

अवघ्या ३३ साव्या वर्षी जगातून तरुणाची एक्झीट
मेट्रो,उड्डाण पूले,सिमेंट रस्ते,शॉपिंग मॉल्स,नाचणारे संगीत कारंज्यांच्या विकासात नागपूरकरांच्या‘सुरक्षा’ जीवनाची हमी कुठे?
सरकारी विभाग, सरकारी विभागांवर करणार का कारवाई?
समाज माध्यमांवर विनाेददास नायरच्या मित्रांचा तीव्र संताप
नागपूर,ता.१२ सप्टेंबर २०२२: आम्ही या शहरात २०१४ मध्ये साढे आठ हजार कोटींची ‘मेट्रो’आणली,सध्या या प्रकल्पाचा खर्च १२ हजार कोटींवर पोहोचला असून अद्यापही या प्रकल्पाची ४० टक्के कामे अपूर्ण आहेत.आम्ही या शहरात उड्डाण पूलांची अवर्णातीत अशी श्रृखंला निर्माण केली मात्र पूलांवरील व पूलांच्या खाली असणा-या रस्त्यांवर धावणा-या वाहनचालकांच्या सुरक्षेची तीळमात्र काळजी वाहीली नाही,आम्ही या शहरात विकासाच्या नावावर ३०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले,अगदी गल्ली बोळ्यातील दोन-दोन फूटांच्या रस्त्यांसाठीही सिमेंट रस्त्यांचा आग्रह नगरसेवकांनी धरला, कंत्राटदारांच्या कोट्यावधीच्या निविदाही मंजूर झाल्यात व आज त्यामुळेच ‘नागपूर ’ शहर हे ठिकठिकाणी ’अर्धवट’ सिमेंट रस्त्यांचे शहर म्हणून जगात आपली ओळख निर्माण करु पाहत आहे,महत्वाचे म्हणजे हा सगळा विकास नागपूरकरांनी न मागता ही त्यांच्या ‘भाग्यात’जमा झाला आणि रस्त्यावर चालताना खड्डेयुक्त रस्ते,इंग्रजांच्या काळातील गळक्या,तुंबलेल्या सिवेज लाईन्स,दूषित पिण्याचे पाणी, तुंबलेल्या सिवेजमुळे घ्यावे लागणारे दुर्गंधीयुक्त श्वास,पराकोटीचे वायु व ध्वनि प्रदुषण,दुर्गंधीयुक्त कच-याचे ढिग, सिमेंट रस्त्यांमुळे पावसाच्या पाण्यात तरंगारी अगदी माजघरातील भांडीकुंडी इत्यादी हा संपूर्ण विकासाचा प्रवास नागपूरकर नागरिक जवळून अनुभवत असतानाच,अगदी रस्त्याच्या मधोमध महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे(एमएससीबी) यमदूतांसारखे उभे असणारे खांब जेव्हा शेकडो नागरिकांच्या जीवावर उठतात तेव्हा मात्र मेट्रो,उड्डाण पुले,तरंगते संगीत कारंजे यापेक्षा, एकदा घराच्या बाहेर पडल्यानंतर वाहनचालक आपल्या कुटूंबियांपर्यंत सुरक्षित घरी पोहोचण्याची काळजीच अलीकडे कुटुंबियांकडून वाहीली जात असल्याचे दिसून पडतंय.
दररोजचे वृत्तपत्र उघडले तर सदोष उड्डाण पूलांमुळे,पूलांवर,पुलांखाली घडणा-या अपघाती बातम्यांचा रतीब वाचायला मिळतो!. ९ ऑगस्ट २०२२ रोजी म्हणजे मागील महिन्यात विनोददास मोहनदास नायर हा अवघ्या ३३ वर्षाचा तरुण सक्करदरा पुलाच्या खालून आपल्या घरी परत येत असताना रस्त्याच्या मधोधत असणा-या एका खांबाला धडकून खाली कोसळला,यानंतर त्याला तातडीने तेथील डॉ.गिल्लूरकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र २४ तारखेला त्याची मृत्यूशी झुंज संपली अन्…त्याचा मित्र परिवार काळजातून हळहळला,ट्टिटरवर व्यक्त झाला..!
एक नव्हे तर मृत्यूला आमंत्रण देणारे असे ७ ते ८ खांब गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर अगदी मधोमध उभे आहेत,या निर्जिव खांबांना दोष द्यायचा की ज्यांनी पुलाची निर्मिती केली,ज्यांनी पुलाखालच्या रस्त्याची निर्मिती करताना हे खांब तसेच मधोमध राहू दिले,ज्यांची हे खांब काढून टाकण्याची जबाबदारी होती त्यांनी ती जबाबदारी पाळलीच नाही,कोणा-कोणाला विनोद आणि विनोदसारख्या या खांबांना धडकून असंख्य अपघाताला बळी पडलेल्यांनी जबाबदार धरायचे?हा प्रश्न आता या शहरातील सुज्ज्ञ मनांना छळतो आहे.

