फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशविरोधी पक्षांच्या यशात मोदींच्या ‘या’ कारभाराचा वाटा 

विरोधी पक्षांच्या यशात मोदींच्या ‘या’ कारभाराचा वाटा 

Advertisements
(रविवार विशेष)
लोकसभा निवडणूक(२०२४)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.९ जून २०२४: गेल्या पंचाहत्तर वर्षात भारत या देशाने किमान एका बाबतीत प्रगल्भता गाठली आहे ती म्हणजे,निवडणूका.सत्ता कोणाचीही असो,अगदी ‘इंदिरा इस इंडिया’संबोधून घेणा-या देशाच्या सर्वात शक्तीशाली पंतप्रधान इंदिरा गांधी असो किवा २१ सा व्या शतकातील मतदारांच्या जोरावर तितकेच शक्तीशाली झालेले विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी असो.मतदानातून,सत्ताधा-यांच्या डोक्यात भिनलेला सत्तेचा माज भारतीय मतदार ज्याप्रमाणे उतरवतो, ते भारतातील लोकशाहीच्या प्रगल्भतेचेच द्योतक आहे.२०२४ ची लोकसभेची निवडणूक भारताची लोकशाही ही किती परिपक्व आहे,याचे उत्तम उदाहरण सिद्ध करणारी आहे.’अबकी बार चार सौ पार’चा उन्मत आणि तितकाच दांभिक नारा देणा-या सत्ताधा-यांना बहूमताच्या काठावर नेऊन ठेवणा-या या निवडणूकीचे महत्व, भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद करणारेच आहे,यात दुमत नाही.
अर्थात,भारतात मोदी पर्व सुरु होण्याआधी देशात काहीच झाले नाही,अगदी चांद्रयानच्या यशापासून तर परराष्ट्रीय संबंधांपर्यंत सर्व काही मोदींमुळेच संभव झाले,पुढे ही ,मोदी असतील तरच देशातील ‘हिंदू’ खतरे मध्ये नसतील या विचारांना देशातील मतदारांनी साफ धुडकावून लावत,सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष यांना समान पातळीवर आणण्याची किमया लीलया साधली व गेल्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात ‘काँग्रेसमुक्त भारत’तसेच विरोधी पक्षांशिवाय, भाजपची देशात अर्निबंध सत्ता,या लोकशाही विरोधी विचारांना भारतीय मतदारांनी साफ धुडकावून लावित संवैधानिक लोकशाहीची बूज पुन्हा एकदा राखली आणि हेच भारतातील प्रगल्भ लोकशाहीचे सौंदर्य म्हणावे लागेल.
‘चार सौ पार’चा नारा देणा-या आणि संवैधानिक लोकशाही मूल्याला गृहीत धरणा-या भाजपला देशातील जनतेचा मुल्याधिष्ठित कौल समजलाच नाही,मोदींच्या प्रतिमेवर यंदा देखील मतदार भरभरुन मतदान करेल व संसदेत भरघोस बहूमत देतील,भाजपचा हा अतिआत्मविश्‍वास भाजपला नडला,यात वादच नाही.आजपर्यंतच्या सत्ताकाळात आपण ज्याप्रमाणे देश चालवला त्याला भारतातील जनता भरभरुन पाठींबा देईल,असे मोदींना वाटणे म्हणजे फाजील आत्मविश्‍वासाचा कळसच होता.हे एकविसावे शतक असून,या दशकात सोशल मिडीया हे अतिशय प्रभावी माध्यम झाले असून सत्ताधारी असो किवा विरोधक,त्यांची एक ही बाब समाज माध्यमांपासून लपून राहत नाही.समाज माध्यमांवरील वाचक आणि दर्शक वर्ग हा कोणत्याही प्रिंट किवा इलेक्ट्रोनिक माध्यमांपेक्षा कोटी-कोटीच्या संख्येने जास्त आहे.
