

नागपूर, ता. २७: उपराजधानीतील एका खासगी कॅन्सर रुग्णालयात मुखाच्या कॅन्सरवर उपचार करण्यात आले. मात्र या कॅन्सरग्रस्ताला कोरोनाची बाधा असल्याचे निदान उशीरा झाले. यामुळे या कॅन्सरग्रस्तावर उपचार करणाऱ्या चार डॉक्टरांसह २० आरोग्य कर्मचाऱ्यांना याच रुग्णालयात विलगीकरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
या कॅन्सरग्रस्तासह मोमीनपुरा येथील ४० वर्षीय युवक कोरोनाबाधित असल्याचे मेडिकलमधील प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले.
नागपूर येथील कामठी रोडवर असलेल्या “एचसीजी नार्ची’ या खासगी कॅन्सर रुग्णालयात एका कॅन्सरग्रस्तावर उपचार सुरू होते. त्याला जिभेचा कॅन्सर होता. १४ एप्रिल दरम्यान त्याच्यावर एचसीजी नार्ची रुग्णालयात शस्त्रक्रिया केली गेली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्याला सुट्टी देण्यात आली. दरम्यान २४ एप्रिलरोजी त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला. सोबतच सर्दी व इतर कोरोनाची लक्षणे आढळून आली. यामुळे तो पून्हा नार्ची रुग्णालयात उपचारासाठी आला.
कोरोनासदृश्य लक्षणे बघता त्याची डॉक्टरांनी “मेट्रोपॉलिस’ या खासगी प्रयोगशाळेच्या माध्यमातून तपासणी करून घेतली. त्याचा अहवाल रविवारी मध्यरात्रीनंतर पॉझिटिव्ह आला. यामुळे नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. तातडीने या रुग्णाला मेयो रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान या रुग्णाचे नमुने पून्हा घेवून ते मेयोच्या प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत. सोमवारी त्याचे नमूने घेण्यात आले आहेत.
कॅन्सरवरील उपचारादरम्यान या रुग्णावर चार डॉक्टर तसेच २० आरोग्य सेवी, प्रयोगशाळा कर्मचारी असे २० जण संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने खासगी रुग्णालय गाठले. या रुग्णावर झालेल्या उपचारासह त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेत ४ डॉक्टरांसह एकूण २० जणांना याच रुग्णालयातच विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आली. खासगी रुग्णालयाचे संचालक डॉ. अजय मेहता यांनी विलगीकरणात ठेवण्याच्या या वृत्ताला दुजोरा दिला.
दुसऱ्यांदा थेट संबध नाही-
मुखाच्या कॅन्सरवर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यावेळी येथील डॉक्टर, परिचारिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा कॅन्सरग्रस्तांशी थेट संबध आला होता. परंतु दुसऱ्यांदा कोरोनासदृश्य लक्षणांवर उपचार करण्यासाठी हा रुग्ण नार्ची रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आला, त्यावेळी मात्र या कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या संपर्कात फारसेजण आले नाही. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण करण्यात आले आहे, याचे समर्थन त्यांनी केले. मात्र लक्षणे बघताच त्याला थेट मेयोत पाठवले असल्याचे ते म्हणाले.




आमचे चॅनल subscribe करा
