

५ लाख कोटींचे कर्ज मोदींनी केले दहा वर्षात २०० लाख कोटी!खर्गेंचा आरोप
मणिपूरमध्ये महिलांची विटंबना मोदी अहमदाबादेत डायमंड हाऊसच्या उद् घाटनात व्यस्त!
संसेदत तरुणांच्या उड्या मोदी संसदेत उत्तर देण्या ऐवजी लखनऊमध्ये सभेत व्यग्र
नागपूर, दि. २८ डिसेंबर: देशात सध्या लोकशाही व संविधान धोक्यात आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रातील ३२ लाख सरकारी पदे रिक्त असतानाही मोदी सरकार नोकर भरती करत नाही, मागासवर्गीयांना संधी मिळेल म्हणून मोदी सरकार नोकर भरती करत नाहीत. मोदींना जगभर फिरण्यास वेळ आहे पण संसदेचे अधिवेशन सुरु असताना संसदेत येण्यास वेळ नाही. संसदेत प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित करून कायदे पास करून घेतले ही लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीला न जुमनणाऱ्या मोदी व भाजपाला धडा शिकवा असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले.
काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात अतिविराट जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते पुढे म्हणाले की, संविधानाने महिला, गरिब, मागास समाजाला अधिकार दिले ते भाजपा देऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालतो तर मोदी आरएसएसच्या विचारधारेवर चालतात. मोदी सरकारने देशावर २०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर करुन ठेवला आहे पण कल्याणकारी योजनांवरील निधीमध्ये कपात केली जाते, मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नाही. मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले आहेत. भाजपाला रोखले नाही तर देश बरबाद होईल, संविधान संपुष्टात येईल.
या प्रसंगी बोलताना खर्गे म्हणाले,की लोकशाही ही धोक्यात आली आहे.पंतप्रधान मोदी हे बेरोजगारीवर बोलत नाही.तीस लाख सरकारी नोक-या रिकाम्या आहेत मात्र मोदी ते भरत नाही कारण आरक्षणातून ती भरावी लागेल.देशाच्या इतिहासात पहील्यांदा फक्त आठ ते दहा हजार नोकरीचे नेमणूकीचे पत्र हे भव्य दिव्य मंचावरुन पंतप्रधानांच्या हस्ते ‘इव्हेंट’साजरा करुन वाटण्यात आले.आमच्या काळात असे नोकरीचे पत्र वरिष्ठ अधिका-यांच्या स्वाक्षरीने पोस्टाने पत्र पाठविले जात असत,मोदींच्या काळात राजकारणाने इतकी हीन पातळी गाठली,असा टोला त्यांनी हाणला.
आमची २०१४ मध्ये सत्ता गेली त्यावेळी देशावर ५ लाख कोटींचे कर्ज होते,गेल्या दहा वर्षात २०० लाख कोटींचे कर्ज देशावर झाले असून उलट सगळ्या सवलती मात्र मोदी सरकारने बंद केल्या.आम्ही बजेटमधील खर्च कमी केल्याचा प्रोपोगंडा मात्र मोदी सरकारकडून सातत्याने केला जात असल्याचे ते म्हणाले.
मणिपूरमध्ये महिलांसोबत बलात्कार होतो,त्यांची नग्न धिंड काढली जाते त्या वेळी देशाचे पंतप्रधान अहमदाबादमध्ये डायमंड हाऊसच्या उद् घाटनात व्यग्र असतात.संसेदत सहा तरुण उडी घालतात,धुडगुस घालतात,त्यावर उत्तर न देता लखनऊमध्ये सभा भरवतात.देशाची संसद ही नेमकी असते कशाला?आम्ही लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी संसदेत जात असतो मात्र,जनतेला उत्तर न देता मोदी हे लोकसभा व राज्यसभेत फिरकलेत सुद्धा नाही,तरी देखील आम्हालाच लोकशाही शिकवतात,अशी टिका त्यांनी केली.
त्यामुळेच येत्या निवडणूकीत जनतेने मोदींना धडा शिकवला नाही तर हेच पुन्हा घडेल.इंडिया आघाडी ही लोकसभेची निवडणूक एकत्रित येऊन लढणार आहे,परिणामी भाजप कुठेही दिसणार नाही.यामुळेच भाजप आमच्याच फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे,असा आरोप खर्गे यांनी केला.तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी भाषण केलं त्यावर मोदी म्हणतात,ते जादुगार आहेत तर मी चमत्कारी आहे,त्यांच्यासारखा खोटं बोलणारा माणूस नाही,निवडणूकी पूर्वी २ कोटी रोजगार देणार असल्याची वल्गना त्यांनी केली.विदेशातून काळा पैशा देशात आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.खोटे बोला पण रेटून बोला,असे त्यांचे धोरण आहे.
