

पत्रभेटच्या ‘अक्षय दान’ उपक्रमाचे उद्घाटन
नागपूर,दि.१४ मे: लौकिक जीवनात परमार्थापर्यंत पोहोचायचे असेल दानाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यातले अन्नदान, विद्यादान महत्वाचे आहे. विद्याधन हे अक्षय्य धन असून त्याचे दान करा, असे आवाहन सद्गुरूदास महाराजांनी केले.
अक्षय तृतीयेच्या पर्वावर पत्रभेटच्यावतीने ज्ञान दानाचा कार्यक्रम ‘अक्षय्य दान’ चे उद्घाटन आभासी पद्धतीने प. पू. सद्गुरूदास महाराजांच्या उपस्थितीत झाले.

सद्गुरूदास महाराज म्हणाले, ऋषीमुनींच्या काळापासून विद्यादानाचे काम अखंडपणे चालत आले आहेत. गुरूने दिलेले शिष्याचे ज्ञान जीवन घडवत असते. गुरूच्या मुखातून आलेल्या मंत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य असते. गुरू स्पर्शाने दिव्यत्वाची अनुभूती प्राप्त होते. मन आणि प्राण एकवटून जर हा गुरूंचा मंत्र स्वीकारला, त्याचा जप केला तर परमार्थ प्राप्ती होते, दैवी आनंद प्राप्त होतो.
पुण्याच्या श्री वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त शरदशास्त्री जोशी महाराज यांनी ‘प. पू. श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांच्या लोककल्याणकारी मंत्रांची उपयुक्तता’ या विषयावर भाष्य केले. ते म्हणाले, वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांनी भारतीय तत्वज्ञान व विचार साधनेमध्ये मौलिक भर घातली आहे. त्यांच्या साहित्यातून गुरूचरित्रासारख्या ग्रंथाचा प्रचार व प्रसार करण्याचे महत्वाचे कार्य झाले आहे.

लोकवर्धक, लोककल्याणकारी असे हे साहित्य प्रासादिक व सिद्ध आहे. त्यांनी त्यातून दिलेला गुरूमंत्र हा लोककल्याणकारी आहे, असे ते म्हणाले. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या स्वामींच्या पहिल्या मंत्राविषयी सांगताना ते म्हणाले, त्यांना स्फुरलेला हा पहिला मंत्र असून तो विश्वशांती मंत्र आहे. गायत्रीतुल्य असा हा मंत्र लोकमंगल, लोकवर्धक, लोककल्याणकारी असा असून तो सर्वदूर जपला जातो.
सुरूवातीला चिन्मय मनीषराव यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. त्यानंतर प्रज्ञा फडणीस यांनी प्रास्ताविक केले. किरण गोडबोले यांनी प्रमुख वक्त्यांच्या परिचय करून दिला. आज, 15 मे रोजी सायंकाळी 7 वाजता पुण्याच्या श्री वासुदेव निवासचे विश्वस्त देवीदास जोशी ‘प. पू. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज प्रणीत मानसपूजा’ या विषयावर व्याख्यान होईल.




आमचे चॅनल subscribe करा