नुकतेच ऐन निवडणूकीच्या दरम्यान(आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे आदर्श आचारसंहितेला पायाखाली तुडवत)पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्वात प्रभावशाली उद्योगपती गौतम अदानी यांच्या वृत्तवाहीनीला मुलाखत देताना यू-ट्यूबर्सवर कठोर टिका करीत,याला लगाम लावण्याची गरज प्रतिपादीत केली!याच मोदींना सत्ताकाळातील दहा वर्षात एक ही पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या प्रश्‍नांना उत्तर देण्याची गरज वाटली नाही हे विशेष! मात्र,निवडणूकीदरम्यान देशातील झाडून-पुसुन सर्वच राज्यातील विविध भाषेतील प्रसिद्ध व मोठे वृत्तपत्रे यात त्यांच्या प्रदीर्घ मुलाखती(स्वप्रतिमा आणि मनमानी कारभाराचे समर्थन करणा-या) छापून आल्या तसेच सर्व इलेक्ट्रोनिक माध्यमांवर प्रदीर्घ मुलाखती प्रसारित झाला.
पत्रकारितेची विंडबना म्हणजे मोदींच्या मुलाखती घेणा-या विविध वाहीन्यांवरील संपादकांसह चार-चार मुखंडांचे हावभाव व प्रश्‍ने हे सुजाण प्रेक्षकांना चिड आणनारे होते.या मुलाखतींमध्ये जनतेच्या मनातील प्रश्‍ने ही अनुपस्थित होती.बीफ विकणारे,बाजारात नामांकन नसणारे व अयोग्य औषधे विकणा-या औषध कंपन्यांकडून देखील मोदींच्या भाजप पक्षाला शेकडो कोटींचे निवडणूक रोखे का व कसे मिळाले?प्रचंड वाढलेली महागाई,उच्च विद्याभूषितांमध्ये प्रचंड वाढलेली बेरोजगारी,जबरीने देशाच्या तरुणाईच्या गळी उतरविण्यात आलेली अग्निवीर योजना,परदेश वारीपासून तर अगदी समुद्रात बुडालेल्या द्वारका नगरीचे दर्शन घेणा-या मोदींना गेल्या दोन वर्षांपासून धगधगत असणा-या याच देशाचा एक भाग असणा-या मणिपूर राज्याचा साधा एक दौरा ही का करावासा वाटला नाही?
उत्तरप्रदेशमधील ज्या कुश्‍ती महासंघाच्या अध्यक्षांवर बृजशरण सिंह यांच्यावर देशातील सुवर्णपदक विजेत्या कुश्‍तीपटू महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे अत्यंत गंभीर आरोप लावले त्याच बृजशरण सिंह यांच्या मुलाला लोकसभेचे तिकीट का देण्यात आले?शेतकरी आंदोलनात ज्या केंद्रिय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने ३ ऑक्टोबर २०२१ रोजी शेतक-यांच्या अंगावर दोन एसयूव्ही मोटारी चढवल्या ज्यात सहा शेतक-यांचा मृत्यू झाला,त्याच अजय मिश्राला पुन्हा उत्तरप्रदेशच्या भवानीपूरमधून लोकसभेचे तिकीट का दिले?शेतक-यांचे जीव मोदी यांना बहूमोल वाटत नाही का?कनार्टकामध्ये लिंगपिसाट प्रज्वल रेवण्णाच्या प्रचारासाठी मोदी अनावधानाने गेले की सत्ता लोलूपतेने त्यांच्या सारासार विवेकबुद्धीवर पडदा टाकला होता?मतदानाच्या दाेन दिवसांआधी तीन हजारच्या जवळपास आया-बहीणींची अब्रू पेन ड्राईव्हच्या माध्यमातून जगभर बेअब्रू झाली त्याचे शल्य न वाटता भाजपने कर्नाटकात आपल्याच पक्षाच्या अध्यक्षांची हकालपट्टी का केली?
