह प्रा. सपन नेहरोत्रा, विदर्भ माध्यतिक शिक्षक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अनिल गोतमारे, भाजपा शिक्षक आघाडी नागपूरचे प्रदीप बिबटे, भुषण तल्हार यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, मुख्याध्यापक संघटनांनी महामंडळाच्या आंदोलनाला यावेळी सक्रीय पाठिंबा जाहीर केला.
शाळा मुख्याध्यापकांची १४ रोजी बैठक-
‘शालांत परीक्षा’ आंदोलनासंदर्भात सोमवार, १४ फेब्रुवारी रोजी शाळा मुख्याध्यापकांची सभा धीरन कन्या शाळा, सीताबर्डी येथे दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी केले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
