

नागपूर,२१ मे: सिम्बॉयसिस येथील विलगीकरण केंद्रातील पाच महिन्याच्या चिमुकलीला काल बुधवार दि. २० मे रोजी कोराेनाची बाधा झाली आणि नागपूरकरांना धक्काच बसला. पाच महिन्याची ही चिमुकली शहरातील आतापर्यंत सर्वात लहान कोरोना बाधित असल्याची नोंद झाली. मूळात विलगीकरण केंद्रातील संशयितांचाच आकडा गेल्या अनेक दिवसांपासून बाधित म्हणून का वाढतोय?हा प्रश्न आता नागपूरकरांना पडला आहे.
’लोग सुनते ही नही’ असे यावर उत्तर मिळत आहे. एकमेकांच्या संपर्कात येण्याचे कटाक्ष्ाने टाळले पाहिजे,हा साधा संकेत असताना विलगीकरण केंद्रे असो किवा शहरातील हॉट स्पॉट क्षेत्र.लोकं हे एकमेकांच्या संपर्कात येत आहेत,अर्थात यामागे अनेक कारणे अंर्तभूत असल्याचे सांगितले जात आहे. ११ मार्च नंतर उपराजधानीत कोरोनामुळे अनेक कल्पनातीत घडामोडी घडल्या व घडत आहेत. राज्य सरकार,स्थानिक प्रशासन,जनप्रतिनिधी व सामान्य जनता यांच्यासाठी ‘कोरोना’हे आव्हानापेक्ष्ा त्यांच्यातील निर्णय क्ष मतेचा कस बघणारी घटना ठरली. कोरोना ही काय ‘बला’आहे,हे संपूर्णपणे जगाच्याच लक्षात आले नसताना महाराष्ट्राच्या उपराजधानीत तर सारं काही आलबेलच असल्याचं म्हणावं लागेल.

हा रोग संसर्गजन्य असून एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतो,बस एवढीच ‘शास्त्रीय’माहिती सामान्य नागरिकांना मिळू शकली. हा रोग पसरु नये म्हणून मग प्रशासनाने नागपूरात पावले उचलली ती म्हणजे संशयितांना हजारोच्या संख्येने शहरातील वेगवेगळ्या विलगीकरण केंद्रात ठेवण्याची तसेच शहरातील अनेक प्रभाग प्रतिबंधित क्षे त्र घोषित करुन सील बंद करण्याची. गेल्या तीन महिन्यांपासून स्थानिक प्रशासन फक्त आणि फक्त हेच पावले उचलत आहेत,तरीही शहरात दररोज कोरोना बाधितांची संख्या का वाढतेय?आता हा प्रश्न नागपूरकरांना चांगलाच छळतोय.
विलगीकरणातील कॉमन शौचालय-न्हाणीघर
शहरातील अनेक विलगीकरण केंद्रात अनेक कुटुंबे किवा अनेक खोल्या मिळून काॅमन शौचालय व न्हाणीघर असल्याचे भयाण वास्तव सामोरे आले आहे.पॉझिटीव्ह बाधितांनी वापरलेले शौचालय किवा न्हाणीघर इतरांनी वापरले असल्यास त्यांनाही बाधा होण्याची शक्यता ही अधिक असल्याचे जगातील संशोधकच सांगत आहेत.मात्र नागपूरातील स्थानिक प्रशासनाकडे एकमेव उपाय हाच आहे,हजारो नागरिकांना उचला व विलगीकरणात डांबा!सतरंजीपुरा येथील १७०० नागरिकांना उचलण्यात आले,मोमिनपुरा येथील ६०० नागरिकांना उचलण्यात आले,पार्वती नगर येथील ५०० च्या वर नागरिकांना उचलण्यात आले,गड्डीगाेदाम तसेच ज्या ज्या भागात कोरोना बाधित आढळला तेथील नागरिकांना घरातून उचलून विलगीकरण केंद्रात पोहोचवण्यात आले.

नुकतेच पार्वती नगर येथील २०० पेक्षा जास्त नागरिकांच्या कोरोना चाचणीचा अहवाल हा निगेटीव्ह आला. आता याच लोकांनी प्रशासनाला प्रश्न विचारला आहे,आम्हाला कोरोना नव्हताच तरी ‘१४ दिवसांची ही भयंकर शिक्षा का? केवळ संशयाच्या आधारावर?या पेक्ष्ा घरीच आम्ही विलगीकरणात राहीलो असतो तरी भागले नसते का?आम्ही तर आमच्या घराबाहेर देखील नसतो पडलो.आमच्यावर दिवस-रात्र पोलिसांचा पहारा ठेवायचा होता मात्र १४ दिवस आम्ही फक्त, प्रशासनाला आमच्यावर संशय आल्यामुळे, जे दिवस विलगीकरण केंद्रात काढले,त्या मानिसिक,भावनिक,शारिरीक,आर्थिक त्रासाचे काय?’
