Advertisements

‘वोट चोर गद्दी छोड‘:३ सप्टेंबर दूपारी १२ वाजता विशाल रॅलीचे आयोजन

सतेज पाटील,वडेट्टीवार,यशोमती ठाकूर,सपकाळ यांच्यासह विदर्भातील सर्व खासदार,आमदार राहणार उपस्थित
नागपूर,ता.३० ऑगस्ट २०२५: काँग्रेसचे शीर्षस्थ नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी महाराष्ट्र विधान सभा निवडणूकीतील ‘मत चोरी‘चा मुद्दा देशभर पेटवला आहे,हाच मुद्दा घेऊन येत्या ३ सप्टेंबर रोजी दूपारी १२ वाजता कामठी येथील कृषि उत्पन्न बाजार परिसरात ‘वोट चोर,गद्दी छोड‘या विशाल रॅलीचे आयोजन काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले असल्याची माहिती रवींद्र दरेकर यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.याप्रसंगी मंचावर सावनेरचे माजी आमदार सुनील केदार,रामटेकचे खासदार शाम बर्वे,माजी आमदार राजेंद्र मुळक,आ.अभिजित वंजारी,पक्षाचे सरचिटणीस प्रफूल्ल गुडधे पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर,उपाध्यक्ष कुंदा राऊत आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना दरेकर म्हणाले, की कामठीपासूनच या आंदोलनाची सुरवात यासाठी होत आहे कारण राहूल गांधी यांनी महाराष्ट्र विधान सभेतील ‘वोट चोरी’चे प्रकरण दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयात उघडकीस आणले त्यावेळी त्यांनी या वोट चोरीच्या माहितीची सुरवात कामठी विधान सभा मतदारसंघातून केली होती. त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ज्याप्रकारे सुनियोजित पद्धतीने मत चोरी झाली त्याचा खुलासा केला.त्यामुळेच कामठीपासूनच या आंदोलनाची सुरवात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण देशामध्ये झालेला ‘मत चोरी’चा प्रकार सर्वांनी देशाच्या संसदेत देखील पाहीले. देशाच्या स्वातंत्र्य काळात पहिल्यांदा देशाच्या इतिहासात असे घडले आहे.संसदेतील तीनशे खासदार हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या मार्गावरुन चालत,व्यवस्थेविरुद्ध आपला आवाज उचलत असल्याचे दिसून पडत आहे,असे माजी आमदार सुनील केदार यांनी याप्रसंगी सांगितले.महत्वाचे म्हणजे ही अशी व्यवस्था आहे जी लोकांचा,खासदारांचा,लोकप्रतिनिधींचा आवाज न ऐकणे हाच आपला अधिकार समजते.राहूल गांधी यांनी सर्वसामान्य मतदाराला जो मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे,त्याचीच चोरी होत असल्याने त्या विरोधात देशभरात एल्गार पुकारला आहे.हा अधिकार सर्वसामान्य मतदारांना कोणत्याही सबसिडीतून मिळाला नाही,आंदणात दिला नाही,प्रलोभनातून मिळाला नाही तर या मतदानातूनच देशाची लोकशाही राजकीय व्यवस्था निर्धारित झाली आहे. संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्यावेळी प्रत्येक पात्र भारतीय नागरिकाला मतदानाचा जो हक्क मिळाला आहे,तो सर्व राजकीय विचारधारेच्या नेत्यांनी स्वीकृत केला होता,यावरुन त्या मतदानाचे महत्व आणि गांर्भीर्य विशद होतं.आज तोच विषय घेऊन ,आमचे नेते राहूल गांधी यांचा विचार घेऊन येत्या ३ तारखेला कामठीमध्ये एल्गाराची सुरवात करीत असल्याचे केदार म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे यावर आपली भूमिका मांडतील,उत्तर हे द्यावेच लागेल, आता महाराष्ट्रातील मत चोरीचा आवाज संपूर्ण देशात निनादल्याशिवाय राहणार नाही,हा लढा प्रत्येकाचा आहे.कुठलाही वर्गाचा नागरिक असो किवा प्रशासनातील व्यक्तिंचा असो,शेतकरी असो किवा महाविद्यालयीन विद्यार्थी असो.पत्रकार असो किवा त्यांचा मालक असो,संविधानाने दिलेल्या या अधिकाराची चोरी त्यांनी खपवून घेऊ नये,संविधानाने दिलेल्या मतदानातून सरकार निवडीचा अधिकार कोणीही चोरुन घेता कामा नये,हिरावून घेता कामा नये,ही भूमिका पुनश्च या देशा पुढे मांडण्यासाठी कामठीतून सुरवात करणार असल्याचे याप्रसंगी केदार यांनी सांगितले.
