

जीर्णावस्थेमुळे नागरिकांच्या जीवाला धोका : ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे मनपा प्रशासनाला निवेदन
नागपूर, ता. २१ : नागपूर महानगरपालिकेच्या वाठोडा येथील दहन घाट जीर्णावस्थेत असून प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. दहन घाटाच्या जीर्णावस्थेमुळे येथे येणा-या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून यामुळे अपघात होण्याची शक्यत नाकारता येत नाही. त्यामुळे या दहन घाटाची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी मनपा प्रशासनाला केली आहे.
वाठोडा दहन घाटाच्या स्थितीबद्दल ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नागपूर महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांना निवेदन देउन सदर विषयाकडे लक्ष वेधले आहे.

(छायाचित्र: वाठोडा दहन घाटाच्या छताचे तुटलेले पत्रे नागरिकांच्या जीवासाठी धोकादायक ठरत आहेत)
नागपूर महानगरपालिकेच्या नेहरूनगर झोन अंतर्गत वाठोडा दहन घाट आहे. मात्र या घाटाची अवस्था अत्यंत बिकट स्वरूपात असल्याचे दिसून येत आहे. घाटाच्या छतावर लावलेले पत्रे जीर्ण झालेले असून ते खाली लोंबकळत आहेत. त्यामुळे येथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास येणा-या नागरिकांच्याच जीवाला घाटामुळे धोका निर्माण झाल्याची स्थिती आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाचे वाठोडा दहन घाटाच्या व्यवस्थेकडे पूर्णत: दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या जीवासाठी धोकादायक ठरलेल्या दहन घाटाकडे तातडीने लक्ष देउन आवश्यक ती दुरूस्ती करण्याची मागणी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी निवेदनातून केली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
