
:

नागपूर,ता.१४ ऑक्टोबर २०२२: विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे आज निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांचा जन्म अमरावतीला झाला होता. त्यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयमध्ये झाले होते. त्यानंतर ते नागपूरला काही काळ सोमलवार हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. त्यानंतर त्यांनी मॉइल मध्ये नोकरी केली आणि मॉइलमधून सेवानिवृत्त झाले.
१९७२ साली त्यांचा विदर्भ साहित्य संघामध्ये प्रवेश झाला. १९८३ पर्यंत त्यांनी विविध पदे भूषविली. त्यानंतर १९८३ ते २००६ पर्यंत ते सरचिटणीस होते. २००६ ते आजपर्यंत त्यांनी विदर्भ साहित्य संघातचे अध्यक्ष पद भूषविले.
रंजन कला मंदिरामध्ये ते सक्रिय होते. रंजन कला मंदिरचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर क्रिकेट असोसिएशन मध्ये सुद्धा त्यांनी काम केले. ‘स्वरसाधना’ या संगीतसंस्थेमध्ये सुद्धा त्यांनी काम केले. संगीत, क्रिकेट नाटक आणि तत्सम सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्यांमध्ये ते अग्रेसर होते.
१९७२ पासून त्यांनी स्वतःला विदर्भ साहित्य संघासाठी वाहून घेतले होते. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ते ख्यातकीर्त होते. विदर्भ साहित्य संघ कार्यकर्त्यांच्या,साहित्यिकांच्या तीन पिढ्या त्यांनी घडवल्या.
विदर्भ साहित्य संघाने २००७ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूरात आयोजित केले होते. यंदाचे हे वर्ष विदर्भ साहित्य संघाचे शतक महोत्सवी वर्ष आहे आणि शतक महोत्सवी वर्षाच्या या कार्यक्रमांमध्ये सातत्याने वेगळे असायचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प अनेक महत्त्वाच्या गोष्टी करायचे त्यांच्या मनामध्ये होते.
विदर्भ साहित्य संघाच्या जुन्या वास्तू पासून नवीन वास्तू पर्यंतच्या प्रवसाचे ते साक्षीदार होते. तसेच विदर्भ साहित्य संघाच्या हिरक महोत्सव, अमृत आणि शतक महोत्सवाचे ते साक्षीदार होते.
गुरुवारी त्यांच्या प्रकृती मध्ये काही बिघाड झाल्यामुळे त्यांना विवेका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुली अर्चना देव, मंजू घाटे, जावई न्या. रोहित देव तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे.
मनोहर म्हैसाळकर यांच्या पार्थिवावर शनिवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची गोव्यातील आज व उद्याची बैठक रद्द करण्यात आली आहे. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड नोव्हेंबरमध्ये वर्धा येथील बैठकीत होईल.

(छायाचित्र : १९६६-६७ सालीच्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित दिग्दर्शित नयन तुझे जादुगार या नाटकाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाले होते. याच नाटकातील रंगीत तालमीतला हा फोटो…स्वर्गीय पुरुषोत्तम दारव्हेकर स्वर्गीय गणेश नायडू आणि आता मनोहर म्हैसाळकर शेवटचे)
उमदा साहित्यव्रती हरपला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक मनोहर म्हैसाळकर यांना श्रद्धांजली-
मुंबई, दि. १४:- ‘ मराठी वाङ्मयाच्या सेवेला वाहून घेतलेला उमदा साहित्यव्रती हरपला,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘मनोहर म्हैसाळकर यांनी साहित्यिक चळवळीला वाहून घेतले होते. लेखन, संशोधन आणि सर्जनशील साहित्य निर्मिती बरोबरच त्यांनी क्रीडा क्षेत्रात संघटनात्मक कार्य केले. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपदही यशस्वीपणे सांभाळले. त्यांच्या निधनामुळे एक उमदा, अभ्यासू साहित्यव्रती हरपला आहे. ज्येष्ठ साहित्यिक मनोहर म्हैसाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे..
…………………………………………….
एक उत्तम साहित्यिकच नाही, तर एक चांगला संघटक, व्यवस्थापक, खेळाडू आपल्यातून हिरावला गेला:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष श्री मनोहरराव म्हैसाळकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने केवळ एक उत्तम साहित्यिकच नाही, तर एक चांगला संघटक, व्यवस्थापक, खेळाडू आपल्यातून हिरावला गेला आहे.
अनेक दिग्गज साहित्यिक आणि लेखकांना एका सूत्रात बांधण्याचे काम मनोहररावांनी केले. मनोहररावांचे आशीर्वाद असले की, साहित्यातील कुठलेही आयोजन यशस्वीच होते, अशी त्यांची ख्याती. आताही वर्ध्यातील आगामी ९६ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते.
केवळ विदर्भ साहित्य संघच नव्हे, तर अनेक संस्थांशी त्यांचा अतिशय जवळून संबंध आला. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. संपर्कात आलेल्या अनेक संस्था त्यांनी वि.सा.संघाशी जोडल्या. या जाणकार साहित्यिकाचे निधन ही साहित्यजगताची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
……………………………………………
मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची अपरिमीत हानी – सुधीर मुनगंटीवार
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाने अभ्यासू वक्ता, भाषा अभ्यासक, सर्जनशील लेखक, अभ्यासक व संशोधक हरपल्याची शोकभावना सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
मनोहर म्हैसाळकर यांनी साहित्य क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. गेल्या १० वर्षापासून विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. वाड्.मयाच्या क्षेत्रात त्यांनी आयुष्यभर मोलाचे योगदान दिले आहे. विदर्भ साहित्य संघ म्हणजे मनोहर म्हैसाळकर असे जणू समीकरणच बनले होते. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
……………………………………




आमचे चॅनल subscribe करा
