

दूर्घटनेला संशयाची किनार: पैशांना घेऊन वाद झाल्याची चर्चा
जिल्हाधिकारी इटनकर यांची आरोपींना त्वरित अटक करण्याची सूचना
मृतकांच्या परिजनांना चार लाख रुपयांचा मुआवजा देण्याचे आदेश
उद्या पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या सूचनांचे पालन न झाल्यास अन्यायाविरुद्ध राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार:यश गौरखेडे यांचा प्रशासनाला इशारा
वोट बँकचं राजकारण नाही चालू देणार
नागपूर,ता.११ एप्रिल २०२३: मानेवाडा येथील रहीवाशी डॉ.सुनील राव यांच्या घरातील विहीरीची स्वच्छता करताना ९ एप्रिल रोजी दोन तरुण आदीवासी तरुणांचा दूर्दवी मृत्यू झाल्याच्या घटनेनले नागपूर शहर हळहळले असतानाच, आता यावर राजकीय खेळी सुरु झाली असून ही घटना दाबण्यासाठी ‘वरुन’हालचाली करण्यात येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व ‘जन बदलाव’ संस्थेचे अध्यक्ष यश गौरखेडे यांनी केला आहे.एका राजकीय पक्षाच्या काही नेत्यांचा त्यांना प्रकरण मिटवून टाकण्यासाठी विचारणा झाली असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला.
मात्र, दोन आदीवासी तरुणांचा अकाली मृत्यू,राजकीय पक्षाच्या वोट बँकच्या राजकारणाला बळी पडू देणार नसल्याचा निर्धार व्यक्त करीत, यश गौरखेडे यांनी आज शेकडो आदिवासी बांधवांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय गाठून, दोषींवर त्वरित कारवाई व मृतकांच्या परिजनांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांनी घटनेचे गांर्भीर्य लक्षात घेत, नागपूर पोलिसांना त्वरित या घटनेसाठी दोषी असणा-या अारोपींना अटक करण्याची सूचना केली तसेच मृतकांच्या परिजनांना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
मानेवाडा रोड येथील राजनगर स्थित डॉ.सुनील राव यांनी त्यांच्या घरातील विहीर स्वच्छ करण्यासाठी गोंड वस्तीत राहणा-या चार आदिवासी तरुण मजुरांना बोलावून घेतले.तीन तास या मजुरांनी विहरीत उतरुन विहरीची स्वच्छता केली मात्र अचानक कोणी तरी विहीरीतील मोटारीचे बटन सुरु केल्याने विहीरीत असणा-या अमन मरकाम याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अमनला वाचवण्यासाठी विहीरीत उतरलेल्या शंकर याला देखील वीजेचा झटका बसला व त्याला देखील मृत्यू ने गाठले.
या घटनेची माहिती यश गौरखेडेला कोयल नेताम व किशोर यूके यांनी दिली.पोलिसांच्या मदतीने दोन्ही मृतकांचे पार्थिव बाहेर काढण्यात आले.मृतकांच्या परिजनांनी दोषींना आधी अटक करण्याची मागणी केली.एवढंच नव्हे तर मृतदेहासोबत मेयो रुग्णालयात तीव्र आंदोलन केले.
शेकडो आदिवासी बांधव मेयोमध्ये जमा झाल्याने पोलिसांनी कायदा सुव्यवस्था ठेवण्यास यश गौरखेडे याला सांगितले.यश गौरखेडे यांनी आदिवासी बांधवांची मागणी प्रशासनासमोर ठेवण्याची मागणी केली.वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण शांत झाले.
काल १० एप्रिल रोजी सदर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेचे कलम ३०४(अ),अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक)कायदा १९८९ अन्वये डॉ.सुनील राव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र,एवढ्या गंभीर कलमा लागूनसुद्धा अद्याप आरोपीला अटक झाली नसल्याने ,यश गौरखेडे यांच्या नेतृत्वात पिडीतांनी जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्याकडे निवेदन सोपवले.
घटनेचे गांर्भीर्य बघता जिल्हाधिकारी इटनकर यांनी पोलिसांना त्वरित दोषींविरुद्ध कारवाई करण्याची सूचना केली व दोन्ही मृतकांच्या परिजनांना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी यांच्या सूचनांचे पालन न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यश गौरखेडे यांनी दिला.
पत्रकारांशी वार्तालाप करताना, त्यांच्या व मृतकांच्या कुटूंबियांवर एका राजकीय पक्षाचे काही ज्येष्ठ नेते हे प्रकरण दाबण्यासाठी दबाव आणत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
इतकंच नव्हे तर सुरवातीला हे प्रकरण दाबण्यासाठी विहीरीतील विषारी वायूच्या गळतीतून ही दुर्घटना झाल्याचा बनाव करण्यात आला मात्र, इतर दोन आदीवासी मजुरांच्या उपस्थितीमुळे आरोपींचे बिंग फूटले.येथील भागातील रहीवाश्यांच्या चर्चेमध्ये,हे कुटुंब पैश्यांच्या बाबतीत अतिशय कंजुस असून पैशांना घेऊन वाद झाला असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात असल्याचे यश गौरखेडे यांनी सांगितले.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याने आरोपींना त्वरित अटक करुन सत्य बाहेर आणावे,अशी मागणी त्यांनी केली आहे.
…………………….




आमचे चॅनल subscribe करा
