

पिण्याच्या पाण्यासाठी दिवसभरात २० लिटरची फक्त एक कॅन
नागपूर,ता.१० मे: पार्वतीनगर येथील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आणि मनपा प्रशासनाने तातडीने ६ मे रोजी रात्री त्या भागातील १५० लोकांना विलगीकरणात ठेवले. दुस-या दिवशी पुन्हा ८० लोकांना उचलले तर काल शनिवारी आणखी ४ लोकांना विलगीकरण कक्ष्ात पाठवले. विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या संशयितांचे स्वॅब, तातडीने वैद्यकीय अधिकारी घेऊन जातात मात्र पुढे त्या चाचणीचा अहवाल काय आला?पॉझिटीव्ह कि निगेटीव्ह हे कळवण्याचं सौजन्यही मनपा प्रशासन दाखवित नसल्याचे ताजे उदाहरण म्हणजे पाचपावली येथील विलगीकरणातील संशयितांचे आहे.
या ठिकाणी १७० लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.नुकतीच त्यातील ११३ लोकांच्या चाचणीचा अहवाल हा निगेटीव्ह आला मात्र मनपा प्रशासनातर्फे कोणाकोणाचा अहवाल हा निगेटीव्ह आहे,हे कळवण्यातच आले नाही. नुसते पाचपावली येथीलच नव्हे तर आजपर्यंत विलगीकरणात ठेवण्यात आलेले खामला,बजाजनगर,अभ्यंकर नगर जयनगर,पांढराबोडी,काशीनगर, जवाहर नगर, एम्प्रेस सिटी,पार्वतीनगर,गणेशपेठ, जयभिम नगर,रामेश्वरी,मोठा ताजबाग,भालदरपुरा, टिमकी, बैरागीपुरा,संतरंजीपुरा,मोमिनपुरा,शांतीनगर,कुंदनलाल गुप्ता नगर, दलालपुरा, राजीव गांधी नगर,संगम नगर, जरीपटका,गौतम नगर,गिट्टी खदान,कुशीनगर इ.ज्या ज्या भागातून लोकांना विलगीकरण कक्ष्ात नेण्यात आले,त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या,त्यांना कधीही प्रशासनातर्फे त्यांच्या चाचणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला कि निगेटीव्ह हे कळवण्याचे सौजन्य दाखवत नाहीत.
पाचपावली येथील ११३ लोकांचा पहीला चाचणीचा अहवाल हा शनिवारीच निगेटीव्ह आला होता मात्र जे वैद्यकीय अधिकारी त्यांचे स्वॅब घेऊन गेलेत त्यांनी किवा मनपा प्रशासनाने ते निगेटीव्ह आले हे त्यांना कळवलेच नाही. बाहेरुन मित्रांकरवी या ठिकाणी विलगीकरणात असणा-या तरुणांना असा अहवाल आला आहे,हे कळले. अत्यंत भीतीच्या सावटीखाली वावरणा-या या लोकांना कोणाकोणाचा अहवाल निगेटीव्ह आला हे कळाले असते तर खूप मोठा दिलासा मिळाला असता. मात्र असे घडत नाही.
मनपा प्रशासन फक्त घरातून उचलण्याचे काम करते. यानंतर विलगीकरणात नेऊन ठेवल्यावर प्रशासनाला फक्त त्यांच्या नाकातील व घश्यातील स्वॅबशी घेणे-देणे नसते. भेदरलेल्या,घाबरलेल्या मनांची अवस्था जाणून घेण्याचा वेळ निगरगट्ट प्रशासनाकडे नसल्याचे येथील तरुणाई सांगते. आम्हाला आमचा पहीला चाचणी अहवाल कळला असता तर भीती थोडी कमी झाली असती. आता पुढल्या आठवड्यात बुधवारी किवा गुरुवारी दूसरी चाचणी घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी येतील. त्यावेळीही भीती ही मनात कायमच असणार आहे, अजून पुढचे १० दिवस या कोरानाच्या ’तुरुंगात’काढायचे आहे,चार दिवस कसे तरी काढले,पुढचे दिवस मन कसे एवढा ताण-तनाव सहन करणार,माहिती नाही.
