फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजविदर्भ साहित्य संघ अध्यक्ष पद निवडणूक मालमत्तेसाठी!

विदर्भ साहित्य संघ अध्यक्ष पद निवडणूक मालमत्तेसाठी!

Advertisements
नागपूरातील साहित्य वर्तुळात चर्चा

साहित्याशी संबंध नसणा-यांनीही भरले उमेवारी अर्ज
नागपूर,ता.२२ जानेवरी २०२६: एकेश तीन वर्षांची परंपरा असलेली विदर्भ साहित्य संघ ही विदर्भातील सर्वात जुनी आणि मोठी साहित्य संस्था आहे.ही संस्था अण्णासाहेब खापर्डे यांनी १४ जानेवरी १९२३ रोजी अमरावती येथे  स्थापन केली.त्यानंतर मार्च १९५० मध्ये तिचे मुख्यालय नागपूरात हलविणयात आले.आजही ही संस्था शहरातील ह्दयस्थानी असलेल्या झांशी राणी चौकात दिमाखात उभी आहे.काळानुसरुप संस्थेच्या ईमारतीत व अंतर्गत साहित्यिक कारभारात अनेक बदल झाले असले तरी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरसह संपूर्ण विदर्भातील साहित्य क्षेत्राची ही गंगोत्री आहे.
अश्‍या या विदर्भ साहित्य संघाची २०२१-२०२६ या काळातील कार्यकारिणी तत्कालीन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष दिवंगत मनोहर म्हैसाळकर यांनी जाहीर केली होती.विलास मानेकर यांची सरचिटणीस पदी फेरनियुक्ती झाली होती.कार्याध्यक्ष म्हणून डॉ.रवींद्र शोभणे यांची तर डॉ.रमाकांत कोलते व डॉ.राजेंद्र डोळके यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.प्रदीप दाते शाखा समन्वय चिटणीस होते, याशिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर अन्य प्रतिनिधी म्हणून देखील विदर्भ साहित्य संघाकडून विलास मानेकर,प्रदीप दाते व डॉ.गजानन नारे यांची नियुक्ती झाली.विदर्भ साहित्य संमेलनाच्या आमंत्रक पदाची जबाबदारी डॉ.रवींद्र शोभणे यांच्यावर सोपविण्यात आली.
पुढे म्हैसाळकर यांच्या मृत्यू नंतर अध्यक्ष पदाची धूरा दाते यांच्या खांद्यावर आली.१९ ऑक्टोबर २०२२ रोजी दाते यांची कार्यकारिणीच्या तातडीच्या बैठकीत अध्यक्षस्थानी निवड झाली होती.
२०२६ मध्ये या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला असल्याने नव्याने विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत.वीस वर्षांनंतर विदर्भ साहित्य संघाची अध्यक्ष व कार्यकारिणीसाठी प्रत्यक्ष निवडणूक होत आहे.