अर्थात प्रशासनाकडे याचे उत्तर नाहीच.त्यांचे तर‘ घोष वाक्य’ आहे जे नागरिक प्रशासनाच्या आदेशाला सहकार्य करणार नाही त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता,आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण तसेच साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली जाईल. अगदी दररोज मनपा आयुक्त तुकाराम मुंढे ही धमकी नागपूरकर नागरिकांच्या कानी घालत आहेत.मात्र विलगीकरण केंद्रात जे नागरिक हे एकमेकांच्या संपर्कात येत आहेत,एकमेकांच्या खोलीत जाऊन डबे खात आहेत,गच्चीवर जाऊन सुख-दु:खाच्या गप्पा करीत आहेत,त्यांना रोखण्याचीसाठी माननीय आयुक्तांकडे अद्यापही कोणतीही ठोस उपाययोजना नाही!
याचा परिणाम विलगीकरण केंद्रातील पॉझिटीव्ह रुग्ण वाढण्यात होत नाही का?असा प्रश्न आता विचारला जात आहे.महापौर संदीप जोशी यांनी देखील प्रशासनाचे,विलगीकरातील गैरसोयी,बेशिस्तपणा व लोकांना होणारा त्रास याकडे लक्ष् वेधले होते.मात्र आयुक्तांना मिळालेल्या ‘सर्वाधिकारासमोर’हतबल होऊन महापौरांनाही गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
विलगीकरणातच पॉझिटीव्ह सापडत आहेत त्यामुळे नागपूरकरांचे आरोग्य हे सुरक्षित आहे,आयुक्तांचा हा दावा त्यामुळेच सपशेल फोल ठरतो,उलट विलगीकरण केंद्रात निगेटीव्ह असणारे संशयित हे देखील तेथेच एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे पॉझिटीव्ह ठरत आहेत, अशी आता शहरातील काही जाणकारांमध्ये चर्चा आहे.

प्रतिबंधित क्षेत्र केवळ फास-
गड्डीगोदाम भागात कोरोनाबाधित सापडताच आयुक्तांनी हा परिसर सील केला.असाच सतरंजीपुरा,मोमिनपुरा,हनुमान नगर, जवाहर नगर,रामेश्वरी,पार्वती नगर इ.भाग तातडीने सील करण्यात आले मात्र सील करण्यात आलेल्या क्ष्ेत्रात जिवंत‘माणसे’राहतात,ज्यांना जगण्यासाठी नैसर्गिक काही गरजा आहेत,त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कितीही क्षे त्र सील केले तरी,प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यक्ति ही त्यांच्या संपर्कात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येतच असल्याची अनेक उदाहरणे आहे.
या प्रतिबंधित क्षेत्रात दूधवाले,भाजीवाले,औषध दूकाने इत्यादींना सूट देण्यात आली.परिणामी या क्षेत्रात बाहेरच्यांचा वावर हा वाढतोच. गड्डीगोदाम येथे तर एक दूधवाला चक्क बर्फाची लादी दररोज गाडीत गड्डीगोदाममधूनच घेऊन जात आहे..तो याचा वापर नक्कीच दूधात भेसळ करण्यासाठी करीत असावा किवा शहरातील इतर ठिकाणी हा बर्फ पोहोचून देत असावा.आयुक्तांनी परिसर सील केला तरी भारत टॉकिज कडून कामठीकडे जाणारा अंतर्गत रस्ता हा पूर्णपणे खुला आहे!त्यामुळे या भागातून बाहेर पडणा-यांची चांगलीच वर्दळ येथील नागरिक दररोज अनुभवतात. परिणामी परिसर सील केला तर उर्वरित नागपूरकांचे आरोग्य हे सुरक्षित राहील,आयुक्त तुकराम मुंढे यांचा हा दावा ही सपशेल फोल ठरल्याचे हे उदाहरण आहे.
