Advertisements

मोंदीवरही व्यक्तीगत हल्ले
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
दिल्ली,१ जुलै २०२४: लोकसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून राहूल गांधी यांचे पहीलेच संबोधन देशाने आज ऐकले.राहूल गांधींनी आज त्यांच्या हातात हिंदूंचे आराध्य दैवत असणारे भगवान शिव यांचे छायाचित्र लोकसभेत झळकवताच,सत्ताधा-यांसह लोकसभेची कार्यवाही बघणारे संपूर्ण प्रेक्षकही थक्क झाले,यानंतर आज दिवसभर राहूल गांधींचे हे ‘शिवपुराण’विविध माध्यमात चर्चेत राहीले.
राहूल गांधी यांनी आपल्या भाषणात असली हिंदू वर्सेस भाजपचे नकली हिंदूत्व हा मुद्दा मांडला.अयोध्येत भाजपच्या पराभवाचे कारण,शेतक-यांचे आंदोलन,मणिपूर,अग्निवीर योजना,गृहीणींच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा महागाई,विद्यार्थ्यांना छळणारा नीट परिक्षेचा घोळ,संविधान,केंद्रिय संस्थांचा दुरुपयोग ,जम्मू कश्मीर राज्य इत्यादी अनेक विषयांवर पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीला उद्देशून त्यांनी घणाघाती भाषण केले.या सर्व मुद्दांमधून राहूल गांधी यांनी मोदी हे कसे देशातील शेतकरी,गृहीणी,विद्यार्थी पासून तर विरोधकांना भीतीत ठेवण्याचे काम करतात यावर भाष्य केले.
भगवान शिवचे छायाचित्र झळकवत,शिवपुराण आपल्याला ‘डरो मत डराओ मत’हे तत्वज्ञान सांगत असल्याचे राहूल गांधी यांनी सांगितले(अर्थात शिवपुराणात याचा कुठेही उल्लेख नाही)देशातील ११० कोटी हिंदूंचे लक्ष त्यांनी या कृतीतून निर्विवादपणे आकर्षित केले,यात दुमत नाही.आज राहूल गांधींचे संपूर्ण भाषण आत्मविश्वासाने परिपूर्ण होते.भगवान शिवच्या गळ्यात साप आहे,हे निर्भयपणाचे प्रतीक असल्याचे राहूल गांधी यांनी सांगितले तर भगवान शिवाच्या उजव्या खांद्यावर त्रिशूल आहे जे अहिंसेचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले, कारण त्रिशूल असून देखील ते हातात नाही तर खांद्यावर आहे.भगवान शिवाचा एक हात आर्शिवाद देण्यासाठी हा अभयमुद्रेत आपल्याला आढळतो.याचप्रमाणे गुरुनानक सिंग असो किवा पैंगबर,भगवान महावीर,भगवान गौतम बुद्ध, प्रभू येसू या सर्व देवांचे , संतांचे व प्रेषितांचे हात अभयमुद्रेत असून कॉंग्रेसचे चिन्ह देखील अभयमुद्राच म्हणजे निर्भय असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.ही मुद्रा म्हणजेच निडर,र्निभय होण्याची खूण असल्याचे ते म्हणाले.
भगवान शिवच्या गळ्यातील साप देखील हेच सूचवतो र्निभय होऊन सत्याचा सामना करा,सत्यापासून पळू नका,भगवान शिवाचा त्रिशूल देखील हिंसा नाही तर अहिंसेचे प्रतीक आहे.सगळेच हिंदू हे हिंसेचे समर्थन करीत नाही पण सत्ताधा-यांचे हिंदूत्व बेगडी आहे.ते फक्त असत्य,हिंसा आणि नफरतीचे राजकारण करतात,असा घणाघात राहूल गांधींनी पंतप्रधान मोदी व सत्ताधा-यांवर चढवला.यावर मोदी यांनी राहूल यांचा हिंदूवरील आरोप की ते हिंसक आहे फारच गंभीर असल्याचे सदनात उभे राहून सांगितले.यावर राहूल यांनी,मोदी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे हिंदूत्व हिंसक असल्याचे सांगून ,माझा रोख संपूर्ण हिंदू समाजावर नव्हता मी फक्त यांच्याच विषयी बोललो,असे स्पष्टीकरण दिले.खरे हिंदूत्व हे उदारमतवादी,धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगून भाजपच्या हिंदूत्वावर त्यांनी प्रहार केला.जे भाजपला मतदान करीत नाही ,ते हिंदू नाहीत का?असा प्रश्न करताच गृहमंत्री अमित शहा यांनी यावर आक्षेप घेतला.जे स्वत:ला हिंदू म्हणून घेतात ते २४ तास हिंसेचे राजकारण करतात,२४ तास नफरतीचे राजकारण करतात,असा घणाघात त्यांनी मोदी यांच्यावर केला.
कलम ३५६ अन्वये सदनच्या सदस्याला चुकीचे आरोप करण्यापासून थांबवावे अशी मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केली.हिंसेची भावना कोणत्याही धर्मासोबत जोडणे ते ही एका संवैधानिक पदावरील सदस्याकडून हे फार गंभीर असून त्यांनी सदनाची माफी मागावी,अशी मागणी शहा यांनी केली.