निवडणूक आयोग विरोधकांचे कोणतेही म्हणने मनावर घेत नाही,याकडे लक्ष वेधले असता,पाणी कुठे मुरतंय हे देशातील जनतेला त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरुन कळले असल्याचा टोला केदार यांनी हाणला.लोकांमधून निवडून आलेले तीनशे खासदार यांना न भेटने हा निवडणूक आयोगाचा लोकशाहीला घातक असल्याचा दृष्टिकोण असल्याची टिका त्यांनी केली.सावनेरच्या पराभवाकडे कसे बघता?असा प्रश्न करुन विधान सभा निवडणूकीत रामटेकमध्ये डॉ.राजेंद्र मुळक यांच्या विजयाचे वारे वाहत असताना अचानक विजय कसा काय निसटला?असा प्रश्न केला असता.या सर्वांची उत्तरे कामठीच्या महारॅलीत मिळणार असल्याचे सूचक उत्तर केदार यांनी दिले.
अखिल भारतीय काँग्रेस कमेटीने ‘वोट चोर,गद्दी छोड‘हा जो मुद्दा घेतला आहे,लोकशाहीमध्ये त्याचे गांर्भीय बघता असे आंदोलन प्रत्येक विभागामध्ये झाले पाहिजे,या उद्देशाने याची सुरवात आम्ही कामठी मतदारसंघापासून करीत असल्याचे याप्रसंगी प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी सांगितले.महाराष्ट्रात ब-याच मतदारसंघात सुनियोजित पद्धतीने काँग्रेसचे हमखास जिंकणारे नेते,आमदार यांना मत चोरीतून पराभूत करण्यात आले आहे.यामुळे नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसने या विरोधात आंदोलनाची जबाबदारी उचलली असल्याचे त्यांनी सांगितले.हा राज्यस्तरीय मेळावा असल्याचे सांगून विदर्भातील सर्व खासदार,आमदार यात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोल्हापूरात आ.सतेज पाटील यांच्या नेतृत्वात शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध होत आहे .८६ हजार कोटींचा व ८२ हजार एकरवर साकारला जाणा-या शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून मुख्यमंत्री हे नागपूरचे आहेत,परंतू त्याच नागपूरात काँग्रेसकडून कोणताही विरोध मुख्यमंत्र्यांच्या या ड्रीम प्रोजेक्टला होताना दिसत नाही,असा प्रश्न केला असता हा वेगळा विषय असल्याचे सांगून आजची पत्रकार परिषद ही कामठीतील एल्गार आंदोलनाची माहिती देण्यासाठी असल्याचे प्रफूल्ल गुडधे पाटील म्हणाले.
‘मत चोरी’चा मुद्दा बिहार निवडणूकीत चांगलाच गाजतोय,बिहारमध्ये काँग्रेस व तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल विजयी होणार का?असा प्रश्न केला असता,आम्ही बिहार जिंकलो आहे,असे उत्तर खासदार शाम बर्वे यांनी दिले.बिहारमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसची कार्यालये फोडली जात आहे,हे आमच्या विजयाचेच द्योतक असल्याचे बर्वे यांनी सांगितले.आता जनता थांबणार नाही आणि वोट चोरी देखील होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत व्हीव्हीपॅटचा वापरच होणार नाही,असे राज्य निवडणूक आयुक्तांनी घोषित केले,याकडे कसे बघता,असा प्रश्न केला असता,प्रदेशाध्यक्ष सपक़ाळ यांच्यासह मी स्वत:राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली असल्याचे प्रफूल्ल गुडधे म्हणाले.व्हीव्हीपॅट,बॅलेट यूनिट व कंट्रोल यूनिट मिळूनच ईव्हीएमची निर्मिती होत असते,अश्यावेळी व्हीव्हीपॅटच काढून टाकण्यात येत असेल तर फक्त दोन यूनिटच्या भरवश्यावर निवडणूक कशी होऊ शकते?याचे उत्तर माहितीच्या अधिकारात मागितले आहे मात्र,अद्याप ते आम्हाला मिळाले नसल्याचे गुडधे यांनी सांगितले.
नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी तर नागपूर महानगरपालिकेत १२५ जागा भाजप जिंकणार असल्याचा दावा केला आहे.मनपाची निवडणूक देखील ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातूनच जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे का?असा प्रश्न त्यांनी केला.
अधिवेशनात तब्बल २३ दिवस संसद ठप्प होती.विरोधक फक्त महाराष्ट्राच्या मत चाेरीवर चर्चा मागत होते,कायद्या नाही,तरी देखील केंद्र सरकारने पळ काढला,असा चिमटा खासदार शाम बर्वे यांनी काढला.भाजप चर्चेपासून यासाठी पळाली कारण ते संसदेच्या पटलावर आले असते व त्यांचे पितळ उघडे पडले असते,असा दावा त्यांनी केला.
काँग्रेस पक्षाच्यावतीने एवढी मोठी महारॅली कामठीत पार पडणार आहे मात्र,काँग्रेसचे आमदार व शहराध्यक्ष विकास ठाकरे हे तुमच्यासोबत मंचावर का नाही?असा प्रश्न केला असता,सध्या गणपतीचा उत्सव सुरु आहे ते उत्सवात व्यस्त असतील,असे उत्तर आ.अभिजित वंजारी यांनी दिले.
(बातमीशी संबंधित सर्व व्हिीडीयोज Sattadheesh official यूट्यूब चॅनलवर उपलब्ध)
Advertisements

Advertisements

Advertisements