सगळी प्रश्ने सोडून आता ते देवाकडे(श्रीराम जन्मभूमी)लागले असल्याचा टोला त्यांनी हाणला.राहूल गांधी यांनी माध्यमकर्मींच्या भूमिकेवर बोट ठेवले मात्र,माध्यमकर्मी हे पगारी असून त्यांना सांगितलेले कामच ते करीत असतात.माध्यमांच्या मालकांमागे ज्या कार्पोरेट कंपन्या आहेत त्यांना आपण दोष दिला पाहीजे,असे सांगून माध्यमकर्मींची पाठराखण याप्रसंगी खर्गे यांनी केली.
आम्ही कर्नाटक,तेलंगणा जिंकलो त्यामुळे आमचा हौसला वाढला आहे मात्र,राजस्थान,छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश हरलो त्यामुळे कार्यकर्त्यांनी हताश होण्याचे कारण नाही,आम्ही लढू,आम्ही इंग्रजांना या देशातून हकलून लावले,आम्ही मोदी,संघ आणि भाजपला कशाला घाबरु?राहूल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बब्बर शेर ही उपमा दिली,शेर कभी घास खाता है क्या?असा सवाल त्यांनी केला.
हा खोटं बोलणारा माणूस आणखी किती दिवस खोटं बोलेल?आपल्याला शक्ती मिळाल्यानंतर आपण न्याय योजना राबवू,महिलांना आर्थिक आधार देऊन सशक्त करु,असे आश्वासन खर्गे यांनी दिले.येत्या निवडणूकीत तुम्ही काँग्रेसला शक्ती द्या,निवडणूकीत जिंकवा आम्ही महाराष्ट्रात न्याय-योजना लागू करु,असे खर्गे यांनी आवाहन केले.
आपले अर्धे अधिक भाषण अस्सल मराठीत करुन त्यांनी मराठी भाषेवरील प्रभूत्वाची चुणूक दाखवली.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा असलेल्या भूमीत काँग्रेस स्थापना दिन साजरा होत आहे याचे स्वागत आहे. महात्मा गांधी यांनी याच नागपुरातून हुकूमशाही सत्तेच्या विरोधात नारा दिला व संपूर्ण देशातून जनता एकवटली आणि १५० वर्षांची ब्रिटिशांची हुकूमशाही राजवट संपुष्टात आणली. नागपुरातून याच भूमितून इंदिराजी गांधी यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा ठराव केला होता. भारताच्या मध्यवर्ती भागात ही सभा होत असून मल्लिकार्जून खरगे व राहुलजी गांधी यांचा संदेश देशात जावा यासाठी ही सभा महत्वाची आहे. हुकूमशाही सत्तेला बाहेर हाकलण्यासाठी, कामगार, शेतकरी, तरुणांना न्याय देण्यासाठी, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी है तैयार हम, हा संदेश या सभेतून दिला आहे. इंदिराजी गांधी यांनी देशात हरित क्रांती, श्वेत क्रांती आणली, देशाचा विकास केला. इंदिराजी गांधी यांनी त्यावेळी नागपुरात सभा घेतली व विदर्भातील जनतेने लोकसभेच्या ११ पैकी ११ जागा विजय मिळून दिला व इंदिराजी पंतप्रधान झाल्या. आज इंदिराजी यांचे नातू राहुलजी गांधी मोहब्बत का संदेश घेऊन आले आहेत, त्यांनाही विदर्भ व महाराष्ट्राने तशीच साथ द्यावी, असे आवाहन पटोले यांनी केले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, स्वातंत्र्यापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाने बलिदान दिले आहे, हे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित निकाल लागला नाही तरी जनतेचा पाठिंबा मात्र वाढला आहे. देशासमोर आज मोठी संकटे उभी आहेत, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला अत्याचार या विषयावर भाजपा सरकार बोलत नाहीत. जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून धर्मांध शक्ती वेगळे मुद्दे पुढे करत आहे. काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आजपर्यंत अनेकांनी केला, काँग्रेस संपली नाही पण ते लोक मात्र संपले हे लक्षात ठेवा. राज्यात समाजा-समाजात वाद उभे केले आहेत, लोकांमध्ये भांडणे लावून सत्तेची पोळी भाजली जात आहे. जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणे ही काँग्रेसची भूमिका आहे पण भाजपा सरकार ते करत नाही. देशाची लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. देशाला व राज्याला मजबूत व स्थिर सरकार देण्यासाठी इंडिया आघाडीला विजयी करा]असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खासदार मुकुल वासनिक यांनी केले तर आभार प्रदर्शन विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.




आमचे चॅनल subscribe करा