सर्वोच्च न्यायालयाने नाक दाबल्यानंतर निवडणूक रोख्यांविषयी निवडणूक आयोगाला तोंड उघडावे लागले,त्याच सर्वोच्च न्यायालयाशी मोदी यांच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात सातत्याने संघर्ष घडत राहीला,ती कोण-कोणती कारणे होती?करोना काळात मोदींच्या काही चुकीच्या धोरणांमुळे देशातील नागरिक,मजुर वर्ग, व्यापारी वर्ग,हातवर पोट असणारे ज्या पद्धतीने भरडल्या गेले, ती धोरणे मोदी यांना योग्य वाटते का?समाज माध्यमांची मुस्कटाबी करण्याच्या प्रयत्नातूनच २५ मे २०२१ रोजी दिल्लीतील गुरुग्राम येथील ट्टिटरच्या कार्यालयावर पोलिसांनी मारलेल छापा,टूलकिट प्रकरण,पॅगेसस,ईडी,देशाची अर्थव्यवस्था,जीएसटी इत्यादी जनतेशी सरळ संबंध असणारे  प्रश्‍न मोदींच्या या प्रदीर्घ मुलाखतीतून नदारद होते.
उलट,मला परमेश्‍वरानेच कार्य करुन घेण्यासाठी भारतात पाठवले ,माझा जन्म जीवशास्त्रीय नसल्याची मोदी यांची वल्गना ऐकून संपूर्ण भारतीय स्तब्ध झालेत!भाजपच्या एका ही खासदार,आमदारावर ईडीची धाड का नाही?ज्या विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत,ईडीच्या धाडी पडल्या ते भाजपमध्ये येताच त्यांच्या चौकश्‍या का थांबल्या?मोदी,भाजप आणि माध्यमांना भारतीय जनता इतकी र्निबुद्ध वाटली का की त्यांना काहीही कळत नाही!
 रिझर्व बँकेसह देशातील सर्वच केंद्रिय संस्थांमध्ये मोदी सरकारने नव्हे तर मोदींच्या एकाधिकारशाही वृत्तीने जी पराकोटीची ढवळाढवळ केली ती योग्य की अयोग्य यावर देखील प्रश्‍न नव्हता.ज्या राम मंदिराच्या भरवश्‍यावर मोदींनी देशातील हिंदूंची मते गृहीत धरण्याचे ‘धाडस’ केले त्या अयोध्येत देखील भाजपचा पराभव झाला!यावर हा तथाकथित लाेकशाहीचा चौथा स्तंभ मूग गिळून आता मोदींच्या ‘ऐतिहासिक’शपथविधी सोहळ्याचे गुणगाण करण्यात रममाण झालेला दिसून पडतोय.अयोध्येतील राम मंदिराजवळील शेकडो हिंदूंची घरे, ही मंदिराच्या भव्यतेसाठी भुईसपाट करण्यात आली, उधवस्त नागरिकांचे अश्रू आणि तळतळाटाचे शेकडो व्हिडीयोज सोशल मिडीयावर व्हायरल झालेत मात्र,भाजपला याची दखलही घ्यावीसी वाटली नाही.याचा परिणाम,ज्या भाजपला २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत ८० पैकी ६४ जागा मिळाल्या होत्या त्या ३४ वर पोहोचल्या.समाजवादी पक्षाला ३७ जागा मिळाल्या भगवान श्रीरामाच्या जन्मस्थानी अयोध्येतही भाजपच्या उमेदवाराला पराभवाचे तोंड बघावे लागले.
मोदी यांनी देखील वाराणसीमधून फक्त एक लाख व काही हजारांचे मताधिक्य घेतले.याचा अर्थ मोदी यांच्या लोकप्रियतेचा फूगा फूटला असून वाराणसीतून ते जिंकून आलेत,हेच त्यांचे यश मानावे लागेल.दूसरीकडे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी राज्यातील संपूर्ण २९ जागा मोदींच्या पारड्यात टाकली.हे मोदींचे नव्हे तर शिवराज चव्हाण यांचे यश आहे,हे मोदी कधीही मान्य करणार  नाही.मध्यप्रदेशमधून शिवराजसिंग चव्हाण यांनी आठ लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन नेत्रदिपक विजय मिळवला. शिवराज सिंह यांची ही च प्रतिमा मोदी-शहा या जोडगोळीला खूपत असल्याने,मध्यप्रदेशात तिस-यांदा बहूमत मिळवून देखील मुख्यमंत्री पदाची माळ यादव या अतिशय नवख्या राजकारणीच्या गळ्यात टाकण्यात आली.या मागील हेतू मध्यप्रदेशचा सुनियोजित आणि अनुभवी विकास नसून,शिवराज सिंह चव्हाण यांचे पंख छाटणे हाच होता,हे सांगण्यास कुण्या ज्योतिषाची गरज नाही.‘नाकापेक्षा मोती जड’ झाल्याने व पुढे दिल्लीच्या तख्ताला,मोदींच्या लोकप्रियतेला ग्रहण लागण्याच्या भीतीतूनच मध्यप्रदेशात अनेक लोकप्रिय जनकल्याणाच्या योजना राबवून निर्भेळ बहूमत आणून दिल्या नंतर देखील तिस-यांदा मुख्यमंत्री पदाची माळ शिवराज सिंह चव्हाण यांच्या गळ्यात घालण्यात आली नाही.मोदींना मात्र स्पष्ट बहूमत नसताना देखील तिस-यांदा पंतप्रधान पदी विराजमान होण्याची घाई झालेली दिसतेय.आता शिवराज चव्हाण यांना केंद्रात मंत्री पद देण्यावाचून मोदींना पर्याय नव्हता.