अध्यक्ष पदासाठी साहित्य,नाट्य,वैद्यकीय तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातून देखील उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत मात्र,ज्यांचे साहित्य क्षेत्रात फारसे योगदान नाही त्यांनी अध्यक्ष पदासाठी निवडणूकीत सहभाग नोंदविल्याने साहित्य विश्‍वात संशयाचे दाट धूके साचले असून,साहित्य संघा ऐवजी साहित्य संघाच्या अब्जावधीच्या मालमत्तेची पुरती वाट लावण्याचा हा घाट असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरु झाली आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या शंभर वर्षांच्या जडणघडणीत अनेकांनी हातभार लावला आहे.शतकभराच्या इतिहासात या संस्थेने उत्तरोत्तर प्रगती केली.समाजातील विविध क्षेत्रातील लोकांना जोडणा-या वि.सा.संघाने विदर्भातील सामाजिक मनावर संस्कार रुजवण्याचे महत्वपूर्ण कार्य केले,असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १४ जानेवरी २०२३ रोजी वि.सा.संघाच्या शतक महोत्सवी वर्षातील वाड्:मय पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी काढले.मंचावर शताब्दी महोत्सवाचे संयोजक गिरीश गांधी,सुप्रसिद्ध उद्योगपती आशुतोष शेवाळकर,रविनगर येथील दंदे हॉस्पीटलचे संचालक डॉ.पिनाक दंदे आदी उपस्थित होते.महत्वाचे म्हणजे गिरीश गांधी,डॉ.पिनाक दंदे यांनी देखील या निवडणूकीत अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
लोकशाहीत निवडणूक लढण्याचा संवैधानिक अधिकार प्रत्येकाला आहे,विदर्भ साहित्य संघाचा सदस्य म्हणून हा अधिकार प्रत्येक सदस्याला असला तरी,साहित्य क्षेत्र हा राजकारणाचा  तसेच राजकारणातून अमर्याद अर्थकारण साधणारा प्रांत नव्हे,असा संताप व्यक्त होत आहे.चार-चार दशके पत्रकारितेत घालवणा-यांनी स्वत:च्या क्षेत्रात कोणता उच्चांक साधला?हे करोनाच्या जीवघेण्या दोन वर्षांच्या काळखंडात सर्वांना कळले आहे.स्वत:चे पद टिकवण्यासाठी हातावर पोट असणा-या व कुटूंबात एकमेव कमविणा-या अनेक कर्मचा-यांना व पत्रकारांना ज्याप्रकारे एका आदेशाद्वारे नोकरीतून काढण्यात आले ती कृती माणुसकीला काळीमा फासणारीच होती.अनेकांच्या घरात चूल पेटली नाही.जगणे भेसूर झाले,आत्मविश्‍वास कायमचा कोलमडून पडला,मुलांची पोटं व शिक्षणाच्या काळजीने काळजाचेच पाणी पळवले.अनेकांनी घरा-दारासाठी नोकरीच्या भरवश्‍यावर कर्ज घेतले होते,त्यांच्या छातीतील कळ ही तीव्र वेदना देणारी होती मात्र,‘आदर्शवत’क्षेत्रातील माणसे ही ‘बुजगावणी’ झाली होती.संवेदना नसणारी…पोटात अन्नाचा दाना असतो तेव्हाच साहित्याच्या ओळी सूचत असतात हे कालत्रयातीत सत्य आहे.
परिणामी,जीव ओतून ज्या कामावर प्रेम केले त्याच कामाचा तिटकारा कायमचा मनात दाटला.संपादक आणि मालक हे ‘यमाचे साथीदार’भासू लागले.नरडीचा घोट घेणारे…आयुष्य उधवस्त करणारे…ज्यांनी स्वत:च्या क्षेत्रात ‘ईमान ’नाही राखला ते साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पद गाठून,साहित्य व साहित्य संघाच्याच्या भल्यासाठी कोणते ‘ब्रम्होस’ निर्माण करणार आहेत?असा संतापाचा सूर आता ऐकू येतोय.सन्मान आणि विश्‍वासाच्या पदावर असल्यामुळे आधी विदर्भ साहित्य संघाचे सहज सदस्यत्व मिळवले,आता त्या पदाचा आपापल्या महत्वाकांक्षेसाठी ‘सदुपयोग’करीत असल्याचा टोला ही हाणण्यात आला.
वैद्यकीय,शिक्षण,नाट्य,पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या या अट्टहासा मागे अनेकांना षडयंत्र दिसू लागले आहे.नागपूर शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एका बापमाणसाला,म्हणजे एका उमेदवाराला केंद्रातील कद्दावर नेत्याचेच बळ असून त्यांच्या माध्यमातून विदर्भ साहित्य संघाची मोक्याची जागा यावर त्यांचा डोळा असल्याचा आरोप केला जात आहे.साहित्याच्या ‘स’मध्ये ‘सरस्वती ’ व ’सेवा’दडली असून अश्‍या झारीतील शुक्राचारी राजकारण्यांना साहित्याच्या ‘स’मध्येही अब्जावधीच्या मालमत्तेचा ‘मेवाच’दिसून पडत असल्याचा रोष व्यक्त केला जात आहे.
