साहित्य संस्था वाचवा …
नागपूर,ता.२२ जानेवरी २०२६: विदर्भ साहित्य संघाची निवडणूक टाळली जाणे व सर्व संबंधितांनी एकत्र बसून मार्ग काढणे विदर्भ साहित्य संघ या संस्थेचा किमान सुमारे १५ लाखांचा निवडणुकीवर होणारा प्रचंड खर्च वाचवून तो पैसा संस्थेच्या कार्यावर खर्च होईल हे बघणे संस्था हिताचे असल्याने अजूनही अतिशय आवश्यक आहे,ही बाब कोणीच विचारात घेताना दिसत नाही.
केवळ स्वलाभकेंद्री आणि आपल्या व्यक्तिगत आकांक्षापूर्तीचे साधन म्हणून सेवाभावी,स्वयंसेवी संस्थेचा वापर हा तिचे रूपांतर एखादे सत्ताकेंद्र असलेल्या पण मुळात तसे नसलेल्या राजकीय स्वरूपाच्या संस्थेत यातून होण्याची शक्यता प्रथमच निर्माण झाली आहे.असे आपल्या निवेदनातून ज्येष्ठ साहित्यिक साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व यंदाच्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूकीत अध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मत व्यक्त केले आहे.
ते अशा प्रकृतीच्या संस्थांसाठी इष्ट नक्कीच नाही.जिल्हा परिषद,ग्राम पंचायत, नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच प्रत्येक संस्थेकडे बघणे व केवळ निवडणूक म्हणजेच लोकशाही एवढी मर्यादित बाळबोध व्याख्या लोकशाहीची करणे म्हणजेच फक्त लोकशाही नव्हे.लोकशाहीत विवेक ही देखील महत्वाची बाब असते.
विदर्भ साहित्य संघ ही प्रामुख्याने भाषा, साहित्य, संस्कृतीशी संबंधित गांभीर्याने कार्य करण्याकरता निर्माण झालेली सेवाव्रती,स्वयंसेवी लेखक,साहित्यिक अशा समर्पित कार्यकर्त्यांची संस्था आहे.केवळ तथाकथित साहित्यप्रेमी नावावर कोणीही चालवण्यासाठी निर्माण झालेली ही संस्था नाही हे लक्षात घेतले पाहिजे.तसेच ती व्यापारी, राजकारणी,प्रशासक,राजकीय नेते यांनी देखील चालवण्याची संस्था नाही.सदस्यांनी देखील हे लक्षात घेऊनच त्या पद्धतीने ती टिकेल व तशीच वाङ्मयीन प्रतिमा,प्रतिष्ठा असणारी माणसे तिथे असतील हे बघणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे विदर्भ साहित्य संघ ही भाषा, साहित्य, संस्कृती,अभिरूची,अभिव्यक्ती,वाङ्मयीन प्रतिभा याचे जतन,संवर्धन करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी स्थापली गेलेली संस्था आहे.त्यातील संघ हा शब्द संघ भावनेचा,समूह भावनेचा निदर्शक असून तो पाली शब्द हा संघभावनेच्या,समर्पित व समूह भावनेने कार्य करण्याच्या अर्थाचा द्योतक आहे. कोणत्याही विशिष्टच विचारसरणीच्या संघाचा तो द्योतक नाही.हे विदर्भ साहित्य संघाच्या इतिहासात नमूद आहे, वेळोवेळी अनेकांनी आपल्या लेखांमधून हा इतिहास ज्ञात करून दिला आहे.हे देखील संबंधितांनी लक्षात ठेवावे.
कार्यकारी मंडळात पूर्वीही वेगवेगळ्या विचारसरणीचे थोर,जुने,नवे असे कार्यकर्ते होते.
मात्र ते आपापल्या वैचारिक निष्ठा वा आप आपल्या विचारसरणीच्याच तेवढ्या संघ भावनेने नव्हते तर ते बाजुला ठेवून संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठीच तेवढे राबत होते.
कोणत्याही विशिष्टच विचारसरणीने,राजकारण्याने वा शासनाने कोणत्याही विभागीय साहित्य संस्थेत, विदर्भ साहित्य संघात,कधीही थेट हस्तक्षेप,जो आज खुलेपणाने आमंत्रित केला जातो आहे,राज्यात इतरत्र होताना दिसतो आहे तसा आजवर गेल्या शंभर वर्षात केलेला नव्हता.
आज विदर्भ साहित्य संघ व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या तत्सम विभागीय साहित्य संस्थांसमोर अशा एखाद्या विशिष्टच विचारसरणीच्या दावणीला, राजकारण्यांच्या दावणीला, राज्यकर्त्यांच्या दावणीला संस्था बांधली जाण्याचे, शासनाच्या हस्तक्षेपाचे आव्हान उभे आहे.
तसेच लेखक असणाऱ्या, प्रतिभावान असणाऱ्या, साहित्य संस्थेला आवश्यक वाङ्मयीन दिशादर्शक नेतृत्वाच्या जागी तथाकथित प्रशासकीयतेचे स्वयंघोषित कौतुक करणारे व अवाङ्मयीन असणाऱ्या नेतृत्वाने संस्था ताब्यात घेण्याचे धोके उभे आहेत.