खास‘सत्ताधीश’ला सांगताना येथील तरुणाई सांगते फक्त ऐकले होते मनपातर्फे विलगीकरणातील लोकांसाठी नागपूर शहरातील नामवंत मानसोपचारतज्ज्ञ हे भेटायला येतील मात्र आज ४ दिवस झाले येथे फक्त एकदाच स्वॅब घेणारे डॉक्टरर्स आले,यानंतर कोणी फिरकलेच नाही.आमच्या मनातली भीती घालवण्यासाठी कोणतेही समुपदेशन आतापर्यंत तरी झाले नाही.
जेवण अवेळी,बाथरुमध्ये अंधार!
गेल्या चार दिवसांपासून जेवणाची कोणतीही वेळ ठरली नाही. जेवण घेऊन येणारे फक्त मास्क आणि हातमोजे घालून असतात,उलट त्यांच्यापासून आम्हाला कोरोना होईल,ही भीती आता आमच्या मनात बसली असल्याचे येथील संशयित सांगतात.कधीही जेवण वेळेवर मिळत नाही,वेगवेगळ्या वेळी जेवण देतात. दिवसभरातून फक्त एकदा २० लिटरची कॅन एका खोलीत दिल्या जाते. उन्हाळ्याचे दिवस आहेत. दिवसभर खूप तहान लागत असते. एका खोलीत ४ ते ५ लाेकांना ठेवण्यात आले आहे. दोन बीएचकेच्या या ईमारतीत एकूण २८ सदनिका आहेत. .संतापजनक गोष्ट म्हणजे कोणत्याही सदनिकेतील न्हाणीघरात लाईटच नाही. एका एका सदनिकेत महिला,पुरुष किंवा कुटुंबिय हे एक साथ राहतात. रात्रीच्या वेळी दार थोडे उघडे ठेऊन जावं लागतं. महिलांसाठी हे फार गैरसाेयीचं ठरतं.
यापेक्ष्ा आम्हाला आमच्याच भागात,आमच्याच घरात विलगीकरणात ठेवण्यात आले असते तर आम्ही तरुणांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले असते. आम्ही त्या तरुणाच्या मृत्यूने इतके घाबरलेले आहोत की आम्ही घरातून बाहेरच पडलो नसतो.आमच्या पैकी जो शवागृहात त्या तरुणाला बघून आला त्यांनी तर स्वत:हून प्रशासनाला सहकार्य करीत माहिती दिली. आमच्यात लक्ष् णे दिसायच्या आधीच आम्ही ही सावधगिरी बाळगली.कुटुंब,समाज किवा शेजारी यांना धोका आम्हाला निर्माण करायचा नव्हता. मात्र प्रशासनाकडून अशी वागणूक मिळेल,अशी अपेक्ष्ाही नव्हती,असा संतापही पाचपावली येथे विलगीकरणात असणारी तरुणाई व्यक्त करत आहे.
मृत तरुणाचा बच्चा दिमाग!
मृत पावलेला पार्वतीनगर येथील तरुण हा जरी वयाने २२ वर्षाचा होता तरी बारा वर्षाच्या मुलांसारखी त्याची वागणूक होती. त्याचे मानसिक संतुलन बरोबर नव्हते,खूप हायपर डोजची औषधी तो खात असल्याने त्याच्यावर आणखी जास्त परिणाम झाला होता. घरात न राहता तो कोणाकडेही जाऊन बसायचा.नेमका त्यालाच ‘काेरोना’व्हावा आणि त्याच्या संपर्कात आलो म्हणून या भागातील महिला,पुरुष,लहान मुले यांना असे दिवस बघायला मिळावे,याचेच आश्यर्च वाटत असल्याचे ही तरुणाई सांगते.
छोटीसी झोपडी,पडकं घर का असेना,घर हे घर असतं. १४ दिवस संशयित म्हणून,पुढे १४ दिवस पॉझिटीव्ह आल्यास रुग्णालयात,पुढे बरे झाल्यावर पुन्हा १४ दिवस घरातच स्व-विलगीकरणाची यातना भोगावी लागणार असल्याचे आधीच कळाले असते तर…. !पुढील दहा दिवस आशावादी राहून मानसिक संतुलन नियंत्रणात ठेवणे एवढेच आता आम्ही करणार आहोत…!




आमचे चॅनल subscribe करा
