

नेहरूनगर, मंगळवारी झोनची कारवाई
नागपूर, ता. ७ : नागपूर महानगरपालिकेची रीतसर परवानगी न घेता फुटपाथवर गणेश मूर्ती विक्रीची दुकाने थाटणाऱ्या नेहरूनगर व मंगळवारी झोनमधील दुकानदारांचे अतिक्रमण अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले. ही कारवाई मंगळवारी (ता. ७) सायंकाळी करण्यात आली.
नेहरू नगर झोनअंतर्गत येणाऱ्या दिघोरी पुलाखाली अनेक विक्रेत्यांनी कुठलीही परवानगी न घेता दुकाने थाटली होती. याबाबत माहिती मिळताच मनपा आयुक्तांच्या आदेशान्वये नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिघोरी पुलाखालील सर्व दुकाने अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविली व रस्ता मोकळा केला.
दुसरी कारवाई मंगळवारी झोनमध्ये करण्यात आली. या झोनअंतर्गत येणाऱ्या परिसरामध्ये विनापरवानगी लावण्यात आलेल्या गणेश मूर्ती विक्रीच्या तीन दुकानांवर कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त विजय हुमने यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.




आमचे चॅनल subscribe करा