विदर्भ साहित्य संघाच्या व तत्सम विभागीय साहित्य संस्थांच्या मूळ प्रकृतीला व स्वायत्ततेला गंभीर धोका त्यामुळे निर्माण झाला आहे.साहित्य संस्था या राजकारणी,अवाङ्मयीन नेतृत्व आणि विशिष्टच विचारसरणी लादू बघणाऱ्यांपासून,व्यापाऱ्यांपासून वाचवायला हव्यात.
या पार्श्वभूमीवर गेली ५५ वर्षे केवळ व्यापक मराठी हित आणि विदर्भ साहित्य संघाचेही व्यापक संस्थात्मक हित ज्यात असेल अशीच,सर्व अस्मितांच्या सर्व प्रवाहांना संस्थेशी जोडून घेणारी सर्वसमावेशक भूमिका विदर्भ साहित्य संघ,अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात व संस्थेबाहेरही सर्वत्र घेतलले व’ मराठीच्या भल्यासाठी’ आणि ‘ मराठीच्या व्यापक हितासाठी ‘ ४० संस्था व ६० मान्यवरांच्या चळवळीचे प्रमुख संयोजक,मराठीला अभिजात दर्जा मिळवण्याचा संघर्ष करत तो मिळवून देण्यात यशस्वी झालेले,मराठी विद्यापीठ स्थापनेचा सतत पाठपुरावा करत ते राज्याकडून स्थापन करून घेणे, दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा कायदा करून घेणे ,
‘ मराठी भाषा विकास प्राधिकरण ‘ कायदा करून शासनाने स्थापावे यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले, महाराष्ट्राला प्रथमच मराठी भाषा धोरण देणाऱ्या राज्य भाषा सल्लागार समितीत त्यासाठी प्रमुख भूमिका निभावणारे,शासनाने सांस्कृतिक धोरणाचे पुनरीक्षणाचा पाठपुरावा करत ते पुनरीक्षण करवून घेणारे, महाराष्ट्रातील सुमारे २५० सांस्कृतिक संस्थांची आघाडी उभारून राज्याच्या सांस्कृतिक विकासासाठी,राज्य सांस्कृतिक विकास मंडळ आणि विभागीय सांस्कृतिक विकास मंडळे राज्याने स्थापन करावीत या साठी शासनाकडे पाठपुरावा करणारे,हिंदी आणि तिसरी भाषा सक्तीचे शासन निर्णय मागे घ्यायला शासनाला बाध्य करणारे या व अशा अनेक भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक बाबींच्या चळवळीचे एक अध्वर्यू , अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी संस्थेच्या निवडणुकीत व्यक्तिगत आकांक्षा बाळगण्या ऐवजी संस्थात्मक आकांक्षा बाळगाव्या असे आवाहन अनेकदा केले होते.
मात्र अद्याप तरी त्या दिशेने ठोस पावले टाकली जाणे बाकी आहे.
दरम्यान प्रख्यात ज्येष्ठ कवी इ.मो. नारनवरे यांनी या पार्श्वभूमीवरच डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेले आवाहन केवळ भावनिक म्हणून दुर्लक्षित केले जाऊ नये. श्रीपाद कर्ता साहित्यिक विचारवंत आहे. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ वि.सा.संघाचा उपाध्यक्ष म्हणून धुरा वाहणारा श्रीपाद भालचंद्र जोशी विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष म्हणून मनोनित होणे विदर्भ साहित्य संघाच्या तमाम सभासदांचाही गौरव वाढविणारे ठरावे,असे म्हटले आहे.
म्हणूनच आम्ही,विदर्भ साहित्य संघाला सर्वप्रवाही, सर्वसमावेशक वळण लावण्यात आणि ती अपेक्षित अशी सुमारे ४० वर्षे टिकवून धरण्यात,तिला प्रतिष्ठा व ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यात, विदर्भ साहित्य संघाचे सुमारे तीस वर्षे उपाध्यक्ष राहिलेले व या संस्था चालनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या ज्येष्ठ कवी,लेखक, साहित्यिक, पत्रकार, संपादक,संवाद-माध्यम तज्ज्ञ असणारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पूर्वाध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांना या संस्थेला पूर्वीप्रमाणे सुस्थापित करून देण्यासाठी अध्यक्षपदाचे उमेदवार होण्यासाठी अनुमती मागितली व ती त्यांनी दिली याचा आम्हाला आनंद आहे.त्यांचे दिशादर्शक वाङ्ममीन, सांस्कृतिक नेतृत्व विदर्भ साहित्य संघाला पुनः एकदा गमावली गेलेली प्रतिष्ठा प्राप्त करून देईल व संस्थेतील हरवलेला संवाद पुनःस्थापित करेल याची आम्हाला खात्री आहे.
श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यासोबत त्यांच्या पॅनेलमध्ये असणाऱ्या संपूर्ण २२ कार्यकारी मंडळ सदस्यांसाठी अर्ज अगोदरच अर्ज दाखल झाले असून त्यातील नावे ९ फेब्रुवारी नंतर जाहीर केली जाणार आहेत.
आज त्यांचे आम्ही सूचक,अनुमोदक त्यांच्यासह त्यांचा अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल करण्यासाठी इथे हजर आहोत.
सूचक–डाॅ शरद निंबाळकर
विनोद देशमुख
अनुमोदक–मेघना वाहोकार
वसंत वाहोकार
प्रकाश दुलेवाले
दादाकांत धनविजय
ज्ञानेश्वर वांढरे
………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