(छायाचित्र :विनोददास याचा सिटीस्कॅन:वीज खांबावर धडकल्याने डोके व डोळ्यांना झालेली गंभीर इजा)
दूर्देव या तरुणाचं इतकंच होतं की त्या रात्री पाऊस कोसळत असल्याने त्याने डोक्यावरचे हेलमेट काढून टाकले होते कारण हेलमेटच्या काचेवर पडणा-या पाण्यामुळे त्याला समोरचे काहीच दिसत नव्हते.त्याच्या समोर एक ऑटो धावत होता.त्या ऑटोचालकाला तो खांब नावाचा ‘यमूदत’ मधोमध दिसताच त्याने कट मारला व आपला जीव वाचवला मात्र याच ऑटोच्या अगदी मागे असणा-या विनोदला सावध होण्याची संधी ही मिळाली नाही अन्….तो त्या अजस्त्र वजनाच्या लोखंडी खांबाला धडकून खाळी कोसळला,त्याच्या डोक्याचा, ज्याप्रकारे या धडकेमुळे चुराडा झाला ते त्याच्या सिटीस्कॅनचे छायाचित्रे ही विनाेदच्या मित्रांनी समाज माध्यमांवर शेअर केलेत,जी कोणाताही संवेदनशील मनाचा माणूस तर बघण्याची हिंमतच करु शकत नाही!
विनोददास याला १३ ऑगस्ट रोजी त्याच्या मित्रांनी बजाजनगर येथील सिम्समध्येही दाखल केले होते.जवळपास पाच लाखांचा खर्च त्याच्या उपचारावर होणार होता,यासाठी त्याच्या मित्रांनी मदतीचे आवाहन देखील समाज माध्यमावर पोस्ट केले होते.विनोददास याचे वडील २००७ मध्ये जग सोडून गेले,जन्मदात्रीने २०१५ मध्ये जग सोडले,दिव्यांग बहीणीचे मार्च २०२२ मध्ये निधन झाले,विनोददास हा त्याच्या कुटुंबातील एकमेव सदस्य या भौतिक,ऐहिक जगात उरला होता,त्याचा देखील बळी या शहरातील प्रशासकीय व्यवस्थेने अतिशय क्रूरपणे घेतला!

(छायाचित्र :विनोददास या तरुणाचा बळी घेणारा सक्करदरा पुलाखालील हाच तो यमदूत!)
सक्करदरा पोलिस ठाण्यात असो किवा शहरातील इतर कोणत्याही पोलिस ठाण्यात,अपघातांची माहिती अगदी दोन-तीन ओळींमध्ये संपते मात्र अपघात हा फक्त कुण्या एका देहाचा नसतो,तो त्या देहासोबत जुळलेल्या असंख्य नात्यांचाही असतो.विनोददास हा आपल्या सुस्वभावामुळे मित्रांमध्ये अतिशय लोकप्रिय होता.त्याच्यावर जीव ओवाळणारे असंख्य मित्र होते.एका मित्राने ट्टीटरवर मदतीचे आवाहन करताच,जवळपास साढे तीन लाखांची मदत जमा ही झाली मात्र हे लाखो रुपये देखील विनोदच्या हक्काचे जगण्यातले श्वास परत आणू शकले नाहीत….!
विनोददासच्या मृत्यूसाठी नेमके कोणाला दोषी ठरवायचे?उड्डाण पुल बांधणारे नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया(एनएचआय),नागपूर महानगरपालिका,नागपूर सुधार प्रन्यास की एमएससीबी?
आयुर्वेदीक कॉलेज पासून तर रघुजी राजे भोसले पुतळा,उमरेड रोड वर एमएससीबीचे जवळपास ७ ते ८ खांब रस्त्याच्या मधोमध आज ही यमदूत म्हणून उभे आहेत!मागील अनेक वर्षांपासून ते त्याच ठिकाणी,जसे त्या तसेच उभे आहेत,हे विशेष!अनेक अपघात होऊन देखील त्यांना हटवण्यासाठी शासनाच्या या सर्व विभागांकडे निधीच नाही!२०२० मध्ये एमएससीबीच्या एका अभियंताने या रस्त्यांचे सर्वेक्षण करुन अहवाल व निधीसाठीचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे सोपवला ,यानंतर आपल्या जबाबदारीची इतिश्री मानली!