अमेठीतून केंद्रिय मंत्री स्मृति इराणीला याच अहंकारातून पराभव पत्कारावा लागला.फक्त काँग्रेस आणि राहूल गांधींवर टिकेची झोड उठवून निवडणूका जिंकता येत नाही हे अमेठीच्या जनतेने दाखवून दिले.इराणी यांनी पाच वर्षांच्या काळात अमेठीचा विकास केला नाही,हे जनतेने लक्षात ठेवले. हा सोशल मिडीयाचा काळ आहे.आपल्या खासदाराने आपल्या मतदारसंघात पाच वर्षात काय दिवे लावले?किती रोजगार आणले?जनतेच्या दैनदिन जिवनातील समस्या सोडविण्यासाठी काय प्रयत्न केले?महागाई,आरोग्य आणि शिक्षण यासाठी केलेले प्रयत्न मतदार हे मत देताना लक्षात ठेवत असतो.जाती-पातीचे आणि धर्माचे राजकारण सर्वच ठिकाणी यशस्वी होत नाही,लोकसभेच्या यंदाच्या निकालाने हे स्पष्टपणे अधोरेखित केलं.
सर्वात महत्वाचे म्हणजे लोकसभेचे निकाल घोषित होताच मोदी यांची भाषाच बदललेली संपूर्ण देशाने बघितली.मोदी सरकार ऐवजी एनडीए सरकारची भाषा,चंद्रबाबू आणि नितीशकुमारांच्या नेतृत्वात,यासारखे शब्द मोदींच्या तोंडी ऐकून लोकशाहीवर श्रद्धा असणा-यांचे मन नक्कीच तृप्त झालेले दिसून पडले.‘चार सौ पार’चा दांभिक नारा देणा-यांना २७२ जागा ही मिळवणे दुरापस्त झाले.उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्राच्या मतदारांनी यात मोलाचा वाटा उचलला.२०१९ मध्ये भाजप-शिवसेना गठबंधनने महाराष्ट्रात ४८ पैकी ४१ जागा जिंकून विरोधकांना श्‍वास घेण्यासाठीही जागा शिल्लक ठेवल्या नव्हत्या.त्यात भाजपने २५ जागा जिंकल्या तर १६ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता.यंदा भाजपला दोन आकडी देखील जागा मिळवता आल्या नाहीत.भाजप ८ जागा तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ९ जागा जिंकल्या.उद्धव ठाकरे,शरद पवारांची राष्ट्रवादी व काँग्रेसपक्षाच्या महाविकासआघाडीने (काँग्रेस १३,राष्ट्रवादी शरदपवार ८)२९ जागांवर विजय मिळवित भाजपचा महाराष्ट्रात धुव्वा उडवला.महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशने मोदींना केंद्रात बहूमताच्या २७२ आकड्यापासून दूर ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली.
याहून महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग रोखण्यात मोदी-शहा या जोडगोळीची महत्वाची भूमिका होती,अशी चर्चा आहे.पक्षात आपल्यापेक्षा वरचढ एक ही नेता होऊ नये,असेच राजकारण पक्षाच्या या दोन्ही शीर्षस्थ नेत्यांची असते,अशी चर्चा भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये आहे.व्यापारी वर्गाची वृत्ती जोपासणारे खरे राजकारणी कधीही होऊ शकत नाही,अशी टिका देखील उमटली.