हिंदूत्वानंतर राहूल गांधी यांनी मग मोदी यांच्या विविध योजनांचा आणि कार्यशैलीचा समाचार घेतला.त्यांची अग्निवीर योजना ही तरुणांमध्ये भीती निर्माण करणारी आहे.मोदींची अग्निवीर योजना ही तरुणांसाठी ‘यूज ॲण्ड थ्रो’मजदूर योजना असल्याचा घणाघात त्यांनी केला.यावर सरंक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही योजना आम्ही देशातील १५८ मान्यवरांच्या सूचनेनंतरच लागू केल्याचे सांगितले.राहूल गांधी हे सदनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर राहूल गांधी यांनी आमची सरकार आल्यावर ही योजनाच रद्द करणार असल्याचे सदनात सांगितले.अर्थात उत्तर भारतात तरुणांमध्ये मोदी सरकारच्या अग्निवीर योजनेला घेऊन पराकोटीचा विरोध आहे.याचे परिणाम उत्तर प्रदेशात भाजपला लोकसभेच्या निवडणूकीतही भोगावे लागले आहेत.यानंतर राहूल गांधी यांनी देशातील विद्यार्थ्यांच्या उ्द्वीग्नतेचा विषय असणारा ’नीट’चा प्रश्न उपस्थित केला.‘नीट आता प्रोफेशनल राहीली नसून कमर्शियल ‘झाली असल्याचा टोमणा त्यांनी हाणला.शेतक-यांचे आंदोलन ज्याप्रकारे चिरडण्यात आले त्यावर टिका करीत त्यांच्या उत्पादनांना हमी भाव मिळत नसल्याचा अारोप केला.यावर कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आक्षेप नोंदवत आज ही देशात शेतक-यांच्या उत्पादनाला हमी भाव मिळत असल्याचे सांगितले.राहूल गांधी सदनात खोटी माहीती देत असल्याचे शिवराज सिंह म्हणाले.(अर्थात काँग्रेसच्या काळात जो हमी भाव शेतक-यांना एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मिळत होता तो मोदी सरकारच्या काळात दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मिळतो,हा भाग वेगळा. २००६ मध्ये शेतक-यांच्या संदर्भात स्वामीनाथन आयोगाने ज्या सिफारिशी केल्या त्या केंद्रात काँग्रेसची सत्ता असूनही लागू झाल्या नाहीत).
अयोध्येत श्रीराम मंदिराचे निर्माण कार्यासाठी शेकडो घरे,दूकाने उधवस्त करण्यात आली.श्रीरामाच्या प्रतिष्ठापणा सोहळ्यात देशातील सर्वात मोठे उद्योगपती अदानी व अंबानी उपस्थित होते मात्र,अयोध्येच्या उधवस्त नागरिकांनाच या सोहळ्यापसून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप राहूल गांधींनी केला.यामुळे भाजपला श्रीरामाचे मंदिर बांधून देखील पराभवाचे तोंड बघावे लागले,असा टोमणा त्यांनी हाणला.(फैजाबाद हा लोकसभेचा मतदारसंघ असून पाच विधानसभा मतदारसंघाचा त्यात समावेश होतो त्यातील अयोध्या हा एक विधानसभेचा मतदारसंघ आहे.भाजपला अयोध्येतून लीड मिळाली असल्याचा दावा सत्ताधारी करतात)अयोध्येतील घरे आणि दूकाने उधवस्त करुन देखील नागरिकांना कोणताही मोबदला मोदी सरकारने दिला नाही,असा आरोप राहूल गांधींनी केला.यावर जे लोक सदनाचे सदस्य नाहीत तसेच सदनात त्यांच्यावरील आरोपांवर उत्तर देण्यासाठी उपस्थित होऊ शकत नाहीत त्यांचे नाव सदनात घेता येत नाही,असा आक्षेप सत्ताधा-यांनी कलम ३५२ अन्वये नोंदवला कारण,राहूल गांधी यांनी अयोध्येत उपस्थित झालेले अदानी व अंबानी यांचे नाव घेतले होते.सत्ताधा-यांच्या या आक्षेपावर राहूल गांधींनी या उद्योपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज मोदी सरकारने माफ केले किमान शेतक-यांच्या हमी भावासाठी तरी मला बोलू द्या,असा टोमणा त्यांनी हाणला.
आज सदनात राहूल गांधींवर कोणताही प्रोटोकॉल,नियम लागू होऊ शकला नाही.कारण त्यांनी कोणत्याही नियमांना जुमानले नाही व आपले आरोप सुरुच ठेवले.विरोधकांवर केंद्रिय तपास संस्थांच्या दुरुपयोगाची गाथा यावरही कठोर प्रहार केले.इतकंच नव्हे तर ‘माझ्या माईकचा कंट्रोल कोणाकडे आहे?’असा सरळ प्रश्नच लोकसभा अध्यक्षांना विचारला.यावर अध्यक्षांनी या पदावर असे आरोप योग्य नसल्याचे उत्तर राहूल गांधींना दिले.नियमाप्रमाणे अध्यक्ष हे ज्यांना बोलण्याची परवानगी देतात त्यांचा माईक सुरु केला जातो.ज्यांचे बोलण्यासाठी नाव घेतले जात नाही त्यांचे माईक बंद असतात.ही व्यवस्था जुन्या संसद भवनात देखील होती,इथे देखील आहे.त्यामुळे राहूल गांधींनी यांनी संसदेत तसेच बाहेर माध्यमात देखील केलेला आरोप हा चुकीचा असल्याचे ओम बिर्ला म्हणाले.