शहरातील या राजकारणी नेत्याच्या मर्जीतील अध्यक्ष झाल्यास इतरांना त्यांच्या पॅनलमध्ये राहायचे असल्यानेच अनेकांनी उमेदवारी अर्ज भरले असल्या आरोप होत आहे. निवृत्तीच्या तोंडावर आलेल्यांनी निवृत्तीनंतरची ‘सोय’म्हणजेच ‘सहित्य’अशी सोयीस्कर कृती स्वीकारली असून,अश्‍या विचारधारेच्या उमेदवारांसाठी ही निवडणूक ‘सोयीची’करण्यात आल्याची परखड व बोचरी टिका ही उमटलेली दिसून पडतेय.पत्रकारिता,शिक्षण,वैद्यकीय इत्यादी सगळेच क्षेत्र हे आताच्या काळात ‘धंदा’झाले आहेत आणि धंदेवाईक हे केवळ ‘नफ्यासाठी’जगत असतात,आम्हाला हे जमले नाही,साहित्य संघात वेगवेगळी पदे भूषवली मात्र,कधीच संघाची मालमत्ता विकण्याची,या इमारतीसाठी उचललेले कर्ज व, ते उरावर असलेले कर्ज फेडण्याची कुबुद्धी आम्हाला सूचली नाही,अशी उपरोधकि खंतही काही साहित्यिक खासगीत मांडतात.
फक्त नागपूरच नव्हे तर पुणे-मुंबईत देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने साहित्य संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला,स्वयंसेवकाचे पॅनल या दोन्ही ठिकाणी लढले मात्र,आमच्या सर्तकतेने तेथील साहित्य संघातील  प्रशासनाचा ताबा त्यांना मिळू दिला नाही व त्यांचा पराभव झाला.नागपूरात देखील हेच प्रयत्न सुरु असून,तद्दन व्यवसायिक झालेल्या राजकीय नेत्याला ‘आपला माणूस’सर्वोच्च पदावर बसवायचा आहे,यासाठी ख-या साहित्यसेवकांनी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरताच,तद्दन व्यवसायिक देखील पुढे सरसावलेले दिसून पडतात.
या ही निवडणूकीत मतदान पोस्टाद्वारे होणार असल्याने व एका मोठ्या बिल्डरच्याच सदस्यांचा मोठ्या प्रमाणात मतदार म्हणून भरणा असल्याने या मत पत्रिकेंवर काय उमटणार आहे?हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही वरुन काही उमेदवारांकडे अतोनात पैसा आहे,तो कधी उपयोगी पडेल?असा सरळ आरोप या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एेकू येतोय.त्यामुळेच ही निवडणूक टाळून सर्वसंमतीने अध्यक्षांची ‘निवड’यावर अनेक सहित्यिक भर देत आहेत.
……………………………………….
तळटीप:-
विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्ष पदासाठी आतापर्यंत डॉ.गिरीश गांधी,लखनसिंग कटरे,डॉ.रवींद्र शोभणे,डॉ.रंजन दारव्हेकर,डॉ.पिनाक दंदे,संपादक श्रीपाद अपराजित,प्रमोद भुसारी,नरेश गडेकर,सतीश तराळ व डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी अर्ज सादर केला आहे.श्रीपाद अपराजित यांनी अध्यक्ष तसेच कार्यकारिणी सदस्यत्वासाठीही अर्ज सादर केला आहे.त्याच बरोबर ज्येष्ठ संपादक शैलेश पांडे,संपादक श्रीमंत माने व संपादक देवेंद्र गावंडे यांनी देखील सदस्यत्वासाठी अर्ज सादर केला आहे.ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.रंजन दारव्हेकर यांनी यंदाची निवडणूक बिनविरोध न होता,पारदर्शक व सकारात्मकतेने लढवली जावी,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
……………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या