याच वृत्तीची ही कामगिरी आहे,वेळ पडल्याबरोबर जीभेवर साखरेची पेरणी करत एनडीएचे गुणगाण सुरु झाले.मोदींची गॅरेंटी ही हवेत विरली व एनडीच्या गॅरेंटीचे बोलघेवडे दिवस उजाडले.वेळ पडल्यावर विनम्रता स्वीकारुन कटू सत्य पचवणे याला देखील कौशल्य लागतं आणि हे गुण भारतीय जनता पक्षाच्या या दोशन्ही शीर्षस्थ नेत्यांमध्ये ठासून भरले आहे.
मात्र,मोदींची एकदंरित कारर्कीद आणि कार्यशैली बघता २३४ चा आकडा पुढील काही महिन्यात किवा वर्षात आधी २७२ व पुढे ३०० च्या जवळपास नेण्यासाठी पडद्यामागून हालचाली होतील यात भारतातील नागरिकांना तिळमात्र ही शंका नाही.फोडाफोडीचे राजकारण,पक्षात इतर नेत्यांना मोठे न होऊ देणे आणि अंहकाराने लिप्त कारभार,ही मोदींच्या दुस-या टर्मची ठलक वैशिष्ठ ठरली.
 गडकरी हे त्यांच्या या धोरणाचे आणखी एक बळी ठरले,असे मराठी माणूस मानतो.संघाचा भक्कम पाठींबा असणा-या गडकरींशिवाय केंद्रात मोदी-शहांना कोणीही टक्कर देऊ शकत नाही.एवढंच नव्हे तर गडकरी यांचा चेहरा हा सर्वच राजकीय पक्षांमध्ये अगदी विरोधकांमध्येही सर्वमान्य तसेच एनडीएमध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा मानला जातो.२०२४ मध्ये ज्याप्रकारचे जनमत मोदी यांच्या कारभाराला मिळाले आहे ते बघता २३४ पर्यंत मोदींना जागा देऊन थांबविण्यात आले.आंध्रचे चंद्रबाबू नायडू,बिहारचे नितीशकुमार तसेच महाराष्ट्र शिंदेसेनेचे प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठींबा जरी मोदी यांच्या चेह-याला मिळाले असले तरी या पक्षांशिवाय इतर कुण्या पक्षाची मदत बहूमतासाठी घ्यावी लागली असती, तर निर्विवादपणे गडकरी यांचेच नाव पंतप्रधान पदासाठी समोर आले असते.देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात एक ही वेळा अटकेपार मराठ्यांचे झेंडे गाडणारा मराठी माणूस पंतप्रधान पदी बसला नाही.शरद पवार हे काँग्रेसमध्ये तगडे दावेदार असतानाही सोनिया गांधी हयातीत असेपर्यंत पंतप्रधान पद कधीही मिळणार नाही,हे त्यांना उमजले व त्यांना वेगळी चूल मांडावी लागली.
मोदी यांचे काही निर्णय हे निश्‍चितच देशासाठी चांगले देखील होते,यात शंका नाही.परराष्ट्र संबंध,राम मंदिर,कलम ३७० हटवणे,बालाकोट ,महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण इत्यादी त्यांची धोरणे ही देशाच्या इतिहासात दूरवर परिणाम करणारी ठरली आहे.मात्र,साढे तीनशेच्या जवळपास बहूमत देऊन देखील मोदींनी समान नागरिक संहितासारखे विधेयक हे गुंडाळून ठेवले.निवडणूकीच्या शेवटच्या चरणांमध्ये गृहमंत्री अमित शहा यांना देशवासियांना दिलेल्या या वचनाची आठवण झाली व भाजप(एनडीए नव्हे)चारशे पार होताच मोदींच्या पुढील टर्ममध्ये समान नागरी कायदा आणण्यात येईल असे आपल्या सभांमध्ये शहा सांगू लागले.त्यामुळेच,जेव्हा दुस-या ही टर्ममध्ये मोदींना बहूमतांच्याही किती तरी अधिक जागा देशाच्या जनतेने विश्‍वासाने दिल्या,त्या टर्ममध्ये तातडीने पुढाकार घेऊन देशावर दूरगामी परिणाम करणारे समान नागरी विधेयक मोदींनी का पारीत करुन घेतले नाही?असा प्रश्‍न आता विचारला जात आहे.