राहूल गांधींनी अध्यक्षांना देखील आपल्या भाषणात समाविष्ट करीत,अध्यक्ष पद हे सर्वोच्च पद असल्याचे सांगितले.मला व समस्त विरोधी पक्षासाठी हे पद सन्मानीय असेच आहे त्यामुळे अध्यक्षांना देखील सत्ताधारी व विरोधक हे समान असले पाहिजे,अशी पुश्ती त्यांनी जोडली.मात्र,मी विरोधी पक्ष नेतेपदाची शपथ घेतल्यावर तुमच्याशी हात मिळवला तेव्हा तटस्थ राहून तुम्ही माझ्यासोबत हात मिळवला मात्र,पंतप्रधान मोदी यांनी तुमच्याशी हात मिळवला त्यावेळी तुम्ही सर्वोच्च पदावर असतानाही त्यांना वाकून नमस्कार केला,हे योग्य होते का?असा प्रश्न केला.यावर आपल्यापेक्षा मोठ्या वयाचे आणि सन्मानित पदाच्या व्यक्तींना मी वाकून नमस्कार करने हा माझ्या संस्काराचा भाग असल्याचे उत्तर ओम बिर्ला यांनी दिले.
थोडक्यात,राहूल गांधी यांचा विरोधी पक्ष नेते म्हणून लोकसभेत झालेले भाषण हे पुढील पाच वर्षात लोकसभेत त्यांच्या कार्याची दिशा काय राहणार?हे दिग्दर्शित करणारी होती.सत्ताधा-यांनी कलम ३५६ अन्वये चुकीची माहिती संसदेत देण्यापासून रोखणे,कलम ३४९(२)अन्वये जे आरोप केले त्याविषयीचे तथ्य सभागृहात ठेवण्यासाठी अध्यक्षांनी आदेश देणे,कलम ३५२ अन्वये जे सदनात उपस्थित नाहीत त्यांचे नाव घेण्यापासून राहूल गांधींना रोखणे,कलम ३४९ अन्वये अध्यक्षांच्या आसनाकडे पाठ दाखवून सदनाला संबोधित करने इत्यादी अश्या अनेक निमयांवर बोट ठेऊन सत्ताधा-यांनी आज, राहूल गांधींना राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिवाचनानंतर त्यावरील चर्चेत त्यांच्या भाषणादरम्यान अडवणूकीचा प्रयत्न केला.मात्र,राहूल गांधी आज जणू फूल फॉर्ममध्ये होते.त्यांनी अनेकवेळा पंतप्रधानांच्या नावाचाच उल्लेख आरोप करताना केला.नियमानुसार सदनात कोणतेही धार्मिक छायाचित्र,चिन्हे,प्रतीके दाखविण्यास बंदी असताना देखील राहूल गांधींनी ती वारंवार दाखविली.
मोदी यांनी केवळ विरोधकांना,शेतक-यांना,गृहीणींना,देशातील विद्यार्थ्यांना,अग्निवीर योजनेतील जवानांना,केंद्रिय तपास यंत्रणांना आपल्या भीतीत ठेवण्याचे काम केले नाही तर भाजपच्याच लोकांना त्यांनी भीतीत ठेवले,असा जळजळीत आरोपच त्यांनी सदनात केला.त्यांच्या या आरोपावर सत्ताधारी बाकांवरुन कोणताही गदारोळ उठला नसल्याने,बघा हीच वस्तूस्थिती असल्याची कोपरखळी त्यांनी मारली.
उद्या,पंतप्रधान या अभिवाचनावर झालेल्या चर्चेत संसदेत उत्तर देतील.त्यावेळी मणिपूर हे पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात दहा वर्ष कसे पेटलेले होते आणि मनमोहन सिंग हे देखील एकदाही या राज्याच्या भेटीला गेले नाहीत,यावर काँग्रेसवर प्रहार करण्याची शक्यता आहे.काँग्रेसच्या सहा दशकांच्या सत्ताकाळात आणिबाणिपासून तर ‘हिंदू दहशतवाद’या कृतीची देखील ते चिरफाड करतील यात शंका नाही.पी.चिदंबरम आणि तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांनी संसदेत पहील्यांदा ‘हिंदू दहशतवाद’हा शब्द उच्चारला होता.परिणामी,राहूल गांधींच्या ‘हिंदू हिंसेला ’पंतप्रधान कॉंग्रेसच्या ‘हिंदू दहशतवादाची’ कृती उजाळून उत्तर देतील का?यावर देशाचे लक्ष लागले आहे.
………………………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