उपराजधानीतील मनपा ही तर जन्माची दरिद्र असून या स्थानिक स्वराज्य संस्थेची तिजाेरी कायमच रिकामी असते,निधी असला तरी तो सिमेंट रस्ते,कागदांवर निर्माण झालेल्या पाण्याचा टाक्या,मनपात कार्यरत विविध राजकीय नेत्यांच्या एजंसीजी बिले देण्यात खर्च होतो.मनपात कचरा संकलन करणा-या एजंसीज, शहरातील पाण्याचा बट्ट्याबोळ करणारी ओसीडब्ल्यू एजंसी, जनसंपर्क विभागात महीन्याकाठी पावणे पाच लाखांचा मलिदा खाणारी आय.टी.क्राफ्ट एजंसी,कर संकलन करणारी सायबर टेक एजंसी,सुरक्षा रक्षक पुरवणारी एजंसी,संगणक ऑपरेटर पुरवणारी एजंसी,आपली बस चालवाणा-या एजंसीज,मनपा अधिका-यांच्या दिमतीत असणारे विविध भाड्याने आणलेले वाहन,वाहन चालकांचे पगार,पेट्रोल,डीजेलची निघणारी महिन्याकाठी लाखोंची बिले,चाळीस-चाळीस वर्षांपासून मनपाच्या विविध विभागात एकाच कंत्राटदारांच्या विविध एजंसीजना कोट्यावधींचा मिळणारा मलिदा,३०० कोटींचे सिमेंटचे रस्ते,मनपा कर्मचा-यांच्या बँकेतही एका माजी महापौरांच्या नातेवाईकांचा भरणा इत्यादी विविध कारणांमुळे उपराजधानीतील नागपूर महानगरपालिका नावाच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे सक्करदरा पुलाखालील वर्षानूवर्षे यमदूत म्हणून उभे असणा-या या वीजेच्या खांबांना काढण्यासाठी निधीच उपलब्ध झाला नाही!
नागपूरकर वाहन चालक जगो किवा मरो,मनपातील सत्ताधा-यांना महापुरुषांच्या नावाखाली भव्य दिव्य पुतळ्यांची स्मारके,भव्य दिव्य विविध सांस्कृतिक,क्रीडा महोत्सवे,सिमेंट रस्ते,कचरा संकलन,कर संकलन, आपली बस,नगर रचना विभागातील कारभार,बाजार विभाग,अग्निशमन विभाग,उद्यान विभाग,घनकचरा विभाग,गलिच्छ वस्ती विभाग,आरोग्य विभाग इ.अश्या विविध विभागांतील सत्ताकारणातून ‘अर्थकारणच’प्रिय राहीले असल्याने एमएससीबीने एक वर्षा पूर्वी दिलेल्या अहवालाकडे,मागितलेल्या निधीकडे लक्ष देण्याची सत्ताधारी व प्रशासकीय अधिका-यांना ‘गरजच’वाटली नाही आणि या अश्या गलथान व संधीसाधू राजकारण व प्रशासकीय कारभारामुळे या शहराचा एक उम्दा हसतमुख तरुण काही दिवसां पूर्वी हकनाक बळी गेला ,त्याचेही त्यांना कोणतेही वैषम्य वाटत नाही!
एमएससीबीच्या या प्रभागातील एका अभियंत्याने या रस्त्यावरील वीज खांबांविषयीचा अहवाल तयार करुन मनपात पाठवला होता.या प्रभागाचे प्रतिनिधीत्व भाजपचे आमदार मोहन मते करतात.त्यांना देखील या भीषण समस्येची जाणीव होती.उमरेड,दिघोरीपर्यंतच्या रस्त्याचे काम करुन पुढे वाहनचालकांना ’भगवानभरोसे ’सोडून देण्यात आले आहे.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या एनएचआय विभागाने सक्कदरा पूल बांधून तर दिला व त्यानंतर त्यांच्या विषय पूलापर्यंतच संपला!रस्ते हा विषय नागपूर सुधार प्रन्यास,सार्वजनिक बांधकाम विभाग व नागपूर महानगरपालिकेचा असला तरी या तिन्ही विभागांची ’देदिप्यमान कार्यशैली’नागपूरकरांना चांगलीच अवगत आहे.एमएससीबीनेही वीज खांब काढण्याचा प्रस्ताव देण्या पलीकडे कोणताही पाठपुरावा केलाच नाही!
आता एमएससीबीला जिल्हा नियोजन समितीच्या निधीची अपेक्षा आहे.तसा प्रस्ताव देखील जिल्हाधिका-यांना एमएससीबीच्या अभियंताने दिला आहे.रस्ता शहराच्या हद्दीत,निधी मात्र ग्रामीण प्रशासन सांभाळणारे जिल्हाधिकारी देणार!शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयापासून सक्करदरा चौकापर्यंतच्या जवळपास आठ खांबांना काढण्यासाठी आता माय बाप सरकारचे हे सगळे विभाग आणखी किती विनोददाससारख्या तरुणांचा जीव जाण्याची वाट बघणार आहेत?असा सवाल आता समाज माध्यमात विचारला जात आहे.
विनोददास याच्या अपघाती मृत्यूला जबाबदार ठरलेल्या या सर्व शासकीय विभागांवर,शासकीयच असलेला पोलिस विभाग कारवाई करेल का?हे सर्व वीज खांब तातडीने हटविले गेले नाही तर महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभागासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ‘परिवर्तन युवा विचारमंचचे डॉ.प्रणय चांदेकर,सचिन वाघाडे व विठ्ठल लहाने यांनी निवेदनातून दिला आहे.




आमचे चॅनल subscribe करा