लग्न,घटस्फोट आणि संपत्तीवरील हक्क हे भारतात हिंदू व मुस्लिमांसाठी वेगवेगळ्या कायद्याच्या आधारे निर्धारित आहे.हा प्रश्‍न देशाची प्रंचड वेगाने वाढत जाणा-या लोकसंख्येशी देखील संबंधित आहे.देशाचे क्षेत्रफळ हे मर्यादित आहे.नैसर्गिक संसाधनावरील ताण एका मर्यादेपेक्षा जास्त हा देश सहन करु शकणार नाही.येत्या काळात चीनला देखील मागे टाकून जगात लोकसंख्येच्या बाबतीत पहील्या क्रमांकावर येऊ पाहणा-या भारत या देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी समान नागरी कायदा हा प्रभावी ठरणार आहे,असे देशातील बुद्धिजीवींचे मत आहे.
जीवशास्त्रीयरित्या ज्यांचा जन्म झाला नाही असे जे मानतात,,परमेश्‍वराने ज्यांच्या हातून देशाचे काम करण्यासाठी पाठविलेले देवदूत म्हणजे नरेंद्र मोदी यांना या विधेयकाचे महत्व माहिती नाही,असे नाही मात्र,फक्त फाजील आत्मविश्‍वास,देशवासियांना मुर्ख समजणे,या विधेयकापेक्षा देशातील करबुडवे उद्योगपतींचे १६ लाख कोटी संसेदत विधेयक आणून माफ करने,हे मोदी यांना महत्वाचे वाटले,त्याची निष्पत्ती त्यांना या निवडणूकीत मिळालेल्या जागांवरुन दिसून पडते.
समान नागरी कायदा याला हिंदू-मुस्लिम अशी धार्मिक जोड न देता,देशाचे क्षेत्रफळ,मर्यादित संसाधने व या कायद्यामुळे मुस्लिमांचेही उंचावणारे जीवनमान अशी जोड देऊन मुस्लिम मौलवींना आधी विश्‍वासात घेणे गरजेचे होते.मोदींसाठी हे अशक्य नव्हते मात्र,धूर्त हेतूमुळे व स्वत:ला ईश्‍वराचा अंश,देशाचा भाग्यविधाता समजणारे मोदींनी एकप्रकारे भाजपच्या मतदारांच्या अपेक्षा पायदळी तुडवल्या,असा आरोप होणे यात मिथ्या नाही.
महाराष्ट्रात भाजपची पीछेहाटसाठी शेतक-यांची मोठ्या प्रमाणात नाराजी हे देखील एक प्रभावी कारण आहे.गुजरातमधील पांढरा कांद्याला निर्यातीची सूट आणि महाराष्ट्राच्या लाल कांद्यावर निर्यात बंदीचे धोरण,खूप जास्त ओरड झाल्यावर महराष्ट्राच्या शेतक-यांवर निर्यातीसाठी ४० टक्के निर्यात शुल्क आकरणी अश्‍या महाराष्ट्रद्वेषी धोरणातून शेतक-यांची नाराजी भोवणे स्वाभाविक होते.एवढंच नव्हे तर राज्यातील महाविकासआघाडीची सत्ता जाऊन महायुतीची सत्ता येताच गुजरात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यात आलेले व स्थिरावू पाहणारे मोठमोठे उद्योग फडणवीस यांच्या सहाय्याने चक्क गुजरातमध्ये पळविण्यात आले व महाराष्ट्राच्या बेरोजगारांच्या तोंडाला पळसाची पाने पुसण्यात आली.फडणवीस हे आता कितीही दावे करीत असले की उद्योग धंदेच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या पुढे आहे तरी देखील राज्यातील जनतेला त्यांच्या दाव्यावर विश्‍वास नसल्यानेच महाराष्ट्रात मोदींची ही गती झाली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा,ही देखील मराठी मनाची दुखती रग आहे.गेल्या अनेक दशकांपासून केंद्राकडे याचे भिजत घोंगडे पडले आहेत.मनसेचे राज ठाकरे यांनी मोदींसोबत पहील्यांदा मंच शेअर करताना आपल्या सभेत मराठी भाषेला अभिजात दर्जा मोदींनी त्यांच्या तिस-या टर्ममध्ये बहाल करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली मात्र,राज ठाकरेंच्या भाषणानंतरच्या भाषणात मोदींनी मराठी अस्मितेला साद घालणा-या या विषयाचा साधा उल्लेख देखील केला नाही.महाराष्ट्रात त्यांच्या १२-१३ सभा झाल्या.सुरवातीला दोन-चार मराठी वाक्य तोंडावर फेकल्याने मतदारराजा सुखावत असला तरी,मतपेटीत मत उमटत नाही.त्यासाठी ठोस आश्‍वासन हवे.ते न मिळाल्यानेच महाराष्ट्रात मोदींना सपाटून मार खावा लागला व केंद्रात ही बहूमताच्या जादुई आकड्यापासून दूर राहवे लागले.