मोमिनपुरा भागातील नागरिक आपल्या घरातील दैनदिन गरजेच्या वस्तू बाहेरील भागात नातेवाईकांना सांगून गेल्या अनेक दिवसांपासून मागवित आहेत.परिणामी अगदी पोलीसांच्या सन्माननीय उपस्थितीतच ‘पिशव्यांचीही ही देवाण-घेवाण’चालत आहे. अर्थात आयुक्तांच्या हा प्रकार लक्ष्ात आल्यास यावरही त्यांच्याकडे ‘कठोर कारवाई’हा एकमेव उपाय असणार आहे,नागपूरकांच्या हे चांगल्याने गळी उतरले आहे.
मात्र येथील नागरिकांचीच आता विचारणा आहे,आम्ही नाही निघत घराबाहेर,आमच्या घरातील दळण संपले,भाजी संपली,जिवनावश्यक वस्तू संपल्या तर पोलीस हे आणून देतील का?पोलीसांवर आधीच गेल्या ३ महिन्यांपासून अतिरिक्त ताण असून नागपूरच्या रणरणत्या उन्हात त्यांची कातडी कर्तव्य करता-करता अगदी भाजून निघाली आहे.याची जाणीव उपराजधानीतील नागरिकांनाही आहे,म्हणून प्रतिबंधित क्ष्ेत्रातील नागरिक हे आपापल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर नातेवाईकांची मदत घेत आहेत,मात्र शेवटी प्रश्न तोच उरतो,हॉट स्पॉट क्ष्ेत्रातील नागरिकांचा काहीही केले तरी इतर भागातील नागरिकांशी संपर्क हा येतोच आहे,यावर आयुक्त आता काय प्रतिबंध घालतील?
लॉक डाऊन,विलगीकरण आणि प्रतिबंधित क्षे त्र.….या तिन्ही गोष्टींचा अवंलब करुन ही आज नागपूरात बाधितांची संख्या ही ४०० च्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे.नागपूरकरांचा संयम आता ढासळत चालला असून,प्रशासनाच्या या तिन्ही ‘प्रभावी उपाययोजनांविरुद्ध ’प्रकरणे आता न्यायालयात पोहोचली आहे.प्रशासनाने कितीही आपली पाठ थोपटून घेतली तरी त्यांचे ‘अपयश’हे आता ठलकपणे नागरिकांच्या समोर येत असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांना बाहेरील अन्न खाणे नडले!
मोमिनपुरा भागात कर्तव्यावर असणारे पोलीस यांनी याच भागात बसून बाहेरील अन्न व पाणी ग्रहण केल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आज नागपूरकरात रंगली होती. नुकतेच बुधवारी आणखी ६ पोलीसांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला होता. पोलीसांनी आपल्याच घरातून पिण्याचे पाणी व डबा आणल्यास त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने ते सोयीचे होईल,असा सल्ला ही त्यांना आता देण्यात येत आहेत. मोमिनपुरा भागात कर्तव्यावर असणारे पोलीस हे इतरांनी आणून दिलेले डबे खात असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस हे घरी जात नसल्यामुळे ते घरुन डबा आणत नसल्याचे कारण सांगितले जात असले तरी अनेक पोलीस हे दररोज घरी जातात,मात्र बाहेर पडताना घरुन डबा घेऊन निघत नसल्याची चर्चा आहे.बाहेर मिळतं ना..चहा,नाश्ता,जेवण,पाणी…मग कशाला वजन सोबत वागवावं?हा अट्टहास त्यांना नडला असल्याचे सांगितले जात आहे.इतरांनी आणून दिलेला डबा खाणे म्हणजे इतरांच्या सपंर्कात येणे व बाधितांच्या संपर्कातील वस्तूंचे सेवन करण्याचा धोका हा कर्तव्यकठोर पोलीसांनाही ओळखता आला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रेल्वे स्टेशनवर पोलिसच पाळत नाही सुरक्षित अंतर!
रेल्वे स्टेशनवर सध्या बाहेरुन काही प्रमाणात रेल्वेचे आवागमन सुरु झाल्याने रेल्वे स्टेशनवर देखील ब-याच प्रमाणात पोलीसांची ड्यूटी लागली आहे.मात्र रेल्वे स्टेशनवर पोलीसच साथ रोगाचा कायदा पाळत नसल्याचे दृष्य दिसत आहे. अनेक पोलीसकर्मी हे सुरक्षित अंतर न राखता एकसाथ जमा होऊन गप्पा करताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.परिणामी पोलीसांमध्ये कोरोनाची लागण पसरण्यास,पोलीसांचा निष्काळजीपणा हे देखील एक कारण सांगितले जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