भ्रष्टाचारी नेते हे देखील कारण महाराष्ट्रात सपाटून मार खाण्यासाठी कारणीभूत ठरले.चक्क तिस-या टर्मसाठी तेच-तेच खासदार रिपीट केल्याने देखील विरोधी मतांचा सामना मोदींना करावा लागला.अनेक खासदारांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून,मोदींनी मात्र,डोळे मिटून घेतले होते.याचा परिरणाम विदर्भात दहा पैकी आठ जागा गमावण्यात झाल्या.फक्त नागपूर आणि अकोला हे मतदारसंघ पक्षाने जिंकले,ते ही मोदींच्या चेह-यामुळे किवा कथित करिष्म्यामुळे नव्हे तर या दोन्ही मतदारसंघात भाजपच्या नेत्यांची स्वप्रतिमा ही उजळ होती.चंद्रपूरमधील काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी तर उघडपणे दावा केला की त्यांच्या विजयात भाजपचाच हात आहे!बुलढाणा,वर्धा,भंडारा-गोंदिया,गडचिरोली,अमरावती,यवतमाळ-वाशिम,रामटेक,अकोला,चंद्रपूर आणि नागपूर या विदर्भातील दहा मतदारसंघात मतदारांनी मोदींच्या एवढया सभा झाल्यावरही मोदींना नाकारले व फक्त दोन जागा जिंकून दिला,मोदी याचे विश्‍लेषण आता तरी करणार आहेत का?
भाजपच्या एका मोठ्या नेत्याचा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला होता त्यात,’कोई वोट दे या ना दे,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही बननेवाले है’असे सांगताना दिसतात.लोकशाही व्यवस्थेत मतदारांना एवढ्या उद्दामपणे गृहीत धरणा-या नेत्याला देशाच्या मतदारांनी चोख उत्तर दिले,आता किमान देशाची माफी मागावी अशी चाटूकारितेची संपूर्ण सीमा ओलांडणा-या त्या मोदी अंधभक्त नेत्याकडून जनतेला अपेक्षा आहे.

थोडक्यात,मोदी यांचा कार्यकाळ,संसदेतील भाषणे,विरोधकांविषयीची मते,धोरणे,परिणाम,सर्वोच्च न्यायालयासोबतच संघर्ष,शेतक-यांचे आंदोलन,आर्थिक नीतीचा बोजवारा,महागाई,उद्योगपतीस्नेही धोरणे,निवडणूक रोखे,पॅगेसस,राम मंदिरची प्रतिष्ठापणा,सोशल मिडीयाची मुस्कटदाबी ,मणिपूर इत्यादी घटनाक्रमांचा सखोल आढावा ‘सत्ताधीश’ घेणार असून लवकरच काही भागांमध्ये ‘सत्ताधीश’च्या वाचकांसाठी प्रसिद्ध होणार आहे.मोठ्या प्रमाणात www.sattadheesh.com ला सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या